name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

साहित्यिकाची आणि पत्रकारितेची भाषा (Literary and journalistic language)

 साहित्यिकाची आणि पत्रकारितेची भाषा
Literary and journalistic language

Sahityik ani patrakaritechi bhasha

    कोणत्याही समाजात विचारांची देवाणघेवाण होणे महत्त्वाचे असते. त्याशिवाय त्या समाजाची प्रगती होऊ शकत नाही. ह्याचबरोबर शिक्षण, शिकवण, ज्ञानार्जन या सर्वांसाठी संपर्काचे माध्यम म्हणजे त्या समाजाची आपली स्वतःची अशी एक भाषा असते.

सर्वांगांनी परिपूर्ण भाषा
A language that is complete in all respects

  प्रत्येकास आपल्या मनातील उस्फूर्त विचार आणि भावनांचा उद्रेक दाखविण्यासाठी भाषेशिवाय अन्य दुसरे कुठलेच प्रभावी माध्यम नाही. मानवाची बुध्दी जसजशी विकसित होऊ लागली त्यानुसार भाषेचा विकास होऊन भाषा सर्वांगांनी परिपूर्ण होऊन समृध्द झाली. ही भाषा वेगवेगळ्या अविष्कारातून प्रकटू लागली - कधी बोली भाषा, लिखित स्वरुपातील भाषा, वाङ्मयीन भाषा, कवितेची-कथेची-नाटकाची-लेखांची भाषा, वैज्ञानिक भाषा इ.भाषा विकसित झाली

साहित्य म्हणजे काय? 
What is literature?

   साहित्य म्हणजे काय? तर स-हित म्हणजे संगतीने चालणारे, (ह्यावरून 'साहित्य' हा शब्द तयार झाला.) समाजातील लोकांना सोबत घेऊन त्याच्या आचारांना, विचारांना दिशा देऊन चालणारे ते साहित्य आणि त्याची निर्मिती किंवा रचना करणारा तो साहित्यिक. साहित्यिकाने निर्माण केलेल्या साहित्याची त्या त्या राष्ट्राच्या उज्ज्वल आकांक्षेची, राष्ट्राच्या संस्कृतीशी संगती असली पाहिजे तरच ते साहित्य. ह्या साहित्यात जगाचे परिवर्तन करण्याची शक्ती असावी तरच ते साहित्य सत्याच्या कसोटीवर उतरते आणि कालाच्या ओघात चिरंजीवी ठरते.

वैचारिक प्रबोधनाची प्रेरणा
Inspiration for ideological enlightenment

 साहित्यिकांच्या भाषेत कल्पनेचा व बुध्दीचा मुक्त विलास असतो, स्वैरपणे संचार करीत असते. उदा: द्वितीय महायुध्द सुरु झाले होते. कुण्या एका श्रेष्ठ साहित्यिकाने आपल्या काव्यमय भाषेत सांगितले 'पूर्वपश्चिमोत्तमा रक्तस्नानास निघाली. या काव्यपंक्तीवरून सर्वसामान्य जनतेस वा वाचकांना नक्की काय तो बोध होणार आहे ?
  पण एक पत्रकार वा बातमीदार ही गोष्ट कशी सांगेल तर 'दुसरे जागतिक महायुध्द सुरु, हाच तुलनात्मक फरक असतो. असे असले तरी त्या त्या साहित्याची आपापल्या जागी एक किंमत असते. त्या वाङमयात देखील वैचारिक प्रबोधनाची प्रेरणा देणारी शक्ती असते.

पत्रकारितेची भाषा
Journalistic language

       पत्रकारितेची भाषा ही पत्रावर लिहिलेल्या मजकूराप्रमाणे सरळ, साधी, सोपी अशीच असावी. कारण पत्रकार हा समाजातील वास्तव स्थितीचे दर्शन देणारा 'आरसा' (दर्पण) आहे. आरश्यात केव्हाही आपण उभे राहून बघितले तर आपले जे चित्र (प्रतिमा) असेल तसेच जे (प्रतिबिंब) समोर दिसेल. यालाच 'सत्य' समजावे. ह्या वृत्तीतूनच पत्रकाराची मूस तयार झालेली असावी.

पत्रकाराची भाषा
 Journalist's language

  पत्रकाराची भाषा नेहमी सत्य सांगणारीच असावी. भाषेत कल्पनेला आणि बुध्दीच्या विलासाला वाव नसावा. प्रसंगी मखमली चिमटे काढण्याची, विनोद शैलीने लिहून समाजातल्या क्लिष्ट, अनिष्ट रुढींवर प्रहार केले पाहिजेत. जे चांगले असेल ते चांगले म्हणून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तसेच जे वाईट असेल त्यावर टीकेची झोड उठवली पाहिजे. पैशासाठी विकले जाणारे किंवा स्वतःची किंमत ठरविणारी पत्रकारितेची भाषा मुळीच नसावी. एक स्त्री पत्रकार म्हणून नलिनी सिंह यांचे निर्भिडपणाचे व निडरतेचे उदाहरण सतत डोळ्यासमोर ठेवावे.

चोखंदळपणाची दृष्टी 
A vision of neatness

   पत्रकाराची व त्याच्या भाषेची झेप ही नेहमी उत्कृष्टाकडेच असावी. प्रत्येक कार्याकडे वा घटनेकडे बघताना त्याच्याकडे चिकित्सकपणा आणि चोखंदळपणाची दृष्टी असावी. एखाद्या घटनेच्या मुळाशी जाण्याची तयारी हवी. प्रत्येक गोष्ट बुध्दीच्या माध्यमातून तर्काच्या संमतीने तपासून बघण्याची क्षमता म्हणजेच परिपूर्णता हवी. पत्रकारितेची भाषा समृध्द हवी. कल्पनेचा विलास भाषेत मुळीच नसावा. शब्दांची नुसतीच उठाठेव नसावी. "जे न देखे रवी, ते देखे कवी' या उक्तीनुसार भाषेची व स्वतःची समर्पकता असावी पत्रकाराने मानसन्मानांची अपेक्षा न करता वा निंदेस न घाबरता समाजाचे प्रबोधन करणारे "सत्यम् शिवम् सुंदरम्" भाषेत लिखाण करत राहिले पाहिजे तरच तो वर्तमानकाळाच्या कसोटीवर उतरु शकेल.

भाषेचा समन्वय  
Language coordination

  साहित्यिक व पत्रकार दोघेही आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ आहेत. या दोन्हींचा आणि त्यांचा भाषेचा समन्वय साधला गेला तर वाचक आणि वर्तमानपत्र यांच्यातील हे दोन्ही दुवे पुलाचे आधारस्तंभ ठरतील. 'वर्तमानपत्र' ह्या लोकशाहीच्या दुसऱ्या तीन स्तंभावर (विधीमंडळ - न्यायमंडळ - कार्यकारीमंडळ) आपला अंकूश ठेवून ही लोकशाहीची कोसळू पाहणारी इमारत कोसळण्यापासून वाचवील. या तिन्ही व्यवस्थेकडून देशाची स्थिती सुधारेल, सारे काही ठीक होऊन रामराज्य वा सुराज्य येईल.

साहित्यिक व पत्रकाराची युती  
Alliance of writers and journalists

  आजची विधीमंडळाची स्थिती सर्वत्र गोंधळाची आहे तर न्यायमंडळाची स्थिती "मिटवून टाकू" च्या भाषेत चालू आहे. तर कार्यकारी मंडळ मात्र "नरो वा कुंजरो वा" या न्यायानुसार भ्रष्टाचाराच्या गंगेत सुखेनैव डुंबत आहे. चवथ्याची स्थिती देखील स्थिर नाही तेथेही आता अपप्रवृत्तीने आपले बस्तान बसविले आहे. यासाठी साहित्यिक व पत्रकाराची युती झाली (राजकीय नव्हे तर वैचारिक!) तरच बौध्दिक, वैचारिक, मानसिक बदलाची नांदी होऊन हा निष्क्रिय समाज बदलत्या स्थितीशी मुकाबला करण्यास सुसज्ज होऊ शकेल.

समाजपुरुषास जागे करण्याचे कार्य 
The task of awakening the social man

    सध्या विलक्षण अशा राजकीय, सामाजिक, आर्थिक युगाच्या उत्पातास सुरुवात झाली आहे. जुनी उपखंडात्मक राष्ट्र लयास जाऊन नवे देश, राष्ट्र निर्माण होत आहेत. जुनी सामाजिक व सांस्कृतिक जीवनमूल्ये टाकाऊ झाली आहेत. नवीन येणाऱ्या बदलांची, वादळाची दखल घेण्याचे कार्य या दोघांना करावयाचे आहे. त्यासाठी निद्रिस्त व अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या समाजपुरुषास जागे करण्याचे अवघड आणि कठीण कार्य या कलमबहादुरांना करावयाचे आहे. त्यासाठी या समाजाला योग्य दिशेने पाऊल टाकावयास हवे. तरच या झंझावातात या तुफानात हा समाज, तुम्ही-आम्ही व आपले राष्ट्र टिकून राहील.

© दीपक केदू अहिरे, नाशिक
संज्ञापन व वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रम विभाग
पूर्व प्रसिध्दी : श्रद्धा (वार्षिक नियतकालिक : ९४-९५, एच.पी. टी. कॉलेज, नाशिक)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

एव्ही ब्रॉयलर-सोरा होल्डिंग्ज यांच्यात सामंजस्य करार (MoU between AV Broiler and Sora Holdings)


एव्ही ब्रॉयलर-सोरा होल्डिंग्ज यांच्यात सामंजस्य करार
MoU between AV Broiler and Sora Holdings

Akashveer broiler

नाशिक : जागतिक पोल्ट्री ब्रीड उत्पादनात एव्ही ब्रॉयलर या भारतीय कंपनीने अल्पावधीत मुसंडी मारीत या उद्योगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून आफ्रिका खंडातील सेनेगल या देशातील सोरा होल्डिंग या कंपनीसोबत एव्ही ब्रॉयलरचा सामंजस्य करार नुकताच सह्याद्री फार्म, मोहाडी येथे करण्यात आला. 

  यावेळी एव्ही ब्रॉयलरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण गांगुर्डे, सोरा होल्डिंगचे अध्यक्ष सिस्कोममाऊ व अॅडफीडचे संचालक मॅलिकसेने उपस्थित होते. पोल्ट्री ब्रिड उद्योगात भारत व सेनेगल (आफ्रिका) या दोन देशातील उद्योजकात झालेला हा भारतातील पहिलाच करार मानला जात आहे. 

  आफ्रिका खंड हा पोल्ट्री फीड उत्पादनांचा मोठा आयातदार आहे. आफ्रिकेकडून भारतीय पोल्ट्री उत्पादनांना प्राधान्य दिले जात असताना पुढील काळात या करारातून भारतीय पोल्ट्री उद्योगांसाठी संधी वाढणार असल्याचे श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

     सेनेगल देश व एकूणच आफ्रिका खंड हा ब्रॉयलर पक्षी व अंड्याचा मोठा ग्राहक देश आहे. यासाठी या देशाला अमेरिका व युरोप देशातून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे; मात्र हे अवलंबित्व हे सुयोग्य नसून ते महाग असल्याचे सेनेगल देशातील पोल्ट्री व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

   त्या तुलनेत भारतातून येणाऱ्या पोल्ट्री ब्रीडला त्यांनी प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सेनेगल येथील पोल्ट्री अनुवंश आयातदार व ग्राहकांनी एव्हि ब्रॉयलरच्या ब्रीडला पसंती दर्शविली आहे. भारतातील एव्हि ब्रॉयलर व सेलेगन येथील सोरा होल्डिंग्ज यांच्यात याच संदर्भात द्विपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यामुळे भारतीय पोल्ट्री उत्पादनांच्या या दोन्ही देशातील व्यापाराला चालना मिळणार असल्याचे श्री. गांगुर्डे यांनी सांगितले.

Akashveer

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

वाईनरीसाठी यंत्रसामुग्री I Winery equipment

वाईनरीसाठी यंत्रसामुग्री
Winery equipment


Wainarisathi yantra samurgi

     कृषियोगचा द्राक्ष वाईनबद्दल समग्र माहिती देणारा व गैरसमज दूर करणारा संग्राह्य द्राक्ष वाईन विशेषांक प्रकाशित झाला होता. 

      या अंकात वाईनसाठी द्राक्ष लागवड, द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण, वाईनरीसाठी यंत्रसामुग्री, वाईन आणि आरोग्य, भारतीय वाईनला निर्यातीची संधी, वाईन बनविण्याची घरगुती पध्दत, वाईन उद्योगातील यशाची सुत्रे तसेच वाईन उद्योगाचा प्रकल्प अहवाल इ. विषय देण्यात आले होते. त्यातील वाईनरीसाठी यंत्रसामुग्री या विषयावरचा ब्लॉग देत आहोत...

द्राक्षरस यंत्र
 Wine press

यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार उपलब्ध असतात-

१) न्यूमॅटीक प्रेस 

२) हायड्रॉलिक प्रेस

वेगवेगळ्या कपॅसिटमध्ये हे उपलब्ध होवू शकतात 

डिस्टेमर क्रशर
Distemer Crusher

हा क्रशर रेड वाईनसाठी द्राक्षाचे मणी देठापासून वेगळे करून थोड्याच प्रमाणात क्रश करणेसाठी वापरतात. तसेच व्हाईट द्राक्षांची देठ बाहेर काढण्यासाठीच याचा वापर केला जातो. 

पंम्प
Pump

विविध प्रकारचे  पंम्प वाईनरीमध्ये वापरले जातात यापैकी प्रामुख्याने डिस्टेमर बरोबर वापरला जाणारा पंप हा संपूर्ण द्राक्ष ट्रान्सफर करणेसाठी वापरला जातो. तो इसेंट्रीक स्क्रु किंवा लांब टाईपचा वापरला जातो. सर्व पंप स्टेनलेस स्टीलचेच असावेत.

फरमेंटेशन व्हेसल्स
 Fermentation Vessels

सामान्यतः रेड वाईन आणि व्हाईट वाईनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेसल्स वापरले जातात. दोघांच्या संरचनेमध्ये फरक असला तरी दोन्ही स्टेनलेस स्टीलमध्येच बनविलेले असतात व त्याला तापमान नियंत्रणासाठी जॅकेट किंवा क्वाईल्स दिलेले असतात. 

चिलींग प्लांट   
Chilling Plant   

तापमान नियंत्रणासाठी चिलींग प्लांटची आवश्यकता असते व चांगल्या कार्यक्षमतेचा, वाईनरीच्या क्षमतेला योग्य चिलींग प्लांटची निवड करणे अतिशय महत्वाचे असते. कारण वाईनरीमध्ये सर्वात जास्त विजेची गरज ह्याच प्लांटलाअसते म्हणून चुकिचा निर्णय आपल्या वाईनरीला घातक ठरू शकतो.

Wainarisathi yantra samurgi

फिल्ट्रेशन सिस्टीम
Filtration system

वाईन फिल्टर करणेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम असतात. त्यात प्रामुख्याने प्लेट अॅन्ड फ्रेम टाईप, केंट्रीज टाईप, रिवर्स ओसमॉयसीस, रोटरी वॅक्यूम टाईप फिल्टर्स असतात.

 बॉटलींग एक्विपमेंटस अॅण्ड मशिन्स 
Bottling Equipments and Machines

वाईन बाटलीमध्ये भरणेसाठी, स्वच्छ करणेसाठी बॉटल वॉशिंग मशिनची गरज भासते ह्यात बॉटल स्वच्छ करून झाल्यावर बॉटल फिलींग मशिन्सवर वाईन बॉटलमध्ये भरण्यासाठी सिंगल हेड मशिनपासून ते दोनशे हेडपर्यंत फिलर्स असतात. वाईनरीच्या क्षमतेनुसार याची निवड करता येते. बॉटलींगमध्ये वाईन भरल्यानंतर कॉर्किंग मशीनच्या सहाय्याने कॉर्क लावले जाते व त्यावर फॉईलींगच्या मदतीने अॅल्युमिनीयम अथवा इतर फॉईल लावून लेबलिंगसाठी बॉटल तयार करण्यात येते.

वॉटर ट्रिटमेंट व हॉट वॉटर सिस्टिम 
Water treatment and hot water system

आपल्या पाण्यामध्ये बऱ्याच प्रकारचे क्षार असतात. हे पाणी जर जसेच्या तसेच वापरले तर त्यातील काही क्षार मशिन्सच्या आतील भागात चिकटतात तसेच बाटल्यांच्या आतसुध्दा राहतात व प्रक्रिया होऊन वाईनमध्ये मिसळले जातात. याचा परिणाम सरळ वाईनच्या गुणवत्तेवर होतो म्हणून वाईनरीमध्ये वॉटर ट्रिटमेंट संयंत्र वापरणे अत्यंत गरजेचे असते.

अद्ययावत प्रयोगशाळा 
Modern laboratory

वाईन तयार होत असतांना त्यातील प्रत्येक घटकाचे प्रत्येक टप्यावर, त्यांचे प्रमाण तसेच गुणवत्ता तपासण्यासाठी व त्यात आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी प्रत्येक वाईनरीमध्ये अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा असणे अपरीहार्य आहे. वाईनची द्राक्षे आणण्यापासून तर वाईन बाटलीमध्ये बंदिस्त होईपर्यंत विविध परिक्षणे व चाचण्या घेणे आवश्यक असते. व ह्यातूनच आपण उत्कृष्ट वाईनचे उत्पादन करू शकतो 

प्रशिक्षित मनुष्यबळ
Trained manpower

अतिशय महत्वाचा घटक म्हणजे वाईनरीमध्ये काम करणारे मनुष्यबळ, ह्या उद्योगामध्ये ज्या मशिन्स व संसाधने वापरली जातात. त्या व्यवस्थित चालविणे, त्यांची निगा राखणे व त्या अखंडपणे चालविता याव्यात यासाठी कामगार प्रशिक्षीत असणे गरजेचे असते. अन्यथा अगदी किरकोळ कारणामुळे वाईनरीचे काम बंद होवून नुकसान होणेची शक्यताही असते.

   द्राक्ष वाईनचा दर्जा टिकवणे व त्यासाठी लागणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्माण करणे या उद्देशाने देशातील पहिली द्राक्ष प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण व संशोधन इन्स्टीट्यूट सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आहे. भारती विदयापीठाच्या सहकार्यानेच ती स्थापन करण्यात आली आहे तसेच पलूस येथे दीड कोटी रूपये खर्चाच्या वाईन लॅबोरेटरीचीही निर्मिती झाली  आहे.

कृषियोग द्राक्ष वाईन विशेषांक
मूल्य : ५० रू., पाने : ६५

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

बोर लागवड ते प्रक्रिया उद्योग : किफायतशीर शेती व मूल्यवर्धनाचा नफा | Ber Cultivation & Processing Industry

बोर लागवड ते प्रक्रिया उद्योग

शेतात बोर – शेतकरी बिनघोर!
Ber Cultivation to Processing Industry | Bor Lagavad ani Prakriya Udyog

ber lagvad te prakriya udyog

प्रस्तावना

    किफायतशीर व शाश्वत शेतीसाठी आज केवळ कच्चा माल विकण्यापेक्षा मूल्यवर्धन (Value Addition) करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शेतात उत्पादित होणाऱ्या पिकांपासून विविध उपपदार्थ तयार केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो. अशा पिकांमध्ये बोर (Ber / Indian Jujube) हे पीक अत्यंत उपयुक्त, कमी खर्चिक आणि बहुउपयोगी आहे.
    हलक्या ते भारी जमिनीत तग धरू शकणारे, कमी पाण्यावर येणारे आणि प्रक्रिया उद्योगासाठी योग्य असलेले हे पीक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा सुरक्षित पर्याय देऊ शकते.


बोरातील पोषणमूल्ये – अन्नघटकांचा खजिना


ber lagvad te prakriya udyog

बोर हे केवळ चविष्टच नाही तर पोषणमूल्यांनी समृद्ध फळ आहे. शरीरासाठी आवश्यक असणारी:

  • क जीवनसत्त्व (Vitamin C)

  • खनिजद्रव्ये

  • तंतुमय घटक

यांचे प्रमाण बोरात भरपूर असते. बोरातील पोषक घटकांचे प्रमाण सफरचंदासारखेच असून क जीवनसत्त्वाचे प्रमाण सफरचंदापेक्षा अधिक आहे. भारतात बोराची लागवड प्राचीन काळापासून होत असून स्थानिक व सुधारित अशा अनेक जाती विकसित झाल्या आहेत. आज “अॅपल बोर” सारख्या सुधारित जाती मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली येत आहेत.


कोरडवाहू भागातील लोकप्रिय फळपीक

बोराची अभिवृद्धी प्रामुख्याने डोळे भरून केली जाते. महाराष्ट्रात:

  • उमराण

  • कडाका

  • मेहरूण

या जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. कोरडवाहू फळशेतीत बोर हे अत्यंत लोकप्रिय पीक आहे. हे झाड कणखर, चिवट आणि दुष्काळ सहनशील असून कमी देखभालीतही चांगले उत्पादन देते.


शास्त्रशुद्ध लागवड – यशाची गुरुकिल्ली


ber lagavd te prakriya udyog


बोराची लागवड शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास पडीत जमिनीतही भरघोस उत्पादन मिळू शकते.

जमीन व हवामान

  • किमान १ मीटर खोल मुरमाचा थर असलेली जमीन

  • जमीन pH: ६ ते ८

  • मध्यम प्रतीची, पोयट्याची व निचरा होणारी जमीन

  • उष्ण व कोरडे हवामान बोरासाठी आदर्श

साधारणतः पावसाळ्यात लागवड केली जाते. लागवडीपूर्वी अंतर निश्चित करून खड्डे खोदावेत आणि रोपांची लागवड करावी.


महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर लागवड

बोराचे उगमस्थान दक्षिण आशिया मानले जाते. अन्नधान्य पिके जिथे चांगली येत नाहीत अशा कोरडवाहू व डोंगर उताराच्या जमिनीत बोराची लागवड फायदेशीर ठरते.

महाराष्ट्रात प्रामुख्याने:

  • सोलापूर

  • अहमदनगर

  • उस्मानाबाद

  • लातूर

  • पुणे

  • जळगाव

  • नाशिक

  • धुळे

या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर बोर लागवड केली जाते. राज्य शासनाच्या फलोद्यान कार्यक्रमामुळे बोराचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे.


सर्व प्रकारच्या जमिनीत येणारे पीक

बोराची झाडे उष्ण हवामान चांगल्या प्रकारे सहन करतात. कोरड्या हवामानात:

  • झाडांची वाढ चांगली होते

  • फळधारणा वाढते

अतिआर्द्र भागात रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उन्हाळ्यात पानगळ होऊन झाड सुप्तावस्थेत जाते, ज्यामुळे तीव्र उन्हापासून झाडाचे संरक्षण होते. अत्यंत हलक्या मुरमाड जमिनीपासून भारी जमिनीतही बोराचे पीक चांगले येते.


सुधारित जातींची निवड

बोराची अभिवृद्धी बियांपासून किंवा डोळे भरून करता येते. मात्र:

  • बियांपासून लागवड केल्यास फळे उशिरा लागतात

  • गुणधर्म स्थिर राहत नाहीत

म्हणून डोळे भरून अभिवृद्धी करणे अधिक फायदेशीर आहे.

महाराष्ट्रात लोकप्रिय जाती:

  • उमराण

  • कडाका

  • सन्नुर-२

  • सन्नुर-६

  • चुहारा

  • मुक्ता

  • गोला

  • इलायची

  • मेहरूण


झाडांना वळण देणे व छाटणी

बोराच्या झाडांना सुरुवातीपासून योग्य वळण देणे आवश्यक आहे.

  • डोळा फुटल्यानंतर अनावश्यक फुटी काढून टाकाव्यात

  • मुख्य खोडावर ३–४ मजबूत फांद्या ठेवाव्यात

  • पहिल्या ३ वर्षांत सांगाडा तयार करावा

बोराचा बहर नवीन फुटींवर येतो, त्यामुळे अधिक उत्पादनासाठी छाटणी अत्यंत महत्त्वाची आहे.


खत व पाणी व्यवस्थापन

पूर्ण वाढ झालेल्या झाडासाठी:

  • ४–५ घमेले शेणखत

  • ५०० ग्रॅम नत्र

  • २५० ग्रॅम स्फुरद

  • २५० ग्रॅम पालाश

पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नसते. फळधारणेच्या काळात मात्र नियमित पाणी देणे आवश्यक आहे. काळ्या जमिनीत ८–१० दिवसांनी पाणी द्यावे.


फळांची काढणी व उत्पादन

छाटणीनंतर:

  • जुलै–ऑगस्ट: फुलोरा

  • नोव्हेंबरपासून: फळकाढणी

  • हंगाम: जानेवारीपर्यंत

फळे योग्य अवस्थेत तोडणे महत्त्वाचे आहे. अति लवकर किंवा उशिरा काढणी केल्यास बाजारभाव कमी मिळतो.
➡️ प्रति झाड ७५–१०० किलो
➡️ हेक्टरी १५–२० टन उत्पादन मिळते.


बोर प्रक्रिया उद्योग – मूल्यवर्धनाची संधी


ber lagavd te prakriya udyog

बोरापासून विविध प्रक्रिया उत्पादने तयार करता येतात:

  • सुकामेवा / खजूर

  • बोराचा रस

  • सरबत

  • स्क्वॅश

  • सिरप

  • वाईन (मद्य)

  • दुटीफ्रुटी

  • सुकविलेली बोरे

  • बोर पावडर

यामुळे कच्च्या मालापेक्षा अनेक पटीने जास्त नफा मिळतो.


बोराच्या रसापासून पेये – प्रक्रिया पद्धत

मोठ्या, पिवळसर बोरांची निवड करावी.

  • पाण्यात टाकून खराब फळे वेगळी करावीत

  • बिया काढून लगदा तयार करावा

  • थंड तापमानात ठेवून मळी वेगळी करावी

  • मलमल कापड व फिल्टर पेपरने गाळणी करावी

➡️ १ किलो बोरापासून ४०–४५% रस मिळतो.
या रसापासून सरबत, स्क्वॅश, सिरप व वाईन तयार करता येते.


निष्कर्ष

बोर लागवड ते प्रक्रिया उद्योग हा शेतकऱ्यांसाठी:

  • कमी खर्चाचा

  • दुष्काळी भागासाठी योग्य

  • प्रक्रिया उद्योगाशी जोडलेला

  • शाश्वत व नफ्याचा व्यवसाय

आहे. बोर शेतीमुळे शेतकरी खऱ्या अर्थाने “शेतात बोर – शेतकरी बिनघोर” होऊ शकतो.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

शेततळीतील मत्स्यसंवर्धन (Pond fish farming)

शेततळीतील मत्स्यसंवर्धन
Pond fish farming


Matsya sanvardhan

   विविध प्रकारच्या तलावात, जलाशयात मत्स्यशेतीचे तंत्रज्ञान विकसित आहे. मात्र आता शेततळ्यांत शेतकऱ्यांनाही मत्स्यशेती करणे शक्य आहे.

  शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन प्रकल्पांतर्गत, रोजगार हमी योजनेअंतर्गत व वैयक्तीकरित्या शेतकऱ्यांनी केलेल्या शेततळी या मृद व जलसंवर्धनाच्या उद्देशाने पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवणूक करून ते उन्हाळ्यात जसजशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाईल तेव्हा शेतीसाठी फळबागासाठी शाश्वत पाण्याचा पुरवठा करता यावा या हेतूने शेतकऱ्याकडील उपलब्ध क्षेत्रफळानूसार विविध आकारांची शेततळी निर्माण करण्यात आलेली आहेत. या शेततळ्यांतून साधारण जूलै-फेब्रुवारी या काळात जलसाठा करून ठेवला जातो. पाणीसाठा मार्च ते जून या कालावधीत शेतीसाठी आवश्यकतेप्रमाणे वापरला जातो.
      मातीचे वेगवेगळे प्रकार असतात त्यात जांभ्या दगडापासून तयार झालेल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते. अशाच प्रकारे मुरमाड जमीनीतही पाणी वेगाने झिरपते. अशा वेळी प्लास्टीक कागदाचे अस्तर असलेली शेततळी शेतकऱ्यांना फायदेशिर ठरलेली आहे. अशा शेततळ्यात मत्स्यशेतीस चांगला वाव आहे.

उद्देश
Purpose

       केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या शेततळ्यामुळे उपलब्ध झालेले जलक्षेत्र ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा विनियोगामुळे खालील उद्देश साध्य होतात.
१) ग्रामिण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे,
२) उपलब्ध पाण्याचे नियोजनबध्दरित्या वापर करून मत्स्योत्पादनाद्वारे जिल्ह्याची तसेच राष्ट्रिय उत्पादकतेत वाढ करणे.
३) प्रथिनयुक्त सकस अन्न उपलब्ध करून देणे.
४) शेतकऱ्यांचे मत्स्यशेतीतून मत्स्योत्पादन घेवून आर्थिक व सामाजीक जीवनमान उंचावणे
५) जिल्ह्यात मत्स्यसंवर्धनास प्रोत्साहन देणे.
   वरील उद्देश साध्य करण्याची जबाबदारी म्हणून शेततळीधारक शेतकऱ्यांनी शेततळीत मत्स्योत्पादन करणे आवश्यक आहे.

Matsya sanvardhan

तांत्रीक पध्दतीने शेततळ्यातील मत्स्यशेती :
Fish farming in ponds using technical methods:


अ) मत्स्यसंवर्धन पुर्वतयारी :
१) शेततळी सुकविणे किंवा कोरडे करावे.
२) प्लास्टीक अस्तर नसलेल्या शेततळ्याची नांगरणी करावी, त्यामुळे मातीलील विषारी आणि निरूपयोगी वायुमुक्त होतील.
३) शेततळीत प्रथम पाणी घेतांना पाणी गाळून घ्यावे. जेणेकरून पणलोटक्षेत्र / विहीर / कॅनॉलद्वारे येणाऱ्या पाण्याबरोबर बेडूक, निकृष्ट जातीचे मासे, चाम खेकडे, पाणसाप इ. मत्स्यबीज भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत यासाठी व्यवस्था करावी.
४) शेततळ्यात पाणी घेतल्यावर बीज संचयनापुर्वी १० ते १५ दिवस अगोदर चुणा योग्य प्रमाणात म्हणजेच २५० ते ५०० किलो प्रतीहेक्टरी मिसळावा. शेततळ्यातील पाण्याच्या / मातीचा सामु सहा पेक्षा जास्त असेल तर चुण्याची मात्रा हेक्टरी २५० किलो वापरावी. जर पाण्याचा / मातीचा सामू पाच ते सहा असेल तर चुण्याची मात्रा ५०० किलो प्रतीहेक्टर असावी. जर सामू पाच पेक्षा कमी असेल तर चुण्याची मात्रा प्रतीहेक्टर १००० किलो वापरावी.
५) शेततळ्यातील निकृष्ट जातीचे मासे (मत्स्यबीज भक्षक) काढून टाकावे, त्यासाठी ओढप जाळ्याचा वापर करावा किंवा ब्लिचींग पावडर प्रतीहेक्टर ३०० किलो, १ मीटर खोली असलेल्या पाण्याकरीता किंवा मोहाढेप हेक्टरी १५० ते २०० किलो या प्रमाणात वापरता येते. तसेच ब्लीचींग व मोहाढेपच्या वापराची तीव्रता १५ दिवस टिकत असल्याने त्या कालावधीत मत्स्यबीज साठवणूक करण्यात येवू नये.
७) मातीच्या शेततळ्यातील पाण्याची पातळी किमान २.०० ते २.५० मीटर असावी. प्लास्टीक आच्छादन असलेल्या शेततळ्यात ६ ते ७ मीटर व त्यापेक्षा अधिक पाणीसाठा असतो. शेततळ्यात नैसर्गीक खाद्य निर्माण होण्यासाठी शिफारशीत मात्रेमध्ये खत खाद्याचा वापर करावा. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे
  मात्रा ही दरहेक्टरी जलक्षेत्राकरिता मात्रेचे प्रमाण (कि.ग्र.)असून मत्स्यबीज संचयनाच्या ५ दिवस आधी शेंगदाणा पेंड ७५० कि.ग्र. प्रती हेक्टर, भातकोंडा ७५० कि.ग्र. प्रतीहेक्टर, शेणखत २००० कि.ग्र. प्रतीहेक्टर (प्लास्टिक अच्छादन असलेल्या तलावात शेणखत टाकू नये.), सुपर फॉस्पेट २०० कि.ग्र.  प्रतीहेक्टर या खतखाद्याचा वापर करावा.
   शेततळ्यात मत्स्यबीज संचयन करण्यापुर्वी त्यात प्लवंगाची निर्मिती योग्य प्रकारे झाली आहे का ? हे पाहणे गरजेचे असते.

 मत्स्यशेतीसाठी निवडक जाती व त्यांची वैशिष्टे 
 Selected breeds for fish farming and their characteristics

     
 कटला, रोहू, मृगळ या तीन प्रमुख जातींना भारतीय प्रमुख कार्प असे संबोधण्यात येते. जलद वाढणाऱ्या उपरोक्त तीनही जाती खाद्यासाठी एकमेकांत स्पर्धा न करणाऱ्या तसेच पाण्यातील तीन वेगवेगळ्या थरातील उपलब्ध नैसर्गिक अन्न (प्राणी प्लवंग वनस्पती, प्लवंग) व पुरक खाद्य खावून वाढणाऱ्या मत्स्यभक्षक नसलेल्या व बाजारात चांगला भाव मिळणाऱ्या आहेत. तसेच उपरोक्त माशांचे बीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होवू शकते उपरोक्त माशांबरोबर मिश्रशेतीमध्ये चिनी कार्प, गवत्या चंदेऱ्या व सिप्रीनस हे सुध्दा आहेत.
  मत्स्यभक्षक नसलेले मत्स्यबीज नैसर्गिक तळी व कृत्रिम तलावात संवर्धन करता येवू शकतात.

 मत्स्यबीज संचयन :
Fish seed storage:


 १) संचयनाचे प्रमाण : शेततळ्यात जलद वाढणाऱ्या आणि चांगला भाव मिळत असणाऱ्या जातीचे मत्स्यभक्षक असलेल्या पुरक खाद्य खावून वाढणाऱ्या आणि चांगला भाव मिळत असणाऱ्या जातीचे मत्स्यबीज संचयन करावे. शेततलावात पाणीसाठा झाल्यावर खत खाद्य मात्रा दिल्यानंतर तलावात नैसर्गिक खाद्य तयार होते, त्यानंतर शेततलावात निवडक जातीचे बोटुकली आकाराचे (५० मी.मी.) किंवा २ इंच लांबीचे) बीज साठवणुक करणे अपेक्षित असते.

      मत्स्यबीज उपलब्धतेनुसार शेततलावात तीन, चार, सहा जातीच्या माशांचे बीज साठवणुक करून मत्स्यशेती करता येते. दर हेक्टरी मत्स्य बोटुकलीचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते.
  माशांची जात कटला, रोहू, मृगळ, सायप्रिनस, गवत्या मासा (ग्रास कॉर्प), चंदेरा (सिल्व्हर कॉर्प) हे १०,००० इतक्या संख्येने लागतात. तर पंगॅशिअस आणि नर तिलापीया ५०,००० प्रती हेक्टर इतके लागतात.

Matsya sanvardhan

  शेततळीला प्लास्टिक अच्छादन असल्यास त्या तलावाची खोली जास्त असल्याने मत्स्यबीज संचयनाचे प्रमाण प्रतीहेक्टर २०००० नग बोटुकली असे असावे. मात्र अशा तलावामध्ये कटला ३०%, रोहू ३०%, मृगळ २०%, सिप्रिनस २०% असे प्रमाण तांत्रिकदृष्टया योग्य असून त्यापासून चांगले उत्पन्न मिळते.

 मत्स्यबीज साठवणूक :
 Fish seed storage:-

  
 शेततलावात पाणीसाठा झाल्यावर खाद्यमात्रा देणे आवश्यक असते. खत मात्रा दिल्यानंतर दोन ते तीन दिवसात तलावात नैसर्गिक खाद्य तयार झाल्यानंतर शेततलावात निवडक जलद वाढणाऱ्या माशांचे ५० मी.मी. आकाराचे बीज साठवणूक करणे अपेक्षित असते. मत्स्यबीज उपलब्धतेनुसार शेततलावात तीन, चार, सहा जातीच्या माशांचे बिज साठवणूक करून मत्स्यशेती करता येते.
     मत्स्यबीज संचयन करतांना पिशवीचे तोंड उघडल्यानंतर पिशवी शेततलावातील पाण्यात बुडवून दोन्ही पाणी एकत्र करून हळूहळू पाण्यात माशांचे पिल्ले स्वतःहून जातील अशा पध्दतीने सोडावेत. मत्स्यबीज शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी थंड वातावरणात सोडावेत.

 पुरक खाद्य :
 Supplementary food 

   
 शेततळी किंवा कृत्रिम तळी मत्स्यसंवर्धनासाठी पुरक खाद्य शेंगदाणापेंड, भाताची कणीकोंडा, तरंगते मत्स्यखाद्य, पैलेटेड मत्स्यखाद्य, गिरणीचे पीठ, पोल्ट्रीखाद्य व शेतीतील उरलेल्या अत्रधान्याचा भरडा, तसेच अँग्रीमीन फोर्ट पावडर याचा चांगल्याप्रकारे वापर करता येतो. शेंगदाणा ढेप व भातकोंड यांचे समप्रमाण (१:१) असावे. खाद्य वापराचे प्रमाण हे संचयन केलेल्या मत्स्यबीजाच्या अंदाजीत वजनाच्या ३ ते ५ % असावे.
   मत्स्यखाद्य पाण्यात भिजवून शेततलावात ठिकठिकाणी गोळे करून टाकावेत किंवा सदरचे खाद्य बॅग किंवा कांद्याच्या गोणीतून फिडींग / बास्केट फिडींगद्वारे दिल्यास माशांना सर्व खाद्य गरजेप्रमाणे मिळून खाण्याचे प्रमाण कळते व वेळेत खातात काय ? खाद्याचा पुर्ण विनियोग होत आहे काय ? याची पडताळणी करता येते. तसेच प्लास्टिक शेततळ्यात खाद्य तळाला जावून साठणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण प्लास्टिक तलावात तळाला साठलेल्या अन्नाचे विघटन होत नाही. परिणामी पाणी दुषित होण्यास सुरूवात होवून अपेक्षित मत्स्योत्पादनावर परिणाम होतो. माशांची वाढ जलद व्हावी यासाठी पुरक खाद्याची मात्रा ५०० ग्रॅम वाढ होईपर्यंत साठवणूक केलेल्या माशांचे पिल्लांचे वजनाचे ५% व तदनंतर ३% प्रमाणात मत्स्यखाद्याची मात्रा देण्यात यावी.
  प्रतीहेक्टर जलक्षेत्राकरीता सर्व घटकांचा समावेश असलेले म्हणजेच शेंगदाणा ढेप, भातकोंडा, मत्स्यखाद्य पॅलेटेड, अॅग्रीमीन पावडर, गिरणीचे पीठ यांचे मिश्रण असलेले खाद्य द्यावे.
  माशांना द्यावयाचे पुरक खाद्याचे मिश्रण दिलेल्या प्रमाणानुसार दिवसातून सकाळ, दुपार, सायंकाळ असे तीन वेळा विभागून द्यावे. त्यामुळे तलावातील सर्व माशांना आवश्यकतेनुसार खाता येते व योग्य प्रमाणात वाढ मिळते.

 माशांची वाढ तपासणी :
 Fish growth check :

 
  शेततळ्यातील मत्स्यसाठा व त्याची वाढ याचा अंदाज घेवून खाद्याची मात्रा कमी अधिक करणे, मोठे विक्रीयोग्य मासे काढणे, माशांना एखादा रोग झाला असल्यास उपाययोजना करणे शक्य व्हावे यासाठी तळ्यात २० ते ३० दिवसात एकदा तलावातील मासे फेकजाळे, ओढप जाळे याद्वारे पकडून वाढ तपासावी. त्यानुसार पुरक खाद्याची मात्रा वाढविण्यात यावी. 

  या पाहणीत आढळून आलेल्या माशांची संख्या, वजन, लांबी याची नोंद ठेवावी. तळ्यातून जाळे फिरवले गेल्याने माशांना व्यायाम मिळतो व वाढ होण्यास मदत होते. मत्स्यबीज अधिक घनतेने साठविले असल्यास पाण्यात विरघळलेल्या प्राणवायू, पाण्याचे तापमान याचे परिक्षण नियमित करणे फायदेशिर असते.

 मत्स्यउत्पादन व मासेमारी :
 Fish production and fishing:

    
  मत्स्यसंवर्धनाच्या ८ ते १० महीन्याच्या कालावधीत सरासरी ७५० ग्रॅम व त्यापेक्षा अधिक थोड्याफार प्रमाणात माशांची वाढ होत असते. तांत्रीक पध्दतीने मत्स्यसंवर्धन केल्यास प्रतीहेक्टर १०००० किलो (१०टन) व त्यापेक्षा जास्त प्रमाणात मत्स्योत्पादन मिळू शकते. 
 फेकजाळ्याने, गिलनेटने स्थानिक मासे पकडणाऱ्या मासेमारांच्या मदतीने योग्य आकाराचे मासे काढल्यास चांगला दर मिळतो.सद्यस्थितीत १ किलो मासळीचा दर ८० रूपये प्रती किलोपर्यंत मिळू शकतो. मासळीचा दर हा स्थानिक मागणी, उपलब्धता, मासळीची प्रतवारी, आकारमान तसेच आठवडी बाजार यावर कमी जास्त प्रमाणात अवलंबून असतो. योग्य हंगामात मासळीची विक्री केल्यास दर चांगला मिळू शकतो.

 मासळीचे सुरक्षण व वाहतूक विक्री
 Preservation, transportation and sale of fish

      
 मासेमारीनंतर पकडलेली मासळी स्वच्छ धुवून वजनानुसार किंवा आकारमानानुसार वेगवेगळी वाढावी. मासळी लगेच विकणे शक्य असल्यास विकावी किंवा बर्फामध्ये थर ठेवून साठवणूक करून ठेवावी. अधिक चांगला भाव मिळण्यासाठी व वाहतुकीसाठी शितपेट्यांचा वापर करावा व जलद विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करावी.

 पाण्याचे व्यवस्थापन:
 Water Management:

  
 शेततळीतील पाण्याचे व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा भाग असून पाण्याची प्रतवारी संतुलीत ठेवणे शेततळ्यांमध्ये शक्य असते. प्लास्टिक शेततळीतील पाणी फळबागेसाठी दैनंदिन वापरल्यास साठलेल्या पाण्याचा उपसा होवून पाणी दुषित होण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी तलावातील पाण्याची आदर्श परिस्थिती खालीलप्रमाणे असावी.
१) पाण्याचा रंग :- हिरवट
२) पाण्यातील विद्राव्य प्राणवायुचे प्रमाण :- ४.०० पीपीएम.
३) पाण्याचे तापमान :- २४ ते ३५ अंश सेल्सीयम
४) पाण्याचा सामू (PH) :- ७ ते ८.५ पी. एच. (८.२)
५) पाण्याची पारदर्शकता :- १२ ते १८ से. मी.
६) प्रदुषण :- पाणी प्रदुषण मुक्त असावे.
  अशा पद्धतीने शेततळ्यात मत्स्यशेती करून दुहेरी फायदा करून घेता येतो. अधिक माहितीसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या सरकारी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...