साईनगर, अमृतधाम नाशिक ते साईनगर शिर्डी पदयात्रा
Nashik to Shirdi Padyatra: A Journey of Faith, Service & Inner Transformation
श्रद्धा, संयम आणि आत्मिक परिवर्तनाचा प्रवास
साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण पायी यात्रा हा मार्ग केवळ अंतर कापण्याचा नसून तो मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करणारा असतो. साईनगर, अमृतधाम, नाशिक येथून साईनगर शिर्डी पर्यंत ओम साई फ्रेंड सर्कल तर्फे दरवर्षी आयोजित होणारी पदयात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती श्रद्धा, सेवा आणि शिस्त यांचा संगम आहे.
पदयात्रेचा इतिहास व महत्त्व
ही पदयात्रा यंदा १३व्या वर्षात पदार्पण करत असून, गेल्या १२ वर्षांपासून नियमितपणे अखंड सुरू आहे. यावर्षी २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत आयोजित या पदयात्रेत ७० भाविकांनी सहभाग घेतला. यामध्ये महिला, मुली, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश होता.
ही पदयात्रा सर्वधर्म समभाव, एकोप्याची भावना आणि साईबाबांच्या शिकवणीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी आहे.
पदयात्रेची भक्तिमय सुरुवात
पदयात्रेची सुरुवात साई आरतीने झाली. साईबाबांचा जयजयकार, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. वाजत-गाजत दिंडीने शिर्डीकडे प्रस्थान केले आणि प्रत्येक पावलागणिक “साई साई” हा नामस्मरणाचा नाद कानात घुमत राहिला.
माझा पहिला अनुभव – श्रद्धेचा निश्चय
यावर्षी मी या पदयात्रेत पहिल्यांदाच सहभागी झालो होतो. खूप दिवसांपासून ही इच्छा मनात होती, पण काही ना काही अडचणी येत होत्या. यावेळी मात्र मनाचा ठाम निश्चय केला आणि पत्नीसमवेत दिंडीत सहभागी झालो.
हा निर्णय माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक टप्पा ठरला.
पहिला दिवस : नाशिक – सिन्नर
पदयात्रा संभाजीनगर रोड मार्गे नाशिक रोडला लागली. सर्व सहभागी साईबाबांचा जयजयकार करत चालत राहिले. दुपारी २ वाजता लॉन्सवर जेवण झाले. प्रत्येकाने घरून आणलेले पोळ्या-भाजीचे डबे उघडले.
साधं पण प्रेमानं भरलेलं ते जेवण खूप समाधान देऊन गेलं.
सायंकाळी सिन्नर घाटाच्या अलीकडे चहा झाला आणि रात्री सिन्नर बसस्टँड समोरील हनुमान मंदिर, गावठा येथील भव्य हॉल मध्ये मुक्काम केला.
पायाला फोड आल्यामुळे वेदना होत होत्या, पण “साईबाबा बघतील” या विश्वासावर झोप लागली.
सेवा हीच साधना
पदयात्रेदरम्यान पाणी, चहा, नाश्ता, जेवण यासाठी महेश (नाना) झाल्टे व त्यांचे सुपुत्र गणेश (गणाजी) झाल्टे यांचे सहकार्य अविरत होते. गेल्या १३ वर्षांपासून ते ही सेवा भक्तिभावाने करत आहेत.
त्यांच्यासोबत ओम साई फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष सागर परदेशी व अध्यक्ष राकेश धोंडगे यांचेही मोलाचे योगदान लाभते. ही सेवा पाहून “सेवा म्हणजेच साई” याचा प्रत्यय आला.
दुसरा दिवस : सिन्नर – वावी
सकाळी साई आरतीनंतर मंदिरासमोर नाचतच पदयात्रेला प्रारंभ झाला.
सिन्नर येथे जय माता दी ऑटोमोबाईल तर्फे नाश्ता व चहा देण्यात आला.
रवीभाऊ सानप यांचे आभार मानताना मनातून शब्द बाहेर आले –
“रवीभाऊ आज फक्त गाड्यांची नाही, तर माणसांची सेवा करत आहेत.”
टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वातावरण आणखीनच उत्साही झाले.
रात्री वावी जवळील लॉन्सवर मुक्काम केला. इतर पालखीतील वारकऱ्यांसोबतचा तो सहवास खूप काही शिकवून गेला.
तिसरा दिवस : वावी – शिर्डी
साई आरतीनंतर वावीहून पालखी मार्गाने कणकोरी – कोऱ्हाळे मार्गे दिंडी पुढे सरकली.
रात्री ९ वाजता आम्ही शिर्डी साई भक्त निवासात दाखल झालो.
खिचडी महाप्रसाद घेऊन ई-२१ क्रमांकाच्या रूममध्ये विश्रांती घेतली.
चौथा दिवस : साई दर्शन – जीवन बदलणारा क्षण
चौथ्या दिवशी सकाळी साई आरतीनंतर, चप्पल व मोबाईल गाडीत ठेवून आम्ही अनवाणी २ किमी चालत साई दर्शनासाठी निघालो.
लाखो भक्तांच्या रांगेत उभं राहून संयम, शांतता आणि श्रद्धा यांची खरी परीक्षा झाली.
दुपारी ३:५० वाजता साईबाबांचे दर्शन झाले.
तो क्षण शब्दात मांडता येणार नाही.
डोळ्यांत पाणी, मनात समाधान आणि हृदयात अपार शांती होती.
पदयात्रेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व
ही पदयात्रा केवळ चालण्याची प्रक्रिया नाही, तर
चार दिवसांच्या या यात्रेत प्रत्येकाने स्वतःला नव्याने ओळखले.
निष्कर्ष : साई कृपेचा संकल्प
या पदयात्रेत मिळालेल्या अनुभवांची शिदोरी आम्ही मनात बांधली आहे. नववर्षात नवे संकल्प करताना साईबाबांची कृपा सदैव पाठीशी असेल, याची पूर्ण खात्री आहे.
“सबका मालिक एक” या वचनाचा अर्थ या पदयात्रेने प्रत्यक्षात शिकवला.
🙏 साईबाबा सर्वांचे कल्याण करो 🙏
© दीपक केदू अहिरे
नाशिक
राज्यस्तरीय लेखन सेवा पुरस्कार विजेते
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************