कृषिपत्रकारिता : एक आव्हानात्मक क्षेत्रAgricultural journalism : A challenging field
--------------------------------------------------------------------
पिकाच्या लागवडीपासून तर मार्केटिंगपर्यंत शेतीचे सर्व अर्थकारण कृषीपत्रकारांस माहित असायला हवे. नुसते माहित असूनही भागत नाही तर उत्पन्नात तफावत का आली ? सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घेता येईल का? असा सांगोपांग विचार व्हायला हवा. एकंदरीत शेती विषयामध्ये जाणीवपूर्वक कृषीपत्रकार निर्माण व्हायला हवेत. पण ही गोष्ट सोपीही नाही...
--------------------------------------------------------------------
पत्रकारितेमध्ये सर्वच प्रवाह एकवटलेले आहेत. साहित्य, सांस्कृती, समाजकारण, राजकारण, क्रीडा आदी विषयांची पत्रकारिता स्वतंत्र अंगाने बहरत आहे. त्याचप्रमाणे आज कृषीपत्रकारिता हे एक नवे क्षेत्र उदयाला आले असून या विषयावरची दैनिकं, मासिकं, पाक्षिके, साप्ताहिके यांमधून कृषी पत्रकारितेचे दर्शन घडतेच.
पूर्वीपेक्षा आज शेतीज्ञानाला खूप महत्त्व आहे. ज्ञान आणि मेहनत घेण्याची वृत्ती हेच आजचे मोठे भांडवल आहे याची जाण शेतकरीवर्गाला होत आहे. मग हे ज्ञान मुद्रित माध्यमातून असो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असो. या दोन्ही माध्यमातून शेतीविषयक ज्ञान घेऊन शेतकरी आपल्या शेतीमध्ये सुधारणा करू लागला आहे. पारंपरिक शेतीऐवजी सुधारित, नगदी पिकाची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. (आज शेतकऱ्याचे एकरी उत्पादनही बरेचसे वाढले आहे) आपल्या योजक व शोधक बुद्धीने शेतकऱ्याने चिकित्सकता जोपासली आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारी शेती कशी फुलेल याच विचाराने शेतकरी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहे.
कृषिपत्रकारितेचा विचार करता वर्तमानपत्रांनी शेतीविषयक लेख, बातम्या प्रकाशित केल्या, पण त्याचे स्थान खूप कमी आहे. जिल्हा वर्तमानपत्रात शेती विषयावरच्या पुरवणीला स्वतंत्र स्थान मिळाले. पण या कृषिप्रधान देशात किती शेती विषयावरची दैनिके, पाक्षिके, साप्ताहिके, मासिके आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल अशी परिस्थिती पूर्वी होती पण आता शेतीज्ञानाविषयी जागृती वाढली आहे. ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कृषिप्रदर्शनात शेतकरी भेट देतो. तेथे असणारे पुस्तकांच्या, मासिकांच्या स्टॉलवर खरेदी करतो. शेती मासिकांची वर्गणी भरतो यावरून कृषिपत्रकारितेला नक्कीच चांगले दिवस आले आहेत.
शेती विषयामध्ये जाणीवपूर्वक कृषिपत्रकार निर्माण होणे सोपी गोष्ट नाही. इथले बारकावे तसेच प्रत्येक पिकाच्या लागवडीपासून तर मार्केटिंगपर्यंतचे सर्व अर्थकारण या कृषिपत्रकारास माहित असायला हवे. नुसते माहित असूनही भागणार नाही तर त्या उत्पन्नातील तफावत का आली? सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पत्र घेता येईल का? याचा सांगोपांग विचार व्हायला हवा. कृषिपत्रकारितेत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे 'यश कथा' पूर्वापार रीतीने खेडयातला शेतकरी अधिक उत्पन्न मिळालेल्या शेतकऱ्याला भेटायचा, त्याची उत्पादन काढण्याची पद्धत समजून घ्यायचा आणि आपलं नेमकं कुठं चुकलं याचा अंदाज बांधून शेतीत बदल करायचा. आज त्याला प्रत्यक्ष शेतक-याची शेतीही दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दिसते. त्याने केलेले प्रयोग वर्तमानपत्रांतून अथवा मासिकातून वाचतो. ज्याची यशकथा दाखवली आहे त्या शेतकऱ्याशीही तो दूरध्वनीने संपर्क करतो. प्रत्यक्ष शेताला भेट देतो. यातून शेतीज्ञानाची लालसा त्याच्या अंगी वाढीस लागली आहे; परंतु लिखाणातून हिच परिणामकारकता दाखविण्यासाठी आज 'कृषिपत्रकार' बोटावर मोजण्याइतकेच आहेत असे चित्र आज आहे. त्यामुळे पुढे कृषिपत्रकारितेला फार मोठा वाव आहे. तसेच कृषिपत्रकारालाही ! अनेक वाहिन्यांत, वर्तमानपत्रांना अभ्यासू, व्यासंगी कृषिपत्रकाराची गरज भासते. पण या पत्रकारितेचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळण्यासाठी फार कमी ठिकाणी सोय आहे. किंबहुना नाहीच! परंतु नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने कृषिपत्रकारितेचा 'अॅग्रो जर्नालिझम' हा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे.
जूनपासून याची प्रवेशप्रक्रिया विविध केंद्रावर सुरू होत असते. शेतीविषयक नियतकालिकांमध्ये बहुतांशी लिहिणारे लेखक हे प्रामुख्याने कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन संस्था तसेच खते-बियाणं, शेतीविषयक उपकरणे, अवजारे यांच्या निर्मिती उद्योगात गुंतलेल्या व्यावसायिक संस्था यामध्ये कार्यरत असलेले संशोधक, प्राध्यापक असतात. त्यांचा भर प्रामुख्याने त्यांनी केलेल्या संशोधनावर असतो. या संशोधनाच्या आधारावर ते आपल्या लेखांमधून शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शकाची भूमिका घेतात. त्याचं लेखन एका विशिष्ट ढाच्यात बांधलेलं असतं. उदा. एखाद्या पिकाविषयीच्या लेखात त्या पिकाचं शास्त्रीय नाव, त्याचे गुणविशेष, त्या पिकाला अनुकूल जमिनीचा प्रकार, हवामान, पेरणीचा काळ, लागवड आणि मशागत, पिकावर पडणारी कीड-रोग, त्याचे नियंत्रण, काढणीचा काळ आणि काढणीचं तंत्र वगैरे माहिती असते. अशा बहुतांशी लेखांमध्ये शास्त्रीय परिभाषेचा आणि परिणामांचा वापर असतो.
त्याविषयी अनेक शेतकरी अनभिज्ञ असतात. अशा लेखांमध्ये शेतावरचा प्रत्यक्ष अनुभव क्वचितच आढळतो. संशोधक प्राध्यापकांचं लेखन, त्यांनी त्यांच्या संस्थेच्या शेतावर केलेल्या प्रयोगावर आधारित असतं. त्यामुळे ते प्रामाणिक असतं. प्रयोगनिष्ठ असतं. यात शंकाच नाही. पण प्रत्यक्ष शेतावरच्या अनुभवाअभावी ते बऱ्याचदा 'सैद्धान्तिक' ठरतं. वेगवेगळ्या भागातल्या, वातावरणातल्या शेतकऱ्यांना अशा लेखामध्ये प्रतिपादित केलेले निष्कर्ष किंवा लाभ मिळतातच असं नाही. अशा सैद्धान्तिक लेखनापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर भर देण्याचं कृषीपत्रकाराचे धोरण असावे. यासाठी स्थानिक कृषीपत्रकारांची गरज पडते. तो प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला भेटून त्याने केलेल्या प्रयोगाचा अवलंब लेखाद्वारे मांडेन, अशी अपेक्षा असते. कृषीपत्रकाराने केवळ सल्लेबाजी करायची नसून किंवा एखाद्या समस्येवरचा हाच उपाय रामबाण असला दावाही करायचा नसून शेतक-यांचे अनुभव वस्तुनिष्ठ पातळीवर तपासून ते शेतकरी वाचकांसमोर मांडायचे त्या शेतकऱ्याची प्रयोगशीलता आणि हुशारी, परिस्थितीनुसार हे प्रयोग, अनुभव स्वीकारावेत त्यावर आणखी प्रयोग करावेत, अशी भूमिका कृषी पत्रकाराची असावी.
महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ कार्यरत आहेत. या विद्यापीठातून संशोधन आणि शेती विकासाची नवनवीन प्रणाली शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कृषीपत्रकाराची गरज आहे. पुढील काळात कॉर्पोरेट कंपन्या शेतीमध्ये उतरणार आहेत. मालाची खरेदी करणार आहेत. त्यामधून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा व फसवणूक टाळता यावी या दृष्टीने कृषीपत्रकाराने सजग राहिले पाहिजे. शेतक-यांच्या हिताचे निर्णय, शेतीविकासाच्या योजना सातत्याने कृषी पत्रकाराने मांडल्या पाहिजे. यासाठी त्याने स्वतःचे कृषीज्ञान अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
कृषी शिक्षणाचा राज्यातला विचार करता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ नुसार महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांवर प्रामुख्याने कृषी व संलग्न क्षेत्रातील शिक्षण व संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याची जबाबदारी आहे. कृषी विद्यापीठांतर्गत निम्नश्रेणी शिक्षण म्हणजे कृषी शाळा, माळी प्रशिक्षण, दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन इ. पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि उच्च शैक्षणिक म्हणजे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी. अभ्यासक्रमामुळे कृषी व संलग्न क्षेत्राकरिता निरनिराळ्या पातळीवर उच्चशिक्षित/प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. या चार विद्यापीठांतर्गत कृषी क्षेत्रातील दरवर्षी अंदाजे १६५० पदवीधर उपलब्ध होतात. एकूण उपलब्ध प्रवेश क्षमता २१९० विद्यार्थी असली तरी फार मोठ्या प्रमाणात (अंदाजे १५,०००) प्रवेश इच्छुकांचे अर्ज विद्यापीठ/कृषी परिषदेकडे प्राप्त होतात. तथापि उपलब्ध मयर्यादित प्रवेशक्षमतेमुळे अनेक विद्याथ्यांना प्रवेश मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांनी कृषीपत्रकारितेकडे वळणे गरजेचे आहे. कृषीपत्रकारिता हे एक नवे क्षेत्र असून याचा अभ्यासू, व्यासंगी पत्रकारांनी उपयोग करून घ्यावा असे मला वाटते.
© दीपक केदू अहिरे, नाशिकपूर्व प्रसिद्धी : दै. लोकसत्ता (काऊन्सेलर पुरवणी) बुधवार,२६ सप्टेंबर २००७ (पान ४)
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment