माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प : सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
Mauli Vermicompost and Seed Production Project: Moving towards organic farming
श्री.युवराज सखाराम कदम, रावळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) हे एक दूरदृष्टी असलेले शेतकरी.त्यांच्याकडे तीन एकर शेती असून दोघे भाऊ शेतीबरोबरच गांडूळ खत व्यवसाय सांभाळत आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने केवळ स्वतःच्या शेताचीच नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचीही वाट बदलून टाकली आहे. त्यांचा माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प आज शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. श्री.कदम बंधू यांच्या माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्पाला विभागीय कृषी आयुक्त काटकर साहेब यांनी भेट दिली. त्यांनी हा प्रकल्प पाहून समाधान व्यक्त केले.
आज रासायनिक शेतीचा दुष्परिणाम आपण पाहत आहोत. आजच्या शेतीपद्धतीत रासायनिक खतांचा अतिवापर होऊ लागला आहे. या रसायनांमुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजिवाणू नष्ट होतात. जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होते. पिकांची गुणवत्ता घसरते आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भर पडते. याचा परिणाम असा की शेतकरी दबकळीस जातो, कर्जबाजारी होतो. या गंभीर परिस्थितीवर विचार करून युवराज कदम यांनी “सेंद्रिय शेती” हाच पर्याय निवडला. कृषिभूषण शेतकरी अरुणबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या शेतावर १६ बेड्स लावून गांडूळ खत उत्पादनाची सुरुवात केली.
अल्पभूधारक शेतकरी श्री. युवराज कदम यांनी पारंपरिक कांदा, मका पिकांमधून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नाऐवजी पूरक व्यवसायाचा शोध घेतला. गावातील कृषिभूषण अरुण पवार आणि छत्रपती संभाजीनगर येथील गोरखनाथ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गांडुळखत प्रकल्पाची सुरुवात केली. जुन्या पोल्ट्री शेडमध्ये २०० किलो गांडुळ बीज घेऊन सुरू केलेल्या पहिल्या प्रकल्पातून अवघ्या ७० दिवसांतच ४५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास दुणावला.
प्युअर शेणखतापासून तयार केलेले ट्रायकोडर्मायुक्त माऊली गांडूळखताचे अनेक फायदे आहेत. गांडूळखताला “काळ्या सोन्याचे खत” असे म्हटले जाते. त्याचे अनेक फायदे आहेत. मातीची भुसभुशीत रचना तयार होते, ज्यामुळे मुळांना हवा व पाणी सहज मिळते. सेंद्रिय कार्बन वाढतो, परिणामी जमीन सुपीक राहते. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सूक्ष्मअन्नद्रव्ये नैसर्गिकरीत्या मिळतात. रासायनिक खतांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी होतो. पिकांची गुणवत्ता सुधारते, बाजारात चांगला दर मिळतो. भाजीपाला, फळपिके, कांदा, ऊस, डाळी–कडधान्ये यावर उत्तम परिणाम दिसून येतो. शेतकरी व ग्राहक दोघेही निरोगी व विषमुक्त अन्न मिळवतात. युवराज कदम यांच्या प्रकल्पातून मिळणारे गांडूळ खत वापरून अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव आला की पीक अधिक तजेलदार, रोगप्रतिकारक्षम आणि दीर्घकाळ टिकणारे झाले आहे.
माऊली गांडूळ खत प्रकल्पाचा विस्तार व मार्केटिंगविषयी श्री. युवराज कदम यांच्याविषयी अधिक जाणून घेतले असता सुरुवातीला १६ बेड्सपासून सुरू झालेला हा प्रकल्प, खताला मोठी मागणी असल्याने ७५ बेड्सपर्यंत पोहोचला. आज दर अडीच महिन्याला ७० टन गांडूळ खत तयार केले जाते. त्यांच्या मार्केटिंगची काही ठळक वैशिष्ट्ये अशी जाणवली कि जवळपासच्या शेतकऱ्यांकडून थेट मागणी येते. फळबाग, भाजीपाला व कांदा उत्पादक शेतकरी गांडूळ खताला जास्त पसंती देतात. गावोगावी भेटी घेऊन, प्रात्यक्षिके करून शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. खताच्या गुणवत्तेमुळे तोंडी प्रचार (Word of Mouth) हा सर्वोत्तम जाहिरात माध्यम ठरत आहे. ते सोशल मिडियाचा आधार घेऊनही या खताची मार्केटिंग करतात. इंस्टाग्राम, फेसबुक, विविध शेतीविषयक व्हाट्सअँप ग्रुपद्वारे त्यांची प्रसिद्धी आणि प्रचार चालू आहे.शेतकरी स्वतः अनुभव घेतल्यावर दुसऱ्यांनाही सुचवतात, त्यामुळे बाजारपेठ नैसर्गिकरित्या वाढते.श्री. युवराज कदम स्वतः शेतकऱ्यांना भेटून त्यांना सेंद्रिय खताचे फायदे समजावतात. त्यामुळे विक्रीसोबतच सेंद्रिय शेतीचे जाळेही निर्माण होत आहे.
गांडूळखताबरोबरच श्री. युवराज कदम यांच्या प्रकल्पात वर्मीवॉशचेही उत्पादन केले जाते. वर्मीवॉश म्हणजे गांडुळांपासून निघणारे द्रव स्वरूपातील जैविक खत. या द्रवात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव विपुल प्रमाणात असतात. शेतकरी वर्मीवॉशचा फवारणीद्वारे वापर करून पिकांना रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात, पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ दिसते. भाजीपाला, फळबाग, कांदा, कडधान्ये अशा सर्व पिकांवर वर्मीवॉश प्रभावी ठरतो. यामुळे रासायनिक कीडनाशके व द्रवखतांवरील खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांची मोठी बचत होते.
माऊली गांडूळ खत प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल चालू झाली आहे. गांडूळ खतामुळे नैसर्गिक शेती शक्य होते. रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे मातीचा समतोल टिकतो. जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाला हातभार लागतो,आणि ग्राहकांना सुरक्षित,आरोग्यदायी अन्न मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आज श्री. युवराज कदम यांनी ५५ टन क्षमतेचा आधुनिक प्रकल्प उभारून शेतकरी व शहरी ग्राहकांसाठी उच्च प्रतीचे गांडुळखत, गांडुळ बीज आणि वर्मीवॉश उपलब्ध करून दिले आहे. ४० किलो पिशवी, छोटे पॅकिंग, तसेच जिवाणूंची फवारणी करून तयार केलेले सेंद्रिय खत स्थानिक फळबाग, भाजीपाला व कांदा उत्पादकांसाठी वरदान ठरत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी पडत असताना युवराज कदम यांची ही वाटचाल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
श्री. युवराज कदम यांचा हा माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प म्हणजे केवळ खत उत्पादन नव्हे, तर शाश्वत शेतीचा एक मार्ग आहे. त्यातून जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढवण्याचे, काळी आई जिवंत ठेवण्याचे व शेतकरी सुखी करण्याचे ध्येय साध्य होत आहे. माऊली गांडूळ खत प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत म्हणून काम करत आहे. श्री. युवराज कदम यांच्या प्रकल्पातून काही महत्त्वाचे धडे मिळतात कि लहान प्रमाणावर सुरुवात करूनही मोठे यश मिळू शकते. रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेती शक्य आणि फायदेशीर आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन असेल तर मार्केटिंगसाठी वेगळ्या खर्चाची गरज नसते. शेतकरी एकमेकांना मार्गदर्शन करून शेतकरी ते शेतकरी (Farmer-to-Farmer learning) या पद्धतीने बदल घडवू शकतात.
आज “माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प” केवळ रावळगावात नाही, तर संपूर्ण मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहे. युवराज कदम यांनी दाखवले की, खरी प्रगती म्हणजे निसर्गाशी सुसंगत शेती, जिच्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि समाजालाही निरोगी अन्न मिळते. त्यांची ही यशोगाथा स्पष्ट सांगते कि, जमिनीवर प्रेम करा, तिला जिवंत ठेवा; कारण जमिनीतच शेतकऱ्याचे भविष्य दडलेले आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com




No comments:
Post a Comment