उद्योगस्वामिनी
Udyog swamini
१. सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले
sou. Shraddha Chaitanya Dhormale
सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले यांनी दुग्ध व्यवसायामध्ये अगदी शून्यातून सुरुवात करून यशस्वी व्यवसाय केला.
आज त्या १३० म्हशींचा गोठा स्वतः व्यवस्थापन करतात. श्रद्धा सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रभागी आहेत,
'चला माती वाचूया' या अभियानाच्या माध्यमातून जैविक शेती या उपक्रमांतर्गत त्या ४८ गावांमध्ये काम करतात.
आत्ताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली "चरकक्रांती" या उपक्रमाच्या अंतर्गत श्रद्धा आता शिक्षित, होतकरू, तरुण अशा ५०० तरुण तरुणीबरोबर शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये काम करत आहेत.
सौ. श्रद्धा यांच्या वेगवेगळ्या कामांमधून १२०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार निर्मिती होत आहे. यशस्वी पद्धतीने गोठा कसा चालवावा, त्याचबरोबर गोठ्याच्या संदर्भातील वेगवेगळ्या प्रकल्पांमधून कशा पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात, याबाबतचे प्रशिक्षण वर्ग त्या घेतात. यामधून अनेक नवीन तरुणांना व्यवसाय करण्यासाठी योग्य दिशा मिळत आहे.
त्यांच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकार तसेच अनेक सामाजिक संस्थांनी वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले, २०२० साली त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल एका सामाजिक संस्थेकडून त्यांना "कृषीकन्या" नावाने गौरविण्यात आले.
श्रद्धा लहान असल्यापासूनच गोठ्यातील लहान-सहान कामे करून आई-बाबांना मदत करायच्या, २०१३ सालापर्यंत श्रद्धा यांना आई-बाबांकडून या व्यवसायातील अनेक बारकावे समजले.
वाढत्या वयाबरोबर संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी २०१५ साली स्वतःच्या खांद्यावर घेतली. आणि २०१६ ला "ना भूतो ना भविष्यती" असा दोन मजली भव्य-दिव्य अशा गोठ्याची बांधणी केली, जो जिल्ह्यातील पहिलाच दोन मजली गोठा ठरला.
सौ.श्रद्धा यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली, प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधली आणि यशाची शिखरे चढतच राहिली. आज मितीला श्रद्धा वार्षिक २५० टन क्षमतेचा विक्रमी गांडूळ खत प्रकल्प चालवतात श्रद्धा यांनी केलेल्या व्यवस्थापनातून "झिरो वेस्ट मॅनेजमेंट" ही संकल्पना उदयास आली, जो महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.
सौ. श्रद्धा यांनी बायोवीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. या माध्यमातून दैनंदिन वापरासाठी लागणारी हजारो रुपये किमतीची वीज त्यांना आता मोफत मिळते. त्याचबरोबर घरगुती उपयोगासाठी बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग केला जातो.
सौ.श्रद्धा यांनी शेणावर विविध प्रयोग करून, वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू शेणामध्ये टाकून, त्यावर प्रक्रिया करून "जिवाणू जैविक खत" तयार करण्यास सुरुवात केली. आज जिवाणू खत नापीक जमिनी, फळबागा भाजीपाला पिके यासाठी महाराष्ट्रभर वरदान ठरत आहे.
सौ.श्रद्धा यांनी स्वतःची एक यशस्वी व्यवसाय पद्धती तयार केली, त्यानुसार परिश्रमाने देशभर आदर्श ठेवणारा दुध व्यवसाय प्रकल्प उभा केला.
कधी काळी अवघी ७० रुपये मजुरी असून आता १० व्यवसायांत उत्तुंग भरारी घेणारी महिला कमल कुंभार यांचा उल्लेख करावा लागेल. धाराशिव जिल्ह्यातील हिंगळजवाडी येथील एका कुंभारी काम करणाऱ्या आणि रोजंदारीवर पोट भरणाऱ्या घरात कमल कुंभार यांचा जन्म झाला. दहावीनंतर त्यांचे लग्न श्री. विष्णू कुंभार यांच्याशी झाले.
कमलताई यांनी आईसोबत बांगड्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. पुढे जाऊन त्यांनी स्टेशनरी व साड्यांचा व्यवसाय सुरु केला. घरकाम आई सांभाळत असल्यामुळे त्यांना संस्था, आशा कार्यकर्ती, बचतगट, व्यवसाय अशा सगळ्या कामात त्यांना वेळ मिळत होता. "उमेद" अभियानमध्ये संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेळीपालन करण्याचा निर्णय घेऊन तो पूर्ण केला.
पोल्ट्री व्यवसाय सुरु करून त्या आज लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहेत. कमलताई या आज १० व्यवसाय सांभाळत आहे. ज्यात सेंद्रिय शेती, शेळीपालन, पोल्ट्री, स्टेशनरी, साडी विक्री, मेस, लाईट बिल वाटप या व्यवसायांचा समावेश आहे. महिला सबलीकरण आणि उद्योजकतेसाठी केलेल्या योगदानासाठी २०१७ मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) फाऊंडेशनचा वुमन एक्सम्पलर पुरस्कार त्याच वर्षी नीती आयोग व युनायटेड नेशन्सद्वारे ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार, २०२२ मध्ये नारीशक्ती पुरस्कार, २०२३ मध्ये जनाई मुक्ताई समाज भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
(लेखन सेवा पुरस्कार विजेते)
deepakahire1973@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा