शेती, काव्य आणि सकारात्मक विचारांनी बहरलेला ‘स्व-काव्यांकुर’ हा मराठी ब्लॉग आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, प्रेरणादायी लेख व लोकोपयोगी माहितीचा आस्वाद घ्या.
‘Swa-Kavyankur’ is a Marathi blog enriched with agriculture, poetry, and positive thoughts. Explore practical agricultural guidance, inspirational articles, and useful information.”
RAILBUSरेलबस ही ऑटोमोटिव्ह इंजिन असलेली हलकी प्रवासी रेलगाडी आहे. या रेलबसची अनेक वैशिष्ट्य आहेत. रेलबसची डिझाइन १९३० साली बनविली गेली असून विशेषत: रेलबसची बॉडी आणि चार चाके (२ एक्सल) बोगीच्या ऐवजी स्थिर पायावर असतात. रेलबसेस ह्या मोठ्या आकारमानात विकसित झाल्या आहेत.
रेलबसला रेलकारही म्हटले जाते. रेल्वेबस सामान्यतः जर्मनी, इटली, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि स्वीडन सारख्या देशांमध्ये वापरल्या जातात. आजच्या रेलबसची डिझाईन आधुनिक, हलकी आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्सने घेतली आहे. आधुनिक डिझेल व इलेक्ट्रिक रेलकार या अनेक युनिट्सच्या रूपात चालवल्या जातात.
रेलबस वाहनांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत रेलबस ही सौरऊर्जेवर चालणारी आहेत. रेलबसचे सर्व ट्रॅक अत्याधुनिक सोलर पॅनेलने कव्हर केले आहेत. हे केवळ कार्बन उत्सर्जन कमी करत नाही तर एक सातत्यपूर्ण, किफायतशीर ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करते.
रेलबसचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रगत डिझाईन होय. शहरी लँडस्केपसाठी अनुकूल केलेली आकर्षक अशी आधुनिक डिझाइन आहे. वायुगतिकीय रचनेमुळे प्रवाशांना जास्तीत जास्त आराम मिळतो. बाहेर लक्ष दिल्याने शहराचे सौंदर्य बघता येते. प्रशस्त आणि प्रवेशयोग्यता हे रेलबसचे अजून एक वैशिष्टय आहे. रेलबसमध्ये बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी प्रवाशांना आरामदायी सुविधा आहे. अपंग व्यक्तीना सुद्धा यात सुविधा दिल्या आहेत.
रेलबसमध्ये पर्यावरणाशी बांधिलकीनुसार पुनर्वापर करण्यायोग्य आणि पर्यावरणास अनुकूल सामग्री वापरली जात असल्यामुळे टिकाऊपणा जोपासला जातो. रेलबस वाहने कमीत कमी आवाजात चालण्यासाठी डिझाइन केलेली आहेत यामुळे शहरी भागात कमी आवाजाचे प्रदूषण होते. हे वैशिष्ट्य दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये विशेषतः फायदेशीर आहे जेथे ध्वनी प्रदूषण ही एक महत्त्वाची चिंता आहे.
उच्च कार्यक्षमता आणि विश्वासार्हता रेलबसची वैशिष्ट्य आहे. ते अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत म्हणून रेलबस शहरी सार्वजनिक परिवहनाच्या सर्व मागण्या पूर्ण करतात. रेलबसमध्ये सर्वांगीण सुरक्षितता आहे. रेलबसमध्ये प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण प्रदान करतात. रेलबसमध्ये २४ प्रवाशी बसून तर १६ प्रवाशी उभे राहून प्रवास करू शकतात.
रेलबसचा प्रवाशांना खूप फायदा होतो. भारतीय रेल्वे शाखा मार्गांवर अनेक रेल्वेबस चालवते. प्रवासी वाढल्यामुळे या रेल्वेबसची जागा ईएमयूने घेतली आहे. कालका-शिमला मार्गावर (ट्रेन क्रमांक ७२४५१), मथुरा ते वृंदावन (ट्रेन क्रमांक ७२१७५) आणि मेट्रो जंक्शन ते मेट्रो सिटी (ट्रेन क्रमांक ७४८०४) तसेच इतर मार्गांवर रेलबस आहे.(Source: www.railbus.com)
कराल कृषीपर्यटन तर आनंदी होईल तन आणि मन | Agritourism in Maharashtra
शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषीपर्यटन होय. कृषिपर्यटनाची जागतिक स्तरावर ओळख होऊन कृषिपर्यटनाला चालना मिळावी म्हणून १६ मे हा दिवस जागतिक कृषिपर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त काही लोकप्रिय कृषिपर्यटन केंद्राची ओळख...
गेली अनेक शतके भारताची संस्कृती ही जगामध्ये कृषी संस्कृती या रूपानेच ओळखली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे झाले आहे. आणि त्यासाठी पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक ठरते. शेतीच्या पारंपारिक व्यवसायाबरोबर शाश्वत उपाय म्हणून कृषीपर्यटन हा पर्याय पुढे आला आहे. शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन रोजगार व अर्थसहाय्य मिळून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषीपर्यटन या संकल्पनेमध्ये आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषीपर्यटन होय.
आजच्या धावपळीच्या जीवनात विज्ञानयुगात पर्यटनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक देशात तसेच देशांतर्गत अनेक भागामध्ये ऐतिहासिक किल्ले, धरणे, पुरातन वास्तू यांचा उपयोग सध्या पर्यटनासाठी करण्यात येत आहे. परंतू आता ग्रामीण भागातील संस्कृती, निसर्ग, पशुपक्षी, ग्रामीण भागातील जीवनशैली ही शहरी भागामध्ये पहावयास मिळत नाही. त्यामुळे धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शहरी भागातील जनता आता ग्रामीण भागातील या जीवनशैलीकडे पर्यटन म्हणून पाहू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषि पर्यटन हा एक पुरक व्यवसाय म्हणून नावारुपाला आलेला आहे.
शहरी जीवनात दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी शहरातील नागरीक राज्याच्या विविध भागात शेतक-यांनी सुरु केलेल्या कृषिपर्यटनाला प्राधान्य देताना दिसत आहेत.आणि त्यांची पावले आपोआपच ग्रामीण भागातील कृषि पर्यटनाकडे वळू लागली आहेत. ग्रामीण जीवनशैलीचे शिक्षण आणि करमणूक हे दोन्ही हेतू मनात ठेऊन कृषिपर्यटन साधणे शक्य आहे.
कृषी व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची तर शेती ही केवळ उपजीवीका नसून जीवनशैली आहे. राज्यातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीमउद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषि संलग्न विषयाचा एकत्रित विचार करुन विकास घडवून आणल्यास ग्रामीण भागामध्ये कृषिपर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते.
आजमितीस कृषिपर्यटन संदर्भात शासनाची कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही. त्याकरिता फलोत्पादन तसेच इतर संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिल्यास ग्रामीण भागामध्ये कृषि पर्यटन केंद्र विकसित होणे सहज शक्य आहे. कृषिपर्यटन हा जगातील अतिशय वेगाने वृध्दींगत होणारा व्यवसाय ठरत आहे. महाराष्ट्रात अशी उल्लेखनीय कृषीपर्यटन केंद्र आहेत. त्या ठिकाणी भेट देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात अशी लोकप्रिय कृषिपर्यटन आहेत.सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी आणि उल्हास नदीच्या कुशीत, सगुणा बाग हे ५५ एकरचे सुंदर शेत नेरळ, कर्जत, मालेगावला वसलेलं आहे. सगुणा डेअरी या नावाने स्वातंत्र्यापूर्वी ओळखले जाणारे हे शेत साधारणपणे १९६० नंतर "सगुणा बाग" या नावाने ओळखायला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच शेती आणि शेतीसंबंधी कार्यामध्ये सगुणाबाग काम करत आहे. कृषीपर्यटन या संकल्पनेचा जन्म सगुणा बागेमध्ये १९८५ साली झाला. आणि आत्तापर्यंत त्यात अनेक बद्दल सुद्धा झाले. सध्या "सगुणाबाग" हे सर्वात लोकप्रिय असे कृषी पर्यटन केंद्र शहरी बांधवांसाठी झाले आहे. सध्या हजारोच्या संख्येने पर्यटक विद्यार्थी आणि शेतकरी सगुणा बागेला भेट देतात आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेतात.
कुसुम कृषी पर्यटन आणि सहल केंद्र हे जालना जिल्ह्यातील मंठा रोड येथे दहा एकरामध्ये विकसित झाले आहे. या कृषी पर्यटन केंद्राचे संचालक श्री.एकनाथ मुळे असून सदर कृषीपर्यटन केंद्रामध्ये विविध प्रकारची फळपिके, जुन्या शेती औजाराचे म्युझियम, संपूर्ण सेंद्रिय शेती, आनंद सदनाची निर्मिती, महिला केंद्रित संख्या असून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही महत्त्वाची वैशिष्ट्य या कृषिपर्यटनाची आहेत.
योरामा-मायारा कृषी पर्यटन केंद्र हे नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील नवरगाव येथे विकसित केले आहे. या कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका सौ.मंजुषा योगेंद्र मोडक या आहेत.
या कृषी पर्यटनात त्यांनी विदेशी पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या पोर्ला इस्टेट राजा नवाब मिर युसुफ अली यांचे म्युझियम नवरगाव येथे उभारणी केली आहे. येथे त्यांनी शेकडो दुर्मिळ विविध प्रकारच्या देशी वाणाच्या झाडांची लागवड केली आहे. यामुळे पूर्वी विरळ दिसणाऱ्या पक्षी, फुलपाखरे, मधमाशांचे पोळे यात मोठ्या संख्येने वाढ होऊन पर्यटकांचे नंदनवन उभे केले आहे. येथे शेळीपालन, ससेपालन, मत्स्यपालन, फळबाग, सेंद्रिय पीक शेती इ. विविध प्रकल्प आहेत.
मोठ्या शहरातील वाढती वर्दळ, प्रदूषण यामुळे प्रत्येक कुटुंब हे मानसिक तणावाखाली राहत आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेकांची पावले गावातील निसर्ग आणि शेतीतील शांत ठिकाणाकडे वळत आहे. असेच शांत आणि निसर्गरम्य ठिकाण मुंडवडा कृषीपर्यटन केंद्र आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुंडवाडा या गावात हे केंद्र आहे. या केंद्राची स्थापना श्री. निलेश खेडकर यांनी केली.
मॉन्टेरिया व्हिलेज हा एकूण ३६ एकरचे कृषी पर्यटन आहे. ह्या कृषि पर्यटनाची सफर तुम्हाला तुमच्या गावापर्यंत घेऊन जाईल असा अनुभव येतो. मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून दोन तासांच्या अंतरावर कर्जत, कलोते येथे वसलेले हे ठिकाण आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी गावातील जीवनाचा संपूर्ण अनुभव या ठिकाणी घेता येतो. शांत वातावरण निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेले हे सुंदर ठिकाण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील घारपी हे गाव आहे. त्या ठिकाणी कन्नई कृषी पर्यटन केंद्र आहे. कन्नई ऍग्रो टुरिझम सेंटरमधील हिरवेगार आणि समृद्ध शेतीचे निरीक्षण हा एक सुंदर आणि मनोहारी क्षण आहे. या ठिकाणी काजू, नारळ, संत्रा, भुईमूग, सुपारी, जॅकफ्रूट, सिल्व्हर ओक, एवोकॅडो आणि रॅम्बुटन ही झाडे येथे विपुल प्रमाणात आहेत. कन्नई ऍग्रो टुरिझमच्या सत्तर एकर परिसरात लेमनग्रास, अननस, स्ट्रॉबेरी, संत्रा, केळी, कॉफी, कांदा, बटाटा, टोमॅटो, लसूण, आले आणि आंबा यांची मोठी लागवड आहे. याशिवाय अद्वितीय औषधी गुणधर्म असलेल्या जगातील काही दुर्मिळ वनस्पती आणि झाडे देखील येथे तुम्हाला पाहावयाला मिळतील.
निसर्गाच्या सानिध्यात , ग्रीशास कृषी पर्यटन केंद्राची स्थापना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील घोगली गावात केली आहे. या केंद्राचे संचालक सतीश नानाजी मोहोड हे आहेत. सदर पर्यटनाच्या ठिकाणी सेंद्रिय तसेच जैविक खताचा वापर करून ग्रीननेट व शेडनेटमध्ये घरगुती भाजीपाला, गुलाब इ. प्रकारचे उत्पादन घेण्यात येतात. पर्यटकांच्या मनोरंजनाकरीता स्विमिंग पूल, रेन डान्स, कॅनल व सिंगिंग प्लॅटफॉर्म, खेळण्याकरिता प्रशस्त जागा, उद्यानासह तसेच लहान मुलांना खेळण्याकरिता विविध प्रकारची खेळणी व मनोरंजनाकरिता विविध साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कृषीपर्यटन केंद्रात रात्रीच्या मुक्कामासाठी राहण्याकरिता उत्तम व्यवस्था आहे.
चैतन्य कृषी-पर्यटन आणि साहसी उद्यान हे निसर्गाच्या सान्निध्यात छत्रपती संभाजीनगर जवळील गंगापूर गावात वसलेले आहे. सुटीचा आनंद मिळवण्यासाठी,तुमचा शनिवार व रविवार घालवण्यासाठी हे एक इको-फ्रेंडली ठिकाण आहे. हिरव्यागार वातावरणाने वेढलेला परिसर जिथे तुम्हाला शुद्ध हवा अनुभवता येईल. येथे गायपालनाचा प्रकल्प आहे. या कृषिपर्यटन केंद्रात तुम्ही मातीच्या चुलीवर बनवलेल्या स्वादिष्ट ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी जैवविविधता असून निसर्ग आणि प्राणी प्रेमींसाठी एक शांत निसर्गानुकूल जागा आहे. गेल्या नऊ वर्षांपासून येथे सेंद्रिय शेती केली जाते. चैतन्य कृषीपर्यटनात मातीच्या घरात राहण्याचा अनुभव घेता येतो.
श्री रामबाग कृषी पर्यटन केंद्र हे परभणी जिंतूर रोडवरील धर्मपुरी येथे आहे. या केंद्राचे संचालक डॉ. संजय टाकळकर हे आहेत. २६ एकरमध्ये हे कृषी पर्यटन असून येथे शिवारफेरी, आयुवेर्दिक गार्डन, तारांगण, फळ लागवड, पशुपालन केले आहे. अनंत हेरिटेज कृषी पर्यटन केंद्र हे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात मौजे झुंजारपूर येथे आहे. वडिलोपार्जित ५० एकर शेतीत कृषिपर्यटन असून येथे वर्हाडी पद्धतीचे जेवण मिळते. तूर, कापूस, सोयाबीन, हळद यांची पिके, सेवा सुविधा लक्झरीयस आहेत. येथे जवळच टिपेश्वर अभयारण्य असल्यामुळे वन्यजीव पर्यटक येतात. त्यामुळे येथे कृषी पर्यटकाबरोबर वन्यजीव पर्यटक नेहमी मोठ्या संख्यने येत असतात.
सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथे अभिषेक मळा कृषीपर्यटन केंद्र आहे. निसर्गरम्य परिसरात आपलं घर असावं अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. नेत्रसुखद असा परिसर नजरेत भरून घेत छान हुरड्याचा अन् भोजनाचा आस्वाद घेत आयुष्यातील काही क्षण घालवावेत असे प्रत्येकाला वाटते. त्या प्रश्नांचे उत्तर अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्राकडे असावे असे मला वाटते
नेचरब्लिस कृषी पर्यटन केंद्र हे वाशीम जिल्हा, कारंजा लाड तालुक्यातील मानाभा या गावी वसलेले आहे. या ठिकाणी सेंद्रिय शेती केली जाते. नेचरब्लिस ऑरगॅनिक फार्म या अंतर्गत कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती, सेंद्रिय बियाणे बँक, अन्न प्रक्रिया युनिट्स, शेतकऱ्यांसाठी इडीपी केंद्र इ.शेती व्यवसायाचे सर्व पैलू आहेत. हा प्रकल्प भारतातील ‘नेक्स्ट जनरेशन फार्मर’चे उत्कृष्ट प्रदर्शन असल्याचे लक्षात येते. हा एक आदर्श कृषिपर्यटन प्रकल्प असून जो तरुण आणि महिलांसाठी अधिक व्यवसाय संधी निर्माण करून ग्रामीण भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवत असल्याचे प्रकल्प प्रमुख श्री.राहुल देशमुख यांनी सांगितले.
आनंद कृषी पर्यटन केंद्र हे सातारा येथून १८ कि.मी.अंतरावर बोरगाव येथे आनंद कृषी पर्यटन वसले आहे. या कृषी पर्यटनात उन्हाळ्यात आरामदायी खेळ खेळले जातात. या कृषी पर्यटनात स्विमिंग पूल असून यावेळी विनामूल्य स्विम सूट येथे दिला जातो. रेन डान्स, रोलर बॉल डान्सिंग, बोटिंग, धबधबा, फोटोसेशन, गार्डन सेल्फी पॉइंट्स, चिल्ड्रन पार्क स्विंग्स, फनी राईड्स, रोपवे, स्लाइडिंग पूल, ट्री हाऊस, फनी मिरर, (भुलभुलैय्या), संतदर्शन, लॉन, जेवणाची उत्तम सोय आहे. या वेळी नाश्त्यासह चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण मिळते. आनंद कृषी पर्यटनात शेकडो वृक्ष आहेत. निसर्गाच्या सहवासात दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. आनंद कृषी पर्यटनाला भेट देणे हे आनंददायक अनुभव असल्याच्या अनेक पर्यटकांच्या प्रतिक्रिया आहेत.
स्वग्राम हे आयुर्वेद,योग,निसर्ग,कृषीपर्यटन आणि जैवविविधता केंद्र आहे. आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक शेती हे जगातील पहिली नैसर्गिक जीवनशैली आहे. या कृषिपर्यटन केंद्रात रोगग्रस्त व्यक्तीसाठी नैसर्गिक वैद्यकीय प्रणाली समाविष्ट आहे. मुख्यत्वे आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक शेती ही ज्ञान, शास्त्र, तंत्र, कर्मक्रिया-कार्य, खेळ, कला, उत्सव समारंभ या विविध उपक्रमाद्वारे हे कृषिपर्यटन राबवले जाते. पूर्वीची १२ बलुतेदारांची वस्तुविनिमय प्रणाली येथे पाहावयास मिळते. हे कृषिपर्यटन पुणे जिल्ह्यातील लवळे, मुळशी येथे वसलेले आहे.
शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र नाशिक जिल्हा, देवळा येथील वाजगाव येथे आहे. हे केंद्र ७० एकरावर पसरलेले आहे. या कृषिपर्यटन केंद्रात स्विमिंग, बोटींग, रेनडान्स, आर्टीफिसियल फॉल्स आहेत. शिवारफेरी, घरगुती चुलीवरचे जेवण, मनोरे, देशी गायीची गोशाळा, फळबागा या सुविधा या कृषिपर्यटन केंद्रात आहेत. शिवपर्व कृषिपर्यटन केंद्रात नारळ, आंबा, सिताफळ, पेरू, चिक्कू, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद,आवळा, अंजिर, लिंबू, जांभूळ इ. फळपिके बागा आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारचे अन्नधान्य, ऊस, कांदे, भाजीपाला या कृषी पर्यटन केंद्रात पाहावयास मिळतो.
नाशिक जिल्हा, सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील श्री.हर्षल देवराम थविल यांनी रानझोपडी कृषीपर्यटन केंद्राची स्थापना केली. या कृषिपर्यटन केंद्रात कॉफ़ी, कोको,अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रूट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अँपल, पेरु, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी इ. झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळ्या १३ प्रकारांची लागवड केली. माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली त्यानंतर हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी, वारली चित्रकला इ. गोष्टी उभारुन कृषीपर्यटन केंद्र उभे केले.
एक दिवसीय सहल, कौटुंबिक सहली आणि कॉर्पोरेट सहलीसाठी सुप्रसिद्ध ठिकाण असलेले मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्र आहे. हे केंद्र नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी येथे अहमदनगरपासून फक्त २५ कि.मी. अंतरावर आहे. मामाचा मळा पर्यटकांना वास्तववादी ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देतो. सात एकरांपेक्षा जास्त असलेला हिरवागार निसर्गरम्य मामाचा मळा खरोखरच विलक्षण आहे. हा मळा लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूप मनोरंजक ठरत असल्याचा अनुभव आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज येथील मधुबन कृषी पर्यटन केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र आणि सर्वोत्तम एक दिवसीय पिकनिक स्पॉट आहे. लोक इथे येऊन समाधानाने आपला वेळ घालवू शकतात. दैनंदिन जीवनातील डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मधुबन कृषी पर्यटन केंद्र हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे कोणीही कुटुंबासह येथे राहू शकतो, खेळ खेळू शकतो, गावातील जीवन विलक्षण आनंदाने जगू शकतो. स्वादिष्ट भोजन आणि प्रीमियम सेवा ही या पर्यटन केंद्राची खासियत आहे. या सर्व कृषिपर्यटन केंद्रांना नाशिक येथे कृषीथॉन प्रदर्शनात आदर्श कृषिपर्यटन केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे.
तैनवाला फाउंडेशनद्वारे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य Interest free funding for higher education of girls by Tainwala Foundation
मागील दहा वर्षात १५० पेक्षा अधिक मुलींना दिले उच्च शिक्षण
Tainwala Foundation
नाशिक : तैनवाला फाउंडेशनचे रमेश तैनवाला व त्यांच्या पत्नी सौ. शोभा तैनवाला यांच्या संकल्पनेतून तैनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना बिनव्याजी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तैनवाला फाउंडेशनने शैक्षणिक कर्जाला पर्याय म्हणून मागील दहा वर्षात या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत १५० पेक्षा अधिक मुलींना उच्च शिक्षण मिळवून देत स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे केले आहे.
या वर्षी देखील या अभिनव योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थिनींनी संपर्क साधण्याचे आवाहन तैनवाला फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
शिक्षण हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. त्यामुळे मुलांच्या करिअर इतकेच महत्त्व मुलींच्या करिअरला देखील प्राप्त झाले आहे. परंतु गुणवत्ता, उच्च शिक्षणाची व करिअर करण्याची तीव्र इच्छा असून देखील केवळ आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते.
अशा मुलींसमोर शैक्षणिक कर्ज घेण्याचा पर्याय उरतो. परंतु ह्यातही अवाजवी व्याजदरामुळे त्यांना आपल्या करिअरकडे पाठ फिरवावी लागते. हे ओळखून तैनवाला फाउंडेशनतर्फे १२ वी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, नर्सिंग, बी. टेक, आर्किटेक्चर, सी.ए, बी फार्मसी, बीएड यांसारख्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील १० मुलींचे पालकत्व या योजनेअंतर्गत स्वीकारले जाऊन या मुलींना शैक्षणिक खर्चासाठी विशेष बिनव्याजी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे
तैनवाला फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून घेतलेल्या रक्कमेची परतफेड मुलींनी शिक्षण पूर्ण करून रोजगार मिळवल्यावर करावयाची आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीस बारावी परीक्षेत किमान ७५ % पेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य असून विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ३ लाखांपेखा अधिक नसावे.
सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या गरजू विद्यार्थिनींची निवड या योजनेसाठी करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक ३० जून २०२४ असून या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९८८१०९६३१६ किंवा ८६००००३४६० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन तैनवाला फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
बसवंत गार्डन अॅपी-अॅग्री टूरिझम सेंटर Baswant Garden Api-Agri Tourism Centre
नाशिक जिल्हा, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ‘पूर्वा केमटेक’ आणि ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम’च्या सहयोगाने उपक्रमशील असे ‘बसवंत हनी बी पार्क व मधमाशीपालन प्रशिक्षण केंद्र’ तसेच ‘बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र’ उभारण्यात आले आहे.
देशातील पहिले अॅपी-अॅग्री टूरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख निर्माण झाली आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहराजवळील मुखेड रोडनजीक हे पर्यटन केंद्र दोन एकरावर उभारण्यात आले आहे.
या अॅपी-अॅग्री टूरिझम सेंटरची माहिती देतांना संचालक श्री. संजय पवार यांनी सांगितले कि, मानवी जीवनातील मधमाशीचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवून मधमाशीचे संरक्षण व संवर्धन व्हावे व मधमाशा संवर्धन करून शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
मधमाशी प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागील उदेश असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवक, शहरी व ग्रामीण समाज आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
या ठिकाणी पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनी बी फेस्टिवल, बसवंत फळ महोत्सव, द्राक्ष आणि किशमिश (बेदाणे) महोत्सव, मुख्याध्यापक/प्राचार्य परिषद, पर्यटन महोत्सव, चित्रकला स्पर्धा तसेच इतरही अनेक उपक्रम राबविले जातात.
द्राक्ष महोत्सव, आंबा महोत्सव तसेच इतरही अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात.
मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता बसवंत हनी बी पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांसाठी सर्व सुविधायुक्त बसवंत मधमाशी प्रशिक्षण केंद्राचीही स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतीपूरक तसेच पर्यावरणपूरक अशा या प्रकल्पाला हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याचे श्री. पवार म्हणाले.
दोन एकरांवर उभारलेल्या या बसवंत मधमाशी उद्यानात विविध संकल्पनेतून मधमाशीचे मानवी आहार, आरोग्यदायी मध, विविध पिकांचे उत्पादन वाढ तसेच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना बसवंत मधमाशी उद्यानात साकारली आहे.
या मधमाशी उद्यानात मधमाशीविषयी माहितीपट, मधमाशीचा जीवनक्रम, मधमाश्यांची वसाहत (अॅपिअरी), मधमाशांच्या गावाची प्रतिकृती, मधमाशीचे गाव, गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन कशा प्रकारे मधमाशीपालन करू शकतात हे समजण्यासाठी ‘मधमाश्यांचे गाव’ ही संकल्पनेचा उपक्रम या ठिकाणी आहे.
मधमाश्यांच्या शहराची प्रतिकृती, बी-प्लँट नर्सरी - सीड बँक, डोरसेटा पॉईंट, आग्या मधमाशी प्रतिकृती, मधमाश्यांचे पेंटिंग झोन जसे ग्रामीण भागातील संस्कृती आणि मधमाशीचे कार्य वारली पेंटिंग्जच्या माध्यमातून समजावून देणारा विभागही आहे. बांबू, स्टोन, पेपर पेंटिंग, कला वस्तूंचे संग्रहालय, वाचनालय, विसावा, प्ले एरिया, बसवंत कॅफे, फूड कोर्ट, मधुबन, ‘बीनी’ आणि ‘बीनिव्हर्स’ (सेल्फी पॉइंट),, मधमाशीविषयी लघुपट अशा अनेकविध आकर्षण असलेल्या गोष्टी येथे आहेत.
याबरोबरच येथील खाद्यपदार्थ आणि विक्री विभागात आउटलेट आणि कॅफे, मधुबन फूड कोर्ट, विसावा, स्मरणवस्तू दुकान, गेम झोन कॅफे अशा विविध सुविधा आहेत. बसवंत कृषीउद्योग पर्यटन केंद्रात ‘गाव समृद्ध, तर देश समृद्ध’ ही महत्त्वाची विचारधारा अधोरेखित करणार्या ‘सेवरगाव’ या स्वयंपूर्ण आदर्श गावाची संकल्पना प्रतिकृतीद्वारे मांडली आहे.
अलीकडे प्रक्रिया उद्योगांतून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यासाठी एक मध्यम स्वरूपाचे अन्नप्रक्रिया केंद्र (फूड प्रोसेसिंग युनिट), मध प्रक्रिया केंद्र, तसेच चॉकलेट फॅक्टरी येथे उभारून प्रशिक्षणाची सोयदेखील केली आहे. द्राक्षांची माहिती, बेदाणा निर्मिती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या बेदाण्यांची मांडणी येथे केली आहे.
ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे सजीव साधन असणार्या कृषी आधारित बैल-संस्कृतीची परिपूर्ण ओळख बसवंत गार्डनमध्ये मांडलेल्या बैलांच्या शिल्पकृतींमधून नवीन पिढीला अतिशय रंजकतेने करून दिली जाते. भारतातील बैलांच्या विविध जातींच्या हुबेहुब प्रतिकृती त्यांच्या माहितीसह येथे बघायला मिळतात. याबरोबरच स्पोर्ट्स झोन, फळांच्या मोठ्या प्रतिकृती, ससेपालन, टुक-टुक व्हॅन इ. विविध आकर्षणांचा यात समावेश आहे.
अॅग्री टूरिझम-अॅपी टूरिझम हे क्षेत्र परिसरातील शेतकरी बंधुभगिनींना ‘कम्युनिटी टूरिझम’ या दृष्टीकोनातून पूरक ठरणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील कृषी पर्यटन क्षेत्राला पथदर्शक तसेच प्रेरक ठरेल. हे अॅपी अॅग्री टूरिझम अधिकाधिक उपयुक्त आणि शाश्वत होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.अनेक पर्यटक सहपरिवार येथे भेट देतात तसेच शाळा-महाविद्यालयांच्या सहलीही येथे येतात.
बसवंत हनी बी पार्क व कृषी पर्यटन केंद्र पाहण्यासाठी तिकीट लागते. फक्त प्रवेशासाठी १०० रुपये तिकीट असून ५ ते १२ वर्ष मुलांना प्रवेश ५० रु. आहे. यात गेम झोनला प्रवेश नाही. गेम झोनमधे प्रवेश करण्यासाठी २०० रुपयांचे तिकीट सर्व वयोगटाला लागू आहे. त्यांनतर दोन्ही प्रोजेक्ट ची गायडेड टूरसह सर्व गेम झोन, फॅक्टरी विज़िट, मधमाशी उद्यान ते बसवंत गार्डनला टुकटुक वॅनमधून प्रवास असेल. शिवाय वेलकम ड्रिंक आणि ४ वा चहा असेल, हे सर्व ६०० रुपयांच्या पॅकेजमध्ये मिळणार आहे. तर ५ ते १२ वर्षापर्यंत मुलांना ४०० रुपये तिकीट असेल. दोन्ही तिकीटांना (६०० आणि ४००) १०० रुपये किमतीचे २ कूपण देण्यात येतील. या कूपनच्या माध्यमातून मधुबन फूड कोर्ट, बसवंत कैफ़े, सोव्हेनियर शॉप आणि सिटी सेंटर मॉल येथील बसवंत आउटलेट येथे खरेदी करता येते.
'बसवंत गार्डन अॅपी-अॅग्री टूरिझम सेंटर' या कृषिपूरक स्तुत्य उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. बसवंत मधमाशी उद्यानाला प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टूरिझम या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘रिस्पॉन्सिबल टूरिझम अॅर्वार्ड’ हा पुरस्कार मिळाला.
भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटचे अॅडव्हायजर हॅरॉल्ड गुडवीन व मध्य प्रदेशचे पर्यटनमंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते ग्रीनझोन अॅगोकेमचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘नैसर्गिक वारसा आणि जैव विविधतेमध्ये पर्यटनाचे योगदान वाढवणे’ या श्रेणीमध्ये बसवंत हनी बी पार्कला रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले. ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्कार याखेरीज इतरही काही मानाचे पुरस्कार या प्रकल्पाला मिळाले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : बसवंत कृषी पर्यटन, बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगांव बसवंत, जि नाशिक मोबा.- ७७७४०८९५१७, ७५०७७५७७००