तैनवाला फाउंडेशनद्वारे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य
Interest free funding for higher education of girls by Tainwala Foundation
मागील दहा वर्षात १५० पेक्षा अधिक मुलींना दिले उच्च शिक्षण
Tainwala Foundation
नाशिक : तैनवाला फाउंडेशनचे रमेश तैनवाला व त्यांच्या पत्नी सौ. शोभा तैनवाला यांच्या संकल्पनेतून तैनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना बिनव्याजी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तैनवाला फाउंडेशनने शैक्षणिक कर्जाला पर्याय म्हणून मागील दहा वर्षात या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत १५० पेक्षा अधिक मुलींना उच्च शिक्षण मिळवून देत स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे केले आहे.
या वर्षी देखील या अभिनव योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थिनींनी संपर्क साधण्याचे आवाहन तैनवाला फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
शिक्षण हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. त्यामुळे मुलांच्या करिअर इतकेच महत्त्व मुलींच्या करिअरला देखील प्राप्त झाले आहे. परंतु गुणवत्ता, उच्च शिक्षणाची व करिअर करण्याची तीव्र इच्छा असून देखील केवळ आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते.
अशा मुलींसमोर शैक्षणिक कर्ज घेण्याचा पर्याय उरतो. परंतु ह्यातही अवाजवी व्याजदरामुळे त्यांना आपल्या करिअरकडे पाठ फिरवावी लागते. हे ओळखून तैनवाला फाउंडेशनतर्फे १२ वी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, नर्सिंग, बी. टेक, आर्किटेक्चर, सी.ए, बी फार्मसी, बीएड यांसारख्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील १० मुलींचे पालकत्व या योजनेअंतर्गत स्वीकारले जाऊन या मुलींना शैक्षणिक खर्चासाठी विशेष बिनव्याजी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे
तैनवाला फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून घेतलेल्या रक्कमेची परतफेड मुलींनी शिक्षण पूर्ण करून रोजगार मिळवल्यावर करावयाची आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीस बारावी परीक्षेत किमान ७५ % पेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य असून विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ३ लाखांपेखा अधिक नसावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा