name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): आता तरी संघटित व्हा! Farmers Protest & Women Farmer Suicides in Maharashtra | शेतकरी संप

आता तरी संघटित व्हा! Farmers Protest & Women Farmer Suicides in Maharashtra | शेतकरी संप

आता तरी संघटित व्हा! शेतकरी महिलांच्या वाढत्या आत्महत्या आणि अस्मानी-सुलतानी संकट | शेतकरी संप आणि सद्यस्थिती
Time to Unite, Farmers! The Harsh Reality of Agriculture Crisis and Women Farmer Suicides

Aata tari sanghtit vha


प्रस्तावना : सहनशीलतेचा बांध सुटतोय...

​  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात:

स्त्रीलाच भक्ती। स्त्रीलाच ज्ञान। तिलाच संयम शहाणपण।

तिच्यानेच हलती वाटते। संपूर्ण संसारचक्र।।


​   परंतु, आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ग्रामीण भागात पाहिलंत तर या स्त्रीच्या सहनशीलतेचा, संयमाचा बांध आता सुटलाय. जो शेतकरी राजा कालपर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करत होता, दुर्दैवाने आता त्याच संकटांची शेतकरी राणीला थेट तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, आता पुरुषांच्या बरोबरीने शेतकरी महिलांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतोय, ही अत्यंत चिंतेची आणि वेदनादायी बाब आहे.

कष्ट पहाडाएवढे, दाम राई एवढाच!

​   एका कवीने शेतकऱ्याचे विदारक चित्र अत्यंत समर्पक शब्दात मांडले आहे:

कष्ट पहाडाएवढे। राई एवढाच दाम।

बैलाचं राबणं जिनं। रात भुकी सामसुम।

पिढ्यावर पिढ्या गेल्या। सारं कोरडं आभाळ।

कुठं शिजतंया सोनं। कुटं फुका उतू जाळ।।


​   शेतकऱ्याच्या पूर्वीपासून असलेल्या परिस्थितीचे अवलोकन केले, तर असेच चित्र आजही थोड्याफार फरकाने आपल्याला दिसते. परंतु, आता परिस्थितीने टोकाची भूमिका घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीला (अस्मानी संकट) तोंड देता देता शेतकऱ्याची दमछाक होते आणि त्यातून काही प्रमाणात पीक वाचलंच, तर ते सरकारच्या चुकीच्या धोरणांना (सुलतानी संकटाला) बळी पडते.

​   आजपर्यंत जवळपास ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्षाला ४५०० हून अधिक आत्महत्यांची नोंद होत आहे. याचा आढावा घेतला तर एकच सत्य समोर येते—'सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण'.

शेती: उत्पन्नाची हमी नसलेला एक जुगार

​   शेती व्यवसायाकरिता लागणारी सामग्री, बी-बियाणे, खते यांच्या किमती दुपटीने वाढत आहेत. मजुरांच्या मजुरीत दरवर्षी वाढ होते आहे, परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाच्या किमती शाश्वत राहत नाहीत; उलट त्या कमी होताना दिसत आहेत. मागच्या वर्षी मिळालेला भाव यंदाही टिकून राहील याची कोणतीही शाश्वती नसते. पुढच्या वर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो.

​    पण घडते नेमके उलटे! जसे जुगाराच्या डावात हरले की सर्वस्व जाते, तशीच शेतीसुद्धा जणू एक जुगार बनली आहे. त्यात उत्पन्नाची आणि भावाची हमी नसल्यामुळे शेतकरी नेहमी डाव हारतो.

'ना घर का ना घाट का'—बाजारपेठेतील अपमान

​   'शेतकरी राजा, देशाचा कणा' ही त्याला दिलेली उपाधी आज त्याच्यासाठी शाप ठरतेय. स्वतःच्या घामातून पिकवलेल्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार आज शेतकऱ्याला नाही.

  • सरकारी खरेदीतील छळ: सरकारी खरेदीत स्वतःचा माल विकताना तासनतास रांगेत उभे राहून अपमान सहन करावा लागतो. तिथेही ग्रेडेशन (प्रतवारी) च्या नावाखाली शेतकऱ्याची लूट होते.
  • बाजार समित्यांची दुरवस्था: कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी साधे पिण्याच्या पाण्याची सोय नसते. अवकाळी पाऊस आला की शेतकऱ्याचा माल उघड्यावर भिजतो आणि हे संपूर्ण नुकसान त्याला एकट्यालाच सहन करावे लागते.

​  बाजारपेठेत शेतमाल सोडून सुईपासून ते गाडीपर्यंत एकाही वस्तूची किंमत कमी होत नाही, मग शेतमालाचेच भाव का पाडले जातात? दरवर्षी कर्ज काढून शेती करणारा शेतकरी अखेर कर्जाच्या डोंगराखाली दबून आपला जीव देतो.

पेन्शन हजारो रुपये, मग शेतकऱ्याला वर्षभरात ६ हजार का?

​  आज ज्या कुटुंबात पुरुष आजारपणामुळे किंवा मृत्यूमुळे नसतो, तिथे संपूर्ण शेतीची धुरा महिला सांभाळतात. पण पैशाचे सोंग आणता येत नाही. महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही राज्यकर्ते मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत.

​  निवडून जाणारे लोकप्रतिनिधी प्रथम शेतकऱ्यांची मुलं असतात, पण सत्तेत गेल्यावर त्यांना याचा विसर पडतो.

एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे: जिथे सरकारी कर्मचाऱ्यांना ३० ते ८० हजार रुपये महिना पेन्शन पुरत नाही, तिथे संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वर्षाला फक्त ६ हजार रुपये देऊन सरकार काय साध्य करत आहे?


​   पाच आकडी पगार कमावणारी काही मुले आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात, पण माझा शेतकरी वेळप्रसंगी शेती विकून, कर्ज काढून स्वतः भुकेला राहून आई-वडिलांची सेवा करतो.

पीक विमा: एक मोठे गाजर!

​  शेतकऱ्याला मिळणारा पीक विमा म्हणजे केवळ एक गाजर आहे. दरवर्षी नियमित विम्याचा हप्ता भरूनही प्रत्यक्ष नुकसान झाल्यावर शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विमा कंपन्या हे देखील एक नवीन सुलतानी संकट बनले आहेत.

अंतिम पर्याय: संघटन आणि मतदानाचे ब्रह्मास्त्र

​   आपला शेतकरी संघटित नाही, हेच या सर्व शोषणामागचे मुख्य कारण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात:

हत्तीसी आवरी गवती दोर। मुंग्याही सर्पाशी करिती जर्जर।

व्याघ्र सिंहाशी फाडती हुशार। रानकुत्रे संघटोनी ।।

 

​  जशी रानकुत्री संघटित होऊन वाघ-सिंहालाही फाडू शकतात, तीच वेळ आता शेतकऱ्यांवर आणि घरातील राबत्या महिलांवर आली आहे. आपण संघटित झालेच पाहिजे. सरकारी कर्मचारी आपल्या हक्कासाठी कुटुंबासह संपावर जातात आणि आपले हक्क मिळवतात. जर देशातील शेतकऱ्यांनी 'संपाचे अस्त्र' वापरले, तर संपूर्ण देशात हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही.

​   मतदान ही दुधारी तलवार आहे, थोडा चुकला तर स्वतःचा वार स्वतःवर उलटतो. म्हणूनच, आता मतदानाच्या शस्त्राचा 'ब्रह्मास्त्रासारखा' वापर करण्याची तयारी ठेवा.

​ "भीक नको, हवे घामाचे दाम!" हा नारा देत आता प्रत्येक शेतकरी बंधू-भगिनीने संघटित होऊन आपला हक्क पदरात पाडून घेतला पाहिजे. शेतकरी राजा जागा हो, सैनिक म्हणून लढ!

लेखिका: 

©पौर्णिमा सवई, 

अमरावती

Aata tari sanghtit vha

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आता तरी संघटित व्हा! Farmers Protest & Women Farmer Suicides in Maharashtra | शेतकरी संप

आता तरी संघटित व्हा! शेतकरी महिलांच्या वाढत्या आत्महत्या आणि अस्मानी-सुलतानी संकट | शेतकरी संप आणि सद्यस्थिती Time to Unite, Farmers! The H...