name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): ऑक्टोबर 2024

उपक्रमशील संशोधक शेतकरी : श्री. गणू दादा चौधरी—नवकल्पना आणि प्रगत शेतीचे आदर्श उदाहरण | Enterprising Researcher Farmer: Shri. Ganu Dada Chaudhary

उपक्रमशील संशोधक शेतकरी : श्री. गणू दादा चौधरी — नवकल्पना आणि प्रगत शेतीचे आदर्श उदाहरण | Enterprising Researcher Farmer: Shri. Ganu Dada Chaudhary


upkramshil sansodhak shetkari : shri ganu dada choudhari

    धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील श्री. रमाकांत काशिनाथ बागूल उर्फ गणूदादा चौधरी हे संशोधक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन  हेक्टर जमीन असून त्यात ते नारळ, मका, टरबूज,  कोथंबीर अशी पिके घेतात. शेतीसाठी त्यांच्याकडे आज ट्रॕक्टर व अनुषंगिक यंत्रसामग्री नांगर, रोटाव्हेटर, ट्रिलर, टँकर, ट्रॉली आहे.

upkramshil sansodhak shetkari : shri ganu dada choudhari

संशोधक, उद्योगी वृत्ती

       
    श्री. गणू दादा यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. शिक्षण घेत असताना काही अपवादात्मक परिस्थितीमुळे आयटीआय शिक्षण अर्ध्यावरच सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी कंपनीमध्ये जॉब शोधला. आयुष्यामध्ये स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला 

    पण मुळातच संशोधक, उद्योगी वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या उद्योगी वृत्तीमुळे आपण स्वतःचा विकास करत नसून आपण धनदांडग्या व्यवस्थेला पोसत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आणि त्यांनी नोकरी सोडली मग वडिलोपार्जित शेती हा चांगला पर्याय त्यांनी अवलंबला. अर्थातच त्यांचे वडील शेतकरी असल्यामुळे शेतीचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले.

शेतीला जोडधंदा ट्रॅक्टर व्यवसाय केला सुरू

      आपल्या प्रयोगशील वृत्तीने शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करावे या ध्येयाने प्रेरित होऊन नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्याकरीता सोपा नव्हता असे श्री. गणू दादा यांनी सांगितले कारण शेतमालाला अस्थिर बाजारपेठ व्यापारी वर्गाचे पिळवणूकीचे ध्येयधोरण, अवकाळी पावसाचा मार व उत्पादन वाढीव खर्च या सर्व गोष्टी बघता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल याचा साक्षात्कार त्यांना झाला. 

    मुळातच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा स्वभावगुण असल्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग चालू केले. पण अनेकवेळा नफा अपेक्षित असून तोटाच झाला. मग शेतीला जोडधंदा असावा हे लक्षात आले मग त्यासाठी ट्रॅक्टर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.  ट्रॅक्टर व्यवसाय करत असताना नाविन्यपूर्ण अशा यंत्रसामग्रीचा शोधही लावला. त्यासाठी स्वत:च्या छोटेखानी वर्कशॉपची स्थापना केली.  या माध्यमातून विवीध नाविन्यपूर्ण शेतीपूरक यंत्राची निर्मीती केली.

Upkramshil sansodhak shetkari : shri Ganu dada choudhari

यंत्रसामग्री निर्मिती केली

   श्री. गणू दादा यांनी स्वनिर्मित यंत्रसामग्री निर्मिती केली असून यात कांदावाफा खाचेयंत्र,  वाफाशेरी यंत्र, राईट अँगल शेरी यंत्र, विवीध बेड रेझर, सॉइल रेझर, पारंपारिक पध्दतीवर आधारीत बैलजोडी पास(वखरणी, डवरणीसाठी), वाफायंत्र, ऊस पेरणीयंत्र, टोचन यंत्र, शेतातील खतटाकणी लहान ट्रॕक्टर  बकेट, अल्पखर्ची पिस्टन फवारणी अशा विवीध प्रकारच्या ट्रॕक्टरचलीत यंत्रसामग्रीची त्यांनी निर्मिती केली.

फळपिकांची लागवड

   यंत्रसामग्री निर्मितीबरोबर शेतीमध्ये डाळिंब, लिंबू अशा वेगवेगळ्या फळपिकांची लागवड करून आधुनिक असे शोधही लावले, प्रयोगही केले. तेल्यामुक्त डाळिंबाची संकल्पना त्यांनी आपल्या शेतात राबवली आणि त्यांची बाग तेल्यामुक्त होती हे विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे
      या नंतर श्री. गणू दादा यांनी मजूरमुक्त शेतीच्या माध्यमातून सलग सेंद्रिय नारळबागेची संकल्पना उदयास आणली. सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे ठरवले जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी मी शाश्वत शेती त्याला वारसाने देऊ शकतो असे गणू दादा यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांना धुळे येथील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची फार मोलाची मदत झाली.  तेथील विविध कार्यशाळा प्रशिक्षण शिबिरं यांना त्यांनी हजेरी लावली. त्यातून मोलाचे ज्ञान मिळाले आणि त्या ज्ञानाचा फायदा त्यांनी स्वतः साठी तसेच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केला. या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली. शाळा, महाविद्यालय येथे व्याख्यानासाठी, चर्चासाठी आमंत्रण येऊ लागले.  शाश्वत शेतीचा प्रचार त्यांनी सुरू केला.

Upkramshil sansodhak shetkari : shri Ganu dada choudhari

विविध शेती उपक्रमांची सुरुवात

  सर्व काही सरकारने करावे या अपेक्षेवर अवलंबून न राहता त्यांनी शेतामध्ये "पाणी आडवा पाणी जिरवा" या माध्यमातून दहा ते बारा लाख लिटर पाणी क्षमतेचा कोल्हापूर टाईप बंधाऱ्याची निर्मिती केली व इतर शेतकऱ्यांना हा संदेश दिला की आपण स्वतःही काही करू शकतो प्रत्येक वेळेस सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
    
    त्यांच्या विविध प्रयोगांना मग ते सेंद्रिय असो किंवा यांत्रिकी असो कृषी विभाग धुळे, कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी त्यांच्या प्रयोगास वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन केले. कृषी विभागाशी समन्वय साधून आज त्यांची सेंद्रिय शेतीशी व आधुनिक यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी नाळ जोडली आहे.

मजूरमुक्त शेती संकल्पना

    आजकाल शेतीला मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. मजूर टंचाईवर प्रभावी उपाययोजना करावी यादृष्टीने श्री. गणू दादा यांनी शेती १०० टक्के यांत्रिकीकरणाखाली कशा पध्दतीने येऊ शकते यासाठी मजूरमुक्त शेती संकल्पनेच्या माध्यमातून यांत्रिकीकरणावर भर दिला.
 
    टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना स्विकारली. यात मानवचलीत खतटाकणी यंत्र , लिंबू तोडणी यंत्र, विविध प्रकारे बेड मेकर यंत्र ,फळबागेसाठी सॉईल रेझर, कांदावाफा  खाचेयंत्र, वाफाशेरी यंत्र, हातकोळपे, विद्राव्य खतासाठी अतिशय स्वस्त ठिबक, व्हेंचूरी राईट टू अँगल शेरी सपोर्ट सिस्टिम नैसर्गिक संसाधन वापरून ऑर्गेनीक चूल अशा अनेक प्रयोगांची व यंत्रांची मालिका त्यांनी सादर करून निर्मिती केली आहे.

सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार

    सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा. या माध्यमातून ते स्वतः सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरीच बनवितात तसेच इतरही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे  मार्गदर्शन करतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे ज्ञान अवगत व्हावे यासाठीही गणू दादा यांनी शालेय आवारातील कचरा व शालेय पोषण आहारातील उष्टे व खरकटे अन्न यावर प्रक्रिया करून गांडूळ खत निर्मिती व्हावी यासाठी  स्वखर्चाने शालेय आवारात गांडूळ खत निर्मितीचा उपक्रम राबवितात. 

    विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व अवगत व्हावे या अनुषंगाने सेंद्रिय व शाश्वत शेतीचे मोलाचे मार्गदर्शनही ते करतात. यासंदर्भात त्यांचा मंत्रालयाशीही पत्रव्यवहार चालू आहे जेणेकरून ह्या प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय आवारात एक कोपरा सेंद्रिय  निविष्ठांचा किंवा "गणुदादांचा शालेय सेंद्रिय उपक्रम" राबवावा यासाठी त्यांचे प्रयत्न शासनदरबारीही चालू आहेत. विविध मोठ्या संस्थांमध्येही सेंद्रिय निविष्ठांचा वापर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात करावा यासाठी ते प्रयत्न करतात. शासनाच्या विवीध विभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांना या प्रकल्पाविषयी माहिती देण्याचे काम गणू दादा करत असतात.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

राज्यस्तरीय लेखन सेवा पुरस्कार विजेते 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

एकात्मिक कीड नियंत्रणासाठी इकोपेस्ट ट्रॅप (सापळे) – शेतकरी श्री. कांतीलाल पाटील यांचे पेटंटेड संशोधन | Ecopest Traps for Integrated Pest Control

एकात्मिक कीड नियंत्रणासाठी इकोपेस्ट ट्रॅप (सापळे) – शेतकरी श्री. कांतीलाल पाटील यांचे पेटंटेड संशोधन | Ecopest Traps for Integrated Pest Control

Ektmaik kid niyatransathi Ecopest trap (saple)


  एकात्मिक कीड व्यवस्थापनाने शेतीमध्ये कीड नियंत्रण करण्याचा उपाय स्वस्त असून यामुळे कीटकनाशके फवारणीचीही बचत होते. 

    या नैसर्गिक उपायामुळे शेतमालाची गुणवत्ता दर्जेदार होत असल्याचे संशोधन जळगाव जिल्हा चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील कांतीलाल भोजराज पाटील यांनी इकोपेस्ट ट्रॅप (सापळा) विकसित केला आहे. हे नाविन्यपूर्ण संशोधन त्यांनी आधी स्वतःच्या शेतीत वापरले. गेल्या सात वर्षापासून ते सापळ्याचे उपयोग करून निरीक्षण करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

Ektamik kid niytransathi Ecopest trap
कांतीलाल भोजराज पाटील 

दर्जेदार उत्पादनासाठी इको ट्रॅप सापळा

      इकोपेस्ट ट्रॅपविषयी अधिक माहिती देतांना श्री. पाटील म्हणाले की 'हानिकारक कीटकनाशकांचा वापर कमी करून दर्जेदार उत्पादनासाठी पिवळ्या रंगाचा चिकट प्रकाश सापळा उपयुक्त आहे. 

    इको ट्रॅप सापळा हा पिकांवर असणारी पांढरी माशी, तुडतुडे, मावा, लोकरीमाशी, शेंडा पोखरणारी अळी, फळमाशी तसेच इतर हानिकारक कीटक या ट्रॅपला येऊन चिटकतात. 

    या सापळ्यात स्वयंचलीत एलईडी लावण्यात आलेला असून अंधार पडल्यावर तो आपोआप सुरू होतो. कीटक त्याकडे आकर्षित होऊन ट्रॅपला चिकटतात. सूर्योदयानंतर हा एलईडी बंद होतो. हा ट्रॅप (सापळा) दिवस-रात्र कीटक नियंत्रणाचे काम करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

Ektmik kid niytransathi Ecopest trap (saple)

पर्यावरणपूरक सापळ्याची निर्मिती

     श्री. पाटील यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेतले असून शेती करत असतांना शेतकऱ्यांना कीडनाशकाची फवारणी करावी लागते. कीडनाशकांची बाजारात हजारो रुपये लिटरने किंमत आहे. त्याची फवारणी करूनसुद्धा किडींचा पूर्णतः बिमोड होत नाही. हे पाहिल्यानंतर आपण यावर काहीतरी उपाय करावा म्हणून माझं मन अस्वस्थ होतं. यासाठी पर्यावरणपूरक असलेले उपकरण तुलनेने स्वस्त असलेले म्हणजे २०० रुपयात असलेला इको ट्रॅप (सापळा) विकसित केला आहे. 

      हा ट्रॅप बनविण्यासाठी पिवळे कार्ड, द्रव, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि ०.५ एलईडी, दोन पेन्सिल सेल यांचा वापर करून त्यांनी हा ट्रॅप तयार केला आहे. दोन पेन्सिल सेलमुळे  ट्रॅप सुमारे २५ दिवस कार्यरत राहतात. यात सेंसर असल्याने दिवा दिवसा बंद राहतो व अंधार पडल्यानंतर तो प्रकाशित होऊन कार्य सुरू करतो.  हा ट्रॅप स्वयंचलीत असल्याने मजुरांची गरज पडत नाही. सर्व ऋतूत काम करू शकतो.  

Ektmik kid niyatransathi Ecopest traps (saple)

इको ट्रॅपला पेटंट

    या इको ट्रॅपला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंटही बहाल करण्यात आलेले आहे. या ट्रॅपच्या निर्मितीसाठी कांतीलाल पाटील यांना जिल्हा नाविन्यपूर्ण परिषदेतंर्गत प्रोत्साहन देण्यात आलेले आहे असे श्री कांतीलाल पाटील यांनी माहिती दिली

 राष्ट्रीय परिषदेत सादरीकरण

    या इको ट्रॅप सापळ्याचे २०१७ मध्ये जळगाव येथे राष्ट्रीय परिषदेत सादरीकरण केले गेले तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्प (महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी) व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद (जळगाव) यांच्या वतीने आयोजित कृषी यांत्रिकीकरण दिवस या निमित्ताने क्षेत्रीय प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. 

    याकरीता ' नवोन्मेश संशोधक शेतकरी' या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे. २०१८ मध्ये अटारी (पुणे) व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे) येथे प्रयोगशील शेतकरी संमेलनात या इको ट्रॅप सापळ्याचे सादरीकरण झाले आहे.

ektamik kid niytaransathi Ecopest trap (saple)

किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी

   या इको ट्रॅप सापळ्याचा वापर द्राक्ष, टोमॅटो, वांगी, कलिंगड, कापूस, मिरची यांसह विविध पिकांमध्ये करता येतो. किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीडनाशकांवर अवलंबून राहण्यापेक्षा हे सापळे उपयुक्त ठरतील. सेंद्रिय शेतीमध्ये किडींच्या नियंत्रणासाठी हे सापळे प्रभावी ठरत आहे. या स्वस्त उपायाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा असे आवाहन श्री. कांतिलाल पाटील यांनी केले आहे

© दीपक केदू अहिरे, नाशिक

(लेखन सेवा पुरस्कार विजेते)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

तीन वर (कथा)Three up (story)

तीन वर (कथा)
 Three up (story)

  आमच्या लहानपणी पूर्वी भूपाळी,अंगाई गीत, मंदिरात भजन, बोधप्रद गोष्टी ऐकायला मिळायच्या. पण आता या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे मुलांची वाचनाची आवड कमी होत चालली आहे. लहानपणी बाल शिवबाला जिजाऊ माता  गोष्टी सांगत असत. त्यामुळे शिवरायांचे बालपण घडले. या गोष्टीतून मिळणाऱ्या शिकवणीतून संस्कार घडतात. अशीच एक गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. विशेष म्हणजे ती तत्कालीन रामभूमी  दैनिकात प्रकाशित झाली होती. तीच "तीन वर" नावाची कथा आज देत आहे. 

      फार फार जुनी गोष्ट आनंदपुर नगरात फार गरीब ब्राह्मण राहत असे. दिवसभर कष्ट करून तो पोटापुरते मिळवी. तो जरी अगदी गरीब असला तरी थोर मनाचा असा होता. आल्या गेल्याचा आदर सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असे मानी. 

   त्याच गावात एक मोठा व्यापारी राहत होता. त्याच्याजवळ भरपूर संपत्ती होती, परंतु त्यातून काही खर्च होऊ नये म्हणून त्याची धडपड चाललेली असायची कोणाला काही द्यावयाची वेळ आली तर त्याला फार वाईट वाटे.  

          त्या व्यापाराची बायको मोठी धर्मशील होती. ती आपल्या नवऱ्यास म्हणे, "अहो तुम्हाला काय कमी आहे? इतका कंजुषपणा कशासाठी? आपण काही दानधर्म करू या! आपल्या जवळ जी संपत्ती आहे. तिचा उपयोग स्वतःकरिता आणि परोपकाराकरिता केला तर आपल्याला समाधान नाही का लाभणार? हे बायकोचे बोलणे त्याला आवडत नसे, कोणी गरीब माणूस आला की, त्याच्या अंगावर खसकन खेकसून बोलायचा. 

Three up (story)

              एकदा असे झाले की त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी एक साधू आला व नेहमीप्रमाणे काहीतरी भिक्षा मागू लागला. व्यापारी त्या साधूच्या अंगावर धावून ओरडून म्हणाला, 'काय झालं रे, तुला भीक मागायला? चांगला जाडाजुडा तर दिसतोस? चालता हो येथून, तुला येथे काही एक मिळणार नाही. यावर साधू काहीतरी बोलणार तोच तो व्यापारी त्याच्या अंगावर धावून गेला लगेच तो साधु तिथून निघून गेला. 

    पुढे फिरता फिरता साधू गरीब पण सालस व परोपकारी ब्राह्मणाच्या घरी आला. ब्राह्मणाने त्याची विचारपूस करून त्याला जेवण वगैरे दिले. आपल्या एपतीप्रमाणे त्याचा चांगला आदर सत्कार केला व त्या साधुला आपल्या घरी त्या ब्राह्मणाने मुक्कामी ठेवले. 

    बालमित्रांनो, दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर तो साधू म्हणाला, "हे गरीब ब्राह्मणा, मी साधू नाही. मी भगवान विष्णू आहे, तुझी लोकसेवा पाहून मी संतुष्ट झालो. "हे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाने साधूचे पाय धरले. साधू रुपी भगवान म्हणाला, "तुला जे पाहिजे ते माग. ब्राह्मण म्हणाला हे भगवान आपली चरणसेवा मजकडून होवो. एवढेच मला द्या. "साधू वेषधारी भगवान विष्णू" ठीक आहे" असे म्हणून निघाले. लवकरच ब्राह्मणाची स्थिती सुधारू लागली त्याला खूप संपत्ती मिळाली. 

    ही गोष्ट त्या श्रीमंत व्यापाऱ्याला कळली, तेव्हा तो त्या साधूच्या शोधासाठी निघाला. गावाबाहेर बरेच अंतर चालून गेल्यावर तो साधू त्याला दिसला. लागलीच धावत धावत जाऊन त्याने साधु महाराजांचे पाय धरले व म्हणाले हे भगवान मी चुकलो, मला माफ करा. आता माझ्याकडे याल तर मी आपला चांगला आदर सत्कार करीन. मला काहीतरी वर द्या.  

       हे त्या व्यापाराचे बोलणे ऐकून साधूने त्यास पाहिजे, तो वर मागण्यास सांगितले. पण आता काय वर मागायचा हे त्या व्यापाऱ्याला सूचेना शेवटी तो साधू म्हणाला "मी घरी गेल्यावर जे इच्छित होईल असा वर मला द्या" यावर साधू म्हणाला, ठीक आहे घरी गेल्यावर तुझ्या तीन इच्छा पूर्ण होतील. इतके बोलून तो साधू दिसेनासा झाला.  

     काय मागावे म्हणजे आपण जास्त श्रीमंत होऊन याचा विचार करीत तो व्यापारी घरी आला, त्याने खूप विचार केला पण काय मागावे हे त्याला सूचेना, काय मागावे म्हणजे आपले सर्व इच्छा तृप्त होतील हे त्याला ठरवता येईना! 

   तो अगदी बेचैन झाला. त्याच वेळी एक कावळा त्याच्या आजूबाजूला बसून सारखा ओरडत होता. ही ओरड ऐकून तो व्यापारी म्हणाला, "काय या दुष्टाने छळ मांडलाय, हा मरून कसा नाही पडला. त्याचे बोलणे पुरे होत नाही तोच तो कावळा खाली मरून पडला. कावळा मरून पडलेला पाहून त्याला आपला एक वर फुकट गेला म्हणून वाईट वाटले. 

Three up (story)

  नंतर दुपारचे जेवण आटोपल्यानंतर काय वर मागायचा याचा विचार करण्यासाठी तो बागेतील एका मोठ्या दगडावर येऊन बसला. संध्याकाळपर्यंत विचार करूनही काय मागावे त्याला ठरवता आले नाही. संध्याकाळी स्वारी घरी आली नाही म्हणून नोकर बोलवण्यास आला. पण तो व्यापारी घरी गेला नाही. तो नोकराला म्हणाला, "मी आज घरी येत नाही. आज येथेच राहावे अशी माझी इच्छा आहे.! 

      नोकराने सर्व हकीगत मालकाच्या बायकोस सांगितली, तेव्हा ती स्वतः नवऱ्याला नेण्यासाठी आली पण त्याला तिथून उठता येईना तो त्या दगडाला चिकटला होता. दुसरा वर आपण अशा रीतीने गमवला म्हणून त्याला फार वाईट वाटले. 

  त्याने सकाळपासूनची सगळी हकीगत पत्नीस सांगितली. त्यावर पत्नी म्हणाली, " आपणाला काही कमी आहे का? चला आता तिसरा वर मागून आपली सोडवणूक करा. 

     शेवटी नाईलाजाने व्यापारी म्हणाला, मी येथून सुटावे अशी माझी इच्छा आहे. त्या दिवसापासून त्याने आपले वर्तन सुधारले व तो परोपकारात आपल्या पैशांचा वापर करू लागला. 

तात्पर्य : संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी अंगभूत हुशारी असणे गरजेचे आहे. 

 दीपक  केदू  अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube


Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :

वाचाल तर वाचाल (लेख) (If you read, you will read )

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष लेख
"वाचाल तर वाचाल"
If you read, you will read 

If you read, you will be read

If you read,you will read


 माझे शालेय शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या आसखेडा विद्यालयात झाले. 

  मी पाचवीला असताना माझा गाव नावाची कविता लिहिली. तत्कालीन शालेय शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या कवितेवर छान, या प्रांतात वाचन वाढवावे असा शेरा दिला. 

 त्यानंतर मी शालेय पुस्तकाबरोबर अवांतर पुस्तकांचे वाचन वाढवले. सुरवातीला मी छोटा दोस्त, चंपक चित्र मासिक वाचायचो. माझे वडील शिक्षक होते. ते बाहेरगावी कुठे गेले तर आवर्जून गोष्टीची पुस्तके आणायचे. त्यावेळी मी बिरबलाच्या चातुर्यकथा, रशियन लोककथा, इसापनीती, पंचतंत्र, बोधकथा इ. पुस्तके वाचली. आणि दिवसेंदिवस माझा वाचनाचा छंद विस्तारत गेला. 

  दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी सुट्ट्यामध्ये आठवड्याला चार पुस्तके वाचू लागलो. सुहास शिरवळकर, बाबा कदम, सुमती क्षेत्रमाडे, श्री.ना. पेंडसे इ. लेखकांच्या कादंबऱ्या, कथा पुस्तके वाचली. मृत्युंजय, ययाती, छावा, युगंधर, राधेय, श्रीमान योगी, झोंबी, वपुर्झा, श्यामची आई इ. पुस्तके वाचली. 

  मला आठवते या सुट्टीच्या कालावधीत मी ७५ पेक्षा जास्त पुस्तके वाचून काढली. महाविद्यालयीन जीवनात भित्तीपत्रक दररोज वाचायचो. तेव्हा नियमितपणे लिखाण व्हायला लागले. सुदैवाने माझ्याकडे भित्तिपत्रकाचे संपादनाचे काम आले. मोठ्या आवडीने त्यात भाग घेऊ लागलो. 

 महाविद्यालयीन नियतकालिकात मी वाचलेल्या पुस्तकात परीक्षण छापून आले.मी वनस्पतीशास्त्र विभागात पहिला आलो. पण वाचनाच्या छंदामुळे मी जर्नालिझम केले. 

  पत्रकारितेमुळे माझा वाचनाचा आवाका वाढला. दररोजच्या वर्तमानपत्राबरोबर मी शेती, उद्योग, कथा, कादंबऱ्या आणि मोटिवेशनल पुस्तके वाचायला लागलो इकिगाई, मनाचे व्यवस्थापन, यश तुमच्या हातात, बेबिलॉन द एम्पायर, अग्निपंख, एक होता कार्व्हर, इडली ऑर्किड आणि मी, आमचा बाप अन आम्ही, झाडाझडती, परिणामकारक लोकांच्या सात सवयी, माझे चीज कोणी हलवले, छत्रपती शिवाजी महाराज, भगवदगीता, ज्ञानेश्वरी इ. पुस्तके मी वाचली आज माझ्याकडे ७०० वाचनीय पुस्तके आहेत. 

 मी लिहिलेल्या 'असे उपक्रमशील उद्योजक' या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक विठ्ठल कामत यांनी प्रस्तावना दिली आहे. स्थानिक उद्योजकांच्या मुलाखती असलेले हे पुस्तक अनेक शालेय ग्रंथालयात उपलब्ध आहे. 

    वाचाल तर वाचाल हा माझ्या जीवनाचा मंत्र झाला आहे. आज वाचनामुळे यशस्वी ब्लॉगर, कंटेन्ट रायटर, पत्रकार, लेखक, कवी झालो आहे.

If you read you will read

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube


Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :

उद्योगपती रतन टाटा | Industrialist Ratan Tata

🌟 उद्योगपती रतन टाटा 

Industrialist Ratan Tata


udyogpati Ratan Tata

    भारताच्या उद्योगजगतावर अमीट छाप सोडणारे, दानशूर वृत्तीचे प्रतीक आणि दूरदृष्टीचे उद्योजक म्हणजे रतन टाटा. “टाटा ग्रुप” या विशाल उद्योगसमूहाला नवीन उंचीवर नेणारे आणि भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे नाव म्हणजे रतन टाटा.

    1937 मध्ये मुंबई येथे जन्मलेल्या रतन टाटा यांनी Cornell University मधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले. सुरुवातीला टाटा ग्रुपमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक कार्य स्वतः करून अनुभव मिळवला. 1991 मध्ये जे.आर.डी. टाटा यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले आणि टाटा समूहाच्या परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली.

    त्यांच्या नेतृत्वाखाली Tata Motors, Tata Steel, TCS, Tata Tea, Tata Power, Tata Communication यांसारख्या कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत मजबूत स्थान मिळवले. Tata Nano, Corus Acquisition, Jaguar–Land Rover takeover यांसारखे ऐतिहासिक निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहेत.

    व्यवसायापलीकडे रतन टाटा हे मानवतावादी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ट्रस्टने शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांत भरीव काम केले आहे. साधेपणा, प्रामाणिकता आणि विनम्रता या त्यांच्या गुणांनी ते लाखो उद्योजकांचे प्रेरणास्थान बनले आहेत.

    आज रतन टाटा हे भारतातील सर्वात आदरणीय उद्योगपतींपैकी एक आहेत. उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेल्या गेलेल्या योगदानामुळे ते जगभरात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरतात.

उद्योगपती रतन टाटा 

Industrialist Ratan Tata

वयाच्या ८६ व्या वर्षी
रतन टाटा यांचे झाले निधन,
देशातील प्रत्येक नागरिकाला
त्यांचे राहिल कायम स्मरण...


ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा
आहेत जनक भारतीय उद्योगाचे,
त्यांनी केले लोकांना प्रभावित
स्मरण त्यांच्या अमूल्य योगदानाचे...

udyogpati Ratan Tata

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यामध्ये
भारतही होता या संकटाशी लढत,
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी
टाटा यांनी दिली ५०० कोटींची मदत...


सौम्य आणि उदार हृदयासाठी
रतन टाटा ओळखले जातात,
श्वानांसाठी बांधले ५ मजली रुग्णालय
त्यांचे पाळीव प्राण्यांचे प्रेम समजू शकतात...

udyogpati Ratan Tata

पूर्वी मोठ्या वाहनांच्या निर्मितीसाठी
टाटा समूह ओळखला जायचा,
छोट्या वाहनांच्या निर्मितीत प्रवेश
टाटा इंडिका बाजारात आणण्याचा...


मोटारसायकलवर प्रवास करतांना
एका कुटुंबाला पाहिले,
स्वस्तात कार बनवण्याची कल्पना
नॅनो कार निर्मितीचे स्वप्न पुरे केले...

udyogpati Ratan Tata

वाहन विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडून
बाजारात केले नवनवे विक्रम प्रस्थापित,
टाटा ट्रस्ट आणि टाटा समूह
देशाच्या गरजा पूर्ण करतात व्यवस्थित...


सॉफ्टवेअर कंपन्याच्या मांदियाळीत,
पहिले नाव येते 'टीसीएस' चे,
माहिती तंत्रज्ञान, आउटसोर्सिंग सेवेत
महत्वपूर्ण योगदान रतन टाटांच्या या कंपन्यांचे...


राष्ट्र उभारणीत टाटा यांचे
आहे अगणित योगदान,
काळावर त्यांनी सोडली छाप
मिळणार मरणोत्तर भारतरत्न मान...

udyogpati Ratan Tata

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

राष्ट्राची एकात्मता व आपण (The unity of the nation and us)

राष्ट्राची एकात्मता व आपण
(जनजागरण)
The unity of the nation and us
 (mass awakening)

The Unity of the nation and us

      राष्ट्रीय एकात्मता म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी उत्कृष्ठ प्रकारच्या एकत्वाच्या, बंधुत्वाच्या भावनेचा परिपोष होय. समानभाव, समानधर्म, समान इतिहास, समान परंपरा, समान स्वभावधर्म, इत्यादी कारणांमुळे अगर यापैकी काही कारणांमुळे देशात एकात्मता येवू शकते. 

  भारताची संस्कृती ही इंद्रधनुष्याची संस्कृती आहे. सप्तरंगाची संस्कृती आहे. इंद्रधनुष्यातील एक एक रंग अलग केल्यास इंद्रधनुष्य राहणार नाही तसेच भारतातील प्रत्येक प्रांत अलग केल्यास भारत हे राष्ट्र म्हणून उरणार नाही. पण हे घडणार नाही. कारण एका बाजूला आमच्यावर मानवतावाद बंधन आहे तर दुसऱ्या बाजूला या मातीशी इथल्या वातावरणाशी आमचे प्रेम जडलेले आहे.

हिमालयाची आम्ही लेकरे

सागर आमचा भ्राता 

गंगा यमुना आमच्या माता

कसला भेद आता

गीता बायबल कुराण आम्हा

पवित्र या देशी

बुध्द महावीर शिवरायाची

गाऊ आम्ही आरती

हिंदू मुस्लिम शिख ईसाई

आम्ही सारे भाई-भाई

कोटी कोटी शरीरे आमची

जीव मात्र एका ठायी

   ही भारताची राष्ट्रीय एकात्मता आहे. शतकानुशकते भारत या ना त्या रुपात एक राष्ट्र म्हणून उभा आहे. वृत्तपत्रामधल्या रोज प्रसिध्द होणाऱ्या विध्वंसक बातम्या वाचल्या की, त्यावेळेस राष्ट्राच्या ऐक्याबद्दल चिंता वाटू लागते व भारताची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली की काय असे वाटू लागते. 

The Unity of nation and us

  सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्माविषयी सारखाच आदरभाव, प्रेम होय. भारताने निधर्मी राज्याची, धर्मनिरपेक्षतेची कल्पना स्वीकारलेली आहे याचा अर्थ धर्माला विरोध किंवा धर्माचा अनादर करणे असा नसून धर्माबद्दल सारखा आदर असा आहे. 

   आर्यापासून ते इंग्रजांपर्यंत अनेक परकीय या देशात आले येतांना ते आपला धर्म, आपली संस्कृती व भाषा घेवून गेले. पण या सर्वांना भारतीय संस्कृतीने आपल्या विशालतेत सामावून घेतले. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला व सर्वधर्मसमभावाच्या तत्वाला धक्का देणाऱ्या, तडा जाणाऱ्या अनेक गोष्टी भारतात घडत असल्या तरीसुध्दा भारत हे एक राष्ट्र म्हणून आज खंबीरपणे उभे आहे व भविष्यकाळातही एक राष्ट्र म्हणून जिवंत राहणार आहे. 

   नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय संकट, परचक्र अशा आव्हानांच्या प्रसंगी भारतीय जनता परस्परांतील मतभेद विसरून एक होवून संकटाच्या मुकाबला करण्यास उभी राहते हे अनेकवार सिध्द झालेले आहे.

   भारतीय जनतेने आपल्या थोर नेत्यांच्या मार्गदर्शनाने, शहिदांच्या बलिदानाने, स्वातंत्र्यसैनिकाच्या त्यागातून, कोट्यवधी जनतेच्या निर्धारातून आणि कष्टातून स्वातंत्र्य मिळविले आहे. हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आर्थिक समृध्दीच्या प्रयत्नांबरोबरच देशात अंतर्गत शांतता, जातीय सलोखा, बंधूता व राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्याची गरज आहे. 

  राष्ट्रीय एकात्मतेची उभारणी विटा, माती आणि हातोड्याने होत नाही लोकांच्या मनात आणि हृदयात या भावनेचा संथपणे विकास झाला पाहिजे.

  राष्ट्रीय एकात्मतेच्या वाढीसाठी सर्वधर्मसमभावाची भावना वाढण्याची गरज आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनीनी व साधुसंतांनी सर्वधर्म एकच आहेत ही शिकवण दिली आहे. या जगाला परमेश्वर एकच आहे. अल्ला, कृष्ण, राम, ईश्वर ही सर्व त्याचीच रुपे आहेत. आणि जगातील सर्व प्राणी त्याचीच संतान आहेत हीच शिकवण वेद, उपनिषेद, कुराण व बायबलमधून देण्यात आली आहेत. 

The unity of the nation and us

  स्वतःच्या धर्माचा प्रसार व प्रचार करताना इतर धर्माची निंदा करतात तेव्हा साहजिकच धार्मिक तेढ निर्माण होवून राष्ट्रीय ऐक्याला धोका पोहचतो.

  भारतामध्ये वारंवार होणाऱ्या जातीय दंगली व दिसून येणारा धार्मिक संघर्ष नाहिसा करून सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी हे माझे आहे, हे तुझे आहे हा संकुचित विचार त्यागून हे जग एक संयुक्त कुटुंब आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे.       

  ऋषिमुनी, साधुसंत, विचारवंत यांनी दिलेली सर्वधर्मभावाची शिकवण लोकांच्या मनात हृदयात बिंबली पाहिजे. एखाद्या जातीतील काही मूठभर लोकांनी राष्ट्रविरोधी, जातीय संघर्ष पेटविणारी कृत्ये केली याचा अर्थ त्याबद्दल सुडाची व बदल्याची भावना धरणे सर्वार्थाने चुकीचे आहे. 

   राष्ट्रीय एकात्मता ही देशाची आज नितांत गरज आहे. व ही एकता सर्वधर्मसमभावाच्या पायावर आधारलेली असते. केवळ कायदे करून एकात्मता येणार नाही. तशी मनाची जडणघडण झाली पाहिजे. मी देशासाठी, त्याच्या ऐक्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करायला तयार आहे ही प्रत्येक नागरिकाची जीवननिष्ठा असली पाहिजे.

© दीपक के.अहिरे
नाशिक

(पूर्व प्रसिध्दी : दै. तरुण भारत)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


जागतिक जल दिन विशेष 💧 पाणी समस्येचे समाधान = संधींचा पाऊस | Water Problem Solutions & Opportunities

पाणी समस्या सोडविण्याची गरज  Need to solve water problem