पाणी समस्या सोडविण्याची गरज Need to solve water problem
समस्येच्या समाधानातून संधींचा पाऊस !Rain of opportunities from solving the problem!
पाण्याच्या बाबतीत परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. बहुतेक पाण्याचे सर्व स्रोत दूषित झाले आहेत. शुद्ध पेयजल ही एक मोठी समस्या भारतात निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी फक्त लाभार्थीचाच नव्हे तर प्रत्येक भारतीयांचा सहभाग यामध्ये मिळणे नव्हे तर मिळविणे ही काळाची गरज आहे. या समस्येच्या समाधानासाठीच्या प्रयत्नांतून निश्चितच पाण्याबरोबर युवावर्गासाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हे सांगायला नकोच.
शासनाच्या वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत मी व माझ्या सहकाऱ्यांनी ५२ गावांना पाणलोट कार्यक्रमाविषयी जाणीव, जागृती मेळावे घेतले. त्यावेळी प्रचार फेरी, कलापथक आदी माध्यमांद्वारे पाणी बचतीविषयी जाणीव जागृती केली. यावेळी फिरताना नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ही गावे होती. या गावांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते. या परिसरात पाणलोटचे काम करत असताना एक वृद्ध पुरुष बाजेवर आंघोळ करीत होते. बाजेखाली तांब्याचे मोठे पातेले ठेवले होते. आंघोळीचे पाणी त्या घंगाळात येत होते. मी म्हटलं, तुम्ही असं का करतात, ते म्हणाले, साहेब... हे पाणी मी पाच किलोमीटरवरून आणले आहे. या पाण्याचा थेंबही इकडे तिकडे गेला तर मला तीन दिवस हे पाणी पुरवायचे आहे. म्हणून मी इतकं सांभाळून जपवून ठेवतो आहे. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. परंतु अशी छोटी छोटी अनेक उदाहरणे मी बघायचो.
या भीषण समस्येवरती कायमस्वरूपी उपायच नाही का? एक तर भरपूर पावसाचे पाणी... दुसरीकडे विषण्ण परिस्थिती.. पाण्याअभावी जनावरांचे, माणसांचे हाल... हे चित्र असं का? याचे कारण आपण अजूनही पाण्याचं मोल समजत नाही. दिवसेंदिवस भूजलाची पातळी खोलवर जात आहे. हवामानाचे चक्र अनिश्चित झाले आहे. कधी गारपीट तर अवकाळी पावसाचा कहर...दुसरीकडे फुकट मिळणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि जतन करण्यास लोकसहभागाचे अनेक प्रयत्न अपयशी ठरले. सरकारही योजना राबवूनही अपयशी ठरले आहे. मात्र नियोजनाअभावी पाण्याचा दुष्काळ उग्र स्वरूप धारण करीत आहे.
पाण्याचा नोबेल पुरस्कार राजस्थानच्या राजेंद्रसिंह यांना मिळाला. अशा राजेंद्रसिंह यांनी या प्रश्नाचे मोल जाणले. राजेंद्रसिंह यांनी ग्रामीण विकासाची चळवळ उभी केली आणि सातत्याने पाणी अडवा व पाणी जिरवा या सूत्रावर काम केले. आज राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशांत मुबलक पाणी दिसते आहे.
भारतात एकूण ३२९ दशलक्ष हेक्टर्सपैकी १७५ दशलक्ष हेक्टर्स पडीक अवस्थेत आहे. आपल्या कृषिप्रधान देशासाठी आपली नैसर्गिक संपदा अधिकाधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी जलसंधारणाचे अनेक मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग भूपृष्ठावरील दुय्यम स्रोतांचा म्हणजे सरोवरे, नद्या, तळी, डोह, ओढे, नाले, झरे इत्यादी भूपृष्ठावरील जलसंधारणाचे नैसर्गिक प्रकार आहेत. धरणे, कालवे, पूर बंधारे, प्रवाह बंधारे, तलाव, पाझर तलाव, हौद, टाक्या हे भूपृष्ठावरचे जलसंधारणाचे कृत्रिम प्रकार आहेत आणि दुय्यम स्रोतात जसे भुपृष्ठावर जलसंधारण आपण करतो तसेच भूगर्भातही जलसंधारण करता येते.
जमिनीत पाणी जिरून निर्माण झालेले भूगर्भ जलसाठे, नदीपात्रांच्या शेतीतळ्याखालील जलसाठे हे नैसर्गिक भूगर्भ जलसंधारणाचे प्रकार आहेत तर समतलचर, झिरपचर, झिरपखड्डे, शोषखड्डे हे भूगर्भजलसंधारणाचे कृत्रिम प्रकार आहेत. वनराई, वृक्ष, झाडेझुडपे, गवत, हिरवळ यांच्या साह्याने भूगर्भ जलसंधारण साधता येते. वरील प्रकारचे जलसंधारण लोकसहभागातून उत्तम रीतीने साधत हे काम घडवून आणण्यासाठी निरपेक्ष, निःस्पृह नेतृत्वाची गरज असते.
गावपातळीवर शेतकरी ग्रामस्थ यांना एकत्र आणून त्यांना त्यातले फायदे समजावून सांगून प्रवृत्त करणे या कामासाठी तांत्रिक मार्गदर्शन स्वयंसेवी संस्थेकडून उपलब्ध करून देणे, बऱ्याच ठिकाणी हे पारंपरिक तंत्रज्ञान उपलब्ध असते पण त्याला पुनरुज्जीवन करणे, योजना कार्यान्वित करून झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन ग्रामस्थांच्या हातात देऊन या कार्याची जाणीव निर्माण करून द्यावी. राजस्थानात तरुण भारत संघाच्या माध्यमातून राजेंद्रसिंह चौहान या तरुणाने असेच मोठे कार्य उभे केले आहे.
पाणी अडवण्याचे व साठवण्याचे राजस्थानातले पारंपरिक तंत्र वापरून या आदिवासी भागात जोहाड दगडमातीच्या बांधांचे बांधकाम केले गेले. त्यामुळे सरकारने डार्क झोन म्हणून घोषित केलेला प्रदेश आता व्हाईट झोन समृद्ध पट्टा म्हणून ओळखला जातो.
गेल्या तीस वर्षांत तरुण भारत संघाच्या माध्यमातून राजेंद्रसिंह यांनी ११ जिल्ह्यांत लहान मोठी अधिक दहा हजारांहून अधिक जोहाड म्हणजे मातीची धरणे बांधली आहेत. या ११ जिल्ह्यांत ११०० गावांमध्ये ही जोहाड बांधून समृद्धी फुलवण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.
राजस्थानात तर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य अनियमित पावसामुळे हा प्रदेश रुक्ष आणि विदीर्ण बनला होता. त्यामुळे तेथील लोकांचे स्थलांतर असायचे. अशा या लोकांमध्ये जलसंधारणातून चेतना जागविणारे राजेंद्रसिंह यांनी येथील खेड्यांतल्या लोकांचे दुःख पाहिले. पाण्याअभावी तडफडणाऱ्या गावांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य झोकून दिले.
तरुण भारत संघाच्या माध्यमातून त्यांच्या कामाची सुरुवात राजस्थानच्या अलवार या लहानशा खेड्यातून झाली. या गावातली पाणी अडवण्याची परंपरागत पद्धत जोहाड होती. ज्यात डोंगर उतारांवर मातीचे बांध घालतात किंवा छोटे धरण बांधून पाणी अडवण्याची पद्धत असते. पूर्वी पाणी पडलं की या जोहाडात साठवण होत होती. त्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढायची. हे पाणी पुष्कळ दिवस टिकायचे पण या गावाने या जोहाडाकडे दुर्लक्ष केले.
मागच्या पन्नास वर्षांत ते बदलले. अनेक जोहाड नादुरुस्त होऊन कालवे शिगोशिग भरले. या जोहाडाची वर्षानुवर्षे कोणी दखल घेतली नाही. सरकारी पातळीवर हे काम व्हावे अशी लोकांची इच्छा होती यामुळे येथील लोकांना मूग गिळून गप्प बसायचे अशी परिस्थिती! या परिस्थितीत राजेंद्रसिंह यांनी जोहाड दुरुस्त करण्याचे ठरविले.
अनेक वर्षांपासून साठून राहिलेले गाळ, दगड धोंडे काढण्याचे काम सोपे नव्हते. या कामासाठी गांवकरीही पुढे येत नव्हते. परंतु कोणतीही हार न खाता त्यांनी कुदळ-फावडं हाती घेतलं. माती उपसताना, खणताना त्यांना पाहून गावकऱ्यांच्या मनात हे चित्र बदलण्याचे विचार आले. त्यानुसार त्यांनी राजेंद्रसिंहांना मदत केली. बघता बघता जोहाडांचे पुनरुज्जीवनही झाले. त्यानंतर तीन वर्षांच्या दुष्काळानंतर पाऊस पडला.
हा जोहाड दुथडी भरून वाहू लागला. हे पाहून आसपासच्या गावकऱ्यांनाही जोहाडाचे वेध लागले. याचे महत्त्व पटवून देण्यात राजेंद्रसिंह सरसावले. शेकडो गावांमध्ये हे जोहाड उभे राहिले.
नुसतं पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर व्हावं याचबरोबर त्या त्या संबंधीत गावातील अनेक लोक सामाजिकदृष्ट्या मागासलेले होते. दारूच्या व्यसनात अडकले होते. म्हणून त्यांनी अट घातली की, ज्यांना जोहाड बांधून पाहिजे असतील त्यांनी दारू गाळायची नाही, घ्यायची नाही त्यानुसार अनेक गावांनी चुकीचा मार्ग सोडला व कसोशीने कामाला लागले.
एक एक करता अनेक जोहाड राजेंद्रसिंहांच्या मार्गदर्शनातून गावच्या लोकसहभागातून आकाराला आली. पाण्याचा अभाव असलेला प्रदेश म्हणून सरकारने घोषित केला होता तो आता व्हाईट झोनमध्ये बदलला आहे. राजेंद्रसिंहांच्या या बहुमोल कामामुळे येथील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या गावामध्ये फक्त २० टक्के जमीन कसण्यायोग्य होती. आता हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातच शेती करता येत होती. ते या हंगामाताच ज्वारी, बाजरी यासारखीच पिके घ्यायची आता हे शेतकरी रब्बी हंगामातही गहू, बाजरी, उसासारखी पीके घेतात. भाजीपाल्यांचेही भरघोस उत्पन्न काढतात. आता त्यांच्या शेतीतले उत्पन्न दहापटीने वाढले आहे. स्थलांतर थांबवून शेतकऱ्यांना स्थैर्य मिळवून देण्याचे बहुमोल काम त्यांनी केले आहे.
वर्षानुवर्षे नैसर्गिक संपत्तीपासून वंचित राहिलेल्या लोकांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याचे लाभ त्यांना व्हावेत व नैसर्गिक संपत्तीचा विनाश थांबवून त्याचे जतन आणि संवर्धन झालं पाहिजे अशी ठाम भूमिका तरुण भारत संघाने घेतली. वेळोवेळी त्यांनी अरवली बचाव पदयात्रा, जंगल जीवन बचाओ पदयात्रा, गंगोत्री यात्रा, अकाल मुक्ती यात्राही काढली.
यावेळी राजेंद्रसिंहांना समाजकंटकांकडून खूप त्रास झाला पण संघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा धडाका चालूच ठेवला आणि येथील सारिस्कार अभयारण्याचा कायापालट झाला. लोकांच्या हातात पाण्याचे व्यवस्थापन जलबिरादरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण भारत संघाने सोपवले आहे.
सामुदायिक हिताची जाणीव, नैसर्गिक संपत्तीवरील अधिकारांची जाणीव आणि त्यासाठी प्रसंगी लढा देण्याची मानसिकता त्यातून विकसित करण्यात राजेंद्रसिंह तसेच तरुण भारत संघ यशस्वी झाला आहे. जलसंवर्धनाच्या उद्देशाने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प त्यांनी राबवले आहे. त्यांनी पाण्याचं रक्षणाचे आणि संवर्धनाचे साधन लोकांच्या हाती सोपवलं आहे.
याचे बाळकडू विद्यार्थीदशेतच मुलांना लागावे म्हणून या उद्देशाने आपल्या परिसरातील झाडे, पशुपालन, शेतजमिनीची माहिती, मातीचा कस ओळखणे यासाठी एक हजारापेक्षा अधिक मुलांना प्रशिक्षण दिले आहे. तरुणांसाठी श्रमदान शिबिर घेऊन गावातील पारंपरिक जल साठवण्याची दुरुस्ती व सफाई केली जाते.
पारंपरिक बी बियाणे, दुष्काळ निवारण, स्वयंरोजगार, वनसंवर्धन, सरकारी विकास प्रबोधन वर्ग, ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण, सहकार, सामाजिक जाणीव आदी अनेक योजनांमधून त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवले आहे.
त्यांना या कामाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. जगात प्रतिष्ठेचा समजला जाणारा २००१ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाला जगाने दिलेली ही एक पावतीच होती. आता त्यांना पाण्याचा प्रति नोबेल समजला जाणारा पुरस्कारही मिळाला आहे.
महात्मा गांधीच्या उक्तीनुसार 'थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली' म्हणजे विचार जागतिक पातळीवर करा, कृती मात्र स्थानिक पातळीवर करा यानुसार जलसंधारणाचा, पाणी बचतीचा, भूगर्भ जलपातळीचा जागतिक विचार करताना कृती मात्र गावांगावांमधून शिवाराशिवारांतून आचरणात आणली तर अशक्य असं काहीच नाही.
राजेंद्रसिंहांच्या कार्याने पेटून उठणारे तरुण गावागावांत तयार व्हावेत तरच गावांसाठी पाणी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. आपल्या महाराष्ट्रातही अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी जलसंधारणाच्या, मृदसंधारणेच्या अशाच योजना ग्रामस्थांच्या मदतीने अमलात आणून अक्षरशः चमत्कार घडवला आहे. त्यांच्या कार्याचा वसा प्रत्येक शेतकरी ग्रामस्थाने घेतला पाहिजे असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.
पाण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपक्रम हाती घेतले जात असले तरी शाश्वत पाण्यासाठी आर्थिक निधीचा अभाव असल्याचे दिसते. दरवर्षी राज्यात सरासरी पंधराशे टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा खर्च येतो. नळ पाणीपुरवठा योजनांसाठी करोडो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र पाण्याचे स्रोत शाश्वत ठेवण्यासाठी निधीची तरतूद समाधानकारक होत नाही.
राज्यातील बहुतांश गावे, शहरे आणि वाड्या-वस्त्या यामध्ये नळ पाणीपुरवठा योजना आकाराला आल्या असल्या तरी त्यांनी पाणी कुठून आणायचे हा प्रश्न भेडसावतो आहे. त्यासाठी पाणी संवर्धन आणि जतन या पद्धतींना सरकारने प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग सरकारी कार्यालये, पंचतारांकित हॉटेले, उद्योग, चित्रपटगृहे, मोटार गॅरेजेस, गगनचुंबी इमारती, बागबगीचे, सरकारी निवासस्थाने आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग कायद्याने बंधनकारक केली पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा स्वतंत्र विभाग असावा.
ग्रामीण स्तरावर पाण्याचे स्रोत शोधून त्यांचे संवर्धन व जतन करण्याचे अधिकार ग्रामसभेला द्यावेत. यासाठीचा निधीही ग्रामसभेकडे हस्तांतरित करावा. गावागांवात प्रत्येक घरावर पडणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी काही नियम आणि निकष ठरवून त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार ग्रामसभेला द्यावेत.
सरोवर संवर्धन योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. वाळू उपशावर ग्रामसभेचे नियंत्रण असावे. पावसाचे पाणी वाहून जाणार नाही यासाठी नळ पाणी पुरवठ्याप्रमाणेच यंत्रणा विकसित करावी. डोंगराळ भागात "पाणी अडवा, पाणी जिरवा" मोहीम प्रभावीपणे राबवावी. पाण्याचे स्रोत शोधून त्यांचे जतन करण्याचे अधिकार ग्रामसभेला द्यावेत.
पाण्याच्या जुन्या आटलेल्या स्रोतांच्या पुनर्भरणाची महत्त्वाकांक्षी मोहीम जनसहभागातून राबवावी. अशा पद्धतीने पाणी प्रश्नांवर ज्वलंतपणे, विधायक दृष्टीने काम करण्याची गरज आहे. सकाळ वृत्तपत्र समूहाने पाणी बचतीच्या साक्षरतेविषयी प्रबोधन केले आहे.
माध्यमांत अशी विधायक काम करण्याची ताकद जर समाजमनाला पेटवून ठेवण्याचे काम करेल तो दिवस दूर नाही की आपण पाणी प्रश्न संपूर्ण नाही पण त्यातील काही भाग सत्कारणी लागला तरच धन्य होईल असे मला वाटते. म्हणून म्हणतो, पाणी अडवा... पाणी जिरवा..!, पाणी पिकवा... पाणी साठवा...!!
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment