तीन वर (कथा)
Three up (story)
आमच्या लहानपणी पूर्वी भूपाळी,अंगाई गीत, मंदिरात भजन, बोधप्रद गोष्टी ऐकायला मिळायच्या. पण आता या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे मुलांची वाचनाची आवड कमी होत चालली आहे. लहानपणी बाल शिवबाला जिजाऊ माता गोष्टी सांगत असत. त्यामुळे शिवरायांचे बालपण घडले. या गोष्टीतून मिळणाऱ्या शिकवणीतून संस्कार घडतात. अशीच एक गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. विशेष म्हणजे ती तत्कालीन रामभूमी दैनिकात प्रकाशित झाली होती. तीच "तीन वर" नावाची कथा आज देत आहे.
फार फार जुनी गोष्ट आनंदपुर नगरात फार गरीब ब्राह्मण राहत असे. दिवसभर कष्ट करून तो पोटापुरते मिळवी. तो जरी अगदी गरीब असला तरी थोर मनाचा असा होता. आल्या गेल्याचा आदर सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असे मानी.
त्याच गावात एक मोठा व्यापारी राहत होता. त्याच्याजवळ भरपूर संपत्ती होती, परंतु त्यातून काही खर्च होऊ नये म्हणून त्याची धडपड चाललेली असायची कोणाला काही द्यावयाची वेळ आली तर त्याला फार वाईट वाटे.
त्या व्यापाराची बायको मोठी धर्मशील होती. ती आपल्या नवऱ्यास म्हणे, "अहो तुम्हाला काय कमी आहे? इतका कंजुषपणा कशासाठी? आपण काही दानधर्म करू या! आपल्या जवळ जी संपत्ती आहे. तिचा उपयोग स्वतःकरिता आणि परोपकाराकरिता केला तर आपल्याला समाधान नाही का लाभणार? हे बायकोचे बोलणे त्याला आवडत नसे, कोणी गरीब माणूस आला की, त्याच्या अंगावर खसकन खेकसून बोलायचा.
एकदा असे झाले की त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी एक साधू आला व नेहमीप्रमाणे काहीतरी भिक्षा मागू लागला. व्यापारी त्या साधूच्या अंगावर धावून ओरडून म्हणाला, 'काय झालं रे, तुला भीक मागायला? चांगला जाडाजुडा तर दिसतोस? चालता हो येथून, तुला येथे काही एक मिळणार नाही. यावर साधू काहीतरी बोलणार तोच तो व्यापारी त्याच्या अंगावर धावून गेला लगेच तो साधु तिथून निघून गेला.
पुढे फिरता फिरता साधू गरीब पण सालस व परोपकारी ब्राह्मणाच्या घरी आला. ब्राह्मणाने त्याची विचारपूस करून त्याला जेवण वगैरे दिले. आपल्या एपतीप्रमाणे त्याचा चांगला आदर सत्कार केला व त्या साधुला आपल्या घरी त्या ब्राह्मणाने मुक्कामी ठेवले.
बालमित्रांनो, दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर तो साधू म्हणाला, "हे गरीब ब्राह्मणा, मी साधू नाही. मी भगवान विष्णू आहे, तुझी लोकसेवा पाहून मी संतुष्ट झालो. "हे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाने साधूचे पाय धरले. साधू रुपी भगवान म्हणाला, "तुला जे पाहिजे ते माग. ब्राह्मण म्हणाला हे भगवान आपली चरणसेवा मजकडून होवो. एवढेच मला द्या. "साधू वेषधारी भगवान विष्णू" ठीक आहे" असे म्हणून निघाले. लवकरच ब्राह्मणाची स्थिती सुधारू लागली त्याला खूप संपत्ती मिळाली.
ही गोष्ट त्या श्रीमंत व्यापाऱ्याला कळली, तेव्हा तो त्या साधूच्या शोधासाठी निघाला. गावाबाहेर बरेच अंतर चालून गेल्यावर तो साधू त्याला दिसला. लागलीच धावत धावत जाऊन त्याने साधु महाराजांचे पाय धरले व म्हणाले हे भगवान मी चुकलो, मला माफ करा. आता माझ्याकडे याल तर मी आपला चांगला आदर सत्कार करीन. मला काहीतरी वर द्या.
हे त्या व्यापाराचे बोलणे ऐकून साधूने त्यास पाहिजे, तो वर मागण्यास सांगितले. पण आता काय वर मागायचा हे त्या व्यापाऱ्याला सूचेना शेवटी तो साधू म्हणाला "मी घरी गेल्यावर जे इच्छित होईल असा वर मला द्या" यावर साधू म्हणाला, ठीक आहे घरी गेल्यावर तुझ्या तीन इच्छा पूर्ण होतील. इतके बोलून तो साधू दिसेनासा झाला.
काय मागावे म्हणजे आपण जास्त श्रीमंत होऊन याचा विचार करीत तो व्यापारी घरी आला, त्याने खूप विचार केला पण काय मागावे हे त्याला सूचेना, काय मागावे म्हणजे आपले सर्व इच्छा तृप्त होतील हे त्याला ठरवता येईना!
तो अगदी बेचैन झाला. त्याच वेळी एक कावळा त्याच्या आजूबाजूला बसून सारखा ओरडत होता. ही ओरड ऐकून तो व्यापारी म्हणाला, "काय या दुष्टाने छळ मांडलाय, हा मरून कसा नाही पडला. त्याचे बोलणे पुरे होत नाही तोच तो कावळा खाली मरून पडला. कावळा मरून पडलेला पाहून त्याला आपला एक वर फुकट गेला म्हणून वाईट वाटले.
नंतर दुपारचे जेवण आटोपल्यानंतर काय वर मागायचा याचा विचार करण्यासाठी तो बागेतील एका मोठ्या दगडावर येऊन बसला. संध्याकाळपर्यंत विचार करूनही काय मागावे त्याला ठरवता आले नाही. संध्याकाळी स्वारी घरी आली नाही म्हणून नोकर बोलवण्यास आला. पण तो व्यापारी घरी गेला नाही. तो नोकराला म्हणाला, "मी आज घरी येत नाही. आज येथेच राहावे अशी माझी इच्छा आहे.!
नोकराने सर्व हकीगत मालकाच्या बायकोस सांगितली, तेव्हा ती स्वतः नवऱ्याला नेण्यासाठी आली पण त्याला तिथून उठता येईना तो त्या दगडाला चिकटला होता. दुसरा वर आपण अशा रीतीने गमवला म्हणून त्याला फार वाईट वाटले.
त्याने सकाळपासूनची सगळी हकीगत पत्नीस सांगितली. त्यावर पत्नी म्हणाली, " आपणाला काही कमी आहे का? चला आता तिसरा वर मागून आपली सोडवणूक करा.
शेवटी नाईलाजाने व्यापारी म्हणाला, मी येथून सुटावे अशी माझी इच्छा आहे. त्या दिवसापासून त्याने आपले वर्तन सुधारले व तो परोपकारात आपल्या पैशांचा वापर करू लागला.
तात्पर्य : संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी अंगभूत हुशारी असणे गरजेचे आहे.
दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment