उपक्रमशील संशोधक शेतकरी : श्री. गणू दादा चौधरी — नवकल्पना आणि प्रगत शेतीचे आदर्श उदाहरण | Enterprising Researcher Farmer: Shri. Ganu Dada Chaudhary
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील श्री. रमाकांत काशिनाथ बागूल उर्फ गणूदादा चौधरी हे संशोधक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टर जमीन असून त्यात ते नारळ, मका, टरबूज, कोथंबीर अशी पिके घेतात. शेतीसाठी त्यांच्याकडे आज ट्रॕक्टर व अनुषंगिक यंत्रसामग्री नांगर, रोटाव्हेटर, ट्रिलर, टँकर, ट्रॉली आहे.
संशोधक, उद्योगी वृत्ती
श्री. गणू दादा यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. शिक्षण घेत असताना काही अपवादात्मक परिस्थितीमुळे आयटीआय शिक्षण अर्ध्यावरच सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी कंपनीमध्ये जॉब शोधला. आयुष्यामध्ये स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला
पण मुळातच संशोधक, उद्योगी वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या उद्योगी वृत्तीमुळे आपण स्वतःचा विकास करत नसून आपण धनदांडग्या व्यवस्थेला पोसत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आणि त्यांनी नोकरी सोडली मग वडिलोपार्जित शेती हा चांगला पर्याय त्यांनी अवलंबला. अर्थातच त्यांचे वडील शेतकरी असल्यामुळे शेतीचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले.
शेतीला जोडधंदा ट्रॅक्टर व्यवसाय केला सुरू
आपल्या प्रयोगशील वृत्तीने शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करावे या ध्येयाने प्रेरित होऊन नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्याकरीता सोपा नव्हता असे श्री. गणू दादा यांनी सांगितले कारण शेतमालाला अस्थिर बाजारपेठ व्यापारी वर्गाचे पिळवणूकीचे ध्येयधोरण, अवकाळी पावसाचा मार व उत्पादन वाढीव खर्च या सर्व गोष्टी बघता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल याचा साक्षात्कार त्यांना झाला.
मुळातच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा स्वभावगुण असल्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग चालू केले. पण अनेकवेळा नफा अपेक्षित असून तोटाच झाला. मग शेतीला जोडधंदा असावा हे लक्षात आले मग त्यासाठी ट्रॅक्टर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टर व्यवसाय करत असताना नाविन्यपूर्ण अशा यंत्रसामग्रीचा शोधही लावला. त्यासाठी स्वत:च्या छोटेखानी वर्कशॉपची स्थापना केली. या माध्यमातून विवीध नाविन्यपूर्ण शेतीपूरक यंत्राची निर्मीती केली.
यंत्रसामग्री निर्मिती केली
श्री. गणू दादा यांनी स्वनिर्मित यंत्रसामग्री निर्मिती केली असून यात कांदावाफा खाचेयंत्र, वाफाशेरी यंत्र, राईट अँगल शेरी यंत्र, विवीध बेड रेझर, सॉइल रेझर, पारंपारिक पध्दतीवर आधारीत बैलजोडी पास(वखरणी, डवरणीसाठी), वाफायंत्र, ऊस पेरणीयंत्र, टोचन यंत्र, शेतातील खतटाकणी लहान ट्रॕक्टर बकेट, अल्पखर्ची पिस्टन फवारणी अशा विवीध प्रकारच्या ट्रॕक्टरचलीत यंत्रसामग्रीची त्यांनी निर्मिती केली.
फळपिकांची लागवड
यंत्रसामग्री निर्मितीबरोबर शेतीमध्ये डाळिंब, लिंबू अशा वेगवेगळ्या फळपिकांची लागवड करून आधुनिक असे शोधही लावले, प्रयोगही केले. तेल्यामुक्त डाळिंबाची संकल्पना त्यांनी आपल्या शेतात राबवली आणि त्यांची बाग तेल्यामुक्त होती हे विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे
या नंतर श्री. गणू दादा यांनी मजूरमुक्त शेतीच्या माध्यमातून सलग सेंद्रिय नारळबागेची संकल्पना उदयास आणली. सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे ठरवले जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी मी शाश्वत शेती त्याला वारसाने देऊ शकतो असे गणू दादा यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांना धुळे येथील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची फार मोलाची मदत झाली. तेथील विविध कार्यशाळा प्रशिक्षण शिबिरं यांना त्यांनी हजेरी लावली. त्यातून मोलाचे ज्ञान मिळाले आणि त्या ज्ञानाचा फायदा त्यांनी स्वतः साठी तसेच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केला. या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली. शाळा, महाविद्यालय येथे व्याख्यानासाठी, चर्चासाठी आमंत्रण येऊ लागले. शाश्वत शेतीचा प्रचार त्यांनी सुरू केला.
विविध शेती उपक्रमांची सुरुवात
सर्व काही सरकारने करावे या अपेक्षेवर अवलंबून न राहता त्यांनी शेतामध्ये "पाणी आडवा पाणी जिरवा" या माध्यमातून दहा ते बारा लाख लिटर पाणी क्षमतेचा कोल्हापूर टाईप बंधाऱ्याची निर्मिती केली व इतर शेतकऱ्यांना हा संदेश दिला की आपण स्वतःही काही करू शकतो प्रत्येक वेळेस सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
त्यांच्या विविध प्रयोगांना मग ते सेंद्रिय असो किंवा यांत्रिकी असो कृषी विभाग धुळे, कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी त्यांच्या प्रयोगास वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन केले. कृषी विभागाशी समन्वय साधून आज त्यांची सेंद्रिय शेतीशी व आधुनिक यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी नाळ जोडली आहे.
मजूरमुक्त शेती संकल्पना
आजकाल शेतीला मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. मजूर टंचाईवर प्रभावी उपाययोजना करावी यादृष्टीने श्री. गणू दादा यांनी शेती १०० टक्के यांत्रिकीकरणाखाली कशा पध्दतीने येऊ शकते यासाठी मजूरमुक्त शेती संकल्पनेच्या माध्यमातून यांत्रिकीकरणावर भर दिला.
टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना स्विकारली. यात मानवचलीत खतटाकणी यंत्र , लिंबू तोडणी यंत्र, विविध प्रकारे बेड मेकर यंत्र ,फळबागेसाठी सॉईल रेझर, कांदावाफा खाचेयंत्र, वाफाशेरी यंत्र, हातकोळपे, विद्राव्य खतासाठी अतिशय स्वस्त ठिबक, व्हेंचूरी राईट टू अँगल शेरी सपोर्ट सिस्टिम नैसर्गिक संसाधन वापरून ऑर्गेनीक चूल अशा अनेक प्रयोगांची व यंत्रांची मालिका त्यांनी सादर करून निर्मिती केली आहे.
सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार
सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा. या माध्यमातून ते स्वतः सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरीच बनवितात तसेच इतरही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे ज्ञान अवगत व्हावे यासाठीही गणू दादा यांनी शालेय आवारातील कचरा व शालेय पोषण आहारातील उष्टे व खरकटे अन्न यावर प्रक्रिया करून गांडूळ खत निर्मिती व्हावी यासाठी स्वखर्चाने शालेय आवारात गांडूळ खत निर्मितीचा उपक्रम राबवितात.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व अवगत व्हावे या अनुषंगाने सेंद्रिय व शाश्वत शेतीचे मोलाचे मार्गदर्शनही ते करतात. यासंदर्भात त्यांचा मंत्रालयाशीही पत्रव्यवहार चालू आहे जेणेकरून ह्या प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय आवारात एक कोपरा सेंद्रिय निविष्ठांचा किंवा "गणुदादांचा शालेय सेंद्रिय उपक्रम" राबवावा यासाठी त्यांचे प्रयत्न शासनदरबारीही चालू आहेत. विविध मोठ्या संस्थांमध्येही सेंद्रिय निविष्ठांचा वापर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात करावा यासाठी ते प्रयत्न करतात. शासनाच्या विवीध विभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांना या प्रकल्पाविषयी माहिती देण्याचे काम गणू दादा करत असतात.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
राज्यस्तरीय लेखन सेवा पुरस्कार विजेते
deepakahire1973@gmail.com
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************


No comments:
Post a Comment