वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष लेख"वाचाल तर वाचाल"If you read, you will read
माझे शालेय शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या आसखेडा विद्यालयात झाले.
मी पाचवीला असताना माझा गाव नावाची कविता लिहिली. तत्कालीन शालेय शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या कवितेवर छान, या प्रांतात वाचन वाढवावे असा शेरा दिला.
त्यानंतर मी शालेय पुस्तकाबरोबर अवांतर पुस्तकांचे वाचन वाढवले. सुरवातीला मी छोटा दोस्त, चंपक चित्र मासिक वाचायचो. माझे वडील शिक्षक होते. ते बाहेरगावी कुठे गेले तर आवर्जून गोष्टीची पुस्तके आणायचे. त्यावेळी मी बिरबलाच्या चातुर्यकथा, रशियन लोककथा, इसापनीती, पंचतंत्र, बोधकथा इ. पुस्तके वाचली. आणि दिवसेंदिवस माझा वाचनाचा छंद विस्तारत गेला.
दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी सुट्ट्यामध्ये आठवड्याला चार पुस्तके वाचू लागलो. सुहास शिरवळकर, बाबा कदम, सुमती क्षेत्रमाडे, श्री.ना. पेंडसे इ. लेखकांच्या कादंबऱ्या, कथा पुस्तके वाचली. मृत्युंजय, ययाती, छावा, युगंधर, राधेय, श्रीमान योगी, झोंबी, वपुर्झा, श्यामची आई इ. पुस्तके वाचली.
मला आठवते या सुट्टीच्या कालावधीत मी ७५ पेक्षा जास्त पुस्तके वाचून काढली. महाविद्यालयीन जीवनात भित्तीपत्रक दररोज वाचायचो. तेव्हा नियमितपणे लिखाण व्हायला लागले. सुदैवाने माझ्याकडे भित्तिपत्रकाचे संपादनाचे काम आले. मोठ्या आवडीने त्यात भाग घेऊ लागलो.
महाविद्यालयीन नियतकालिकात मी वाचलेल्या पुस्तकात परीक्षण छापून आले.मी वनस्पतीशास्त्र विभागात पहिला आलो. पण वाचनाच्या छंदामुळे मी जर्नालिझम केले.
पत्रकारितेमुळे माझा वाचनाचा आवाका वाढला. दररोजच्या वर्तमानपत्राबरोबर मी शेती, उद्योग, कथा, कादंबऱ्या आणि मोटिवेशनल पुस्तके वाचायला लागलो इकिगाई, मनाचे व्यवस्थापन, यश तुमच्या हातात, बेबिलॉन द एम्पायर, अग्निपंख, एक होता कार्व्हर, इडली ऑर्किड आणि मी, आमचा बाप अन आम्ही, झाडाझडती, परिणामकारक लोकांच्या सात सवयी, माझे चीज कोणी हलवले, छत्रपती शिवाजी महाराज, भगवदगीता, ज्ञानेश्वरी इ. पुस्तके मी वाचली आज माझ्याकडे ७०० वाचनीय पुस्तके आहेत.
मी लिहिलेल्या 'असे उपक्रमशील उद्योजक' या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक विठ्ठल कामत यांनी प्रस्तावना दिली आहे. स्थानिक उद्योजकांच्या मुलाखती असलेले हे पुस्तक अनेक शालेय ग्रंथालयात उपलब्ध आहे.
वाचाल तर वाचाल हा माझ्या जीवनाचा मंत्र झाला आहे. आज वाचनामुळे यशस्वी ब्लॉगर, कंटेन्ट रायटर, पत्रकार, लेखक, कवी झालो आहे.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment