राष्ट्राची एकात्मता व आपण(जनजागरण)The unity of the nation and us (mass awakening)
राष्ट्रीय एकात्मता म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी उत्कृष्ठ प्रकारच्या एकत्वाच्या, बंधुत्वाच्या भावनेचा परिपोष होय. समानभाव, समानधर्म, समान इतिहास, समान परंपरा, समान स्वभावधर्म, इत्यादी कारणांमुळे अगर यापैकी काही कारणांमुळे देशात एकात्मता येवू शकते.
भारताची संस्कृती ही इंद्रधनुष्याची संस्कृती आहे. सप्तरंगाची संस्कृती आहे. इंद्रधनुष्यातील एक एक रंग अलग केल्यास इंद्रधनुष्य राहणार नाही तसेच भारतातील प्रत्येक प्रांत अलग केल्यास भारत हे राष्ट्र म्हणून उरणार नाही. पण हे घडणार नाही. कारण एका बाजूला आमच्यावर मानवतावाद बंधन आहे तर दुसऱ्या बाजूला या मातीशी इथल्या वातावरणाशी आमचे प्रेम जडलेले आहे.
हिमालयाची आम्ही लेकरे
सागर आमचा भ्राता
गंगा यमुना आमच्या माता
कसला भेद आता
गीता बायबल कुराण आम्हा
पवित्र या देशी
बुध्द महावीर शिवरायाची
गाऊ आम्ही आरती
हिंदू मुस्लिम शिख ईसाई
आम्ही सारे भाई-भाई
कोटी कोटी शरीरे आमची
जीव मात्र एका ठायी
ही भारताची राष्ट्रीय एकात्मता आहे. शतकानुशकते भारत या ना त्या रुपात एक राष्ट्र म्हणून उभा आहे. वृत्तपत्रामधल्या रोज प्रसिध्द होणाऱ्या विध्वंसक बातम्या वाचल्या की, त्यावेळेस राष्ट्राच्या ऐक्याबद्दल चिंता वाटू लागते व भारताची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली की काय असे वाटू लागते.
सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्माविषयी सारखाच आदरभाव, प्रेम होय. भारताने निधर्मी राज्याची, धर्मनिरपेक्षतेची कल्पना स्वीकारलेली आहे याचा अर्थ धर्माला विरोध किंवा धर्माचा अनादर करणे असा नसून धर्माबद्दल सारखा आदर असा आहे.
आर्यापासून ते इंग्रजांपर्यंत अनेक परकीय या देशात आले येतांना ते आपला धर्म, आपली संस्कृती व भाषा घेवून गेले. पण या सर्वांना भारतीय संस्कृतीने आपल्या विशालतेत सामावून घेतले. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला व सर्वधर्मसमभावाच्या तत्वाला धक्का देणाऱ्या, तडा जाणाऱ्या अनेक गोष्टी भारतात घडत असल्या तरीसुध्दा भारत हे एक राष्ट्र म्हणून आज खंबीरपणे उभे आहे व भविष्यकाळातही एक राष्ट्र म्हणून जिवंत राहणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय संकट, परचक्र अशा आव्हानांच्या प्रसंगी भारतीय जनता परस्परांतील मतभेद विसरून एक होवून संकटाच्या मुकाबला करण्यास उभी राहते हे अनेकवार सिध्द झालेले आहे.
भारतीय जनतेने आपल्या थोर नेत्यांच्या मार्गदर्शनाने, शहिदांच्या बलिदानाने, स्वातंत्र्यसैनिकाच्या त्यागातून, कोट्यवधी जनतेच्या निर्धारातून आणि कष्टातून स्वातंत्र्य मिळविले आहे. हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आर्थिक समृध्दीच्या प्रयत्नांबरोबरच देशात अंतर्गत शांतता, जातीय सलोखा, बंधूता व राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्याची गरज आहे.
राष्ट्रीय एकात्मतेची उभारणी विटा, माती आणि हातोड्याने होत नाही लोकांच्या मनात आणि हृदयात या भावनेचा संथपणे विकास झाला पाहिजे.
राष्ट्रीय एकात्मतेच्या वाढीसाठी सर्वधर्मसमभावाची भावना वाढण्याची गरज आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनीनी व साधुसंतांनी सर्वधर्म एकच आहेत ही शिकवण दिली आहे. या जगाला परमेश्वर एकच आहे. अल्ला, कृष्ण, राम, ईश्वर ही सर्व त्याचीच रुपे आहेत. आणि जगातील सर्व प्राणी त्याचीच संतान आहेत हीच शिकवण वेद, उपनिषेद, कुराण व बायबलमधून देण्यात आली आहेत.
स्वतःच्या धर्माचा प्रसार व प्रचार करताना इतर धर्माची निंदा करतात तेव्हा साहजिकच धार्मिक तेढ निर्माण होवून राष्ट्रीय ऐक्याला धोका पोहचतो.
भारतामध्ये वारंवार होणाऱ्या जातीय दंगली व दिसून येणारा धार्मिक संघर्ष नाहिसा करून सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी हे माझे आहे, हे तुझे आहे हा संकुचित विचार त्यागून हे जग एक संयुक्त कुटुंब आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे.
ऋषिमुनी, साधुसंत, विचारवंत यांनी दिलेली सर्वधर्मभावाची शिकवण लोकांच्या मनात हृदयात बिंबली पाहिजे. एखाद्या जातीतील काही मूठभर लोकांनी राष्ट्रविरोधी, जातीय संघर्ष पेटविणारी कृत्ये केली याचा अर्थ त्याबद्दल सुडाची व बदल्याची भावना धरणे सर्वार्थाने चुकीचे आहे.
राष्ट्रीय एकात्मता ही देशाची आज नितांत गरज आहे. व ही एकता सर्वधर्मसमभावाच्या पायावर आधारलेली असते. केवळ कायदे करून एकात्मता येणार नाही. तशी मनाची जडणघडण झाली पाहिजे. मी देशासाठी, त्याच्या ऐक्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करायला तयार आहे ही प्रत्येक नागरिकाची जीवननिष्ठा असली पाहिजे.
deepakahire1973@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा