name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

कृषी विभागाच्या विविध योजना : शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान व लाभांची संपूर्ण माहिती I Various Schemes of Agriculture Department: Government Subsidies & Benefits for Farmers

 

कृषी विभागाच्या विविध योजना : शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान व लाभांची संपूर्ण माहिती
Various Schemes of Agriculture Department: Government Subsidies & Benefits for Farmers

सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना आहेत. याची माहिती या ब्लॉगमधून देण्यात आली आहे.

krushi vibhagachya vividh yojna

१) कृषी यांत्रिकीकरण योजना: 

 यासाठी पात्र लाभार्थी हे सर्व खातेदार शेतकरी असून शेतकरी गट, एफ.पी.ओ. व सहकारी संस्था आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्र सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्डची प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र ही आहेत.  कृषी यंत्रिकीकरण या घटकात ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पावर टिलरचलित यंत्र व अवजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडेतत्त्वावर कृषी यंत्र व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (अवजारे बँक) इ. या गोष्टी समाविष्ट असतात. अवजारे बँक या घटकातंर्गत ट्रॅक्टर व इतर पसंतीनुसार अवजारे या बाबी समाविष्ट असतात. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अ.जाती, अ.जमाती, अल्प, अत्यल्प,भूधारक शेतकरी व महिला यांच्यासाठी ट्रॅक्टरचे १.२५ लाख अनुदान व इतरांसाठी ५०% अवजारे तसेच इतर लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर १ लाख, इतर अवजारे ४०%  मंजूर कमाल अनुदान मर्यादा आहे. अवजारे बँकसाठी रुपये १० लाखापर्यंत अनुदान आहे.  यात ४ लाखापासून २५ लाखापर्यंत अनुदान ४० टक्के मिळते.

सुगंधी तेलासाठी जिरेनियमची लागवड (Cultivation of geranium for multipurpose aromatic oil)

सुगंधी तेलासाठी जिरेनियमची लागवड   (Cultivation of geranium for multipurpose aromatic oil)

  आपल्या देशात या वनस्पतीच्या लागवडीसाठी पोषक हवामान आहे. कृत्रिम रसायनांचे आरोग्यास होणारे धोके लक्षात घेता आज संपूर्ण जगाचे लक्ष सुगंधी तेलाकडे आकर्षित होत आहे. अजुनही आपल्या देशात जिरेनियम तेल आयात केले जाते. 

geranium lagvad

वनस्पतीचा परिचय:  

  • या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पेलारगोनियम ग्रेव्होलेन्स आहे. ही वनस्पती गिरानेएसी या कुळातील आहे.  

  • या वनस्पतीची लागवड दक्षिण आफ्रिका, अल्जेरिया, फ्रान्स, स्पेन, रशिया इ. देशात होते. 

  • भारतात याची लागवड निलगिरी कोडाई कॅनाल, पलनी व अन्नामलाई या तामिळनाडू राज्याच्या टेकड्यातून होते. हैद्राबाद येथे याची लागवड सुरू झाली असून महाराष्ट्रातही याची लागवड मोठया प्रमाणात झाली आहे. 

  • जिरेनियम वेगवेगळ्या हवामानात वाढणारी, पाण्याचा ताण सहन करणारी बहुवार्षिक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. तिची उंची ३० ते ४० सें.मी. असते 

औषधी गुणधर्म व उपयोग: 

  • जिरेनियम तेलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही पदार्थात मिसळते व त्या पदार्थानुसार द्रव्याशी एकजीव होते.

  • या तेलाला गुलाबासारखा वास येतो. तंबाखुला सुवास देणे, टूथपेस्ट, निरनिराळ्या प्रकारची मलमे यासाठी या तेलाचा उपयोग होतो. 

  • सध्या भारतात या तेलाचे उत्पादन काही भागात होते. परंतु हे तेल काही अंशी आयात करावे लागते. म्हणून भारतात व महाराष्ट्रात याची लागवड करण्यास मोठा वाव आहे. 

हवामान :  

  • हे पीक उष्ण कटिबंधात चांगले येते. समशीतोष्ण हवामानात चांगले फोफावते. 

जमीन:  

  • हे पीक भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत चांगले वाढते. 
  • तांबड्या व पोयटा असलेल्या जमिनी लागवडीसाठी योग्य आहेत.
  • पिकाच्या योग्य वाढीसाठी १५०० मी.मी. पाऊस व २० ते २५ सें.मी. तापमान असल्यास उत्पादन चांगले येते. 
  • ७० ते ८०% आद्रता, जास्त पाऊस व धुके असणे व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी या गोष्टी पिकाच्या वाढीसाठी हानिकारक आहेत. 

लागवड :  

  • पिकाची लागवड करण्यासाठी खोडापासून उत्पत्ती करतात. 

  • नर्सरी :  खोडाचे १० ते १५ सें.मी. लांबीचे व ६ ते ८ डोळे असणारे खोड नर्सरीत गादीवाफ्यावर लावावेत. 

  • साधारणत: नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान गादीवाफ्यावर ही लागवड करावी.  

  • काड्या लावण्यापूर्वी त्या रूट हार्मोनमध्ये बुडवून लावाव्यात. म्हणजे लवकर मुळे फुटतात. त्याप्रमाणे या काड्या डायथेन एम्-४५ या बुरशीनाशकामध्ये ५ मिनिटे बुडवून लागण करावी. म्हणजे बुरशीजन्य रोगापासून बचाव होतो.  

पुनर्लागवड: 

  • जिरेनियमची पाच महिन्यात रोपे तयार होतात. नर्सरीतील रोपे शेतामध्ये दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. व दोन रोपातील अंतर ४५ सें.मी. ठेवून लागवड करावी.

  • लागवडीनंतर पाणी द्यावे व नंतर दर आठवड्याने पाणी देत जावे. 

खते:  

  • लागवडीच्या वेळी १५ ते २० बैलगाड्या शेणखत द्यावे. तसेच हेक्टरी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.

  • लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी ६० किलो नत्र समान दोन हप्त्यांने द्यावे. 

पाणी व तण नियंत्रण :  

  • पाण्याच्या पाळ्या साधारणत: ७ ते १० दिवसांचे अंतराने द्याव्यात. त्याचप्रमाणे पिकातील तण नियमितपणे काढावे व प्रत्येक कापणीनंतर शेत तणमुक्त ठेवावे.  

पीक संरक्षण :  

  • मर- हा बुरशीजन्य रोग आहे.  रोगाचे नियंत्रणासाठी रोपे बविस्टीन १ ग्रॅम १ लिटर पाणी किंवा डायथेन एम- ४५ यामध्ये २ ग्रॅम १ लिटर पाणी घेऊन ५ मिनिटे बुडवून लावावीत तसेच बाविस्टीन १ ग्रॅम १ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किंवा ब्लॉयटॉक्स २ ग्रॅम१ लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण १ टक्का जमिनीमध्ये रोपास द्यावे. म्हणजे मर रोग आटोक्यात आणता येतो.

  • वाळवी- ही किड जमिनीमध्ये आढळते. यासाठी कार्बारील १० मिली. १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत द्यावे. म्हणजे वाळवीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येतो.  

Geranium lagvad

पिकाची काढणी:  

  • पिकाची पहिली कापणी लागवडीनंतर सहा महिन्यांनी नंतर पुढील कापणी दोन महिन्यांनी करावी. 

  • पीक शेतात ३ ते ५ वर्षे उत्पन्न देते. 

पिकाचे अर्थशास्त्र :  

  • पिकाचा लागवडीचा खर्च हेक्‍टरी ५० हजार रुपये होतो. व उत्पन्न साधारणत: १ लाख रुपये मिळते. खर्च वजा जाता हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये मिळतात.


© दीपक केदू अहिरे, नाशिक


deepakahire1973@gmail.com

www.DigitalKrushiyog.com 

#girenium lagvad 
#Cultivation of geranium for multipurpose aromatic oil 
#बहुपयोगी सुगंधी तेल 
#जिरेनियमची लागवड  

चाळीतील कांदा नुकसान टाळण्यासाठी गोदाम इनोव्हेशन्स यंत्र (To prevent onion damage Godam Innovations Yantra)

 


चाळीतील कांदा नुकसान टाळण्यासाठी  
To prevent onion damage 

गोदाम इनोव्हेशन्स यंत्र 
Warehouse Innovations Machine

Chalitil kanda nuksan talnyasathi godam innovation's yantra

     

 भारत हा कृषीप्रधान देश आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ नाशिकमध्ये आहे. चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण खूप आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. ते टाळण्यासाठी नाशिक येथील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चाळीतील खराब कांद्याची माहिती मिळणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.

Chalitil nuksan talnyasathi godam innovation's yantra

 नाशिकला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी ४० टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो टन कांदा येथून निर्यात केला जातो. बाजारात भाव नसेल तर शेतकरी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो. वातावरणातील बदलांमुळे चाळीत साठवलेला ४० टक्के कांदा खराब होतो. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कुटुंबातील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे तंत्र विकसित केले आहे.
    
    इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना तिची निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक येथील 'डिजिटल इम्पॅक्ट स्वेअर' नावाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये झाली. याच काळात तिचे लक्ष 'कांदा' या विषयाकडे वळले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याला मोठी मागणी असूनसुद्धा शेतकरी त्रस्त का हा प्रश्न तिला पडला? याबाबत संशोधन करण्यास तिने सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते. चांगला भाव मिळाल्यास कांदा बाजारात विकला जातो. भाव चांगला नसल्यास हा कांदा चाळीत साठवून ठेवला जातो. यातील बहुतांशी कांदा हवेतील आर्द्रता आणि योग्य तापमान न मिळाल्याने खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते.
Chalitil nuksan talnyasathi godam innovations

    कांदा खराब होण्याची सुरुवात झाल्याचे शेतकऱ्यांना खूप उशीरा समजते. तोपर्यंत मोठ्या प्रमाणत कांदा सडून खराब झालेला असतो. कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू होताच शेतकऱ्यांना कळाले तर नुकसान वीस टक्क्यावरच थांबवता येईल असा विचार करून नेमक्या याच प्रश्नावर कल्याणी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केले. कल्याणीने शोधलेल्या 'अरली स्टेज स्टार्टअप लेवरीजेस इंटरनेट ऑफ टिंग टेकनॉलॉजी' या तंत्रज्ञानामुळे सडलेल्या कांद्यातून बाहेर पडणारा विशिष्ट वायू शोधून त्याची पूर्वकल्पना देऊन शेतकऱ्यांना सावध केले जाते. ही पूर्वकल्पना मिळाल्यानंतर शेतकरी सडलेला कांदा चाळीतून बाहेर काढतात. त्यामुळे उर्वरित कांदा चांगला राहतो. याशिवाय कांदा चाळीतील तापमान, आद्रतेची माहिती रियल टाईम डाटा सिस्टीमद्वारे कंपनीच्या मुख्य केंद्रात एकत्र केली जाते. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना सावध केले जाते. त्यानंतर शेतकरी तापमान, आद्रता कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी तात्काळ विविध उपाययोजना करू शकतात. ज्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टाळता येते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक परिसरातील शेतकरी चाळीतील कांदा सुरक्षित ठेवत आहेत. साधारणपणे सात ते आठ टनाच्या चाळीसाठी एक डीव्हाईस पुरेसे आहे.

    साधारण शेतकऱ्याने १० टन कांदा चाळीत साठवला तर त्यातील ३० ते ४० टक्के कांदा वातावरणामुळे खराब होतो. ही बाब डोळ्यासमोर ठेऊन कल्याणी शिंदे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र विकसित केले आहे. हे डिव्हाईस कांदा चाळीत लावल्यानंतर कांदा खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास त्यातून निघणारा वायू डिटेक्ट करतो. शेतकऱ्याला तत्काळ याबाबत अलर्ट मिळतो. चाळीत साठवलेला कांदा तापमानातील बदल आणि पाऊस, थंडी आणि हवेतील आद्रता वाढल्यामुळे सडतो. कुजतो आजवर शेतकऱ्यांना चाळीतील कांदा सडतो आहे. हे केवळ वासावरून कळायचे पण कांद्याचा वास आला आणि तात्काळ उपायोजना केली तरी किमान ३० टक्केपर्यंत कांदा वाया गेलेला असतो. काही शेतकऱ्यांना कांदा चाळी बसल्यानंतर म्हणजेच कांदा सडून कांद्याचा ढीग कमी होणे. कांदा सडून नुकसान झाल्याचे कळते. या परिस्थितीत तर तब्बल ६० ते ७० टक्के कांदा वाया जातो. या नुकसानीत कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होतो.

    कल्याणी सध्या या पायाभूत संशोधनाच्या पुढच्या टप्प्यावर काम करीत असून त्यांनी टाटा स्टील आणि सह्याद्री फार्मच्या सहकार्याने 'कम्युनिटी क्लायमेट कंट्रोल वेअर हाऊस' या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेतून सह्याद्री फार्मच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर, मध्यप्रदेशातील जबलपूर आणि उत्तर प्रदेशातील संभल या ठिकाणी तीन गोदामाची रचना आणि पर्यवेक्षणाचे काम केले जात आहे. या तीन ठिकाणी सुमारे ५०० टन कांद्याचे साठवणूक केली आहे. भविष्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांनी सामूहिक तत्त्वावर कम्युनिटी क्लायमेट कंट्रोल वेअर हाऊसची उभारणी करावी. जेणेकरून कमी खर्चात कांद्याचे अत्याधुनिक पद्धतीने साठवणूक कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करून त्या काम करीत आहेत. कल्याणी शिंदे यांनी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी शोधलेले हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरत आहे.

 २०१८ मध्ये 'गोदाम इनोव्हेशन्स'ची कल्पना मांडल्यानंतर कल्याणीला 'डायरेक्टर ऑफ ओनीयन अँड गार्लिक रिसर्च सेंटर'कडून ३ लाख रुपयांचा निधी मिळाला. 'अनलिमिटेड इंडिया'कडूनही तिला २ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून तिने काही ठिकाणी यशस्वीरित्या गोदाम इनोव्हेशन्सची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. पुढील वर्षात ३५ कांदा चाळींमध्ये गोदाम इनोव्हेशन्सचे युनिट बसवणार असल्याचे कल्याणीने सांगितले. अधिक माहितीसाठी kalyani@godaminnovations.com या इमेल वर संपर्क करावा.

© दीपक केदू अहिरे,नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

भाजीपाला विक्रेते ते अमेझ ग्रुपचे डायरेक्टर (vegetable seller to Amaze group directer )

 भाजीपाला विक्रेते ते अमेझ ग्रुपचे 

डायरेक्टर इंजि..अक्षय काटकर

(vegetable seller to Amaze group directer)

कोरोना कालावधीत अनेकांचे                

नाशिक येथे आयोजित सेवाह आंत्रप्रीनर्स कोनक्लेव २०२० मध्ये इंजीनीयर असलेले श्री. अक्षय काटकर यांची ओळख करून देण्यात आली. तळागाळातून आलेले बेरोजगार तरुण, भाजीपाला विक्रेते म्हणून काम केलेले श्री.काटकर आज कोट्यवधीची उलाढाल अमेझ ग्रुपतर्फे करतात त्यांच्याशी ओळख करून घेत मी त्यांची उद्योजकसाठी मुलाखत घेतली. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतला. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारले असता ते म्हणाले कि, माझा जन्म  औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे झाला आहे. माझे आईवडील हे दोघेही शेती करतात. माझे प्राथमिक शिक्षण गंगापूर तालुक्यातील जाखमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर मी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गंगापूरच्या न्यू हायस्कूलमध्ये घेतले. नंतर बी.ए.पदवी घेतली. त्याचवेळेस मी औरंगाबादच्या हायटेक कॉलेजमध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. मला बांधकाम क्षेत्रात रस असल्यामुळे मी हे शिक्षणाचे क्षेत्र निवडले.

माझे सर्व शिक्षण मराठी शाळेमध्ये झाल्यामुळे डोक्यावरून सगळी इंग्लिश गेली असल्याचे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणजे मी पहिल्याच वर्षी नापास झालो. हायटेक कॉलेजनंतर मी पुन्हा नव्याने एम. आय. टी. इंजीनीअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. घरच्या गरीब परीस्थितीची जाणीव होती व परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे असे मनोमन वाटू लागले म्हणून शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला. कॉलेजची फी व इतर बाबींसाठी मी गंगापूर शहरातील नामवंत विधिज्ञ बी.पी. जोशी यांच्याकडे संगणक टायपींग करीत असे. शालेय शिक्षण घेत असताना सुद्धा मी आणि माझा लहान भाऊ गौरव भाजीपाला विकत असू. हेच ते उद्योगाचे बाळकडू मला लहान वयातच मिळाले असल्याचे श्री काटकर यांनी स्पष्ट केले.

इंजीनिअरिंग झाल्यानंतर मी लगेच इंटरनेट कैफे चालू केला. माझे चुलते व आतेभावाचे प्रिंटींग प्रेस असल्यामुळे मी त्यांच्याकडेही काम केले. थोड्या पैशाची बचत केली. त्यावेळी इंटरनेट हे लोकांची गरज बनले होते हे ओळखून मी नेट कैफे गंगापूर शहरात टाकला. एका मित्रासोबत केलेला हा बिझनेस दोन महिन्यानंतर बंद पडला. अपयश काय असते याचा पूर्ण धडा घेतला. पैशाची चणचण भासू लागल्यामुळे नोकरी करणे भाग पडले. अनेक वेळा विचार करायचो कि मी चांगले टायपिंग करतो तर हा व्यवसाय करून पाहावा म्हणून गंगापूर दिवाणी न्यायालयासमोर संगणक टायपिंगचा व्यवसाय चालू केला. त्यावेळेस सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजि. वाय.टी.कंगणकर साहेब, वकील मनोरकर, पानकडे साहेब यांची खूप मोलाची मदत मिळाली. माझा संगणक टायपिंगचा बिझनेस चांगला व्यवस्थित स्थिरस्थावर होत असताना टपरी मालक यांनी त्रास द्यायला सुरवात केली. ते माझ्याकडून जास्त भाडे आकारू लागले. मला त्यांचे बोलणेही सहन होत नसे. या जाचातून सुटका व्हावी म्हणून मी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मी पुहा जोशी साहेबांकडे नोकरी करण्यास सुरुवात केली. व्यवसायातून नोकरी आणि नोकरीतून व्यवसाय असा प्रवास वारंवार घडू लागला असल्याचे श्री.काटकर यांनी सांगितले.  

जोशी साहेबांकडे अनेक नामवंत उद्योजक, बिल्डर येत असत. ते पाहून मला असे वाटायचे कि आपण नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हायचे. पण ते कसे शक्य आहे. ती काय जादूची कांडी आहे काय? असे विचार येऊ लागले. परंतु मला माहित होते कि मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे काम करत राहिलो. घरची परीस्थिती बेताची असल्यामुळे झगडत राहिलो. मिळेल ते काम करत राहिलो. कारण मला माझं उद्योजक व्हायचं स्वप्न होत. मध्ये मध्ये याला तपासायचो पण हाती काहीच लागत नव्हत. वडिलांना त्यावेळी काही लोक म्हणायची कि याला ट्रक्टर ड्रायव्हर करा. पण मला काहीतरी वेगळे करायचे होते. माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा करायचा होता म्हणून मी आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकलो. पण समस्या काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यातच माझ्या वडिलांचा भयंकर अपघात झाला. त्यांचा पाय निकामी झाला.

प्रत्येकवेळी नवीन संकट माझ्यासमोर ठाण मांडत असे.त्यामुळे पैशाची खूपच कमतरता भासत असे. अनेकवेळा वाटायचे कि आत्महत्या करावी. पण घरच्या जबाबदारीमुळे मी पुन्हा जगण्याचा निर्णय घ्यायचो. अशातच मला पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली. स्वामी विवेकानंदाचे कर्मयोग पुस्तक मी वाचले आणि माझे जीवनच बदलवून टाकण्याचा मी निर्णय घेतला. पुस्तक घेण्यासाठीहि पैसे नसायचे. पण अडीअडचणीतून मार्ग काढून मी पुस्तक वाचत राहिलो. सध्या माझ्याकडे एक हजार पुस्तके संग्रही आहेत. पुस्तकांनी मला माझ्या जगण्याचा मार्ग सुकर केला असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.

दरम्यान मला चांगल्या पगाराची एम.एन.सी. कंपनीत नोकरी लागली. थोडा पैसा जास्त मिळू लागला. बचतीची सवय जोपासली. मी माझे पैसे वाचवून छोट्या मोठ्या बिझिनेस सेमिनारला जात असू यात मला खुप माहिती मिळत गेली. व्यवसाय कसा करावा, का करावा याचे शास्त्र मला कळले. विविध संस्थाना भेटी दिल्या. काही बिझिनेस संदर्भात प्रशिक्षण घेतले. यात एम.सी.ई.डी.,सेवाह एज्युकेशन हब यांना भेटी दिल्या. सेवाह एज्युकेशन नाशिकच्या आश्विनी धुप्पे यांना माझ्या सर्व परिस्थितीविषयी सांगितले. त्यांनी बिझिनेस संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मी २००८ ते २०२० पर्यंत नोकरी व्यवसाय अशा व्यापात अडकलो होतो. आता मी माझ्या व्यवसायाच्या, उद्योगाचे स्वप्न पूर्ण करण्यास सज्ज झालो.

इंजिनीअर असलेल्या श्री. अक्षय काटकर यांनी सुमूहर्तावर अमेझ ग्रुपची स्थापना केली. दिनांक २८/०८/२०२० रोजी लाकडाऊनमध्ये अमेझ ग्रुपचे पहिले ऑफिस गंगापूर शहरात सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे  इंजिनियर मित्र मंगेश नरोडे याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्री. नरोडे यांस १२ वर्षाचा स्टक्चरल अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळवण्यासाठी मी त्यांच्याशी भागीदारी केली. औरंगाबाद येथे सुद्धा आम्ही ऑफिस चालू केले आहे. आजमितीला अमेझ ग्रुपमध्ये आर्किटेक्चर प्लानिंग, थ्रीडी डिझाईन, स्टक्चरल डिझाईन, इंटेरियर डिझाईन, सर्वेयिंग, मोजणी, लैन्डस्केपींग व कन्सल्टिंग इंजिनीअरिंगमधील होणारी सर्व कामे केली जातात.

अमेझ ग्रुपची अनेक वैशिष्ट काळानुरूप सिद्ध झाली आहेत. त्यांच्याकडे २ आर्किटेक्ट आणि ६ सिव्हिल इंजिनीअर अशी अनुभवी टीम आहे. आजमितीला त्यांच्या २५० साईटस चालू आहेत. पिंपरी चिंचवड,औरंगाबाद,बीड, सुरत, गुजरात, उत्तराखंड, यवतमाळ, जालना, बुलढाणा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये त्यांची कामे चालु आहेत. त्यांचे सर्व प्लान हे नाविन्यपूर्ण असून संपूर्ण स्टक्चरल डिझाईनसह आहेत. प्रत्येक कामाची टेक्निकल टेस्टिंग केली जाते. प्रत्येक कामाचा प्लान विंडो, डोअर व अनेक प्लान ग्राहकास दिले जातात. प्रत्येक धर्माच्या वास्तुशास्रासह हे दिले जाते. ग्राहकांचा प्रत्येक महिन्याला फिडबैक, प्रतिसाद हा घेतला जातो. शंभर टक्के पारदर्शी काम, २१ साईट व्हिजीट व जोब कार्ड असे अनेक प्रकारची गुणविशेष सांगता येतील. या आधुनिक युगात नाविन्यपूर्ण काय आणि कशा प्रकारच्या सेवा देता येतील याविषयी आम्ही नेहमीच अग्रेसर राहत असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.

या कॉक्रीटच्या युगामध्ये झाडांची संख्या खुप कमी होत आहे त्यासाठी त्यांनी एक घर एक झाड हा उपक्रम सुरु केला आहे त्यासाठी त्यांनी प्रोत्साहनपर सन्मानचिन्हही दिले जात असल्याचे सांगितले. सामाजिक कार्याची आवड लहानपणापासून जोपासल्यामुळे आपण समाजाचे काही देणे लागतो या कार्यासाठी क्रीएटीव्ह युथ फौंडेशनची स्थापना केली आहे. श्री. काटकर ज्या जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकले त्या शाळेला त्यांनी संगणक भेट दिली आहे. दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेची, विद्यार्थाची  गुणवत्ता कशी वाढीस लागेल यासाठी श्री काटकर यांनी सहकार्य केले आहे. पुढेही करत राहणार. वृक्षारोपणाची चळवळ व्यापक करून वृक्षाचे जतन करण्यासाठी नेहमी त्यांचा कटाक्ष असतो. या सर्व कार्यात त्यांचे मित्र रवींद्र एरंडे, अड मानसी जोशी, प्रसाद चव्हाण, संतोष भिंगारे यांचा सक्रीय सहभाग असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले. अशा उपक्रमशील उद्योजकास मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करून मी त्यांची रजा घेतली.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.DigitalKrushiyog.com




#Success story
#Success
#success story of the farmers
#successful entraprenuar
#important success story


भरड धान्य प्रक्रिया उद्योगातून घडलेले यश : समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ. सरोजिनी फडतरे यांची प्रेरणादायी कथा I Multigrain Processing Success Story – Sau. Sarojini Fadtare


भरड धान्य प्रक्रिया उद्योगातून घडलेले यश : समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ. सरोजिनी फडतरे यांची प्रेरणादायी कथा  

Multigrain Processing Success Story – Sau. Sarojini Fadtare


           "कृषिमू्ल ही जीवनम्" या उक्तीनुसार भारतीय संस्कृती विकसित झाली आहे. म्हणूनच शेती ही भारतातील शेतकऱ्याची जीवनशैली म्हणून ओळखली जाते. भारताला वैविध्यपूर्ण हवामानाच्या देणगीमुळे भारत नेहमी कृषीप्रधान देश राहिला आहे. भरड धान्याचा विचार करता भारतामध्ये ८०पेक्षा जास्त जाती आपल्या आहाराचा भाग आहेत.  हरितक्रांतीच्या काळामध्ये भरड धान्याची लागवड मागे पडली. त्यावेळी आव्हान होते ते म्हणजे जनतेची भूक भागविणे. याच काळात तांदूळ आणि गहु आयात करण्यात येवून त्याला सरकारचे धोरणात्मक सहकार्य मिळाले. यामुळे भरड धान्य आहारातून हळु हळू मागे पडले. गहु आणि तांदूळ याच्यावरील संशोधन, जागरूकता, खप, उत्पादन विकास जसा झाला तसा इतर भरड धान्याचा झाला नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गहु आणि तांदूळ यांच्यासाठी पूरक झाली. त्यामुळे भरड धान्य ही गरिबांचा सामाजिक सामना करीत राहिली. हळू हळू भरडधान्याची लागवडही मंदावत गेली.


पोषक धान्ये

       आज समाजामध्ये व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ई, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूल्य यांसारख्या अनेक कारणांनी आहारात कमतरता आली, त्यामुळेच जीवनशैलीचे अनेक आजार जसे की मधुमेह, रक्तदाब, संधिवात, पित्त, हार्ट समस्या दिसून येतात. या समस्येवर मात करण्यासाठी व भारताचे आरोग्य सुधारण्यासाठी भरड धान्याला, त्याचे पैष्टिकतेचे महत्व ओळखून भारत सरकारने पोषक धान्ये म्हणून राजपत्रात प्रसिद्ध केले आहे.
          
महाराष्ट्राचा विचार करता, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम भागात ज्वारी, बाजरी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. कोकण, सह्याद्री पर्वताच्या रांगा यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरी यासारखी पिके घेतली जातात. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी यामुळे मागील तीन दशकांपासून ज्वारी, बाजरी, नाचणी हे मुख्य अन्न म्हणून खाण्यात कमी येत आहे. याला कारण वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण, मॉडर्न संस्कृतीचे अनुकरण, आणि यात भर म्हणून की काय शासन स्तरावरून फक्त गहु आणि तांदूळ यांच्यासाठी प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे भरड धान्य आहारातून हळु हळु कमी झाले आहे.      
       
पुढील येणारे २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या अनुषंगाने महाराष्टातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी चालून आल्या आहेत. शेजारील राज्यांमध्ये भरड धान्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला तसा तो महाराष्ट्रात झाला नाही. आज आपल्या येथे बोटावर मोजण्याइतके भरड धान्य प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. जागतिक बाजापेठेतील वाढत्या ग्लूटेन फ्री पदार्थांमुळे भरड धान्यात प्रचंड मोठी संधी आहे.कोरोनानंतरच्या काळात आरोग्याविषयी भरपूर जागरूकता निर्माण झाली आहे. भरड धान्यात असलेल्या पोषक तत्वामुळेच प्रक्रियायुक्त उत्पादनांना मागणी वाढली आहे. म्हणूनच या संधीचा फायदा घेत तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.


भरड धान्याचे फायदे

       भरड धान्याचे खूप मोठे फायदे आहेत. फायबरचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेह,रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. प्रथिनाचे प्रमाण अधिक आहे.  भरड धान्य कमी कालावधीत तयार होत असल्याने दुष्काळ सहन करण्याची ताकद त्याच्यात असते त्यामुळं ती शेतकरी बांधवासाठी फायदेशिर आहेत. 

    हीच संधी लक्षात घेऊन महाराष्ट्रात कृषी विभागाने भरड धान्य विकास कार्यक्रमाची योजना २०१२ साली सुरू झाली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखे भरडधान्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार व्हावीत. यासाठी भरड धान्य विकास योजना सुरू करण्यात आली. या योजनेविषयी अधिक माहिती घेता भरड धान्यापासून काही प्रक्रियायुक्त उत्पादने बनवण्याची कल्पना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सौ. सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनी सुचली. या क्षेत्रात नावीन्य असले तरी त्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला आणि व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली.पूर्ण वेळ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.


समृध्दी अॅग्रोची भरड धान्य प्रक्रिया
       
समृद्धी अॅग्रो समूहाने २०१० पासून भरड धान्यप्रक्रिया सुरू केली. उत्पादनाच्या चवीशी कोणतीही तडजोड न करता भारताला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्याच्या प्रयत्नात समृद्धी अॅग्रो ग्रुपने नेहमी अस्सल आणि शुद्ध सेंद्रिय उत्पादने आणण्याचे मिशन ठेवले त्यादृष्टीने आम्ही झपाटल्यागत कामाला लागलो असल्याचे सौ. फडतरे यांनी स्पष्ट केले. संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. ही वाटचाल करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. 

संसाराचा व्याप वाढल्याने पतीच्या महाविद्यालयाच्या नोकरीच्या पगारात पुरेनासे झाले. म्हणून सरळगाव सोडले आणि थेट हैद्राबाद येथे ई टीव्हीच्या अन्नदाता या नियतकालिकात ते उपसंपादक म्हणून रूजू झाले. २००६ ते २००८ ह्या दोन वर्षात हैद्राबादमधली भाषा आणि खाद्य संस्कृती यांचा मेळ काही बसेना. खूप दूर आल्यासारखी भावना सतत व्हायची म्हणून तिथेही राजीनामा देऊन पुण्यात एक कृषीविषयक नियतकालिकात पतीनी उपसंपादक म्हणून काम सुरू केले. शेती प्रक्रिया उद्योग चालू करावा असे मला वाटायचे. आयुष्यात काहीतरी नविन करण्याचं पक्क केलं.
         
उद्योजक होण्याचं पहिलं पाऊल उचलल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. मी २०१० साली घरूनच ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू पिठांची विक्री सुरु केली. पिठाची डिलिव्हरी पती कामावर जाताना देत असत असे रूटीन चालू केले. पतीचे  बचत गटांना प्रॉडक्ट बनवण्याचे आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम होते. ह्या कामात त्यांच्या खूप ओळखी झाल्या. त्यांनी सात राज्यांचा जवळून अभ्यास केला.सन २०१२ मध्ये संधी चालून आली. 

कृषी विभागाने भरडधान्य विकास कार्यक्रमाची योजना सुरू केली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांवर भरड प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याची कल्पना अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पुढे आली आणि हे क्षेत्र नाविन्यपूर्ण असून यात व्यावसायिक संधी भरपूर निर्माण करता येतील अशी आशा पल्लवित झाली. विचारांती मी पूर्णपणे आणि पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. वडापुरी ता. इंदापूर जि. पुणे येथे दहा जणांचा बचतगट केला.

 
विक्रीचे व्यासपीठ
           
आमचे मार्गदर्शक दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगर साहेब यांचे मदतीने बचत गट स्थापन केला आणि माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. आमच्या कष्टाची पराकाष्ठा सुरू झाली. मी होम सायन्स पदवीधर असल्याने सर्व उत्पादनाचा प्रयोग आधी  घरात होत असे. त्यात यश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते करत असू. २०१२ मध्ये पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आमच्या उत्पादनांना विक्रीसाठी पहिले व्यासपीठ  मिळाले. ज्वारीच्या चकल्या, शंकरपाळ्या, इडली हे पदार्थ केले. आणि स्टॉलवर उपलब्ध केले. पण आम्हा दोघांना नोकरीचाच अनुभव गाठीशी असल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचताच येईना. 

ग्राहक स्टॉलजवळ आले की संकोचून मान खाली घालून आम्ही दोघेही उभे असायचो. ही बाब कृषी अधिकारी अर्जुन फुले यांच्या लक्षात आली. त्यांनी तेथेच पहिला धडा शिकवला. ग्राहकांनी काही घेवो किंवा न घेवो, त्यांना आपले प्रॉडक्ट देऊन धीटपणे संवाद साधायचा. आपली उत्पादने समजून सांगायची. त्याप्रमाणे आम्ही मार्केटिंग करायला लागलो. आणि काय आश्चर्य...पहिल्याच दिवशी नऊशे रुपयांची तर चार दिवसात साडे चार हजार रुपयांची  विक्री झाली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
होम डिलिव्हरीचा प्रारंभ
              
या प्रसंगाने आमचा आत्मविश्वास दुणावला आणि ग्राहकांचे जाळे आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून खूपच वाढवले. त्यातूनच पुण्यातील एका महिलेने पन्नास जणांसाठी ज्वारीच्या इडलीची ऑर्डर दिली. ती सर्व इडली आम्ही घरी बनवून पोहोच केली आणि होम डिलिव्हरीचा टप्पा सुरु केला. त्याच दरम्यान कोकणातील एक इडलीची ऑर्डर आली आणि आता कोकणात कशी द्यावी हा प्रश्न पडला. मग मी त्यांना म्हणालो की मी पीठ तयार करून देते , तुम्ही ते भिजवून इडली तयार करा. अशा तऱ्हेने इडली मिक्सचा जन्म झाला. 

ग्राहकांची नाडी ओळखून प्रक्रियेचे पुढचे दालन खुले केले असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमच्या उद्योगाचे स्वरूप २०१३ मध्ये विस्तारले. देवळाली प्रवरा येथे 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य ग्रेडिंगचे युनिट सुरू केले. खरंतर ज्वारी, बाजरीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे सोपे नव्हते. पण उत्पादनांच्या विक्रीबरोबरच ही उत्पादने कधी आरोग्यदायक आहेत ते आम्ही ग्राहकांना समजून देत होतो.  नाचणीतील लोहामुळे मुलींमधील रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. ज्वारी आणि बाजरीतील कर्करोग, मधुमेह प्रतिबंधात्मक गुणधर्म मी ग्राहकांना पटवून देत होते. आरोग्यदायी अन्नाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली. आमच्या या कामाची वाखाणणीही समाजात व्हायला लागली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. 

नाविन्यपूर्ण उत्पादने
        
आमची उत्पादने जसे ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पिठं यांची गुणवत्ता सर्व निकषांच्या कसोटीवर उतरली आणि त्यांना भारताबाहेरही जसं की अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणीही बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्रधान्यांचे कुरकुरेही सुरु केले आहेत. 

या सर्व उत्पादनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.तो पुढेही मिळणार असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला. ही उत्पादने जे केवळ इष्टतम पोषणच नाही तर तुमच्या खाद्यपदार्थांच्या प्रोफाइलला अनुकूल चवदेखील देतात. . समृद्धी अॅग्रो ग्रुप वर्षानुवर्षे नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी काम करत आहे, भरड धान्याच्या उत्पादनांपासून ते मल्टीग्रेन ब्रेकफास्टचे पर्याय, सेंद्रिय आणि आरोग्यदायी फ्लेक्स ते फायबर समृद्ध अन्न, विविध प्रकारचे पीठ ते मल्टीग्रेन मिक्स, पफ, स्नॅक्स जे केवळ निरोगी आणि चविष्ट खाद्यपदार्थांमधील रेषा अस्पष्ट करत नाहीत तर भारतीयांसाठी एक विश्वासार्ह जीवनशैली तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला सेवा देण्यास सक्षम आहोत याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांचे सतत निरीक्षण करतो. कनिष्ठ वर्ग, मध्यमवर्ग किंवा उच्च वर्ग या प्रत्येकालाच आमची उत्पादने मनापासून आवडत असल्याचे सौ.फडतरे यांनी सांगितले.समृद्धी अॅग्रो ग्रुपचा सर्वात चांगला भाग हा आहे की ते देशभरात आणि परदेशातही मापदंडांच्या अधीन राहून  वितरण करतात.
      
समृध्दी एग्रो ग्रुप सध्या ज्वारी चिवडा, ज्वारी पोहे, ज्वारीचे इडली मिक्स, नाचणीचे इडली मिक्स, डोसा मिक्स, ज्वारीचा रवा, नाचणीचा रवा,  भरड धान्याचे पीठ, असे अनेक पदार्थ तयार  करते. त्यांनी कुटुंबानुसार पदार्थाचे पॅकिंग आकर्षक बनविले आहे. आज त्यांना भारताबाहेर यूएसए, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या देशातही बाजारपेठ मिळाली आहे. लवकरच आम्ही इतर देशांतही आपली उत्पादने पाठविणार असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
दर्जेदार उत्पादने
       
जेव्हा आपण राज्याबाहेर आणि परदेशातही पदार्थ पाठवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जसे की, त्या देशातील प्रमाणित मानके काय आहेत. प्रायमरी पॅकिंग आकर्षक आणि योग्य, माहितीपूर्ण पाहिजे. आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. 

आपल्या मालाचे भाव हे शक्यतो भारतीय रुपयात घेणे सोयीस्कर आहे. आम्ही आमचे सर्व धान्य आणि आवश्यक असलेला कच्चा माल शेतकर्‍यांकडून त्यांना बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त दराने घेत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमचा लाल बहादूर शास्त्रींच्या "जय जवान, जय किसान" या उक्तीवर विश्वास आहे. आमचे शेतकरी आणि त्यांच्या नैसर्गिकरित्या पेरलेल्या आणि सेंद्रिय कच्च्या मालाच्या मदतीने आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय उत्पादने तयार करत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
        
    मूल्यवर्धित कच्च्या धान्याच्या सोयीस्कर आणि त्रासमुक्त खरेदीसाठी एकूण ३० पेक्षा जास्त शेतकरी उचित किंमतीच्या कराराच्या आधारावर भरड धान्य उत्पादन पुरवित आहेत. बाजारातील उपलब्ध दराच्या तुलनेत उच्च दर्जाच्या भरड धान्याच्या बदल्यात आमच्याकडून अधिक किमती ऑफर केल्या जात आहेत.

 
विविध आव्हाने
     
या क्षेत्रात अनेक आव्हाने असल्याचेही त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. आज समाजामध्ये आरोग्याविषयी जागृती अभियान राबविणे आवश्यक आहे, भरडधान्याविषयी अनेक कारणांनी उदासीनता दिसून येत आहे. शासकीय व खाजगी स्तरावर सतत याबद्दल अधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे. छोट्या उद्योजकाला कमी वेळेमध्ये सुलभतेने कर्ज पुरवठा होत नाही. एका छोट्या गावात तयार करण्यात आलेल्या मालाची विक्री शहराच्या ठिकाणी करण्यासाठीं सोईचा अभाव आहे. 

आज बदलत्या परिस्थितीत विक्री कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे, म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत जागरूकता निर्माण करून मोठ्या प्रमाणात भरड धान्याची जाहिरात होणे गरजेचे आहे.  हे काम छोट्या उद्योजकाला परवडणारे नाही. म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक भरड धान्य वर्षां तरुणांनी पुढाकार घेऊन या आरोग्यदायी अन्न व्यवसायात यशस्वी भरारी घेण्यासाठी आताच पाऊले उचलली पाहिजेत.


शून्यातून उभा केला प्रकल्प
          
 आपल्या दिनक्रमाविषयी बोलताना सौ.फडतरे म्हणाल्या की, आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होऊन रात्री उशिरा मावळतो. सर्वांचे कष्टच मला खरंतर समृद्धीकडे घेऊन आले. आमच्या वेलीवर आलेली दोन फुलं,माझ्या दोन्ही कन्या ह्यांनी ही त्यांचं बालपण आमच्या फरफटीत घालवले. 

चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या शुभेच्छा असल्याने मानहानी, संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कटू प्रसंगातही एकमेकांना सांभाळत आमच्या बरोबरच ज्वारीलाही समृद्धीचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
       
    शून्यातून उभा केलेला हा प्रकल्प आता दिमाखाने आपली ध्वज पताका परदेशातही मिरवत आहे. सौ. फडतरे यांच्या कामात श्री. फडतरे यांनीही सर्वस्व झोकून दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. २०१३ मध्येच त्यांना सहयाद्री वाहिनीचा नवउद्योजकांचा पुरस्कार मिळाला आणि प्रथमच दूरचित्रवाणी वर झळकले. पैशांपेक्षा प्रसिद्धी खूप लवकर मिळाली. २०१५ मध्ये आमच्या उत्पादनांचा संपूर्ण भारतातून  दुसरा क्रमांक आला. २०१९ मध्ये ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार मिळाले.


भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका पुरस्कार   नुकताच ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पातळीवर स्टार्टअप यात्रा शेतीमध्ये काम करणाऱ्या प्रथम पारितोषिक महिला  म्हणुन एक लाख रु.व सन्मानचिन्ह असा पुरस्कार राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यात १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेचा उद्देश महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा उद्देश होता.
          
या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील अनेक उद्योजकांनी आपल्या कल्पना मांडल्या. यातून राज्य स्तरावर वेगवेगळ्या विभागातून २१ जणांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. यामुळे मिलेटच्या कामाला राजमान्यता मिळाली आहे. भरडधान्यातून प्रक्रिया उत्पादने करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. अजून त्यांना खूप मोठी झेप घ्यायची आहे. त्यांची उत्पादने गुड २ इट या ब्रँडखाली ऑनलाईन तसेच ऑफलाईन विक्रीसाठी आहेत.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

 

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...