name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): भरड धान्यावर विविध प्रक्रिया उत्पादने (Multigrain Processing success story)

भरड धान्यावर विविध प्रक्रिया उत्पादने (Multigrain Processing success story)

भरड धान्यावर विविध प्रक्रिया उत्पादने
समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ.सरोजिनी फडतरे यांची यशोगाथा
(Multigrain Processing success story) 


           "कृषिमू्ल ही जीवनम्" या उक्तीनुसार भारतीय संस्कृती विकसित झाली आहे. म्हणूनच शेती ही भारतातील शेतकऱ्याची जीवनशैली म्हणून ओळखली जाते. भारताला वैविध्यपूर्ण हवामानाच्या देणगीमुळे भारत नेहमी कृषीप्रधान देश राहिला आहे. भरड धान्याचा विचार करता भारतामध्ये ८०पेक्षा जास्त जाती आपल्या आहाराचा भाग आहेत.  हरितक्रांतीच्या काळामध्ये भरड धान्याची लागवड मागे पडली. त्यावेळी आव्हान होते ते म्हणजे जनतेची भूक भागविणे. याच काळात तांदूळ आणि गहु आयात करण्यात येवून त्याला सरकारचे धोरणात्मक सहकार्य मिळाले. यामुळे भरड धान्य आहारातून हळु हळू मागे पडले. गहु आणि तांदूळ याच्यावरील संशोधन, जागरूकता, खप, उत्पादन विकास जसा झाला तसा इतर भरड धान्याचा झाला नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गहु आणि तांदूळ यांच्यासाठी पूरक झाली. त्यामुळे भरड धान्य ही गरिबांचा सामाजिक सामना करीत राहिली. हळू हळू भरडधान्याची लागवडही मंदावत गेली.


पोषक धान्ये

       आज समाजामध्ये व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ई, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूल्य यांसारख्या अनेक कारणांनी आहारात कमतरता आली, त्यामुळेच जीवनशैलीचे अनेक आजार जसे की मधुमेह, रक्तदाब, संधिवात, पित्त, हार्ट समस्या दिसून येतात. या समस्येवर मात करण्यासाठी व भारताचे आरोग्य सुधारण्यासाठी भरड धान्याला, त्याचे पैष्टिकतेचे महत्व ओळखून भारत सरकारने पोषक धान्ये म्हणून राजपत्रात प्रसिद्ध केले आहे.
          महाराष्ट्राचा विचार करता, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम भागात ज्वारी, बाजरी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. कोकण, सह्याद्री पर्वताच्या रांगा यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरी यासारखी पिके घेतली जातात. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी यामुळे मागील तीन दशकांपासून ज्वारी, बाजरी, नाचणी हे मुख्य अन्न म्हणून खाण्यात कमी येत आहे. याला कारण वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण, मॉडर्न संस्कृतीचे अनुकरण, आणि यात भर म्हणून की काय शासन स्तरावरून फक्त गहु आणि तांदूळ यांच्यासाठी प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे भरड धान्य आहारातून हळु हळु कमी झाले आहे.      
       पुढील येणारे २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या अनुषंगाने महाराष्टातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी चालून आल्या आहेत. शेजारील राज्यांमध्ये भरड धान्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला तसा तो महाराष्ट्रात झाला नाही. आज आपल्या येथे बोटावर मोजण्याइतके भरड धान्य प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. जागतिक बाजापेठेतील वाढत्या ग्लूटेन फ्री पदार्थांमुळे भरड धान्यात प्रचंड मोठी संधी आहे.कोरोनानंतरच्या काळात आरोग्याविषयी भरपूर जागरूकता निर्माण झाली आहे. भरड धान्यात असलेल्या पोषक तत्वामुळेच प्रक्रियायुक्त उत्पादनांना मागणी वाढली आहे. म्हणूनच या संधीचा फायदा घेत तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.


भरड धान्याचे फायदे

       भरड धान्याचे खूप मोठे फायदे आहेत. फायबरचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेह,रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. प्रथिनाचे प्रमाण अधिक आहे.  भरड धान्य कमी कालावधीत तयार होत असल्याने दुष्काळ सहन करण्याची ताकद त्याच्यात असते त्यामुळं ती शेतकरी बांधवासाठी फायदेशिर आहेत. हीच संधी लक्षात घेऊन महाराष्ट्रात कृषी विभागाने भरड धान्य विकास कार्यक्रमाची योजना २०१२ साली सुरू झाली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखे भरडधान्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार व्हावीत. यासाठी भरड धान्य विकास योजना सुरू करण्यात आली. या योजनेविषयी अधिक माहिती घेता भरड धान्यापासून काही प्रक्रियायुक्त उत्पादने बनवण्याची कल्पना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सौ. सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनी सुचली. या क्षेत्रात नावीन्य असले तरी त्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला आणि व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली.पूर्ण वेळ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.


समृध्दी अॅग्रोची भरड धान्य प्रक्रिया
       समृद्धी अॅग्रो समूहाने २०१० पासून भरड धान्यप्रक्रिया सुरू केली. उत्पादनाच्या चवीशी कोणतीही तडजोड न करता भारताला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्याच्या प्रयत्नात समृद्धी अॅग्रो ग्रुपने नेहमी अस्सल आणि शुद्ध सेंद्रिय उत्पादने आणण्याचे मिशन ठेवले त्यादृष्टीने आम्ही झपाटल्यागत कामाला लागलो असल्याचे सौ. फडतरे यांनी स्पष्ट केले. संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. ही वाटचाल करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. संसाराचा व्याप वाढल्याने पतीच्या महाविद्यालयाच्या नोकरीच्या पगारात पुरेनासे झाले. म्हणून सरळगाव सोडले आणि थेट हैद्राबाद येथे ई टीव्हीच्या अन्नदाता या नियतकालिकात ते उपसंपादक म्हणून रूजू झाले. २००६ ते २००८ ह्या दोन वर्षात हैद्राबादमधली भाषा आणि खाद्य संस्कृती यांचा मेळ काही बसेना. खूप दूर आल्यासारखी भावना सतत व्हायची म्हणून तिथेही राजीनामा देऊन पुण्यात एक कृषीविषयक नियतकालिकात पतीनी उपसंपादक म्हणून काम सुरू केले. शेती प्रक्रिया उद्योग चालू करावा असे मला वाटायचे. आयुष्यात काहीतरी नविन करण्याचं पक्क केलं.
         उद्योजक होण्याचं पहिलं पाऊल उचलल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. मी २०१० साली घरूनच ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू पिठांची विक्री सुरु केली. पिठाची डिलिव्हरी पती कामावर जाताना देत असत असे रूटीन चालू केले. पतीचे  बचत गटांना प्रॉडक्ट बनवण्याचे आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम होते. ह्या कामात त्यांच्या खूप ओळखी झाल्या. त्यांनी सात राज्यांचा जवळून अभ्यास केला.सन २०१२ मध्ये संधी चालून आली. कृषी विभागाने भरडधान्य विकास कार्यक्रमाची योजना सुरू केली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांवर भरड प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याची कल्पना अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पुढे आली आणि हे क्षेत्र नाविन्यपूर्ण असून यात व्यावसायिक संधी भरपूर निर्माण करता येतील अशी आशा पल्लवित झाली. विचारांती मी पूर्णपणे आणि पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. वडापुरी ता. इंदापूर जि. पुणे येथे दहा जणांचा बचतगट केला.

 
विक्रीचे व्यासपीठ
           आमचे मार्गदर्शक दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगर साहेब यांचे मदतीने बचत गट स्थापन केला आणि माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. आमच्या कष्टाची पराकाष्ठा सुरू झाली. मी होम सायन्स पदवीधर असल्याने सर्व उत्पादनाचा प्रयोग आधी  घरात होत असे. त्यात यश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते करत असू. २०१२ मध्ये पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आमच्या उत्पादनांना विक्रीसाठी पहिले व्यासपीठ  मिळाले. ज्वारीच्या चकल्या, शंकरपाळ्या, इडली हे पदार्थ केले. आणि स्टॉलवर उपलब्ध केले. पण आम्हा दोघांना नोकरीचाच अनुभव गाठीशी असल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचताच येईना. ग्राहक स्टॉलजवळ आले की संकोचून मान खाली घालून आम्ही दोघेही उभे असायचो. ही बाब कृषी अधिकारी अर्जुन फुले यांच्या लक्षात आली. त्यांनी तेथेच पहिला धडा शिकवला. ग्राहकांनी काही घेवो किंवा न घेवो, त्यांना आपले प्रॉडक्ट देऊन धीटपणे संवाद साधायचा. आपली उत्पादने समजून सांगायची. त्याप्रमाणे आम्ही मार्केटिंग करायला लागलो. आणि काय आश्चर्य...पहिल्याच दिवशी नऊशे रुपयांची तर चार दिवसात साडे चार हजार रुपयांची  विक्री झाली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
होम डिलिव्हरीचा प्रारंभ
              या प्रसंगाने आमचा आत्मविश्वास दुणावला आणि ग्राहकांचे जाळे आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून खूपच वाढवले. त्यातूनच पुण्यातील एका महिलेने पन्नास जणांसाठी ज्वारीच्या इडलीची ऑर्डर दिली. ती सर्व इडली आम्ही घरी बनवून पोहोच केली आणि होम डिलिव्हरीचा टप्पा सुरु केला. त्याच दरम्यान कोकणातील एक इडलीची ऑर्डर आली आणि आता कोकणात कशी द्यावी हा प्रश्न पडला. मग मी त्यांना म्हणालो की मी पीठ तयार करून देते , तुम्ही ते भिजवून इडली तयार करा. अशा तऱ्हेने इडली मिक्सचा जन्म झाला. ग्राहकांची नाडी ओळखून प्रक्रियेचे पुढचे दालन खुले केले असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमच्या उद्योगाचे स्वरूप २०१३ मध्ये विस्तारले. देवळाली प्रवरा येथे 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य ग्रेडिंगचे युनिट सुरू केले. खरंतर ज्वारी, बाजरीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे सोपे नव्हते. पण उत्पादनांच्या विक्रीबरोबरच ही उत्पादने कधी आरोग्यदायक आहेत ते आम्ही ग्राहकांना समजून देत होतो.  नाचणीतील लोहामुळे मुलींमधील रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. ज्वारी आणि बाजरीतील कर्करोग, मधुमेह प्रतिबंधात्मक गुणधर्म मी ग्राहकांना पटवून देत होते. आरोग्यदायी अन्नाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली. आमच्या या कामाची वाखाणणीही समाजात व्हायला लागली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. 

नाविन्यपूर्ण उत्पादने
        आमची उत्पादने जसे ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पिठं यांची गुणवत्ता सर्व निकषांच्या कसोटीवर उतरली आणि त्यांना भारताबाहेरही जसं की अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणीही बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्रधान्यांचे कुरकुरेही सुरु केले आहेत. या सर्व उत्पादनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.तो पुढेही मिळणार असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला. ही उत्पादने जे केवळ इष्टतम पोषणच नाही तर तुमच्या खाद्यपदार्थांच्या प्रोफाइलला अनुकूल चवदेखील देतात. . समृद्धी अॅग्रो ग्रुप वर्षानुवर्षे नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी काम करत आहे, भरड धान्याच्या उत्पादनांपासून ते मल्टीग्रेन ब्रेकफास्टचे पर्याय, सेंद्रिय आणि आरोग्यदायी फ्लेक्स ते फायबर समृद्ध अन्न, विविध प्रकारचे पीठ ते मल्टीग्रेन मिक्स, पफ, स्नॅक्स जे केवळ निरोगी आणि चविष्ट खाद्यपदार्थांमधील रेषा अस्पष्ट करत नाहीत तर भारतीयांसाठी एक विश्वासार्ह जीवनशैली तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला सेवा देण्यास सक्षम आहोत याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांचे सतत निरीक्षण करतो. कनिष्ठ वर्ग, मध्यमवर्ग किंवा उच्च वर्ग या प्रत्येकालाच आमची उत्पादने मनापासून आवडत असल्याचे सौ.फडतरे यांनी सांगितले.समृद्धी अॅग्रो ग्रुपचा सर्वात चांगला भाग हा आहे की ते देशभरात आणि परदेशातही मापदंडांच्या अधीन राहून  वितरण करतात.
      समृध्दी एग्रो ग्रुप सध्या ज्वारी चिवडा, ज्वारी पोहे, ज्वारीचे इडली मिक्स, नाचणीचे इडली मिक्स, डोसा मिक्स, ज्वारीचा रवा, नाचणीचा रवा,  भरड धान्याचे पीठ, असे अनेक पदार्थ तयार  करते. त्यांनी कुटुंबानुसार पदार्थाचे पॅकिंग आकर्षक बनविले आहे. आज त्यांना भारताबाहेर यूएसए, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या देशातही बाजारपेठ मिळाली आहे. लवकरच आम्ही इतर देशांतही आपली उत्पादने पाठविणार असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
दर्जेदार उत्पादने
       जेव्हा आपण राज्याबाहेर आणि परदेशातही पदार्थ पाठवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जसे की, त्या देशातील प्रमाणित मानके काय आहेत. प्रायमरी पॅकिंग आकर्षक आणि योग्य, माहितीपूर्ण पाहिजे. आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. आपल्या मालाचे भाव हे शक्यतो भारतीय रुपयात घेणे सोयीस्कर आहे. आम्ही आमचे सर्व धान्य आणि आवश्यक असलेला कच्चा माल शेतकर्‍यांकडून त्यांना बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त दराने घेत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमचा लाल बहादूर शास्त्रींच्या "जय जवान, जय किसान" या उक्तीवर विश्वास आहे. आमचे शेतकरी आणि त्यांच्या नैसर्गिकरित्या पेरलेल्या आणि सेंद्रिय कच्च्या मालाच्या मदतीने आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय उत्पादने तयार करत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
        मूल्यवर्धित कच्च्या धान्याच्या सोयीस्कर आणि त्रासमुक्त खरेदीसाठी एकूण ३० पेक्षा जास्त शेतकरी उचित किंमतीच्या कराराच्या आधारावर भरड धान्य उत्पादन पुरवित आहेत. बाजारातील उपलब्ध दराच्या तुलनेत उच्च दर्जाच्या भरड धान्याच्या बदल्यात आमच्याकडून अधिक किमती ऑफर केल्या जात आहेत.

 
विविध आव्हाने
       या क्षेत्रात अनेक आव्हाने असल्याचेही त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. आज समाजामध्ये आरोग्याविषयी जागृती अभियान राबविणे आवश्यक आहे, भरडधान्याविषयी अनेक कारणांनी उदासीनता दिसून येत आहे. शासकीय व खाजगी स्तरावर सतत याबद्दल अधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे. छोट्या उद्योजकाला कमी वेळेमध्ये सुलभतेने कर्ज पुरवठा होत नाही. एका छोट्या गावात तयार करण्यात आलेल्या मालाची विक्री शहराच्या ठिकाणी करण्यासाठीं सोईचा अभाव आहे. आज बदलत्या परिस्थितीत विक्री कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे, म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत जागरूकता निर्माण करून मोठ्या प्रमाणात भरड धान्याची जाहिरात होणे गरजेचे आहे.  हे काम छोट्या उद्योजकाला परवडणारे नाही. म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक भरड धान्य वर्षां तरुणांनी पुढाकार घेऊन या आरोग्यदायी अन्न व्यवसायात यशस्वी भरारी घेण्यासाठी आताच पाऊले उचलली पाहिजेत.


शून्यातून उभा केला प्रकल्प
          
 आपल्या दिनक्रमाविषयी बोलताना सौ.फडतरे म्हणाल्या की, आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होऊन रात्री उशिरा मावळतो. सर्वांचे कष्टच मला खरंतर समृद्धीकडे घेऊन आले. आमच्या वेलीवर आलेली दोन फुलं,माझ्या दोन्ही कन्या ह्यांनी ही त्यांचं बालपण आमच्या फरफटीत घालवले. चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या शुभेच्छा असल्याने मानहानी, संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कटू प्रसंगातही एकमेकांना सांभाळत आमच्या बरोबरच ज्वारीलाही समृद्धीचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
       शून्यातून उभा केलेला हा प्रकल्प आता दिमाखाने आपली ध्वज पताका परदेशातही मिरवत आहे. सौ. फडतरे यांच्या कामात श्री. फडतरे यांनीही सर्वस्व झोकून दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. २०१३ मध्येच त्यांना सहयाद्री वाहिनीचा नवउद्योजकांचा पुरस्कार मिळाला आणि प्रथमच दूरचित्रवाणी वर झळकले. पैशांपेक्षा प्रसिद्धी खूप लवकर मिळाली. २०१५ मध्ये आमच्या उत्पादनांचा संपूर्ण भारतातून  दुसरा क्रमांक आला. २०१९ मध्ये ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार मिळाले.


भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका पुरस्कार    
    नुकताच ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पातळीवर स्टार्टअप यात्रा शेतीमध्ये काम करणाऱ्या प्रथम पारितोषिक महिला  म्हणुन एक लाख रु.व सन्मानचिन्ह असा पुरस्कार राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यात १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेचा उद्देश महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा उद्देश होता.
          या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील अनेक उद्योजकांनी आपल्या कल्पना मांडल्या. यातून राज्य स्तरावर वेगवेगळ्या विभागातून २१ जणांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. यामुळे मिलेटच्या कामाला राजमान्यता मिळाली आहे. भरडधान्यातून प्रक्रिया उत्पादने करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. अजून त्यांना खूप मोठी झेप घ्यायची आहे. त्यांची उत्पादने गुड २ इट या ब्रँडखाली ऑनलाईन तसेच ऑफलाईन विक्रीसाठी आहेत.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

 

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...