सुगंधी तेलासाठी जिरेनियमची लागवड (Cultivation of geranium for multipurpose aromatic oil)
आपल्या देशात या वनस्पतीच्या लागवडीसाठी पोषक हवामान आहे. कृत्रिम रसायनांचे आरोग्यास होणारे धोके लक्षात घेता आज संपूर्ण जगाचे लक्ष सुगंधी तेलाकडे आकर्षित होत आहे. अजुनही आपल्या देशात जिरेनियम तेल आयात केले जाते.
वनस्पतीचा परिचय:
या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पेलारगोनियम ग्रेव्होलेन्स आहे. ही वनस्पती गिरानेएसी या कुळातील आहे.
या वनस्पतीची लागवड दक्षिण आफ्रिका, अल्जेरिया, फ्रान्स, स्पेन, रशिया इ. देशात होते.
भारतात याची लागवड निलगिरी कोडाई कॅनाल, पलनी व अन्नामलाई या तामिळनाडू राज्याच्या टेकड्यातून होते. हैद्राबाद येथे याची लागवड सुरू झाली असून महाराष्ट्रातही याची लागवड मोठया प्रमाणात झाली आहे.
जिरेनियम वेगवेगळ्या हवामानात वाढणारी, पाण्याचा ताण सहन करणारी बहुवार्षिक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. तिची उंची ३० ते ४० सें.मी. असते
औषधी गुणधर्म व उपयोग:
जिरेनियम तेलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही पदार्थात मिसळते व त्या पदार्थानुसार द्रव्याशी एकजीव होते.
या तेलाला गुलाबासारखा वास येतो. तंबाखुला सुवास देणे, टूथपेस्ट, निरनिराळ्या प्रकारची मलमे यासाठी या तेलाचा उपयोग होतो.
सध्या भारतात या तेलाचे उत्पादन काही भागात होते. परंतु हे तेल काही अंशी आयात करावे लागते. म्हणून भारतात व महाराष्ट्रात याची लागवड करण्यास मोठा वाव आहे.
हवामान :
हे पीक उष्ण कटिबंधात चांगले येते. समशीतोष्ण हवामानात चांगले फोफावते.
जमीन:
- हे पीक भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत चांगले वाढते.
- तांबड्या व पोयटा असलेल्या जमिनी लागवडीसाठी योग्य आहेत.
- पिकाच्या योग्य वाढीसाठी १५०० मी.मी. पाऊस व २० ते २५ सें.मी. तापमान असल्यास उत्पादन चांगले येते.
- ७० ते ८०% आद्रता, जास्त पाऊस व धुके असणे व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी या गोष्टी पिकाच्या वाढीसाठी हानिकारक आहेत.
लागवड :
पिकाची लागवड करण्यासाठी खोडापासून उत्पत्ती करतात.
नर्सरी : खोडाचे १० ते १५ सें.मी. लांबीचे व ६ ते ८ डोळे असणारे खोड नर्सरीत गादीवाफ्यावर लावावेत.
साधारणत: नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान गादीवाफ्यावर ही लागवड करावी.
काड्या लावण्यापूर्वी त्या रूट हार्मोनमध्ये बुडवून लावाव्यात. म्हणजे लवकर मुळे फुटतात. त्याप्रमाणे या काड्या डायथेन एम्-४५ या बुरशीनाशकामध्ये ५ मिनिटे बुडवून लागण करावी. म्हणजे बुरशीजन्य रोगापासून बचाव होतो.
पुनर्लागवड:
जिरेनियमची पाच महिन्यात रोपे तयार होतात. नर्सरीतील रोपे शेतामध्ये दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. व दोन रोपातील अंतर ४५ सें.मी. ठेवून लागवड करावी.
लागवडीनंतर पाणी द्यावे व नंतर दर आठवड्याने पाणी देत जावे.
खते:
लागवडीच्या वेळी १५ ते २० बैलगाड्या शेणखत द्यावे. तसेच हेक्टरी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी ६० किलो नत्र समान दोन हप्त्यांने द्यावे.
पाणी व तण नियंत्रण :
पाण्याच्या पाळ्या साधारणत: ७ ते १० दिवसांचे अंतराने द्याव्यात. त्याचप्रमाणे पिकातील तण नियमितपणे काढावे व प्रत्येक कापणीनंतर शेत तणमुक्त ठेवावे.
पीक संरक्षण :
मर- हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाचे नियंत्रणासाठी रोपे बविस्टीन १ ग्रॅम १ लिटर पाणी किंवा डायथेन एम- ४५ यामध्ये २ ग्रॅम १ लिटर पाणी घेऊन ५ मिनिटे बुडवून लावावीत तसेच बाविस्टीन १ ग्रॅम १ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किंवा ब्लॉयटॉक्स २ ग्रॅम१ लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण १ टक्का जमिनीमध्ये रोपास द्यावे. म्हणजे मर रोग आटोक्यात आणता येतो.
वाळवी- ही किड जमिनीमध्ये आढळते. यासाठी कार्बारील १० मिली. १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत द्यावे. म्हणजे वाळवीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येतो.
पिकाची काढणी:
पिकाची पहिली कापणी लागवडीनंतर सहा महिन्यांनी नंतर पुढील कापणी दोन महिन्यांनी करावी.
पीक शेतात ३ ते ५ वर्षे उत्पन्न देते.
पिकाचे अर्थशास्त्र :
पिकाचा लागवडीचा खर्च हेक्टरी ५० हजार रुपये होतो. व उत्पन्न साधारणत: १ लाख रुपये मिळते. खर्च वजा जाता हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये मिळतात.
No comments:
Post a Comment