सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यातBhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iranभुसारी ॲग्रो' प्रकल्प ठरत आहे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण'Bhusari Agro' project is becoming a ray of hope for farmers
अहिल्यानगर जिल्हा, नेवासा तालुक्यातील सोनई गावातील शेतकरी संजय भुसारी आणि सुनील भुसारी या भावंडांनी आधुनिक शेती, सेंद्रिय उत्पादन आणि निर्यातीचे उत्तम नियोजन साधत थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. त्यांनी आपल्या ९ एकर क्षेत्रातून घेतलेला उच्च प्रतीचा ५० टन केळी माल थेट इराणला निर्यात केला असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही निर्यात व्हिवान (Vivan) या नामांकित निर्यात कंपनीच्या माध्यमातून झाली असून, यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि समन्वयाची भूमिका आशिष पाटील सरांनी बजावली. त्यांनी संपूर्ण निर्यात प्रक्रियेतील तांत्रिक, दस्तऐवजीकरण व गुणवत्ता चाचणी या बाबींमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले.
या शेतकरी भावंडांनी केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित न करता, गांडूळखत व निंबोळी पावडर प्रकल्प सुरू करून जैविक शेतीला अधिक बळ दिले आहे. सुमारे ६०% सेंद्रिय आणि ४०% रासायनिक खतांचा समतोल वापर करून घेतलेले केळी उत्पादन निर्यातक्षम ठरले. त्यातील प्रत्येक घडाचे सरासरी वजन ३५ किलो असून, एकूण ९ एकरातून तब्बल ३०० टन उत्पादनाचा संकल्प त्यांनी केला आहे.
या यशामागे पुत्र शुभम भुसारी यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे त्याचे बी.एस्सी (कृषी) शिक्षण घेत असतानाच ‘भुसारी ॲग्रो’ या नावाने गांडूळखत व निंबोळी पावडरचे स्वतंत्र उत्पादन प्रकल्प सुरू केले.
त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात ११८ टन गांडूळखत व ३५ टन निंबोळी पावडर विक्री करून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता निर्माण केली.
‘भुसारी ॲग्रो’ची उत्पादने आज अहिल्यानगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, सातारा आदी भागांमध्ये पोहोचत आहेत. याच पार्श्वभूमीवर २०२५-२६ मध्ये शुभमने नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळखत प्रकल्प उभारला असून त्याची एकवेळ प्रक्रिया क्षमता तब्बल १०० टन इतकी आहे.
विशेष म्हणजे, शुभम तयार करत असलेली निंबोळी पावडर कोणतेही तेल न काढता आणि कोणतेही रासायनिक पदार्थ न मिसळता पूर्णतः नैसर्गिकरित्या तयार केली जाते. तो सध्या एमआयटी पुणे या नामांकित संस्थेत एमबीए (मार्केटिंग) चे शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच व्यवसायाचे उत्तम व्यवस्थापन करत आहे. ‘भुसारी ॲग्रोच्या माध्यमातून तो आज लाखोंची उलाढाल करीत आहे.
आजच्या घडीला 'शिक्षण + शाश्वत शेती + उद्योजकीय दृष्टिकोन' याचा आदर्श नमुना भुसारी कुटुंबीयांनी अंगिकारला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात नव्या पिढीतील शेतकऱ्यांना नव्या दिशेने प्रेरणा मिळत आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com