शेतकरी जीवनातील बैलपोळे — परंपरा, श्रम आणि शेतीची ओळख | Importance of Bullocks in Farmer’s Life
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना नेहमीच एक विशेष स्थान आहे. प्रत्येक सणामागे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यं दडलेली असतात. ग्रामीण जीवनात साजरे होणारे सण हे निसर्गाशी, शेतीशी आणि पशुपालनाशी घट्ट जोडलेले असतात. बैलपोळा हा असाच एक महत्वाचा सण आहे जो थेट शेतकरी जीवनाशी निगडित आहे.
बैलपोळा हा शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या लेकरासारख्या बैलांचा सण आहे. शेतीत बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती असतो. दिवसभर कष्ट करून शेताची मशागत करतो, नांगरणी, पेरणी, वाहतूक ही सगळी कामं बैलाच्या जोरावर पार पडतात. त्यामुळे वर्षातून एकदा त्याचा सन्मान करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.
यांत्रिक युगातील बैलपोळा
आजकाल शेतीत ट्रॅक्टर, आधुनिक यंत्रं आणि तंत्रज्ञान आल्यामुळे बैलांचं महत्व कमी होत चाललं आहे. कामं वेगानं, कमी वेळेत आणि कमी मजुरीत ट्रॅक्टरने होतात, त्यामुळे अनेक शेतकरी बैल पाळणं टाळतात. यामुळेच बैलपोळ्याच्या सणाकडेही दुर्लक्ष होतंय, आणि हळूहळू हा सण फक्त औपचारिकतेपुरता उरतोय याची मला खंत वाटते.
पूर्वी बैल आणि शेतकऱ्याचं नातं भावनिक होतं. ते नातं कमकुवत होत चाललं आहे. बैलामुळे मुलांना प्राणीप्रेम, श्रमाचं महत्व आणि सहजीवनाची शिकवण मिळायची ती आता कमी होत आहे. सणामुळे गावात एकत्रितपणे आनंद साजरा करण्याची प्रथा टिकायची. ती आज कमी होत चालली आहे. बैलपोळा हा केवळ बैलांचा नाही तर शेतकऱ्याच्या श्रमसंस्कृतीचा गौरव आहे आणि त्या संस्कृतीला धोका निर्माण होतोय.
आजच्या यांत्रिक युगात ट्रॅक्टर हे अपरिहार्य साधन आहे, पण बैलांचे योगदान आणि महत्व कधीही नाकारता येणार नाही. त्यामुळे परंपरेतला बैलपोळा सण जिवंत ठेवणं हे आपल्या संस्कृतीसाठी आणि पुढच्या पिढीसाठी फार महत्वाचं आहे.
बैल : शेतकऱ्याचा खरा सोबती
शेतकरी जीवनाची गाथा सांगायची झाली तर ती शेतकरी आणि त्याच्या बैलांशिवाय अपूर्णच आहे. बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती, कष्टाचा साथीदार आणि अन्नदाता मानला जातो. शेत नांगरणं, पेरणी करणं, गाडं ओढणं, शेतमाल वाहून नेणं या सर्व कामांत बैल महत्वाची भूमिका बजावतो. आधुनिक यंत्रसामग्री आली असली तरी अजूनही ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतीसाठी बैलांवरच अवलंबून आहेत. बैल हा केवळ कामासाठीच नाही, तर भावनिक नात्यानेही शेतकऱ्याशी जोडलेला असतो. तो शेतकऱ्याचा लेकरासारखाच असतो.
बैलपोळ्याची परंपरा
भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला बैलपोळा साजरा केला जातो. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा व सन्मानाचा मानला जातो. बैलपोळा सणाच्या आधी बैलांना आंघोळ घालून, अंगाला तेल चोळून स्वच्छ केलं जातं. त्यांच्या शिंगांना रंग लावून सजवलं जातं, गळ्यात घंटा बांधली जाते, डोक्यावर आकर्षक झुलं व फडकी बांधतात. दोन्ही शिंगाना विविध रंगाच्या रिबन बांधल्या जायच्या. प्रत्येक गावात मिरवणुका काढल्या जातात, ढोल-ताशांच्या गजरात बैलांना मानाचा मुजरा दिला जातो. शेतकरी त्यांच्या बैलांना गोडधोड खायला घालतो, पोळ्याच्या दिवशी बैल कामाला लावले जात नाहीत. ही परंपरा शतकानुशतकं चालत आलेली आहे आणि आजही गावोगावी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
बैलपोळ्याचं महत्व
शतकानुशतके चालत आलेली आपली ग्रामीण संस्कृती या बैलपोळा सणामुळे टिकून राहिली आहे. बैल हा शेतकऱ्याचा निसर्गदूत आहे, त्याला मान देणे म्हणजे शेती व निसर्गाला मान देणे.बैलपोळा आपल्याला श्रमाचं महत्व, प्राण्यांबद्दल कृतज्ञता आणि सहजीवनाची जाणीव करून देतो. माझे बालपण खेड्यात गेल्याने मी बैलपोळा सणाचा भरपूर आनंद लुटला आहे. मी संवेदनशील कवी मनाचा माणूस असल्यामुळे बैलपोळा माझ्या नजरेतून कवितेद्वारे मांडला आहे. बैलपोळ्यावरची माझी कविता पुढीलप्रमाणे :
बैलपोळा (काव्य)
बैल आहे माझा सखा सोबती
शेतकरी बंधूंच्या जिवाभावाचा,
बैलांप्रती आपली कृतज्ञता
सण आहे हा बैलपोळ्याचा...
शेतीच्या कामासाठी आली यंत्र
बैलाच्या मेहनतीला नाही तोड,
पोळ्याला सजवतात बैलांना
नैवेद्य पुरणपोळीचा गोड-धोड...
बैल नाही असे शेतकरी बांधव
बैलाच्या पुतळ्याची पूजा करतात,
गावखेड्यात निघतात मिरवणुका
गावात नाचत बैल फिरवतात...
सण माझ्या सर्जा-राजाचा
ऋण त्याचं माझ्या भाळी,
तुझ्या घामानं फुलणाऱ्या शेतीला
सदा पिकू दे सर्व काळी...
शेतकरी वर्षभर बैलांच्या मदतीने शेती करतो. परंतु बैल कधी तक्रार करत नाहीत. त्यांच्यामुळेच शेतातून धान्य, फळं, भाज्या आणि अन्न निर्माण होतं. म्हणूनच बैलपोळा हा सण म्हणजे शेतकऱ्याने आपल्या सोबत्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना होय. बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या बैलांची विशेष काळजी घेतो. त्यांना सजवतो, विश्रांती देतो आणि प्रेम दाखवतो. यामुळे प्राणीप्रेम, माणूस-प्राणी नातं आणि सहजीवनाची जाणीव समाजात टिकून राहते. बैलपोळ्याच्या दिवशी गावात सामूहिक आनंदाचे वातावरण असते.
बैलपोळ्याला सर्वजण मिळून मिरवणुका काढतात, ढोल-ताशा वाजवतात, गाणी म्हणतात. यामुळे गावात सामाजिक एकात्मता, बांधिलकी आणि ऐक्यभावना वाढीस लागते. बैल हा शेतीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे बैलपोळा हा सण म्हणजे शेतीला, निसर्गाला आणि अन्नदात्याला दिलेला सन्मान आहे. हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि त्याच्या उपकारांची जाणीव करून देतो. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगातही बैलपोळा आपल्याला आपल्या परंपरा, संस्कृती आणि शेतकरी जीवनाच्या मूळ मूल्यांची आठवण करून देतो. हा सण आपली सांस्कृतिक ओळख जपण्याचं कार्य करतो.
बैलपोळ्याचे महत्त्व अबाधित
बैलपोळ्याचं आजच्या काळातील महत्त्व अबाधित आहे. आज बरीच कामं ट्रॅक्टर आणि यंत्रांच्या मदतीने होत असली तरी ग्रामीण समाजात बैलांचं महत्व अजूनही संपलेलं नाही. अनेक शेतकरी अजूनही आपल्या बैलांना लेकरांसारखीच जपतात.बैलपोळा आजच्या मुलांना श्रमाचं महत्व आणि प्राण्यांशी जिव्हाळ्याचं नातं शिकवतो.हा सण शेतकऱ्याच्या श्रमसंस्कृतीचा आणि त्याच्या कष्टमय जीवनाचा सन्मान करतो. बैलपोळ्यामुळे शेतीप्रधान भारताची खरी ओळख टिकून राहते.
नाशिक जिल्ह्यातील वडनेरभैरव येथील श्री. बाळासाहेब परसराम मोहिते या शेतकऱ्याने बैलांच्या आठवणी जतन करण्यासाठी व बैलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी यांत्रिक शेतीच्या काळात देखील आपल्या बंगल्यासमोर बैलांची एक जोडी शिल्प उभे करून त्यासाठी खास अशी जागा निर्माण केली आणि आपले जनावरांवरील प्रेम पोळ्याच्या निमित्ताने व्यक्त केले. एक लाख रु.खर्च करून आपल्या प्रिय बैलांचे बंगल्यासमोर शिल्प उभारले.
पोळा हा शेतकऱ्यांचा एकमेव महत्त्वाचा बैलांप्रती कृतज्ञता बाळगण्याचा सण आहे. या सणाला या शेतकऱ्याने बैलांना सहा हजार रुपये किमतीच्या खास झुली बनवून आणल्या. बैलांना गोंडे, माठूट्या त्याचबरोबर घुंगरांच्या माळा असे सर्व काही शोभिवंत दागिने हे बैलांना घातल्यामुळे त्या बैलांचा जिवंतपणा अजूनच बोलका झाला आहे.
पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या बसवंत गार्डन अँपी\अँग्री टुरिझममध्ये ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे सजीव साधन असणाऱ्या कृषी आधारित बैल-संस्कृतीची परिपूर्ण ओळख पहायला मिळते. बसवंत गार्डनमध्ये मांडलेल्या बैलांच्या शिल्पकृतींमधून नवीन पिढीला अतिशय रंजकतेने माहिती दिली जाते. भारतातील बैलांच्या विविध जातींच्या हुबेहुब प्रतिकृती त्यांच्या माहितीसह येथे बघायला मिळतात.
नाशिक येथे "कृषिथॉन"आयोजित दरवर्षीप्रमाणे "माझा बैल - माझी शान" ही फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या बैलपोळा सणाचे आनंदी क्षण फोटो २६ ऑगस्टपर्यंत पाठवून सोबत आपले पूर्ण नाव, गाव, मोबाईल नं. लिहून पाठवा. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे आहेत. यानिमित्ताने बैलांसोबत आपल्या कृतज्ञतेच्या आठवणी कैद होतील.
बैलपोळा हा केवळ सण नाही, तर शेतकऱ्याच्या जीवनातील भावनिक आणि सांस्कृतिक बंध आहे. हा सण शेतकऱ्याला आपल्यावर उपकार करणाऱ्या बैलांची आठवण करून देतो आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. आजच्या वेगवान युगात माणसाने प्राणी, निसर्ग आणि श्रम यांचा सन्मान करणे विसरू नये, हेच बैलपोळ्याचं खरं तत्त्वज्ञान आहे. शेतकऱ्याच्या जीवनात बैलपोळा हा सण म्हणजे प्रेम, आपुलकी, कृतज्ञता आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com

No comments:
Post a Comment