मध्यान्ह हा काव्यसंग्रह कवी प्रकाश आहेर यांचा असून हा काव्यसंग्रह नाशिकच्या दीपयोग प्रकाशनामार्फत प्रकाशित झाला आहे.
'मध्यान्ह' या काव्यसंग्रहात ७२ कविता आहेत. समाजातील बिघडत जाणारी विदारक परिस्थिती, विषमता, दुःख तसेच स्वतः अनुभवलेले सुख-दुःख हे कवी मनाला स्वस्थ बसू देत नव्हते. विचारांच्या कल्लोळात कळत नकळत काही शब्द वेड लावतात व कच्चे काव्य मनात तयार होतं. मग उठलेल काहूर शांत झालं की विचार करून कुंभाराच्या मडक्यासारखं ते काव्य नंतर आकार घेतं.
कुठलाही आर्थिक फायदा नसतांना आपले शब्द वाचकांपर्यंत पोहचावेत व काही काळ जिवंत रहावेत हिच मनोमन तिव्र इच्छा प्रत्येक कवीची असते. व ह्या इच्छेपोटी मी 'मध्यान्ह' काव्यसंग्रह आपल्यापुढे सादर करत असल्याचे कवी म्हणतो.
जिवनाचं खरं सत्य मृत्यु आहे व शेवटी सर्व येथेच सोडुन एकट्याला जाणे आहे ही भावना मनात सतत ठेवली तर माणसाचे दुःख कमी होवून नैराश्यता जिवनातुन जाईल, असं सांगण्याचा प्रयत्न कवीने 'स्मृती' 'सत्य' 'संत' व 'अस्तित्व' ह्या कवितांमध्ये केला आहे. राजकारण्याचे गलिच्छ राजकारण पाहुन 'पुतळा', खुर्ची, 'अश्रु' खरा-खोटा' 'भिकारी' 'त्यांच्या जगात' ह्या कविता मनात जन्म घेत असल्याचे कवी नमूद करतो.
ह्या काव्यसंग्रहात 'मध्यान्ह' नावाच्या दोन कविता आहेत. एक कविता काळाचं स्थित्यंतर सांगते तर दुसरी कविता ही एक ज्वलंत कल्पनेचा अनुभव आहे. स्मशानभुमीत एका अजाण निरागस प्रियकराला पाहुन ती कविता मनात खोलवर आकार घेत असल्याचे कवी म्हणतो. कंपनीत नोकरी करत असतांना 'कॅज्युअल' हंगामी कामगारांचे जिवन कवीने जवळून पाहिले आहे. त्यातील अर्धसत्य हे 'कॅज्युअल' कवितेत मांडले आहे. परमेश्वराबद्दलच्या माझ्या कल्पना 'परमेश्वर' 'ईश्वर' 'खरा परमेश्वर' या कवितेतून कवीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्यान्ह या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांनी प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात की, स्वतःच्या दुःखाने स्वतःवर ओढवलेल्या संकटाने आपण स्वतः व्यथित होणं हा मानवी स्वभाव आहे. मात्र परदुःख शीतल न समजता स्वतःचंच समजून जेव्हा व्यथित होतो, दुसऱ्याच्या मनाला सलणारा काटा आपल्यालाच टोचतो आहे याची जाणीव होते, त्याक्षणी कवितेचा जन्म होतो. तेव्हा जो शब्दोच्चार होतो. तो शब्दसमूह रूढार्थाने कविता नसू दे 'अरेरे, वाईट झालं.
बिचाऱ्याच्या वाट्याला असं दुःखद प्रसंग यायला नको होता या उदगारातही कविता आढळते. ती व्यक्ती मग कवि असो किंवा नसो तिच्याजवळ फक्त संवेदनाक्षम मन असायला हवं. असं मन कवी प्रकाश आहेरांकडे आहे. इतकंच नव्हे, तर परदुःखाचे काळवंडलेले डाग नेमकेपणाने टिपून घेणाऱ्या टीपकागदासारखं त्याचं हृदय आहे. याचा प्रत्यय मध्यान्ह संग्रहातील कविता वाचल्यावर येत असल्याचे त्यांनी अभिप्राय दिला आहे.
मध्यान्ह काव्यसंग्रह हा ७२ पानांचा असून यात ७२ कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या काव्यसंग्रहाची किंमत ५० रुपये असून या काव्यसंग्रहाचे प्रकाशक दीपक अहिरे असून हा काव्यसंग्रह नाशिकच्या दीपयोग प्रकाशनामार्फत प्रकाशित करण्यात आला आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment