संकरित बियाण्यांचे वाण, कृषी क्षेत्राला देईल जान !
Hybrid seed varieties will give life to the agricultural sector !
जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक असलेल्या आपल्या देशातील लोकांची अन्नाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी प्रचलीत वा परंपरागत बियाण्यांच्या वापराने पूर्ण होणे अवघड आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व संकरित बियाणांचा वापर ही काळाची गरज बनली आहे. यामुळे उत्पादन वाढ व रोजगारनिर्मिती होईल. संकरित बियाणे उत्पादनांविषयी उपयुक्त माहितीचा ब्लॉग...
कृषी उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या घटकांपैकी बियाणे हा एक मूलभूत घटक आहे. संकरित व सुधारीत यांच्या प्रसाराबरोबरच त्यांचे स्रोत, बियाण्याची अनुवंशिक शुद्धता कायम राखल्यास कृषी उत्पादन वाढीचे ध्येय साध्य करणे शक्य आहे. उच्च उगवणशक्ती, अनुवंशिक व भौतिक शुद्धता, रोग व किडीपासून व इतर भेसळीपासून मुक्त बियाण्यास शुद्ध बियाणे म्हणता येईल.
आधुनिक शेती शास्त्रात शुद्ध व चांगले गुण असलेल्या बियाण्यांचा वापर हे सर्वात स्वस्त व शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचणारे भांडवल आहे. विविध कृषी संशोधन केंद्रातून अनेक वाण गरजेनुसार प्रसारित झालेले आहेत. परंतु या महत्त्वाच्या वाणांचे बीजगुणन होऊन ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाणे महत्त्वाचे आहे. तमाम शेतकऱ्यांची, संस्थांची गरज आणि मागणी लक्षात घेता देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठानी विकसित केलेल्या अधिक उत्पादनक्षम व जास्त फुटवे असणाऱ्या बुटक्या रोगप्रतिकारक, खताच्या मात्रांना प्रतिसाद देणाऱ्या व लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन होणे आवश्यक आहे.
सन १९७९-८० पासून राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ प्रमाणित बियाणे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी करून बीजोत्पादन क्षेत्र व उत्पादन वाढविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करत आहे. याबरोबरच खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या बी-बियाणे निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत.
शेतीमध्ये नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा व पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन व त्यापासून नफा मिळविणे हे शेती व्यवसायाचे उद्दिष्ट आहे. इतर नगदी पिके घेण्यापेक्षा प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असून तांत्रिकदृष्ट्या ते सोपे आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी वर्ग बीजोत्पादनामध्ये सहभागी होत आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम या संस्था शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले बियाणे खरेदी करतात. मात्र त्यासाठी या संस्थांशी करारनामा करावा लागतो. संकरित जातींच्या बियाण्याचे भाव हंगामापूर्वीच ठरवून देतात तर सुधारित वाणाच्या बियाण्याला त्या हंगामातील बाजारभावापेक्षा किफायतशीर भाव देतात म्हणून शेतकऱ्यांनी प्रमाणित बीजोत्पादनामध्ये सहभागी होऊन देशाची, राज्याची वाढीव बियाण्यांची उणीव भरून काढून स्वतःची शेती किफायतशीर करावी.
बीजोत्पादन कार्यक्रम :
बीजोत्पादनात सर्वप्रथम शुद्ध बियाणे म्हणजे उच्च उगवणशक्ती, अनुवंशिक व भौतिक शुद्धता, रोग व किडीपासून व इतर भेसळीपासून मुक्त बियाणे यांचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शुद्ध बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी बियाण्यास निरनिराळ्या अवस्थांतून जावे लागते. गहू बीजोत्पादनाचा कार्यक्रम खालीलप्रमाणे पैदासकारांच्या स्तरावर राबविण्यात येतो.
केंद्रक बियाणे :
नवीन जात विकसित होऊन प्रसारित झाल्यावर पीक पैदासकाराकडे जे बियाणे असते. त्यापासून बीजगुणन केलेल्या बियाण्यास केंद्रक बियाणे असे म्हणतात. केंद्रक बियाणे बीजोत्पादनाचा कार्यक्रम पैदासकाराच्या वैयक्तिक देखरेखीखाली राबविला जातो. बीज प्रमाणीकरणाची मानके, त्याचे गुणवैशिष्टये तपासून मग त्याला केंद्रक बियाण्याचा दर्जा दिला जातो.
मूलभूत बियाणे :
केंद्रक बियाणे वापरात आणून जे बीजगुणन केले जाते त्याला पैदासकार किंवा मूलभूत बियाणे म्हणतात. मूलभूत बियाणे तयार करताना त्या जातीच्या बीजगुणन क्षेत्रातून संबंधीत जातीचे गुणधर्म असलेले जास्त उत्पादन देणारी सुमारे ५०० ते १००० झाडे निवडून वेगळे ठेवतात. पुढील वर्षी अशा निवडलेल्या योग्य झाडांची दोन ओळीत पेरणी करतात. पिकांची वाढ झाल्यावर अशा सर्व ओळीचे निरीक्षण केले जाते व ज्या ओळीतील सर्व झाडे मूळ जातीच्या गुणधर्मानुसार असतात तेवढ्याच ओळी निवडल्या जातात. निवडलेल्या प्रत्येक दोन ओळींची स्वतंत्रपणे अलग काढणी करतात. उत्पादनाच्या दृष्टीने सांख्यिकीदृष्टया सरस ठरलेल्या ओळींचे उत्पादन एकत्र केले जाते व त्यांचा मूलभूत बियाणे वाढीसाठी उपयोग केला जातो.
पायाभूत बियाणे :
पायाभूत बियाण्यांचे बीजोत्पादन कृषी विद्यापीठे, तालुका बीजगुणन केंद्र व इतर संस्था येथे घेतले जाते. पायाभूत बियाणे घेतलेले क्षेत्र बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याकडे ठराविक नमुन्यात अर्ज करून नोंदणी करावी लागते. या क्षेत्रास पिके पैदासकार, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व बीज प्रमाणिकरण अधिकारी कमीत कमी २ ते ३ वेळा तरी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करतात. जर या क्षेत्रात भेसळ असेल तर ते क्षेत्र नाकारले जाते. अशा रीतीने पायाभूत बियाणे तयार केले जाते.
प्रमाणित/सत्याप्रत बीजोत्पादन :
सत्यप्रत बियाणे उत्पादनासाठी पायाभूत बियाण्याचा दर्जा असलेले बियाणे वापरात आणले जाते. वरील बीजोत्पादनाच्या कार्यक्रमात फक्त पायाभूत किंवा सत्यप्रत बीजोत्पादन कार्यक्रम शेतकरी बांधवांना राबविणे शक्य आहे.
बीजोत्पादनासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :
जमिनीची निवड :
बीजोत्पादन पिकासाठी जमिनीची निवड करताना मागील हंगामामध्ये त्याच प्रकारचे पीक घेतलेली जमीन निवडू नये. तसेच क्षेत्र सर्व बाजूंनी विलग करावे. बीजोत्पादन पिकासाठी मध्यम खोल व चांगल्या निचऱ्याची तणरहित समपातळीची जमीन निवडावी. अतिशय भारी, निचरा न होणारी किंवा वरकस जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये.
विलगीकरण अंतर :
बीजोत्पादन पिकांची अनुवंशिक शुद्धता राखण्यासाठी बीजोत्पादनाचे क्षेत्र व इतर पिकांचे अथवा वाणांचे क्षेत्र यात योग्य ते अंतर ठेवतात. त्याला परागीकरण म्हणतात. विलगीकरण अंतर पिकाच्या परागीकरणाच्या पद्धतीवर अवलंबून असते. परागीकरणाच्या प्रकारानुसार पिकांचे वर्गीकरण स्वयंपरागीत, परपरागीत, किंचित परपरागीत अशा तीन प्रकारांमध्ये केले जाते.
पेरणीची पद्धत :
संकरित पिकांच्या बीजोत्पादनामध्ये नर व मादी वाणांचा समावेश असतो. या पिकांची पेरणी करताना नर वाण व मादी वाण, ओळीचे प्रमाण उदा. संकरित ज्वारीमध्ये २:४ किंवा १:२, बाजरीमध्ये २:४, मका २:५ असे ठेवावे लागते. तसेच बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती नर वाणाच्या ४ ते ६ ओळी पेराव्यात. संकरित पिकांच्या बीजोत्पादनामध्ये नर वाणांच्या ओळी याव्यात म्हणून त्या ओळींना टॅग लावून किंवा खुंट्या लावून खुणा कराव्यात. संकरीत पिकांच्या वाणांमध्ये पेरणी करताना नर वाण व मादी वाणाच्या लागवडीमध्ये जरूर ते अंतर ठेवावे. म्हणजे नर वाण व मादी वाण एकाच वेळी फूलावर येऊन बीजधारणा होण्यास अडचण येत नाही. पेरणीसाठी वापरलेल्या बियांची पिशवी व तिचे लेबल जपून ठेवावे. पिशवी खालच्या बाजूने फोडावी म्हणजे लेबल पिशवीला लावलेले राहते ते पिशवीचे लेबल प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्याने तपासून पाहिल्याशिवाय पहिली तपासणी केली जात नाही.
प्रक्षेत्र तपासण्या :
पीक पेरणीनंतर पिकांची काढणी करेपर्यंत पिकांच्या परागीकरणाच्या पद्धतीनुसार २ ते ४ वेळा बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून प्रक्षेत्र तपासण्या केल्या जातात. पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये प्रक्षेत्राची तपासणी केली जाते. बीज प्रक्षेत्राची तपासणी करतांना शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. भेसळयुक्त झाडे काढण्याबाबतही सूचना दिल्या जातात.
भेसळ झाडे काढणे :
बीजोत्पादनामध्ये बियाण्यांची अनुवंशीक शुद्धता राखण्यासाठी पिकांमधील भेसळयुक्त झाडे काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. पीकवाढीची अवस्था व फुलोऱ्याची अवस्था यामध्ये पिकांच्या जातीच्या गुणधर्मानुसार बीजोत्पादन क्षेत्रामधील भेसळ झाडे ओळखून उपटून टाकावीत. भेसळ झाडे, खोडाचा रंग, पानांचा रंग, मांडणी व आकार, फुलांचा रंग, झाडाची उंची, कणसाचा आकार इत्यादीवरून झाडे ओळखावीत तसेच मादी वाण, ओळीमधील नराची झाडे व रोगट झाडे व इतर पिकांची झाडे उपटून टाकावीत.
नोंदणी :
पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादनासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात माहिती भरून नोंदणी फीसह पाठवावे. बीजोत्पादन पिकाची नोंदणी पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत करावी. बीजोत्पादन क्षेत्राच्या प्रमाणीकरणासाठी आवश्यक ती फी भरावी लागते.
बीज प्रक्रिया :
शेतकऱ्यांचे उत्पन्न मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर अवलंबून आहे. बियाणे उगवले नाही तर पीक चांगले येत नाही. बियाण्यामध्ये भेसळ असेल तर त्यांची किंमत बरोबर मिळणार नाही. रोगमुक्त बियाणे नसेल तर रोगराई जास्त होऊन उत्पन्न कमी येईल. हे सर्व टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही बियाण्याचा ओलावा नेमून दिलेल्या मानकापेक्षा जास्त असता उपयोगी नाही अथवा बियाण्यास नुकसान होईल असे बियाणे प्रथम नीट वाळवून घ्यावे व मगच प्रक्रिया करून घ्यावी. प्रक्रिया केंद्रावर खालीलप्रमाणे प्रक्रिया राबविली जाते. (१) सर्व बियाण्याचे चाळण करून शुद्ध बियाणे हे घाण, काडी कचरा व इतर पिकांच्या जातीच्या बियाण्यांपासून वेगळे करण्यात येते.
(२) शुद्ध बियाण्यास कीड व रोगप्रतिबंधक औषध चोळण्यात येते.
(३) प्रमाणित बियाणे, प्रमाणिकरण यंत्रणेने निश्चित केलेल्या दर्जा आणि आकारमानाच्या पिशव्यांत, पोत्यात ठरवून दिलेल्या वजनाप्रमाणे भरण्यात येते. वाळवून व औषधे लावून घेतलेल्या बियाण्यांचा नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविला जातो. बीज परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पिशव्या व पोते शिवून मोहोरबंद केल्यानंतर व त्याप्रमाणे ठरलेल्या बियाण्यांस प्रमाणपत्र देण्यात येते.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
******************************************
Website :
******************************************