शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधीOpportunity for farmers to study abroad
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार असून त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी २३ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करण्यास साहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटी आदींद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी १६ जून २०२५च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राबविण्यात येत आहेत.
या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेले संभाव्य देशांत युरोप, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये १२ दिवसांत फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन, तर इस्त्राईलमध्ये ९ दिवसांत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण तसेच जपानमध्ये १० दिवसांत सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्समध्ये १२ दिवसांमध्ये फळे, भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रणाली, चीनमध्ये ८ दिवसांत विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो, दक्षिण कोरियातील ८ दिवसांत आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत माहिती अवगत करण्यात येणार आहे.
शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख यापैकी जी कमी असेल, ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील.
या अभ्यासदौरा यासाठी पुढील कागदपत्रे जोडावीत त्यात विहित नमुन्यातील अर्ज, प्रपत्र १, स्वयंघोषणापत्र, वैध पारपत्राची छायांकित प्रत, सातबारा उतारा, ८ 'अ'ची मूळ प्रत (कालावधी मागील सहा महिने), शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र मूळ प्रत ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
तालुकास्तरावरून विहित कालावधीमध्ये प्राप्त पात्र प्रस्तावांची अभ्यासदौऱ्याच्या निवडीकरिता जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करण्यात येईल. त्यानुसार जिल्ह्यास प्राप्त लक्ष्यांकानुसार एक महिला शेतकरी, एक केंद्र, राज्य पुरस्कारप्राप्त तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. योजनेतंर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी २३ जुलैपर्यंत जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment