name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): महिलांसाठी गृहउद्योग (Home industries for women)

महिलांसाठी गृहउद्योग (Home industries for women)


महिला दिन विशेष ब्लॉग

महिलांसाठी गृहउद्योग
Home industries for women


Mahilansathi gruhaudyog

 महिलांमध्ये असलेल्या उपजत उद्योजकीय गुणांचा उपयोग त्यांना कोणत्याही क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाला उभारी देतो. चिकाटी, सातत्य, मेहनत, सजगता यामुळे त्यांना उद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. शहरी तसेच ग्रामीण महिलांना विशेषतः खाद्य प्रक्रिया उद्योग, फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग यामध्ये चांगल्या संधी आहेत. यासाठी वित्तसाह्य योजनांचा अभ्यास करून तसेच प्रक्रिया तंत्रज्ञान आत्मसात करून महिलांना या क्षेत्रात स्वावलंबनाचे उद्दिष्ट साध्य करता येईल.


साधनसामुग्रीची उपलब्धता
Availability of equipment

  
  आजकाल घरच्या घरी उद्योग करण्यासाठी शहरी महिलांसाठी खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत. परंतु खेडेगावात कच्चा माल उपलब्ध असूनही साधनसामुग्रीची उपलब्धता असूनही गृहउद्योगाकडे महिलांचे प्रमाण वळत नाही. याला कारण मानसिकता आपण जर आपली मानसिकता बदलली नाही तर त्याच ठिकाणी आपण राहू. पूर्वी जे करत होते तेच तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला पूर्वी न मिळालेले मिळवण्यासाठी रस्ता बदलावा लागेल तरच तुम्हाला अधिक काही प्राप्त करून घेता येईल. शहरात तर लहान मोठे उद्योगधंदे महिलांनी यशस्वी करून दाखवले आहेत. परंतु खेड्यातल्या महिलांसाठी गृहउद्योगाचे कोणते पर्याय असू शकतात याची कोणीही दखल घेत नाही. किंबहुना काही महिला खेड्यांतही चांगल्या रीतीने गृहउद्योग चालवतात. पण त्याचे प्रमाण नगण्य आहे असे मला वाटते. त्यामुळे खऱ्या अर्थाने खेड्यातली उद्योजकता बहरावी यादृष्टीने माझा हा ब्लॉगप्रपंच...


घरच्याघरी श्रीखंड आदी प्रक्रिया
Shrikhand etc. process at home

  
  महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांना श्रीखंड घरच्याघरी बनवता येऊ शकते. घरच्या सायीसहित दुधापासून बनविलेल्या दह्यापासून महिला चक्का बनवितात त्यापासून उत्कृष्ट श्रीखंड तयार करता येऊ शकते. श्रीखंड हे पक्वान्न अर्धवट मऊ, गोड आंबट, भरपूर स्निग्धाम्ल असलेले, उत्कृष्ट चवीचे व आकर्षक असते. श्रीखंडासाठी म्हशीचे दूध वापरतात. ज्यात ४ टक्के स्निग्धांश असते. ते स्वच्छ गाळून घ्यावे. त्यानंतर १६ सेकंद ९० अंश सें. तापमानाला तापवावे. त्यानंतर थंड करावे. नंतर त्यात विरजण लावावे. नंतर ४ तास साठवून दही तयार होते. त्यापासून ताक काढता येते. चक्का बनवता येतो. चक्क्यात ४० टक्के साखर व ०.१ टक्के वेलची मिसळून मिश्रण तयार करून श्रीखंड बनवले जाते. श्रीखंडाचे पॅकिंग प्लॅस्टिक डब्यात करून आपल्या ब्रँडनेमने विक्री केल्यास अधिक फायदेशीर ठरेल. बऱ्याच ठिकाणी महिला बचत गटांनी हा प्रयोग केला आहे आणि तो यशस्वीही झाला आहे. श्रीखंडाप्रमाणे लोणी बनविणे, गोड लोणी बनविणे, लॅक्टिक लोणी बनविणे, तूप बनविणे, देशी पनीर बनविणे, सोयाबीनचे दूध बनविणे आदी प्रक्रिया बनवता येऊ शकतात.


धान्यापासून वेफर्स
Wefars from grain

  
  खेड्यातल्या महिलांसाठी आणखी एक चांगला गृहउद्योगाचा पर्याय म्हणजे धान्यापासून वेफर्स बनविणे. यात बाजारात बटाट्याचे वेफर्स लोकप्रिय आहेत. पण गव्हापासून बनविलेले पातळ व खुसखुशीत वेफर्स जगभर लोकप्रिय आहेत. हे वेफर्स सपाट किंवा शंखाच्या आकाराचे बनवितात. गव्हाचे पीठ न मिळाल्यास तांदळाचे पीठ वापरूनही हे वेफर्स बनवता येतील. यासाठी आवश्यक १ कप गव्हाचे पीठ, १ कप नारळाचे दूध,
१/२ कप साखर, थोडे मीठ, तेल तळणासाठी आवश्यक यासाठी तीळ बी असल्यास चवीत फरक पडतो. फणसापासून बिस्किटे हा चांगला गृहउद्योग आहे.


फणसापासून बिस्किटे
Biscuits from jackfruit

  
  कोकणात फणसाचे भरपूर उत्पादन होते. महाराष्ट्राच्या इतर भागात कोकणातून फणस विक्रीसाठी येतात. कोकणात घराच्या परसात फणसाची झाडे असतात. फणसाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे कापा आणि बरका. कापा फणसाचे गरे कोरडे, खुसखुशीत, मधुर व उपवासाचे असतात. या जातीची फळे पिकल्यानंतर जास्त दिवस टिकत नाहित म्हणून कोकणात घरोघरी या फणसापासून फणसपोळी हा टिकाऊ पदार्थ तयार करतात. फणसापासून बिस्किटे तयार करण्यासाठी फणसाच्या बियांची भुकटी ३६० ग्रॅम, गव्हाचे पीठ २०० ग्रॅम, साखर २५० ग्रॅम, वनस्पती तूप २५० ग्रॅम, स्किम्ड मिल्क पावडर १०० ग्रॅम, मीठ ५ ग्रॅम, बैंकिंग पावडर ९० ग्रॅम, व्हेनिला इसेन्स १५ ग्रॅम, संत्र्याचा इसेन्स १० ग्रॅम, २ अंडी मिसळून हे बिस्किट तयार करता येते.


काजू रसापासून उत्तम सरबत किंवा मद्य
A syrup or liquor made from cashew juice is good.

  
 ग्रामीण आदिवासी भागात काजूचे भरपूर उत्पादन होते, आमच्या नाशिक विभागात आदिवासी खेड्यांमध्ये तर भरपूर काजूचे उत्पादन होते. परंतु आदिवासी ग्रामीण महिलेला अजूनही या फळाचा परिपूर्ण उपयोग करता आला नाही असे मला वाटते. काजूंपासून काजूगर तयार करतात. नाशवंत काजूची बोंडे वाया जातात. खरचटलेली काजूची बोंडे लवकर नासतात. गोव्यात या काजूच्या बोंडांपासून फेणी हे मद्य तयार करतात. इतर राज्यात त्याची टाकाऊ म्हणून विल्हेवाट लावली आते. वास्तविक या काजू बोंडात भरपूर रस असतो. ह्या रसात पॉलीफेनाल असल्याने या रसाची चव तुरट व कडवट असते. त्यामुळे घसा खवखवतो परंतु रासायनिक पद्धतीने पॉलिफेनॉल काढून टाकले तर या रसापासून उत्तम सरबत किंवा मद्य बनवता येईल. दक्षिण अमेरिकेतील हांडूरस या देशात काजूच्या बोडांपासून कॅश्यू फ्रूट कारमेल हा टिकाऊ पदार्थ तयार करतात.


आंब्याची चविष्ट चटणी
Delicious mango chutney

   
  खेडेगावांत आंब्याचेही भरपूर उत्पादन मिळते. तेथील महिलांनी आंब्याची चविष्ट चटणी तयार केली तर त्याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होईल. ही चटणी बनवण्यासाठी कच्च्या आंब्याचा कीस १० किलोग्रॅम, साखर १० किलोग्रॅम, मीठ अर्धा किलो, वेलची, दालचिनी, जिरे प्रत्येकी १०० ग्रॅम, मिरचीची भुकटी, आले, बारीक कापलेला लसूण प्रत्येकी १५० ग्रॅम वापरावा. त्यात बारीक कापलेला कांदा ६०० ग्रॅम, व्हिनेगर १.८ किलोग्रॅम वापरून ही स्वादिष्ट व खुसखुशीत चटणी तयार करता येऊ शकते. यासाठी कच्च्या आंब्याच्या किसात थोडे पाणी घालून मऊ होईपर्यंत शिजवावे. त्यात मीठ व साखर मिसळावी. ढवळून मिश्रण एकजीव करावे. सर्व मसाल्याचे पदार्थ एकजीव करून मिश्रण जॅमसारखे घट्ट होईपर्यंत मिसळावे.

Mahilansathi gruhaudyog


बटाट्यापासून अनेकविध पदार्थ
Various dishes made from potatoes

   
   बऱ्याच वेळा बटाट्याचे अमाप उत्पादन होते. तसे उत्तर प्रदेशात बटाट्याचे अमाप उत्पादन झाल्यावर ते बटाटे सडून वाया जाण्यापूर्वी त्याचे पीठ तयार करून ठेवतात. त्या पिठापासून बर्फी तयार करतात. बटाट्यापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. 

कडधान्यापासून वडे
Vadas made from pulses

 
 खेड्यातील महिलांसाठी आणखी एक चांगला पर्याय म्हणजे कडधान्यापासून वडे तयार करणे यात हरभरा, मूग, उडीद, कुळीद यापासून वडे बनवून ठेवले तर त्याला चांगली बाजारपेठ मिळेल आजकाल शहरी महिलेला वडे बनवण्यासाठी वेळ नाही त्यांना जर वडे बनवून दिले तर खेड्यातल्या ग्रामीण महिलेला रोजगार उपलब्ध होईल. दक्षिण भारतात स्टार्चपासून बनविलेले वडे खूपच लोकप्रिय आहेत यासाठी डाळीचे पीठ १ किलो, (४५ टक्के पीठ व ५५ टक्के पाणी यांचे मिश्रण), वाळलेली मेथीची पाने १० ग्रॅम, धन्याची पावडर ५ ग्रॅम, जिऱ्याची पावडर ३ ग्रॅम, मिरची पावडर ३ ग्रॅम, मिरी पावडर २ ग्रॅम, हिंग १ ग्रॅम, आले ३ ग्रॅम, मीठ ८ ग्रॅम हे सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे एकत्र मिसळावे. त्यापासून वडे तयार करावे. हे वडे उन्हात वाळल्यानंतर त्यात ९ ते १२ टक्के ओलावा असतो. वाळवून असे वडे टिकाऊ बनतात. या वड्यात भरपूर प्रथिने असतात. अनेक महिला बचत गटांनी वडे बनवण्याचा प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे आणि तो यशस्वीपणे चालवला आहे. यात खेडयातल्या महिलांचे स्थानिक तंत्रज्ञान विकसित केले तर या महिलांकडे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नसतांना वडे बनवण्याचे अजब कौशल्य असते. हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. खेड्यात अनेक भाज्या उपलब्ध असतात. काही भाज्या भाव नसल्यामुळे मातीमोल भावात विकाव्या लागतात. त्यावेळेस भाज्यांचे वडे बनवण्याचे प्रशिक्षण खेड्यांतल्या महिलांना दिले तर भाज्यांपासून वडे बनवण्याचा एक उत्तम गृहउद्योग होऊ शकतो.


कडधान्यांपासून सॅलड व चविष्ट पदार्थ
Salads and delicious dishes from grains


  मोड आलेली कडधान्ये विकणे हा सुद्धा चांगला आणि किफायतशीर गृहउद्योग आहे. काही शहरातील भाज्यांच्या दुकानांत मोड आलेली विविध प्रकारची कडधान्ये विकत मिळतात. काही महिला मोड आलेली कडधान्ये बांबूच्या टोपलीत भरून घरोघरी जाऊन विकतात आणि चांगली कमाई करतात. मोड आलेल्या कडधान्याची उसळ, कालवण किंवा सॅलड तयार करता येते. सॅलडमध्ये न शिजवलेले म्हणजे कच्चे मोड आलेले कडधान्य विशेषतः मूग वापरतात. मोड आलेली कडधान्ये एक प्रकारची पौष्टिक भाजी असून भारताप्रमाणेच पाश्चात्त्य देशांतही लोकप्रिय आहे. ही भाजी कडधान्याचे बी पेरल्यापासून एक आठवड्यापेक्षा कमी दिवसांत तयार होते. हे घरात वाढणारे भाजीचे पीक वर्षातील कोणत्याही हंगामात घेता येते. कडधान्यांचे मोडाची वाढ फार जलद होते. वर्षभर केव्हाही मोडाची कडधान्ये उपलब्ध असतात. या मोडांच्या कडधान्यात भरपूर क जीवनसत्त्व असते. त्यापासून बनवलेले सॅलड आकर्षक व चवदार असते. त्यापासून अनेक चविष्ट पदार्थ तयार करता येतात. मोडाचे कडधान्यांसाठी मूग लोकप्रिय आहे. मुगाचे बारीक गोलाकार हिरवे दाणे असतात. बियांचे मोड पांढऱ्या रंगाचे असतात. याशिवाय मेथीच्या दाण्यांनाही मोड आणून खातात.


भोपळ्यापासून विविध पदार्थ
Various dishes from pumpkin

 
  खेड्यात भाजीपाला उपलब्ध असतो. भाजीपाल्यांत तांबडा भोपळा अनेक बागात मोठ्या प्रमाणात घेतात. या फळाचे वैशिष्ट्य असे की, फळाचा आकार फार मोठा असतो आणि सामान्य खोलीच्या तापमानात ही फळे ३ ते ४ महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येतात. गरजेप्रमाणे फळ कापून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करता येतात. या भोपळ्यात भरपूर "अ" जीवनसत्त्व असते. तांबड्या भोपळ्यापासून बनविलेली गोड भजी विशेष लोकप्रिय आहेत. तांबड्या भोपळ्यात भरपूर बिया असतात. या बिया पांढऱ्या रंगाच्या चपट्या असतात. बियांववरील साल नखाने सोलून काढल्यास आत गोड गर असतो. त्यात भरपूर मेद व प्रथिने असतात. या बियांवर मिठाचे पाणी शिंपून वाळल्यानंतर तेलात तळून खाण्यास द्याव्यात भोपळ्यापासून पेठाही बनवितात. यासाठी राखी भोपळा १ किलो, साखर १ किलो, कॅल्शियम कार्बोनेट (चुना) २ मोठे चमचे, पाणी २ लिटर एवढे माफक साहित्य लागते.


पपईप्रमाणेच इतर फळाचे टिकाऊ पदार्थ 
Other fruit preserves, like papaya


 भोपळ्यासारखेच खेड्यात पपई हे फळपीक चांगल्या प्रकारे उपलब्ध असते. पिकलेल्या पपईमध्ये भरपूर "अ" जीवनसत्त्व असते. हे फळ विशेषतः लहान मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपई खाल्ल्याने रातांधळेपणा हा विकार होत नाही. यासाठी पिकलेली पपई धुवावी. त्याच्या लांब फोडी तयार कराव्या. चमच्याने गराचे लहान लहान तुकडे करावेत. पपईचे तुकडे घोटून लगदा बनवावा त्यात कागदी लिंबाचे थोडे थेंब मिसळावेत अशी पपई मुलांना खायला द्यावी. पपई जेव्हा दररोज मिळत नाही तेव्हा पिकलेल्या पपईची टूटी फ्रुटी किंवा कैंडी तयार करून ठेवावी. ती बनविणे सोपे आहे. कोणतीही न शिकलेली ग्रामीण महिलाही हे कसब मिळवू शकते. यासाठी पिकलेल्या पपईचे लांब तुकडे करावेत. त्याचे सुरीने चिरून लहान लहान काप करावेत. पपईचे हे तुकडे १० मिनीटे उकळावेत. त्यात तुकड्यांच्या वजनाइतकी साखर घालावी. या साखरेचे समान ४ भाग करावेत. त्यातील २ भाग म्हणजे निम्मी साखर घालावी. शिल्लक राहिलेली २५ टक्के साखर व १० टक्के सायट्रिक अॅसिड किंवा लिंबाचा रस मिसळून मिश्रण गरम करावे. त्यात आवडीचा रंग हळद किंवा केसर मिसळावी. त्यानंतर साखरेच्या पाकापासून पपईचे तुकडे चिमट्याने वेगळे करावेत. हे तुकडे सावलीत वाळवावेत. त्यानंतर ही टुटीफ्रुटी किंवा कॅडी प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून पिशव्या सीलबंद कराव्यात. या पिशव्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. शहरात जाऊन यांची विक्री केल्यास अधिक दर व नफा मिळू शकेल. पपईप्रमाणेच इतर फळाचे टिकाऊ पदार्थ मँगो बार, फळांची कॅडी, टॉफी बनविता येऊ शकते.

Mahilansathi gruhaudyog


भाजीपाला निर्जलीकरणाचा प्रक्रिया उद्योग
Vegetable dehydration processing industry

  
  खेड्यात होणारा उपलब्ध भाजीपाला हा विक्रीसाठीच पाठवला जातो. परंतु बऱ्याच वेळा हा भाजीपाला मुबलक होतो व त्याची मागणी घटते. अशा वेळी भाजीपाला निर्जलीकरणाचा प्रक्रिया उद्योग खेड्यातील महिलांनी केला तर वर्षभर त्या भाजीचा मागणीप्रमाणे पुरवठा करता येऊ शकतो. आता तर सौर ऊर्जेने भाजीपाला वाळवता येऊ शकतो. शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात दरवर्षी ६० लक्ष दशलक्ष टन भाजीपाला व फळांची नासाडी होते असे एका पाहणीत समोर आले आहे. अंबाजोगाईच्या वैभव तिडके व शीतल सोमाणी यांनी सौरऊर्जेवर फळ व भाज्या टिकविण्याचे वाळवण यंत्राची निर्मिती केली आहे. त्यांना या शोधासाठी अमेरिकेत पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचे वाळवणी यंत्र दहा हजार रुपयांत उपलब्ध झाले आहे. त्याचा फायदा जर ग्रामीण महिलांनी करून घेतला तर वर्षभर फळ व भाज्या मिळू शकतात.


सौर ऊर्जेने फळे व भाजीपाला वाळवणे 
Drying fruits and vegetables with solar energy

  
  ब्राझीलमध्ये फळांच्या हंगामात ९० टक्के काजूची बोंडे व काही प्रमाणात पिकलेले आंबे सडून वाया जातात. कारण या फळांचा हंगाम अल्पकाळ असतो आणि मागणी कमी असते. पारंपरिक पद्धतीने ही फळे सौर ऊर्जेने वाळविण्याची पद्धत आदर्श आहे. सोलर ड्रायरमध्ये सौर ऊर्जेने फळे व भाजीपाला वाळवितात. हा सोलर ड्रायर खेड्यातही  बनविता येतो. प्रत्येक सोलर ड्रायरमध्ये हवा गरम करण्यासाठी सपाट कलेक्टर असतो. त्याच्यासमोर फळे वाळविण्याची जागा असते. कलेक्टर व फळे वाळविण्याची जागा एकाच प्रकारे तयार केलेली असते. त्यासाठी उष्णता शोषणारी पॉलिइथिलीन शीट, पारदर्शक झाकणाचे शीट आणि बाजूची फ्रेम तयार करावी लागते. वाळवण्यासाठी ठेवलेली फळे सूर्याच्या किरणात उघडी ठेवतात. पारदर्शक पॉलिइ‌थिलीन झाकणाच्या शीटमधून सूर्याची किरणे वाळविण्याच्या फळावर पडतात. यानुसार हे संयंत्राचा वापर करून फळे व भाजीपाला वाळवू शकतो.


धान्य वाळविण्याचा अभिनव गृहउद्योग
Innovative home industry of drying grains


  ग्रामीण महिलांसाठी आणखी एक अभिनव गृहउद्योग असेल तो धान्य वाळविणे. बऱ्याच वेळा काळजी न घेतल्याने, न वाळवल्याने धान्यात किडी लागतात, शेतकरी जेव्हा शेतात मळणी करून घरी धान्य आणतात तेव्हा त्या धान्यात किडी असतात. हे धान्य कणगीत किंवा कोठ्यात साठवणीपूर्वी अंगणात चांगले वाळवून धान्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी प्रमाणात करू शकतात. धान्य उन्हात खळखळीत वाळविल्याने किडी मरतात. मोठ्या शहरातील गोदामात साठविलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून काळजी घेतात. तशीच धान्य बँक म्हणून ग्रामीण खेड्यात महिलांनी उभारणी केली तर किडीपासून आपले धान्य सुरक्षित ठेवून उन्हात वाळवल्यानंतर हे धान्य सुरक्षित ठेवता येऊ शकते. धान्य ६० अंश से. तापमानापर्यंत तापविले असता त्या तापमानात १० मिनिटे ठेवले तर त्या धान्यातील सर्व अवस्थेतील किडी मरतात. तथापि धान्य उन्हात पसरून वाळविले तर किंवा सोलर ड्रायरमध्ये वाळविले तर ६० अंश से. तापमानात वाळविण्यात येत नाही. त्यामुळे धान्यातील किडी १०० टक्के मेलेल्या नसतात. हे धान्य कणग्यांत साठविले की किडीची संख्या पुन्हा वाढते. त्यामुळे धान्य किडले जाते. उष्ण कटिबंधात सौर ऊर्जा भरपूर असते. या ऊर्जेचा उपयोग धान्यातील किडी मारण्यासाठी केला तर धान्य जास्त काळ प्रभावीपणे टिकवता येईल.


प्रातिनिधिक स्वरूपाचे गृहउद्योग
Representative cottage industries


  अशा रीतीने मी दिलेले वरील गृहउद्योग प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. परंतु सर्व गृहउद्योग ग्रामीण भागात आढळणाऱ्या संसाधनांवर उपलब्ध आहेत. महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे खरा भारत हा खेड्यातच आढळतो. कारण खेड्यात सर्व पदार्थांची निर्मिती होत असते. फक्त काळाच्या गतीमध्ये आपण एवढे भरडलो गेलो आहोत की, त्याकडे आपले लक्ष जात नाही. शेतीप्रधान देशातल्या या प्रणालीत आपले लक्ष दुसरीकडे वळवले जाते आणि मग आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा उपयोग करण्यात, प्रक्रिया करण्यात आपण मागे पडत चाललो आहे असे लक्षात येते. मग एखादा पदार्थ त्या गावचा ब्रँडनेम होऊन बसतो हे आपल्या लक्षात येत नाही. त्या गावच्या, त्या परिसराच्या निर्मितीवर हे ब्रँड विकसित झालेले आहेत.


योग्य प्रशिक्षण व आत्मविश्वास द्यावा
Provide proper training and confidence


  ग्रामीण महिलाही या कामी कमी नाहीत. भले ग्रामीण महिला कमी शिकल्या असतील परंतु त्यांचे कौशल्य हे वाखाणण्याजोगे आहे. ग्रामीण महिलांकडून तयार केलेली गोधड़ी, पुरणपोळी आज परदेशात निर्यात होते. यावरून त्याही काही कमी नाहीत हे सिद्ध होते. मला असं प्रामाणिकपणे वाटते की, त्यांना जर त्यांच्याच गावात उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालांच्या प्रक्रिया शिकवल्या तर ते तंत्र लवकर आत्मसात करतील. मागे मी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून अळिंबी उद्योग जेव्हा खेड्यातल्या महिलांना शिकवला त्यावेळी तो उद्योग महिलांनी यशस्वी करून दाखवला. किंबहुना त्या काकणभर सरस ठरल्या, त्या मार्केटिंग करण्यासाठी शहरात आल्या आणि त्यांनी अळिंबी विकून दाखवली. फक्त त्यांना गरज आहे योग्य प्रशिक्षणाची, आत्मविश्वासाची...


उत्पादनाला बाजारपेठ
Market for the product

  
  मला खरं तर शहरी महिला आणि ग्रामीण महिला असा फरक करायचा नाही तर आमच्या खेड्यातील महिला स्वतःच्या पायावर कशी आत्मनिर्भर होईल, दोन पैसे मिळून तिचा संसार कसा सुरळीत चालू शकेल म्हणून मी खेड्यात उपलब्ध असणाऱ्या संसाधनांवर तिला उद्योग कसा उभारता येईल यादृष्टीने लिहिले. आता तर सरकार अन्न प्रक्रिया उद्योगाचे ठिकठिकाणी क्लस्टर स्थापन करते आहे, परंतु या क्लस्टरचा उपयोग आमच्या खेड्यातल्या माता-भगिनींना होवो. त्यांनी केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळो. यादृष्टीने काही प्रशिक्षण विकास कार्यक्रम आखला गेला, त्यांच्या कलानिर्मितीला वाव दिला गेला तर तो दिन क्लस्टरसाठी सुदिन ठरेल. नाही तर नुसती घोषणा करायची, कागदी घोडे नाचवायचे. परंतु प्रत्यक्षात काहीही निर्मिती होत नसेल तर शेतीप्रधान देशासाठी ही कृती लाजिरवाणी ठरेल असे मला वाटते. माझ्या असंख्य माता भगिनींना कौशल्य आहे. परंतु त्यांना योग्य तो मार्ग मिळत नाही. तो मिळवण्यासाठी तुमचं क्लस्टर उपयोगी पडले तर त्यांच्यासाठी ते एक दीपस्तंभच ठरेल. एक ना एक दिवस तुमचा गृहउद्योगही बहरेल असा मला विश्वास आहे.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...