व्यापारवृद्धीसाठी बारा कानमंत्र Twelve mantras for business growth
कोणताही व्यापार यशस्वीपणे करावयाचा असेल तर खालील कानमंत्र व्यापारीबंधूनी आत्मसात करावयास हवेत. त्यायोगे व्यापारात वृद्धी होईलच.
१) अभ्यासू वृत्ती : Industriousness -
मनुष्य जन्मभर विद्यार्थी असतो हे व्यापार क्षेत्रात पण खरे आहे. व्यापारात अभ्यासू वृत्ती नसेल तर आजच्या यांत्रिक युगात तुमचा पाडाव होणार हे निश्चित ! व्यापारात स्पर्धा असते, नव्हे ती अतिशय तीव्र असते. भांडवलापेक्षा आजच्या व्यापारात कल्पकतेला जास्त महत्व आहे. कल्पकता वाढविण्यासाठी अभ्यासू वृत्ती, निरीक्षण, माहिती घेणे यांची जरूरी असते. सुसंवाद साधून माहिती मिळवता येते. त्या त्या धंद्याची संपूर्ण अनुरूपता ठरवावी लागते. आणि मग उडी मारावी लागते.
२) धाडसी वृत्ती : Courageousness -
अशास्त्रीय निष्कर्षाचे ठोकळे आपण कुरवाळत असतो. धाडसी वृत्ती ही अभ्यासाने, कल्पकतेने, अनुभवाने वाढवावी लागते. बाजारपेठेचे सूक्ष्म ज्ञान अगदी २०-३० वर्षांचा अनुभव असला तरी - एखादी वस्तू बाजारात खपेल की नाही याचा अंदाज करता येत नाही. समाजाच्या अभिरुचीचा, त्यांच्या मनाचा शंभर टक्के अंदाज कधीच कोणाला बांधता येत नाही. अगदी क्षुल्लक कारणाने पण लोकांची मनोवृत्ती बदलते व लोक ती वस्तू घेत नाहीत. व्यापारात धाडस जरूर पाहिजे. कल्पकतेने जोखीम स्वीकारावी लागते. बाजारपेठेचे, समाज मनोवृत्तीचे ज्ञान असावे लागते. आपला ग्राहकवर्ग, त्याची मानसशास्त्रीय वृत्ती याचे ज्ञान घेणे आवश्यक असते.
काही उद्योगपती, उत्पादक म्हणतात, "आम्ही लोकांची अभिरुची बदलू, त्यांना आमच्या मर्जीप्रमाणे वाकवू." सद्यःस्थितीत हे शक्य नाही. सर्वच घरात क्रयशक्ती वाढली आहे. आज सोशल मीडिया, रेडिओ, टी. व्ही, वर्तमानपत्रे ही जाहिरातींची माध्यमे अभिरूची घडवण्यास कारणीभूत ठरतात.
३) नावीन्याचा सोस : Innovation -
नावीन्याचा सोस हा सनातन वारसा आहे. निरनिराळ्या फॅशन्स हा नावीन्याचाच भाग आहे. नाटक, सिनेमा व जाहिरातदार त्याची माहिती देतात. सावधानता हा गुण व्यापाऱ्याला आत्मसात करावा लागतो.
४) मंदीची लाट : Recession -
व्यापारात तात्पुरत्या मंदीच्या लाटा नेहमी येतात. बजेटमध्ये करवाढ झाल्यास तात्पुरती मंदी येतेच. लोकांच्या मनातील मरगळ संपली की, व्यापार वाढतो. मंदी ही नेहमी व्यापाऱ्याच्या दृष्टीने मारक ठरते.
५) महागाई : Inflation -
लोकसंख्येचा भस्मासूर वाढत आहे. वैद्यकीय शोधांमुळे मृत्यूचे प्रमाण घटत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती कमी व खाणारी तोंडे जास्त हा प्रकार आहे. कामगारांच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत. हक्काने ते पगारवाढ पदरात पाडून घेतात. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वाढल्याने उत्पादनखर्च वाढला आहे.
६) बाजारपेठ : Market -
कल्पक उत्पादक नवीन गरजा समाजात निर्माण करतात. ती वस्तू खुशीने लोकांना घ्यायला प्रवृत्त करतात. बाजार लक्ष्य ठरवायला कल्पकता फायदेशीर ठरते.
७) विक्रीची आधुनिक तंत्रे : Modern sales techniques -
मानसशास्त्रात लागलेल्या नवनव्या शोधांमुळे विक्री तंत्रात अद्भुत क्रांती झाली आहे. जाहिरातशास्त्र प्रगत आहे. उत्पादनाचा निम्मा खर्च या जाहिरातीवर होतो. जाहिरातीची नवनवीन माध्यमे शोधली जात आहेत. निरनिराळ्या तंत्राचा अवलंब केला जात आहे.
८) मनुष्य हा घटक : Human factor -
मनुष्य हा प्रमुख घटक मानून व्यापार-तंत्र ठरवावे लागते. मानसशास्त्राचा अभ्यास करून उपभोग्य वस्तूंचा आस्वाद घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करावे लागते.
९) यशस्वी व्यापाराचा मूलमंत्र : The key to successful business -
आत्मविश्वासपूर्वक सर्व बाजूंचा विचार करून छोट्या प्रमाणात सुरुवात करून कष्टाने, जिद्दीने अतिलोभाच्या आहारी न जाता चिकाटीने लोकप्रियता व विश्वास संपादन करणाऱ्याने धंदा करावा. भ्रष्टाचार, स्मगलिंग अशा रानटी स्पर्धेला तोंड देत शास्त्रशुद्ध पद्धतीने पाया भरभक्कम करायला हवा.
१०) महत्वाकांक्षी व्हा : Be ambitious -
स्पर्धेने स्फुरण चढायला हवे, उत्साह सळसळला पाहिजे. कल्पनांनी बाजारपेठ फुलविली पाहिजे, बाजारपेठेचा इतिहास, भूगोल अभ्यासला पाहिजे. अल्पसमाधानी न राहता महत्वाकांक्षी व्हायला हवे. रास्त मार्गाने समृद्धी मिळविण्यात काहीच गैर नाही.
११) निराशेला रामराम : End despair -
फायदा-तोटा असे जरी गणित व्यापारात असले तरी अपयशाची पर्वा न करता निराशेला रामराम करून उत्साही मनाने, कष्टाने यशस्वी व्हायला हवे. चंगळवादाच्या आहारी न जाता, ऐषआरामी न होता अथवा नुसते दैववादी न बनता कार्यप्रवण राहिले पाहिजे. दैववादाच्या पाया पडण्यापेक्षा निराशेला रामराम ठोकून आत्मविश्वास, उत्साह वाढविला पाहिजे. वर्तमानकाळातील गोष्टीला सामोरे जाऊन भविष्य घडविले पाहिजे.
१२) आक्रमक वृत्ती : Aggressive attitude -
व्यावसायिक आक्रमक वृत्तीचाच हवा. भित्रा, लोकेच्छा मानणारा यश मिळवू शकेलच असे नाही. संधी ही चालून येत नाही. तिला खेचून आणावे लागते 'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान' ही आध्यात्मिक वृत्ती व्यापारास पोषक नाही. ही संस्कृती परिस्थितीशरण होण्यास कारणीभूत ठरल्याने आक्रमक वृत्तीचा अविष्कार हा आवश्यक गुण आहे.
© श्री. दीपक केदू अहिरे, नाशिकपूर्व प्रसिध्दी : व्यापारी मित्र-डिसेंबर २०००
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com******************************************Telegram :******************************************Facebook :******************************************Instagram : ******************************************YouTube :
******************************************Quora :******************************************Koo :******************************************Pintrest:******************************************Share chat :******************************************Twitter :@DeepakA86854129******************************************Website :
******************************************
www.ahiredeepak.blogspot.com