कामधेनु दत्तक ग्राम योजना
Kamdhenu Dattak gram yojna
कामधेनू दत्तक ग्राम योजना राज्यातील विविध जिल्हा परिषदांमार्फत चालवली जाते. पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
गाई व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ व्हावी यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात येते. संबंधित गावामध्ये योजनाबद्धरीत्या पशुसंवर्धकविषयक कार्य मोहिमा हाती घेण्यात येतात.
कामधेनु दत्तक ग्राम योजनेत जनावरांना चारा, औषधी, लसीकरण, वंध्यत्व निवारण, रोगनिरोधक तपासणी करून गायींच्या संख्येला वाढवण्यासाठी राबवली जाते. या योजनेमुळे गायींच्या संख्येला वाढवणे आणि दुध उत्पादनात वाढ होणे अपेक्षित असते. कामधेनू योजना खालील दिलेल्या घटकाच्या आधारे राबवली जाते.
१) ग्रामसभेचे आयोजन
२) पशुगणना
३) पशुपालक मंडळ स्थापना
४) सहलीचे आयोजन
५) जंतनिर्मूलन शिबीराचे आयोजन
६) गोचिड, गोमाश्या निर्मुलन शिबीराचे आयोजन
७) रोग प्रतिबंधक लसीकरण
८) वैरण विकास योजना
९) वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन
१०) निकृष्ट चारा सकस करणे
११) नाविन्यपूर्ण उपक्रम
१२) दुग्ध स्पर्धा व वासरांच्या मेळाव्याचे आयोजन
१३) अझोला लागवड
१४) मुरघास
१५) जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे व्यवस्थापन
१६) मुक्तसंचार गोठा
नैसर्गिक आपतीमध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी
उन्हाळा व पावसाळा ऋतूमध्ये आणि अनुषंगिक अतिवृष्टी गारपिट, वीजपडणे व पूरपरिस्थिती या आपदांमध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी यासाठी वेळीच नियोजन शक्य होण्यासाठी वेळोवेळी प्रसिध्द होणा-या हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे. त्यानुसार तयारी करावी. वेळोवेळी निर्गमित होणा-या शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे
जैव सुरक्षा
१. पावसाळ्यात अनुकुल वातावरणामुळे विविध रोगजंतूची वाढ झपाट्याने होत असते. त्यासाठी पशुधनाची व त्यांचा निवारा, चारा, खाद्य व पाणी यांची जैवसुरक्षा अत्यंत महत्वाची आहे.
निवारा
१. पावसाचे पाणी गळणे, भिंती ढासळणे, पशुधनाच्या शेडवर वृक्ष पडणे यामुळे पशुधनाचे नुकसान होऊ नये यासाठी पशुधनाच्या निवा-याची वेळीच डागडूजी करून घ्यावी. पाणी गळू नये म्हणून पशुधनाच्या निवाऱ्याच्या छताची डागडुजी करून घ्यावी. निवारा नसल्यास निवारा तयार करावा.
२. निवारा शक्यतो कोरडा राहील याची दक्षता घ्यावी.
३. गोठ्यातील जमिनीचा ओलावा कमी करण्यासाठी चुन्याची फक्की शिंपडावी.
४. शेडचे व निवाऱ्याचे नियमित निर्जुतुकीकरण करावे.
५. पावसाचे पाणी पशुधनाच्या निवाऱ्याजवळ साचू नये यासाठी आवश्यक चर काढून ते साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
चारा
१. नविन हिरव्या चाऱ्यामुळे हगवण, तसेच एचसीएन व नायट्रेट विषबाधा, हायपोमॅग्नेशियम टिटॅनी यासारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
२. वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता ठेवावी, तो भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. पशुधनास पावसात चरावयास सोडू नये.
४. हिरवा चारा कापून पुरेसा साठा करून ठेवावा.
५ . नदीकडील भागात जनावरे चरावयास सोडू नये.
६. शक्यतो चारा पावसाने भिजलेला असू नये, तसेच साठवलेला चारा पावसाने मिजणार नाही याची दक्षता घ्यावी. साठवण कोरड्या जागेत असावी, बुरशी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच बुरशीयुक्त चारा देण्याचे शक्यतो टाळावे.
७. मुरघास साठवण चाऱ्यामध्ये पावसाचे पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
८. पावसाळ्यात वातावरणाची तीव्रता / पावसाची दिर्घकालीन उघडीप / तणनाशक किंवा किटकनाशक फवारणी यांच्यामुळे उगवलेल्या गवतावर / चाऱ्यावर विपरीत परिणाम होऊन त्यातील विषद्रव्यांची साठवण वाढते त्यामुळे ते जास्त घातक ठरतात. नायट्रेट व एचसीएन विषबाधेच्या घटना वाढण्याची शक्यता जास्त असते.
पिण्याचे पाणी
१. स्वच्छ व निर्जतुक पाणी पशुधनास पिण्यास उपलब्ध असावे. पशुधन साचलेले पाणी पिणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पशुधनास साचलेले पाणी पिण्यास देऊ नये.
२. पिण्याच्या पाण्याच्या हौदाची स्वच्छता करावी. शेवाळ जमलेले असल्यास काढून टाकावे. या हौदास चुना लावून घ्यावा.
आरोग्य
१. साथरोगांचा व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरणविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे / तज्ञाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.
२. दुभत्या पशुधनाच्या कासेच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
३. गाभण, वीण्या योग्य, विलेल्या व नवजात वासरांची निगा घ्यावी
४. स्थलांतरीत पशुधनाची निवा-याची विशेष दक्षता घ्यावी.
५. जंत / कृमीनाशक औषधी पाजविणे.
६. बाह्यपरजीवींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी.
७. माशांच्या नियंत्रणासाठी आवश्यक प्रतिबंधक औषधी फवारणी करावी. शेण व मुत्र विल्हेवाट लावावी.
८. शेण व लेंड्यांच्या विल्हेवाटीसाठी शेणखताचा खड्डा असावा. तो शेडच्या अतिजवळ असू नये. विसर्जीत मुत्र वाहून जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा शोषखड्डा असावा.
उन्हाळ्यातील पशुधनाची काळजी
उष्ण लहरी व उष्माघाताच्या विपरीत परिणामांपासून बचावासाठी पशुधन व्यवस्थापनात काय करावे व करू नये या बाबी खालीलप्रमाणे -
उष्णलहरीच्या वेळी काय करावे :
१. स्थानिक हवामानाच्या अंदाजावर व दैनिक तापमानावर लक्ष ठेवावे.
२. चारा व वैरण यांचा पुरेसा साठा ठेवावा.
३. पशुखाद्य देताना पुरेसे क्षार व जिवनसत्व मिश्रणे द्यावीत. उत्पादक/दुभत्या पशुधनास संतुलीत आहार द्यावा.
४. दुभत्या पशुधनांच्या सायंकाळच्या दोहनाच्या वेळा टप्या टप्प्याने किमान १ तास उशीराने ठेवाव्या. जेणेकरून पशुधनापासून योग्य उत्पादन मिळेल.
५. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलरची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारणे / फवारणे किंवा म्हैसवर्गीय पशुधनासाठी शक्य असल्यास पाण्यात बसण्यासाठी स्वच्छ पाण्याच्या हौदाची सोय करावी.
६. शेतीच्या, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतो दिवसा १२ ते ४ या वेळी किंवा स्थानिक उन्हाच्या वेळानुसार) वेळी विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत अथवा थंड व भरपूर खेळती हवा असलेल्या जागेत बांधावे.
७. स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.
८. शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद अथवा इतर सुविधा गोठ्याजवळ व सावलीत असावी. नसल्यास अशा ठिकाणी सावलीसाठी शेड उभारण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून पशुधनास थेट उन्हाचा संपर्क येणार नाही.
९. अश्ववर्गीय पशुधनास उष्णलहरीपासून बचावासाठी पायाकडून शरीराच्या वरील भागास थंड पाण्याचा हळूवार शिडकावा करावा.
१०. गाभण पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा / वैरण द्यावे.
११. वराह प्रजातीच्या पशुधनास पुरेसा निवारा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय असावी.
१२. कुक्कुट पक्षांसाठी वातानुकुलीत पक्षीगृह सर्वोत्तम असतात. तथापि ज्या पक्षीगृहांना अशी सोय नाही त्यांनी पक्षीगृहाच्या शेडवर गवताचे आच्छादन करावे, पक्षीगृहाच्या जाळयांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. तसेच पक्षीगृहात भरपूर खेळती हवा राहील याची दक्षता घ्यावी.
१३. पाळीव पशुधनास उन्हाच्या वेळी शक्यतो घरात ठेवावे.
१४. पशुधनाच्या निवा-यासाठी / छतासाठी उष्णता रोधक साहित्य वापरावे
उष्णलहरीच्या वेळी काय करू नये
१. पशुधनास उन्हात उघड्यावर बांधू नये.
२. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नये.
३. शेतीविषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये.
४. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी.
५. पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधू नये.
६. भर उन्हात पशुधनाची हालचाल / वाहतूक करू नये.
७. उन असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करू नये.
८. मृत पशुधन उघड्यावर टाकू नये.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment