भविष्यात तरणारे जोडव्यवसाय मॉडेल तयार करणारे श्री. हृषिकेश औताडेCreating the next business model that floats in the future Mr. Hrishikesh Autade
अहिल्यानगर जिल्हा, श्रीरामपूर तालुक्यातील ऋषिकेश हरिभाऊ औताडे हे एम. एस्सी. जैवतंत्रज्ञान शिक्षित असून त्यांनी बायो-टेक्नॉलॉजी सारख्या आव्हानात्मक विज्ञान शाखेतून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, २०१० साली त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता नाविन्यपूर्ण प्रयोग करणे व राबवणे या त्यांच्या स्वभावामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. २०१५ साली ते अग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड, नवी दिल्ली यांचेतर्फे घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत उतीर्ण झाले. फक्त महाविद्यालयाच्या चार भिंतींमध्ये न अडकता त्यांनी विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी अनेक विशेष प्रशिक्षणे घेतली व शासकीय प्रकल्प राबविले.
गोदागिरी फार्म्सची स्थापना
शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तीनही पातळीवर काम केल्याने संस्थेने प्रभारी उप-प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांना २०१८ साली व नंतर २०१९ साली प्राचार्य पदाची जबाबदारी दिली. परंतु, प्रशासन व नियोजन जबाबदारीतून विद्यार्थी व शेतकरी यांच्याशी संवाद कमी झाल्याने त्यांनी मार्च २०२२ साली दोन्ही पदाचा राजीनामा दिला व गोदागिरी फार्म्स या फर्मची स्थापना केली.
अँग्री क्लिनिक कोर्स
शिक्षकी पेशातून व्यवसायपेशा मध्ये जाण्यासाठीचा लागणारा दृष्टीकोन मिळावा यासाठी त्यांनी एप्रिल-मे, २०२२ काळात राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद (मॅनेज) यांच्या संलग्न नाशिक येथील प्रशिक्षण संस्था एशिअन येथे ४५ दिवसाचा अँग्री क्लिनिक व अॅग्री बिझनेस सेंटर कोर्स पूर्ण केला.
मधमाशी निगडित उद्योग
कृषी क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाची 'जैविक निविष्ठा' मानल्या गेलेल्या मधमाशीशी निगडित उद्योगाचा मार्ग निवडावा अशी धारणा होण्यामागे; जैव तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतल्याची पार्श्वभूमी असावी हा एक 'मधुर योग'च म्हणायला हवा! त्यांच्या या उद्योगाचा शुभारंभ २०२१ च्या डिसेंबरपासून प्रशिक्षण घेतल्यापासून झाला.
गांडूळ खत, मशरूम बीज उत्पादन
गोदागिरी फार्म्स अंतर्गत प्रामुख्याने मधमाशीपालन, गांडूळ खत उत्पादन, ऑयस्टर मशरूम बीज उत्पादन या बरोबरच शेतकरी, शाळा आणि महाविद्यालये इत्यादींपर्यंत या तीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. "वेस्ट, टू व्हॅल्यू, टू सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट, टू एंटरप्रेन्योरशिप" या थीमला अनुसरून ते ऑफलाइन/ऑनलाइन प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणाद्वारे जागरूकता पसरवत आहोत.
प्रशिक्षण व व्यवसायासाठी प्रोत्साहन
आजपर्यंत श्री. औताडे यांनी १००० हून जास्त शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण, बेरोजगार तरुण यांना प्रशिक्षण व व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन दिले आहे. व्यवसायाची सुरुवात करण्याची संकल्पना तशी खरी कोविडच्या लॉकडाऊन मध्ये त्यांना सुचली. त्यादरम्यान ३० नोव्हेंबर २०२० रोजी घरघुती धिंगरी अळींबी उत्पादन प्रकल्प सुरु केला व ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरु केले. त्यातून आलेल्या उत्पन्नातून पुढे त्यांनी २ टन गांडूळ खत प्रकल्प सुरु केला. सध्या १० टन प्रती ३ महिने क्षमतेचा प्रकल्प सुरु असून, नर्सरी व शेतकरी यांना पुरवठा चालू आहे. सद्यस्थितीमध्ये व्यावसायीक धिंगरी अळींबी उत्पादन व बीज उत्पादन प्रकल्पासाठी प्रयोगशाळेचे बांधकाम चालू आहे.
मधू उद्योजक होण्यामागची प्रेरणा
श्री. औताडे यांनी व्यवसाय म्हणून मधमाशीपालनाची निवड केल्यानंतर पुण्याच्या मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेतून एक महिन्याचे मधमाशीपालनाचे (डिसेंबर २०२१) व तसेच ऑगस्ट २०२२ एकदिवसीय मध तपासणीचे रीतसर प्रशिक्षण घेतले. त्याचप्रमाणे महाबळेश्वरस्थित खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयातून दहा दिवसांचे मधपाळ प्रशिक्षणही जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण केले. 'पूर्वा कृषिदूत' मासिकाचे संपादक तथा ज्येष्ठ कृषिवैज्ञानिक डॉ. श्री. भास्कर गायकवाड यांचे मधुपालनाच्या संदर्भातील वृत्तपत्रांतील काही लेख त्यांच्या वाचनात आले. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषणामुळे या विषयी उत्सुकता वाढली. तीच मधु-उद्योजक होण्यामागची प्रेरणा ठरली. तसेच 'सीबीआरडीटी' येथील माजी सहसंचालक डेझी थॉमस यांनीही ट्रायगोना मधमाशीविषयी त्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी १५ ऑगस्ट, २०२२ रोजी पहिली मधमाशी पेटी खरेदी करून त्यांनी मधमाशीपालन व्यवसाय सुरू केला. पुढे एपिस मेलिफेरा, एपिस सेरेना व ट्रायगोना जातींच्या मधुपेट्यांचा परागीभवनासाठी पुरवठा अहमदनगर येथील टरबूज, डाळिंब, कांदा बियाणे व आंबा पिकासाठी व बागांसाठी श्री. ऋषिकेश हरिभाऊ औताडे यांनी केला.
भाडेतत्त्वावर पेट्या
श्री. औताडे यांनी रायगडमध्येही आंबा बागेसाठी भाडेतत्त्वावर पेट्या दिल्या. भाडेतत्त्वावर मधमाशी पेट्या देण्यापूर्वी संबंधित शेतकरी, व्यावसायिक यांना मधमाशीपालनाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले. त्यामुळे त्यांनी पेटीची काळजी तर घेतलीच, त्याचबरोबर शेतामध्ये नैसर्गिक मधमाश्या संगोपन देखील सुरू केले. मराठी भाषेमध्ये सोशल मीडियावर मधमाशीपालना- विषयी खूपच कमी माहिती टाकली जाते. म्हणूनच श्री. हृषिकेश औताडे यांनी मधमाशीपालन करतानाचे दैनंदिन अनुभव व माहिती यूट्यूब, फेसबुक, लिंक्डइन, इन्स्टाग्राम, ट्विटर, वेबसाईट व ब्लॉगद्वारे प्रदर्शित केले.
सद्यःस्थितीत त्यांच्याकडे २७ एपिस मेलिफेरा, २० ट्रायगोना व ३२ एपिस सेरेना वसाहती आहेत. याद्वारे त्यांनी २०२२-२३ व २०२३-२४ हंगामामध्ये नेवासा, श्रीरामपूर , राहाता, राहुरी, रायगड- म्हसाळा, पैठण, कोपरगाव, अहमदनगर, संगमनेर अशा विविध गावांमध्ये परागीभवन सेवा दिली आहे. या प्रवासात कृषि विभाग श्रीरामपूर येथील आत्मा व कृषि विभाग यांचे सहकार्य लाभले. आत्मा कृषि विभाग पुरस्कृत तेलबिया उत्पादन प्रोत्साहन योजनेमध्ये मधमाशीपालन व सूर्यफूल पेरणी केली. सूर्यफूल काढणी करून त्यांनी त्याचे तेल काढून विक्री केली व सूर्यफूलपासून मध काढून त्याची विक्री केली.
विविध पुरस्कार प्राप्त
मधमाशीपालक शेतकऱ्याना परागीभवन सेवा, प्रशिक्षण, मध विक्री आणि या माध्यमातून कृषिविकास तसेच पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या समर्पित कार्यासाठी त्यांना बसवंत मधुक्रांती पुरस्कार २०२२ मधमाशी उद्योजक (उत्तर महाराष्ट्र) मिळाला. मधुमक्षिकापालन या कृषि क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण विषयात प्राविण्य मिळवून कृषि क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना मा. आ. जयंतराव ससाणे साहेब स्मृति कृषिरत्न पुरस्कार २०२४ पुरस्कार मिळाला.
मोबाईल ॲप व वेबसाईटचे नियोजन
मधमाशीपालन, गांडूळखत व धिंगरी अळींबी उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची भावी योजना पुढीलप्रमाणे आहे ती म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची परागीभवन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पेटीमध्ये फसवणूक होते किंवा जास्तीचे पैसे घेतले जातात. ओला-उबर या ट्रॅव्हल कंपन्या जशी 'रिअल टाईम लोकेशन बेसिस' वर रिक्षा, कार बुक करण्याची सोय करून देतात, त्या धर्तीवर ऑनलाईन पेटी बुकिंग सुविधा, मोबाईल अॅप व वेबसाईट उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. याद्वारे इतरही मधमाशीपालक त्या अॅपमध्ये नोंदणी करून आपली सेवा देऊ शकतील व चांगली सेवा देणारे मधमाशीपालकच पुढील काळात शेतकऱ्यांच्याद्वारे पुढे आणले जातील.
विपणनासाठी साखळी
गांडूळखत निर्माण करण्यासाठी ज्या थोड्याफार सुविधा शेतकऱ्यांना लागतात, त्या त्यांच्याकडे मुबलक आहेत, फक्त विपणनासाठी साखळी पद्धत निर्माण केली तर शेतकऱ्यांना एक जोडव्यवसाय करता येईल. शहरामध्ये प्रत्येकाच्या घरात, सोसायटीमध्ये, कॉर्पोरेट कंपनी मध्ये शोभेची झाडे लावली जातात, परंतु तिथे झाडे लावण्यासाठी माती व खत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्वक गांडूळखत निर्मित करून शहराकडे पाठवले तर त्याला त्यातून चांगले उत्पन्न मिळेल. तसेच गांडूळखत निर्यात करण्यास खूप वाव आहे. या दोन प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी भरपूर संधी आहे. धिंगरी अळींबीचे उत्पादन खूप घेता येते परंतु आठवडे बाजारात जश्या भाज्या कायम ग्राहकाच्या डोळ्यासमोर कायम दिसतात तसे धिंगरी अळींबीबाबत झाले पाहिजे. तरच धिंगरी अळींबी खाणे हे ग्राहकाच्या अंगवळणी पडेल व तयार माल विकला जाईल. त्यादृष्टीने श्री. औताडे यांना संकल्पना राबवायची आहे.
अशा प्रकारे श्री. औताडे यांनी मधमाशीपालन, गांडूळखत व ऑयस्टर मशरूम या तिन्ही व्यवसाय अनुरूप नैसर्गिक शेतीची पीक पद्धती अवलंबत आहे. फक्त शेती व्यवसायावर अवलंबून न राहत त्यास जोड व्यवसायाची साथ दिल्यास नफा तोटयातील अंतर कमी होते, व प्रत्येक शेतकरी एक ब्रँड म्हणून समाजापुढे येण्यासाठी त्याची मदत होते. ब्रँड तयार व्हावा या दृष्टीने गोदागिरी फार्म नामक फर्म नोंदणी करून त्याअंतर्गत सेवा पुरवल्या जात आहे. शेतीला पूरक व कमी भांडवलात सुरू होणार जोडव्यवसाय निवडून त्याबाबत प्रशिक्षण व जनजागृतीचे काम श्री. औताडे यांनी हाती घेतले व २०२२ पासून ते आजपर्यन्त १००० हून अधिक शेतकरी, विद्यार्थ्यांना ऑनलाइन/ऑफलाईन प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रात्यक्षिके यासाठी जोडले.
विविध उत्पादनांची निर्मिती
मध व गांडूळखत आकर्षक पॅकिंग करून ग्राहकांना पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर कोकोपिट, निंबोळी पावडर (गांडूळखत विक्रीपूरक), सूर्यफूल तेल (मधमाशीपूरक), चीया सिड्स (मधमाशीपूरक), खपली गहू (मशरूमपूरक), सोयाबीन (मशरूमपूरक) पिकांची शेती श्री. औताडे यांनी केली व विक्री व्यवस्था त्याप्रमाणे उभी केली. या जोडव्यवसाय साखळीमध्ये अनुभव आल्याने त्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी शासकीय, निमशासकीय, नवउद्योजक व कॉर्पोरेट सीएसआर प्रकल्प हाताळणी या माध्यमाद्वारे ते मार्गदर्शन करत आहे.
शेती उत्पादित मालविक्री हा मोठा प्रश्न आहे, किमान आधारभूत किंमत मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात. त्याला उपाय म्हणून निवडलेल्या जोड व्यवसायास अनुरूप नैसर्गिक शेतीची पीक पद्धतीद्वारे शेती करून व उत्पादित माल ब्रॅण्डिंग करून विक्री करत आहे.
मधमाशीपालनातून मध तयार होतो, काढलेले पीक विक्री करून राहिलेला जो शेतातील काडी कचरा आहे त्याचा उपयोग आधी ऑयस्टर मशरूम उत्पादन करून उर्वरित भुसा गांडूळ खत तयार करण्यामध्ये अंतर्भूत केला जातो. अशाप्रकारे सौम्य गतीने परंतु भविष्यात तरणारे जोड व्यवसाय मॉडेल तयार करून श्री. हृषिकेश औताडे मार्गक्रमण करत आहे.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
(लेखन सेवा पुरस्कार विजेते)
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
Telegram : https://t.me/swakavyankur
Facebook :
Instagram :
YouTube
https://youtube.com/@digitalkrushiyog?si=pHXfk5BaweSWXoSx
Koo :
Share chat :
Twitter :
@DeepakA86854129
Website :
No comments:
Post a Comment