तरसाळीचे अनिरुद्ध पाटील यांना राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार प्रदानAniruddha Patil of Tarsali awarded National Gopal Ratna Award
बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील अनिरुद्ध पाटील यांना नुकताच राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग आणि राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय गोकुळ मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार
केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशनतर्फे महाराष्ट्राला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
हा पुरस्कार सोहळा जागतिक दुग्ध दिनानिमित्ताने पुसा राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रातील ए.पी.शिंदे सभागृहात घेण्यात आला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला.
पाच लाख रुपयांचा पुरस्कार
पुरस्कार प्राप्त श्री. पाटील हे अभियंता असून त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यानंतर गावी येऊन त्यांनी सारजा डेअरी फार्म सुरू केला.
सध्या त्यांच्याकडे १३० देशी गीर गायी आहेत. या गायींपासून दररोज २०० लिटर दूध मिळते. गायींचे संगोपन, दुग्धव्यवसाय, देशी गोवंशाची वाढ व्हावी यासाठी प्रचार-प्रसार करणे, स्थानिक शेतकऱ्यांना पशुधनाचे महत्त्व पटवून देण्याचे काम ते करतात.
विशेष कार्याची दखल
गायीपासून दुध, गोमूत्र, गायीच्या शेणापासून गोवऱ्या, देशी गायीचे तूप, सेंद्रिय खत आदींचे उत्पादनही करतात. या विशेष कार्याची दखल म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, असे आहे.
महाराष्ट्राला चार पुरस्कार
महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयातर्फे राष्ट्रीय गोकुळ मिशन उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्राला चार पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमप यांनी स्वीकारला. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.
उत्कृष्ट पशुचिकित्सकाचा पश्चिम विभागाचा पुरस्कार कऱ्हाड तालुक्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश परिहार यांना प्रदान करण्यात आला. पश्चिम विभागाचा दुसरा पुरस्कार पंढरपूर येथील पशुचिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांना देण्यात आला.
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment