उपयुक्त पशुमित्र मोबाईल ॲप Informative pashumitra mobile App
केंद्रीय मंत्री गडकरींकडून नाशिकच्या युवकाचे कौतुक
पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन हे पशुपालक, पशुवैद्यक, पशुसहाय्यक, पशुउद्योजकासाठी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे असून, याचा उपयोग पशुपालकांनी आपला व्यवसाय, तांत्रिक ज्ञान अद्ययावत करण्यासाठी घ्यावा असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन जयगुरु विमा आणि कृषीपूरक व्यवसायाचे उद्घाटन मंत्री गडकरी यांच्या हस्ते नुकतेच नागपूर येथे करण्यात आले.
नाशिकमधील युवक व कंपनीचे संचालक हेमंत महाजन यांनी पशुमित्र मोबाइल ॲप्लिकेशनबाबत विस्तृत माहिती दिली.
पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास अत्यंत सोपे असल्याने पशुपालक व नवीन व्यवसाय करू इच्छिणारे युवकांना सहज रीतीने वापरता येईल.
यावेळी नितीन गडकरी यांनी पशुंची किंवा उत्पादनाची खरेदी-विक्री करतांना फसवणूक होणार नाही. याची दक्षता घेणेबाबत सूचित केले. तसेच पशुपालक, खरेदीदार यांनी प्रत्यक्ष खात्री करून आर्थिक व्यवहार करावेत, असा मोलाचा सल्ला दिला.
पशुपालक यांना लागणारी सर्व माहिती देणारे असे एकमेव ॲप असून हे ॲप व जय गुरु विमा आणि कृषीपूरक कंपनी पशुसंवर्धन विभागाची क्रांती करेल व बेरोजगार तरुणांना पशु उद्योजक तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करून यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.
या पशुमित्र ॲप्लिकेशनमुळे गोपालकांना चांगल्या जातीची जनावरे शोधण्यासाठी पशुंचे आठवडे बाजारात जाण्याची गरज पडणार नसून, पशुपालक यांचे गोठ्यातील जनावरांची माहिती मिळणार आहे. तसेच चारा, वैरण, मुरघास. पशुखाद्य विक्रेत्यांना सुध्दा त्याच्या जाहिरातीतून सर्वांपर्यंत पोहोचण्याची सोय होणार आहे.
पशुपालक यांना विविध नोंदणीकृत पशुवैद्यक, पशुमित्र, पशुंची औषधी विक्रेते, रोग निदान प्रयोगशाळा, शासकीय व खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, पशु वाहतूकदार, प्रशिक्षण संस्था, गोशाळा, स्वयंसेवी संस्था, उद्योगासाठी लागणारे साहित्य, उपकरणे विक्रेते, उत्कृष्ट डेअरी फार्म्स, शेळी, मेंढी फार्म्स, पोल्ट्री फार्म्स यांची माहिती, पशु ग्रंथालय, व्यवसाय कारण्यासाठी माहिती, पुस्तके तसेच अनुभव देवाण घेवाणमध्ये पशुवैद्यक यांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ या ॲपद्वारे मिळणार आहे.
पशुपालक यांना अत्यंत फायदेशीर असे हे ॲप असून यामुळे बेरोजगारी कमी होईल, पशुसंवर्धनविषयक व्यवसाय वृध्दींगत होतील, असा विश्वास प्रो. एस. पी. सिंह बघेल यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येक राज्यात पशुपालक, पशुवैद्यक यांचे होणाऱ्या चर्चासत्रात याची माहिती द्यावी अशी सूचना केली.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. नरवाडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक तसेच मत्स्य विकास विभागाचे उपआयुक्त प्रदीप जगताप हजर होते.
संचालक हेमंत महाजन यांनी ॲपबाबत सविस्तर माहिती दिली व आभार व्यक्त केले. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा