मराठा महासंघाचे नाशिकमध्ये १० व ११ ऑगस्टला राष्ट्रीय अधिवेशनNational Convention of Maratha Federation in Nashik on 10th and 11th August
नाशिक : अखिल भारतीय मराठा महासंघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. शहरातील लंडन पॅलेस या हॉटेलमध्ये १० व ११ ऑगस्टला हे अधिवेशन होईल.
राज्यातील मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करणे आणि समाजघटकांचे उद्योग, सहकार, क्रीडा, शिक्षण, कृषी क्षेत्रात प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरिता हे अधिवेशन होणार आहे. तसेच मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक ठराव मंजूर केले जातील अशी माहिती मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनाची माहिती देताना श्री. कोंढरे म्हणाले, की राज्यातील सर्वांत प्रगत जिल्ह्यांमध्ये नाशिक चौथ्या क्रमांकावर आहे. कृषी, पर्यटन, सहकार, क्रीडा, कला या क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचे मार्गदर्शन मराठा समाजातील युवकांना मिळेल.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सातला विविध क्षेत्रांतील २०० नामवंत व्यक्तींची गोलमेज परिषद होणार आहे. 'नाशिक आजचे, उद्याचे आणि मराठा समाज' हा या परिषदेचा विषय राहील.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हे अधिवेशन होत असल्याने राज्यातील नेत्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
अधिवेशनाची मुख्य परिषद ही रविवारी (ता. ११) राहणार असून, यात समाजातील नामवंत व्यक्ती विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. नाशिकमधील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, उद्योजक शशिकांत जाधव, अर्थतज्ज्ञ गिरीश चकोरिया आदी मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. तसेच 'शिक्षण, महिला व युवकांचे भवितव्य' या विषयावरही विचारमंथन होईल. परिषदेने मंजूर केलेले ठराव राज्य शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, कोशाध्यक्ष प्रमोद जाधव, युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, राजेंद्र शेळके, अशोक कदम, नानासाहेब बच्छाव, स्वाती जाधव, शोभा सोनवणे, ॲड. स्वप्नाली राऊत, संजय पडोळ, दीपक पाटील, राजेंद्र जाधव, राम निकम, रोहिणी उखाणे, सुवर्णा पाटील, अनिता डेमसे, शैलजा चव्हाण, रूपाली सोनवणे, वंदना कदम आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा