पांगरीतील रेड कॉर्नचा यशस्वी प्रयोग |
Successful Red Corn Farming in Pangri
श्री.उत्तम वाळुंज शेतकऱ्याचा धाडसी उपक्रम
Bold initiative of Mr. Uttam Walunj farmer
पांगरीतील रेड कॉर्नचा यशस्वी प्रयोग |
Successful Red Corn Farming in Pangri
Bold initiative of Mr. Uttam Walunj farmer
भारतीय शेती परंपरेने विविध पिकांची जननी मानली जाते. गहू, तांदूळ, डाळी, मका, ऊस यांसारखी पारंपरिक पिके आपल्या आहारात आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आली आहेत. मात्र जागतिकीकरण, बदलती ग्राहकांची मागणी आणि आरोग्याबद्दलची जागरूकता या तिन्ही गोष्टींनी आजच्या शेतीत मोठा बदल घडवून आणला आहे. शेतकऱ्यांनी नवीन पिकांचा शोध घेणे, प्रयोगशील वृत्ती ठेवणे आणि जोखीम पत्करणे ही काळाची गरज झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाने अलीकडेच एक नवीन इतिहास रचला. गावातील प्रगतिशील शेतकरी उत्तम वाळुंज यांनी जिल्ह्यातील पहिला रेड कॉर्न (लाल मका) लागवडीचा धाडसी प्रयोग केला आणि यशस्वीपणे दाखवून दिला की नावीन्य स्वीकारणारा शेतकरीच भविष्यातील शेती घडवतो.
पहिल्या प्रयोगाची सुरुवात
श्री. उत्तम वाळुंज हे मुळात पारंपरिक पिके घेत असलेले शेतकरी. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांना असे जाणवत होते की पारंपरिक पिकांमधील नफा कमी होत आहे. हवामानातील अनिश्चितता, बाजारातील भावातील चढ-उतार आणि वाढते उत्पादनखर्च यामुळे शेतकऱ्यांना हमखास नफा मिळत नाही. याच काळात त्यांनी रेड कॉर्न या पिकाबद्दल माहिती मिळवली. अमेरिकेसह आशियातील काही देशांमध्ये या पिकाला मोठी मागणी आहे आणि ते ‘हेल्थ ग्रेन’ म्हणून ओळखले जाते, हे त्यांना समजले. ग्राहकांच्या आहारातील आरोग्यपूरक बदल लक्षात घेऊन त्यांनी धाडसाने दोन एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जून महिन्यात त्यांनी लागवड केली आणि ११०–१२० दिवसांच्या कालावधीत हे पीक चांगल्या अवस्थेत आले. शेतातील हिरवट पानांवर लालसर मक्याच्या कणसांनी झळाळून उठताच गावकऱ्यांतही कुतूहल आणि उत्सुकता वाढली.
उत्पादन व अंदाज
या दोन एकरांवरील लागवडीमधून साधारण ६० क्विंटल उत्पादन मिळेल, असा वाळुंज यांचा अंदाज आहे. प्रतिएकर २५–३० क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे, जे पारंपरिक मक्याइतकेच किंवा त्यापेक्षा जास्त आहे. उत्पादनाबरोबरच भावातही मोठा फरक आहे. साध्या मक्याला बाजारात प्रतिक्विंटल ₹२,२०० ते ₹२,५०० दर मिळतो, तर रेड कॉर्नच्या मागणीमुळे व्यापाऱ्यांनी ₹३,५०० ते ₹४,००० दराचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्यपूरक गुणधर्म
रेड कॉर्न केवळ दिसायला वेगळा नाही, तर आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्मांनी युक्त आहे. लालसर रंगाचे कारण म्हणजे अंथोसायनिन नावाचा नैसर्गिक अँटिऑक्सिडंट. हे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करून हृदयविकारांपासून संरक्षण करते. काही संशोधनांनुसार कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म यामध्ये आढळतात.फायबर जास्त असल्यामुळे पचनसंस्था मजबूत राहते, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. जीवनसत्त्व ए आणि कॅरोटिनॉइड्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.त्यामुळे रेड कॉर्नला केवळ धान्य म्हणून नव्हे तर आरोग्यपूरक अन्नधान्य म्हणून मान्यता मिळत आहे.
उपयोगांची विविधता
रेड कॉर्नचा वापर केवळ जेवणापुरता मर्यादित नाही. तर पारंपरिक स्वरूपात : पॉपकॉर्न, भाकरी, पेज, पीठ बनविण्यासाठी, आधुनिक स्वरूपात : हेल्दी स्नॅक्स, टॉर्टिला, नाश्ता बनविण्यासाठी तर औद्योगिक उपयोग म्हणून यापासून औषधनिर्मिती उद्योग, पोषक पूरक पदार्थ तयार करू शकतो. नैसर्गिक खाद्य रंग बनविण्यासाठी तसेच अन्नपदार्थांना नैसर्गिक लालसर छटा देण्यासाठी याचा उपयोग करतात. दूध उत्पादन वाढवणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि पचन सुधारण्यासाठी पशुखाद्य म्हणूनही याचा वापर करतात. विशेषतः गाभण जनावरांसाठी हा मका उत्तम पोषण देतो, तर स्तनदा गुरांना दूध उत्पादनासाठी आवश्यक घटक पुरवतो. मेंढ्या, शेळ्या व कुक्कुटपालनासाठीसुद्धा हा मका फायदेशीर ठरतो.
बाजारपेठेतील संधी
भारतात अजून हे पीक प्रयोगात्मक टप्प्यात आहे. पण युरोप, अमेरिका, मध्य पूर्व या देशांत याला मोठी मागणी आहे. आरोग्याबाबत जागरूक ग्राहक आणि ऑर्गेनिक उत्पादनांच्या वाढत्या बाजारपेठेमुळे भारतातही याच्या संधी निर्माण होत आहेत.
काही प्रक्रिया उद्योगांनी आधीच रेड कॉर्न थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. निर्यातदारांच्या मते, आगामी काळात महाराष्ट्रात जर मोठ्या प्रमाणावर लागवड झाली तर भारत रेड कॉर्नचा मोठा पुरवठादार ठरू शकतो.
शेतकऱ्याचा अनुभव
श्री. उत्तम वाळुंज या प्रयोगाविषयी सांगतात कि “पारंपरिक पिकांबरोबर वेगळा आणि आरोग्यदायी प्रयोग करण्याची गरज मला जाणवली. सुरुवातीला थोडी भीती होती; कारण हे पीक आपल्या भागात कोणी घेतले नव्हते. मात्र, पीक चांगले जमले आहे. उत्पादन आणि भाव या दोन्ही बाबतीत हे आशादायक आहे. ग्राहक आरोग्यपूरक धान्यांना प्राधान्य देत असल्याने रेड कॉर्न शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो.” त्यांच्या या विचारातून शेतकऱ्यांनी नवीनतेला सामोरे जाण्याची मानसिकता अंगीकारावी, हा संदेश मिळतो.
कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता नवीन पिके स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. रेड कॉर्नसारखी पिके बाजारपेठेत वेगळेपण आणि अधिक नफा देऊ शकतात. शासनाने खरेदी हमी, प्रक्रिया उद्योगांसाठी सुविधा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण उपलब्ध करून दिल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पिकाकडे वळतील. आरोग्यपूरक धान्यांची वाढती मागणी लक्षात घेता निर्यात संधी प्रचंड आहेत.
आव्हाने व पुढील दिशा
तरीसुद्धा काही आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत. हे पीक अजून प्रयोगात्मक असल्यामुळे बाजारपेठ पूर्णपणे विकसित नाही. बी-बियाण्यांची उपलब्धता मर्यादित आहे.शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण व तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे.प्रक्रिया उद्योग व निर्यात व्यवस्थापनाची साखळी अधिक मजबूत करावी लागेल. पण या आव्हानांवर मात केली तर रेड कॉर्न महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन शेतकऱ्यांना नवीन आर्थिक स्थैर्य मिळवून देऊ शकतो.
पांगरी बुद्रुकमधील श्री.उत्तम वाळुंज यांचा रेड कॉर्न लागवडीचा प्रयोग हा केवळ शेतकऱ्याच्या धाडसाची गोष्ट नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी यशोगाथा आहे.या पिकामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाचे दार उघडू शकते, ग्राहकांना आरोग्यदायी धान्याचा पर्याय मिळू शकतो, आणि निर्यातीसाठी नवी संधी निर्माण होऊ शकते.
आजचा हा छोटा प्रयत्न उद्याच्या मोठ्या चळवळीचा प्रारंभ ठरू शकतो. आणि खरी शेतीक्रांती म्हणजे फक्त उत्पादनवाढ नाही, तर आरोग्य + उत्पन्न + निर्यात संधी या तिन्ही गोष्टींचा संगम साधणे. रेड कॉर्नने हे समीकरण घडवून आणण्याची क्षमता दाखवली आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com






No comments:
Post a Comment