शेतकरी ते उद्योजक शुभम भुसारी यांची प्रेरणादायी वाटचाल The inspiring journey of Shubham Bhusari from farmer to entrepreneur
अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई या छोट्याशा गावातून एक तरुण आज नव्या उंचीवर पोहोचला आहे. नाव आहे शुभम संजय भुसारी. लहानपणापासूनच शेताशी नाळ जुळलेली, पण डोळ्यांत मोठी स्वप्ने आणि मनात कष्ट करण्याची तयारी. हीच दोन बळे घेऊन शुभमने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आणि आज तो अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे.
छोट्याशा बेडपासून १०० टन क्षमतेपर्यंत
शुभम सध्या बी.एस्सी. अॅग्री पूर्ण करून पुण्यातील एमआयटी येथे एमबीए इन मार्केटिंगचे शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने उद्योजकीय ध्यास घेतला. केवळ ₹३००० च्या छोट्याशा गुंतवणुकीतून त्याने गांडूळखत प्रकल्प सुरू केला. एका छोट्याशा बेडवरून सुरू झालेला प्रवास आज १०० बेड्स आणि १०० टन क्षमतेच्या प्रकल्पापर्यंत पोहोचला आहे. गांडूळ ही माझी खरी सोनेरी संपत्ती आहे आणि माती ही माझी प्रयोगशाळा असे शुभम हसत म्हणतो.
उत्पादन आणि बाजारपेठेतील ओळख
आज शुभमच्या Bhusari Agro ब्रँडखाली ११८ टन गांडूळखत, ३५ टन शुद्ध निंबोळी पावडर, तसेच वर्मीवॉश आणि वर्मीकल्चरचे उत्पादन होत आहे. केवळ उत्पादन नव्हे, तर त्याने या उत्पादनांना बाजारपेठेत गुणवत्ता आणि विश्वासाचे प्रतीक बनवले.
शेतकरी संतोषराव जगताप सांगतात कि, मी शुभमकडून वर्मीकंपोस्ट घेतले. आधी शंका होती, पण वापरल्यावर ऊसाचा हिरवा रंग आणि गोडवा वेगळाच जाणवला. तेव्हाच ठरवले या मुलावर विश्वास ठेवायचा.
यशामागचे रहस्य : ग्राहकांचा विश्वास
यश हे केवळ आकड्यांत मोजले जात नाही. शुभमकडे गेल्या वर्षी ९५% रीपीटेड ग्राहक होते. ही मोठी उपलब्धी आहे. कारण उत्पादन विकणे सोपे आहे, पण ग्राहकाला पुन्हा परत आणणे हे खरे कसब आहे.
ग्राहक हेच माझे ब्रँड अॅम्बॅसॅडर आहेत. मी फक्त उत्पादन विकत नाही, तर त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करतो” शुभम आत्मविश्वासाने सांगतो.
शिक्षणाबरोबरच उद्योजकतेचा प्रवास
शुभमने एमआयटी, पुणे येथे एमबीए इन मार्केटिंगला प्रवेश घेतला. शिक्षण चालू असतानाच त्याने आपल्या व्यवसायाला आकार दिला. Biznovation स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि भारत सरकारच्या हॅकथॉनमध्ये चौथा क्रमांक मिळवून त्याने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. शेतकऱ्यांसाठी काम करायचे तर मार्केटिंग समजणे गरजेचे आहे. उत्पादन चांगले असले तरी ते योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हाच खरा खेळ आहे,” शुभम म्हणतो.
शेतातून निर्यातीपर्यंत
सुरुवातीला खत विक्रीस अडचणी आल्या. पण शुभमने हार मानली नाही. त्याने स्वतःच्या शेतात हेच खत वापरले. परिणामी त्याने निर्यातक्षम दर्जाचे डाळिंब, टरबूज आणि केळी उत्पादित केले. डाळिंब व टरबूज बांगलादेशला गेले. तर केळी इराणच्या बाजारपेठेत पोहोचली. आज त्याचा शेतमाल “एक्स्पोर्ट क्वालिटी” म्हणून ओळखला जातो. यामागे त्याने वापरलेले ६०% सेंद्रिय आणि ४०% रासायनिक खतांचे संतुलन हे मोठे कारण आहे.
शेतकरी विलास भोसले सांगतात कि शुभमच्या शेतातले डाळिंब मी प्रत्यक्ष पाहिले. गुळगुळीत साल, चकचकीत दाणे आणि बाजारभावापेक्षा जास्त दर मिळाला. हे फक्त गांडूळखताच्या जादूमुळे शक्य झाले.
सामाजिक बांधिलकी - २७ शेतकऱ्यांना प्रकल्प उभारून दिला फक्त स्वतःसाठीच नाही, तर शुभमने गेल्या वर्षी २७ शेतकऱ्यांना गांडूळखत प्रकल्प सुरू करून दिला. हेच त्याचे मोठेपण आहे. माझ्या यशात शेतकऱ्यांचा वाटा आहे. म्हणून त्यांना परतफेड करणे माझे कर्तव्य आहे असे शुभम सांगतो.
रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग
शुभमच्या प्रकल्पात कायमस्वरूपी ३ मजूर काम करतात, तर हंगामी काळात २० मजुरांना रोजगार मिळतो. म्हणजेच शेतातूनच रोजगार निर्मितीचा मार्ग त्याने उघडला आहे.
भविष्याचा मार्ग
शुभम म्हणतो कि, माझे ध्येय केवळ व्यवसाय नाही. सेंद्रिय शेतीतून शेतकऱ्यांना सक्षम करायचे, नवी पिढी शेतीकडे वळवायची आणि भारतीय शेतीला जागतिक दर्जा मिळवून द्यायचा आहे. त्याचे Bhusari Agro हे ब्रँड केवळ खतांचे नाव नाही, तर तरुणाईचा उत्साह, नवोन्मेष आणि शाश्वत शेतीचे प्रतीक आहे.
निष्कर्ष
शुभम भुसारीची ही कहाणी म्हणजे 'मातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंतचा प्रवास.” एका छोट्याशा बेडपासून सुरू झालेली ही वाटचाल आज अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ठरली आहे.जर कोणाला शुद्ध गुणवत्तेचे गांडूळखत, निंबोळी पावडर, वर्मीवॉश किंवा गांडूळ कल्चर हवे असेल तर, भुसारी ऍग्रोशी संपर्क साधू शकतात.
अशा प्रकारे आपली युवा पिढी शेतातून, सेंद्रिय शेतीतून आणि उद्योजकतेतून देशाला दिशा दाखवू शकते. शुभम भुसारी हा त्याचा उत्तम आदर्श आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com








No comments:
Post a Comment