भारतीय शेतीला आधुनिक बनवण्यासाठी गुगलने सुरू केला एआय (AI) आधारित उपक्रम
Google launches AI-based initiative to modernize Indian agriculture
शेतकऱ्यांसाठी एक नवीन पर्व सुरू होत आहे. गुगलने भारतीय शेतीला आधुनिक बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. 'कृषी मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन' (Agricultural Monitoring and Event Detection) नावाचा हा प्रकल्प शेतीत मोठी क्रांती घडवून आणू शकतो.
कृषी निरीक्षण आणि घटना शोध प्रणाली ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रक्रिया आहे, जी शेतात घडणाऱ्या विविध घटनांचा वेळेवर शोध घेते व त्यावर आधारित योग्य कृती करण्यास मदत करते.
गुगलचा नवा प्रकल्प
गुगलने ओपन सोर्स एपीआय (API) तयार केला आहे, जो शेतीशी संबंधित अचूक आकडेवारी पुरवेल. एपीआय म्हणजे एक असा इंटरफेस जो दोन ॲप्सना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करतो.
सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या शेतकरी ॲपला हवामान, मातीचा ओलावा, किंवा पिकाची माहिती हवी असेल, तर ते थेट हवामान विभागाकडे न जाता गुगलच्या एपीआयचा वापर करेल आणि आवश्यक माहिती मिळवेल. यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ॲप्स तयार करणाऱ्या कंपन्यांना अचूक आणि रिअल-टाइम डेटा सहज उपलब्ध होईल.
या प्रकल्पाची उद्दिष्टे:
- शेतातील पिकांचे सातत्याने निरीक्षण करणे.
- कीड-रोगांचा वेळीच शोध घेणे.
- हवामान बदल, पाण्याची कमतरता किंवा जमिनीतील बदल यांसारख्या घटनांचे वेळीच निदान करणे.
- शेतकऱ्याला वेळेत इशारा/सूचना (Alert) देणे.
- उत्पन्नात वाढ व नुकसान टाळण्यासाठी निर्णय घेण्यास मदत करणे.
शेतकऱ्यांना होणारा फायदा
रोग व किडींचे नियंत्रण वेळीच केल्याने नुकसान कमी होईल. निदान व उपाययोजना केल्यामुळे उत्पादनात वाढ होईल.
पाण्याचा कार्यक्षम वापर
खते, पाणी यांचा बचतयुक्त वापर होईल उदाहरण द्यायचे झाले तर एक स्मार्ट सेन्सर जर जमिनीतील ओलाव्याची पातळी खालच्या मर्यादेत आली आहे असे दर्शवतो, तर प्रणाली शेतकऱ्याला त्वरित पाणी देण्याचा इशारा पाठवते. त्यामुळे पिकं सुकण्यापूर्वी उपाययोजना करता येते.
उत्पादन खर्चात बचत होऊन अधिक शाश्वत व नफ्यातील शेती शेतकऱ्याला करता येईल.
हा ओपन सोर्स एपीआय अनेक प्रकारे शेतकऱ्यांच्या मदतीला येईल:
शेतीचे अचूक नियोजन:
शेतकऱ्यांना पिकाची पेरणी कधी करावी, काढणी कधी करावी आणि शेतीचे क्षेत्रफळ किती आहे, याबद्दल सॅटेलाईट आणि मशीन लर्निंगच्या मदतीने अचूक माहिती मिळेल त्यामुळे अचूक नियोजन करता येईल.
नैसर्गिक आपत्तीचे जोखीम व्यवस्थापन :
हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक आपत्ती यांची माहिती वेळेवर मिळाल्याने शेतीमधील जोखीम कमी होईल.
नवीन आणि उपयुक्त माहितीचे तंत्रज्ञान :
खाजगी कंपन्यांना एआयवर आधारित ॲप्स आणि सेवा तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत नवीन आणि उपयुक्त तंत्रज्ञान पोहोचेल.
या प्रकल्पामुळे भारतीय शेती केवळ आधुनिकच नाही, तर हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठीही सक्षम होईल, असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. शेतीमधील गुंतवणूक वाढेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपे उपाय शोधता येतील.
वापरले जाणारे तंत्रज्ञान :
ड्रोन (Drone)
शेतावरून उड्डाण करून फोटो व व्हिडिओ घेतले जातात.
सेन्सर (Sensor)
मातीतील ओलावा, तापमान, पोषणतत्त्वे यांचे मोजमाप.
सॅटेलाईट इमेजिंग (Satellite Imagery)
शेतांची मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली जाते.
AI व मशीन लर्निंग
फोटो/डेटा वापरून घटना ओळखल्या जातात.
GIS प्रणाली
नकाशा व स्थान आधारित विश्लेषण.
मोबाईल अॅप्स व SMS अलर्ट
शेतकऱ्यांना माहिती पोहोचवण्यासाठी मोबाईल ॲप्स व एस एम एस सेवेचा वापर करण्यात येईल.
थोडक्यात सांगायचे झाले तर गुगलचा हा उपक्रम भविष्यातील शेतीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवतो. अशा प्रकारचे निरीक्षण व घटना शोध तंत्रज्ञान हे स्मार्ट शेतीचं (Smart Farming) महत्त्वाचं पाऊल आहे. भविष्यकाळात अधिक अचूक, डेटा-आधारित आणि नफा मिळवणारी शेती यामार्फत शक्य आहे
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment