पाण्याची बचतsaving waterभूमिगत वापसा सिंचन पद्धतीUnderground irrigation system
शेतीमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून आपण जमिनीवरून पाणी देण्याची पद्धत वापरीत आहोत. या पद्धतीमुळे पाण्याचा गैरवापर होतोच परंतु यामुळे जमिनीचा सामु (पी.एच.) वाहून गेलेला आहे. तसेच जमिनीची उत्पादनक्षमता फारच खालावलेली आहे. वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाण्याची बचत व जमिनीची धूप थांबविण्यासाठी भूमिगत वापसा सिंचन पद्धती विकसित करण्यात आली अशा या वैशिष्ट्यपूर्ण सिंचन पद्धतीविषयी ब्लॉग...
भूमिगत वापसा सिंचन पद्धती ही एक पिकास पाणी देण्याची आधुनिक पद्धत असून यामध्ये अमेरिकेहून आयात केलेला चक्रित रबर व पॉलिथिलिन मिश्रित केशवाहिनी निर्माण केलेला पोरस पाईप जमिनीमध्ये साधारण ६ ते ९ इंच खोलवर जमिनीचा प्रकार व पिकानुसार टाकलेला असतो. हा पाईप सर्वत्र जमिनीच्या दाबामुळे एकसारखा पाझरतो व जमीन गरजेनुसार यामधून केशवाहिन्यांद्वारे पाणी शोषण करीत राहते. म्हणून जमिनीत कायम वापसा राहतो.
या पद्धतीचा वापर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, झेंडू, टोमॅटो, मिरची या पिकांसाठी व गुजरातमध्ये उस या पिकासाठी केलेला असून यापासून शेतकऱ्यांना चांगलाच फायदा मिळालेला आहे. या पद्धतीमध्ये पाण्याची जवळ जवळ ५० ते ७० टक्के बचत होत आहेच. तसेच विजेची व वेळेचीसुद्धा बचत होते. सध्याच्या परिस्थितीत पाण्याची नैसर्गिक कमतरता, भरमसाट वाढलेल्या खतांच्या व औषधांच्या किमती यामुळे कृषी क्षेत्रामध्ये खर्च व नफा यांचे गणित बसणे फारच अवघड झालेले आहे. यासाठी वरील साधनांमध्ये बचत होणे ही काळाची गरज आहे व हे भूमिगत वापसा सिंचन पद्धतीने आता भारतातसुद्धा शक्य झाले आहे.
भूमिगत वापसा सिंचन पद्धतीची वैशिष्ट्ये
ही आधुनिक पद्धती अती कमी दाब (प्रेशर) म्हणजे ०.१ किलो दाब व सावकाश पाण्याचा प्रवाह यावरती चालते. अति संथ प्रवाहाने पाणी प्रत्यक्ष मुळांना जमिनीच्या शोषण क्षमतेनुसार मिळते. म्हणून पाणी वाहून जात नाही. या पद्धतीला अर्धा किलो प्रेशरपेक्षा जास्त आवश्यकता नाही.
या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष मुळांना पोरस पाईपद्वारा पाणी, हवा व खते पिकांच्या गरजेनुसार दिली जातात. पाणी जमिनीवर आपटत नसल्यामुळे जमिनीमधील क्षार पृष्ठभागावर येऊन सूर्यप्रकाशामुळे जास्त कडक होत नाही. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते व मुळांची झपाट्याने वाढ होते तसेच खतांचे बाष्पीभवन होत नाही व वाहून जात नसल्यामुळे बचत होते.
जमिनीच्या पृष्ठभागांवर पाणी साठत नसल्यामुळे जवळ जवळ ८५ टक्के तणांचा बंदोबस्त होतो व पर्यायाने रोग व किडीचे नियंत्रण होते. कीटकनाशके व बुरशीनाशकावरील ५० टक्क्यांपर्यंत खर्च कमी होतो.
पाणी, खते व विजेची बचत
या भूमिगत वापसा पद्धतीत पाण्याचा ओलावा जमिनीच्या आत असल्याने हवा व प्रकाशाने पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व संथ गतीमुळे पाणी वाहूनही जात नाही. पर्यायाने इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ७० टक्के पाण्याची बचत होते. या पद्धतीमध्ये सबमेनची गरज नसते. एकाच कॉकद्वारा जास्तीत जास्त क्षेत्र कमीत कमी वेळेत ओलिताखाली घेता येते. खते व पाणी पाईपमधूनच देता येते. त्यामुळे विजेची व वेळेची बचत होते.
मायक्रोपोरस पाईपद्वारा जमिनीतून सिंचन होत असल्याने प्रत्यक्ष पाणी जमिनीवर साठत नाही. पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीमधील खते, मूलद्रव्ये पिकांच्या मुळांजवळ टिकून राहतात. पर्यायाने जमिनीची धूप थांबते. जमिनीचा पोत व दर्जा वाढतो. त्यामुळे जमीन वर्षानुवर्षे चांगले उत्पन्न देऊ शकते.
जमिनीत मुळांजवळ योग्य वापसा असल्यामुळे आगंतुक (पांढऱ्या) मुळांची जाळे विकसित होऊन झाडांची जोमदार सशक्त वाढ होते व पर्यायाने उत्पन्नात वाढ होते.
अन्य सिंचन पद्धतीचे पाईप जमिनीवर असल्यामुळे सिस्टिम (संच) बंद केल्यावर थोडे पाणी पाईपमध्ये शिल्लक राहते. या पाण्याचे सूर्यप्रकाशाने बाष्पीभवन होत असल्यामुळे क्षार जमा होतात. त्याने सिंचन पद्धती चोकअप होते. परंतु या पद्धतीत पोरस पाईप जमिनीत असल्यामुळे सूर्यप्रकाशाशी पाईपचा प्रत्यक्ष संपर्क न आल्यामुळे व तसेच संच बंद केल्यामुळेसुद्धा पाईपमधले पाणी जमीन शोषून घेते. (कॅपिलरी अॅक्शन) त्यामुळे पाईप खाली होतो व पाणी आत राहत नाही. यामुळे पाईप क्षारांनी चोकअप होत नाही.
वीज नसतानासुद्धा सिंचन कार्य होते :
ही आधुनिक सिंचन पद्धती कमीत कमी दाबावर चालत असल्यामुळे सर्वसाधारण दहा फूट उंचीवर पाण्याची टाकी भरली असताना व वीज नसतानासुद्धा फक्त कॉक चालू केला तरी शेतीच्या विस्तृत क्षेत्रात सिंचनाचे कार्य सहज होऊ शकते.
या सिंचन पाईपच्या बाजूला सतत ओलावा असल्यामुळे उंदीर पाईपजवळ जाऊ शकत नाही. उंदराचे दात कायम वाढतात त्यामुळे स्वतःचे दात घासण्यासाठी पी.व्ही.सी. व इतर वस्तूंना उंदीर कुरतडत असतात. परंतु हा पाईप लवचिक असल्यामुळे उंदराचे दात यात रुततात व तो कुरतडू शकत नाही. त्यामुळे उंदरापासून नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. या पद्धतीत जमिनीच्या आत मुळांजवळ पाणी नेहमी येत नसल्यामुळे झाड निश्चित होऊन झपाटून वाढते. जमिनीत कायम वापसा असल्यामुळे गांडूळ व इतर रासायनिक खतांचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची झपाट्याने वाढ होते. परिणाम अधिकतम उत्पन्न मिळते. हेच या वापसा सिंचन पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
या पद्धतीत वापरला जाणारा पोरसपाईप व चक्रित रबर थर्मोप्लास्टिकद्वारा निर्मित होत असल्यामुळे याला दीर्घ आयुष्य आहे व त्याचप्रमाणे जमिनीत असल्याने कोणत्याही प्रकारची डागडुजी देखरेख व सांभाळ खर्च व धोका नाही. पाणी व मजुरांच्या गैरवापराने व सांभाळामुळे होणारे नुकसान टळते.
पाईपजवळ नेहमी ओलावा असल्याने व पाईपमधील पाणी जमीन शोषून घेत असल्यामुळे पाईप नेहमी रिकामा असतो. पाईपला अतिसूक्ष्म केशवाहिनी असल्यामुळे मुळांना आत जाणे शक्य व आवश्यक नाही. इतर प्रचलित पद्धती जमिनीवर असल्यामुळे ऊस पिकामध्ये उंदीर, कोल्हे व अन्य जंगली प्राणी पाईप कुरतडतात. तसेच देखभाल करण्यासाठी अडचणीचे आहे परंतु या पद्धतीसाठी वापरलेले पोरस पाईप जमिनीमध्ये असल्यामुळे कोणत्याही प्रकारची देखभाल करावी लागत नाही. उंदीर व जंगली प्राण्यांपासून पाईपला नुकसान होत नाही. पिकास हमखास कमीत कमी पाणी असतानासुद्धा जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली विकसित होऊ शकते.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील चौगाव येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव मांडवडे, आसखेडा येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर आण्णा कापडणीस या शेतकरीबंधूंनी डाळिंब बागेसाठी या आधुनिक भूमिगत वापसा सिंचन पद्धतीचा उपयोग केला आहे. या वापसा सिंचन पद्धतीच्या अधिक माहितीसाठी अॅप्रोटेक, नॅशनल प्लाझा, रेल्वे स्टेशनसमोर, सुरत नाशिक कार्यालय - अॅप्रोटेक, फ्लॅट नं. ३, पटेल आर्केड, मार्केट यार्डसमोर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक-३. या पत्त्यावर संपर्क साधावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment