पुस्तक परिचय Book Introductionशेतकऱ्यांच्या समस्या : शोध आणि बोधFarmers' problems: research and lessons learned
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारं, एका शेतक-यानं लिहिलेलं एक दर्जेदार पुस्तक "शेतकऱ्यांच्या समस्या: शोध आणि बोध" हे पुस्तक प्रकाशित झाले असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका, भोयेगांव येथील प्रगतशील शेतकरी शिवनाथ बोरसे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
या पुस्तकात पाच भाग केलेले असून विभागवार प्रश्नांची उकल करण्यात आली आहे. पहिल्या विभागात भारतीय अर्थव्यवस्था- दिशा आणि दशा यावर प्रकाश टाकला आहे त्यात भारत उदय! कोसळणारा भारत, शेतकरी जिवाला का वैतागला? सरकारची उपाययोजना- कर्जाचे वरदान, महागाई निर्देशांकाचे परीणाम, अर्थसंकल्पीय तरतुद एक भ्रम, समस्यांच्या विळख्यात, लोकशाही आणि शेतकरी, कृषी विद्यापीठे आणि शेतकरी, कृषी पतपुरवठा धोरण, संगणक आणि आय.टी. क्रांती आदी विषयांची खुलासेवार मांडणी करण्यात आली आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात शेती का परवडत नाही? या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न श्री. बोरसे यांनी केला आहे. ते स्वत: शेतकरी असल्यामुळे शेतीच्या प्रश्नांची योग्य जाण या पुस्तकात ठायी ठायी आढळते. यात त्यांनी शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन, मागणी पुरवठ्यांचे गणित, निसर्गाचा अनियमितपणा, रासायनिक खतांचे दुष्परीणाम, पिकसंरक्षक फवारण्या डिझेल दरवाढ, अनियमित वीजपुरवठा, बाजारभावाची अनिश्चितता, निर्यातीवरील अनावश्यक बंधने, आयातीला खुली परवानगी, शेतीविषयक राष्ट्रीय धोरणांचा अभाव, शिक्षणाची वाटचाल बेरोजगारीकडे, परावलंबन, नियोजनाचा अभाव, फसवणूक, वाढलेले कौटुंबिक खर्च, वाढलेले उत्पादन खर्च, शेतीकाठी साहित्याचे अनियंत्रित दर, गावपातळीवर असलेले राजकारण, शेतीमालाचे मार्केटींग, शेती कर्जाचे व्याज आणि इतर खर्च, व्हॅट करार-नवा सापळा, पीक विमा- शुध्द फसवणूक, शेतकरी कोठे चुकतो? बेजबाबदार ग्राहक चळवळी या उपविषयांचा अंतर्भाव चांगल्या प्रकारे हाताळला आहे.
राष्ट्रीय कृषी धोरणाची पार्श्वभुमीही लेखकाने विषद केली आहे. त्यात कृषीप्रधान अर्थव्यवस्था, कृषीप्रधान निती कशी असावी? क्रियाशक्तीत वाढ झाली पाहीजे, कापड उद्योगनिती, कृषीमालाची निर्यात, शेतीपुरक दुग्धव्यवसाय सरकारी पातळीवरून इतर काही उपाय, गावचे राजकारण, आदी प्रासंगिक मुद्यांचा समावेश केला आहे.
लेखकाने शेतक-यांच्या आणि शेतीच्या समस्यांचा नुसता उहापोह केला नसुन त्यावरचे समाधानकारक उत्तरही मिळवून दिले आहे. याचा प्रत्यय पुस्तक वाचतांना येतो. यात देशातील ७० कोटी जनतेची कैफियत मांडली आहे. सारस्वतांच्या लेखण्या या कामांसाठी झिजत नाही ही खंतही लेखकाने मनोगतात मांडली आहे. ते पुढे म्हणतात की, कृषीक्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्यामुळे २० कोटी जनतेची क्रयशक्ती कमी झाली आहे त्यामुळे रोजगार, उद्योग, व्यवसायवृध्दीच्या संधी गोठल्या आहेत. याचा विचार जे लोक करीत नाहीत त्यांना मी बुध्दीवादी विचारवंत, अर्थतज्ज नाहीत असे म्हणेन असं त्यांनी नमूद केले आहे.
पुस्तकाच्या चौथ्या भागात निसर्गासारखेच जगा- एक संदेश या मुख्य शिर्षकातंर्गत आपणच आपले वैरी, उद्योगी बना, उठा आणि तयार व्हा, हिशेब करा आणि निर्णय घ्या, उत्पादन खर्च कमी करा, कर्जाबाबत निर्णय घ्या. गरजा निश्चित करा, पर्यायांचा विचार करा, तुझे आहे तुजपाशी, अत्याधुनिक शेतीच्या दिशेने, गाय, गवत, आणि गांडूळ नियोजन करा, शेतीचे नियोजन, पिकाचा फेरपालट करा, पाण्याचे नियोजन करा, खताचे नियोजन, पिक संरक्षणाचे नियोजन, श्रमाचे नियोजन, बडेजाव टाळा, आरोग्य, गावपंचायत स्थापन करा. शेतीला जोडधंदा सुरू करा आदी विषयांवर विस्तृतपणे मुद्देसूद विवेचन केलेले आहे.
पुस्तकाच्या शेवटी लेखकाने धांडोळा लिहिला असुन त्यात त्यांनी म्हटले आहे की, कृषीक्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की, आम्ही पारंपारिक शेतीला आधुनिक सुधारीत शेतीचे रुप दिले, काय मिळाले? बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि बहुमोली आरोग्यधाम- इस्पितळे! पुन्हा एकदा जागतिक पातळीवर शेतीचा प्रवास सेंद्रिय शेतीच्या दिशेने निघाला आहे. आमच्या पूर्वजांच्या पारंपारीक कृषी तंत्रांचा आणि परंपरांचा धांडोळा नवे शोध? हे सर्व पाहता सुरुवात कोठून केली आणि पहा पोहचलो कोठे!
मराठीत एक म्हण आहे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा ! पाण्याने भरलेली कळशी तर काखेत आहे पण भ्रम निर्माण झाला म्हणून आम्ही ती जगभर शोधीत आहोत. पुन्हा आपण सेंद्रिय शेतीकडे वळल्याचा दाखलाही लेखकाने दिला आहे अशी वास्तवता लेखकाने वेळोवेळी दाखवून दिली आहे. १५२ पानी असलेल्या या पुस्तकाला प्रस्तावना नवयुग या नावाने विनायकदादा पाटील यांनी लिहिली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, शिवनाथासारखे पेरणारे लिहिणारे झाले हे कृषीक्षेत्रातील नवयुग आहे.
मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांचे अवलोकनही या पुस्तकाला लाभले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ साधे परंतु आशयगर्भ आहे. नाशिकच्या वसुधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून एका शेतकऱ्याचे पुस्तक आपण जरूर वाचले पाहिजे, संग्रही ठेवले पाहिजे.
शेतकऱ्यांच्या समस्याः शोध आणि बोध
लेखक: शिवनाथ बोरसे
वसुधा प्रकाशन नाशिक
:: प्रकाशक ::
सौ. कल्पना वि. गायकवाड
द्वारा प्रसाद बुक स्टॉल,
मातृप्रेम, गुरांच्या दवाखान्याची गल्ली,
अशोकस्तंभ, नाशिक-२
पानेः १५२, मूल्यः १००
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment