name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): गावोगावी कर्मवीर व उद्योगवीर घडवायला हवे ! (Karmaveer and industrial hero should be made from village to village)

गावोगावी कर्मवीर व उद्योगवीर घडवायला हवे ! (Karmaveer and industrial hero should be made from village to village)

उद्योजकीय समाज काळाची गरज !
The need of entrepreneurial society
गावोगावी कर्मवीर व उद्योगवीर घडवायला हवे !
Karmaveer and industrial hero should be made from village to village

Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have

देश असो वा राज्य खेडे हे त्यांची छोटी आवृत्ती असते. व्यक्ती-व्यक्तीच्या माध्यमातून राष्ट्र घडते, या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे व असावे हा चिंतनाचा विषय आहे. पण आज ग्रामीण भागातील परिस्थिती ही निश्चितच चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी देशातील प्रत्येकाने 'जबाबदार' होण्याची तसेच देशाच्या युवा पिढीवर उद्योजकीय संस्कार रुजविण्याची अत्यंत गरज आहे. ग्रामीण भागातील विदारक व चिंताजनक परिस्थितीविषयी भाष्य करणारा हा लेख/ब्लॉग...


      उद्योजकच्या दिवाळी अंकासाठी सगळे हटके विषय असल्याचे कळले आणि मीही 'कृषी या एकाच विषयाशी मोट बांधून वर्षभर लिखाण करत असतो. मग हटके विषयावर कधी लिहिणार म्हणून हा लेख उद्योजक दिवाळी अंकासाठी लिहीत आहे. ग्रामीण सुधारणेतून उद्योजकता कशी वाढीस लागेल याविषयी मी माझ्यापरीचे असलेले स्वैर निरीक्षण आपल्यासमोर मांडत आहे. यात कुणालाही स्थल कालपरत्वे कोणी दुखावले आहे असे वाटत असेल तर प्रथमतः मी माफी मागतो. परंतु चांगले होण्यासाठी जशी आपण कडू औषधे घेतो तशी ही लेखरुपी गोळी काम करेल असे वाटते.

     

   ग्रामीण उद्योजकतेला भाऊबंदकीचा शाप आहे असे अनेकांना वाटते ते मलाही खरे वाटत आहे. भाऊबंदकी म्हणजे काय? यात तुमचे सगेसोयरे येत नाही यात तुम्ही ज्या ठिकाणचे, गावाचे आहात तेथील तुमचा भाऊ, काका, चुलते ही भाऊबंदकी येते. यात ग्रामीण भागातील प्रवृत्ती वर्षानुवर्षे तशीच जपली जाते की अमुक एक चांगला व्यवसाय करत आहे तर त्याच्या डोक्यात वेगळंच खूळ घालून त्याला देशोधडीला लावण्याचा प्रकार वर्षानुवर्षे आपण पाहत आहोत. या बाबीकडे आपण डोळेझाक न करता उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याच वेळी दिली पाहिजे म्हणजे आपला रोखठोक स्वभाव त्यांच्या लक्षात येईल. उद्योजकता जोपासणे ही काही विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही की ती त्यांनी जोपासली पाहिजे. हा वर्षानुवर्षे आपण संस्कार जोपासत आलो आहोत. ही भावना भीतीदायक असल्यामुळे आपण उद्योगात 'पडलो' असे म्हणतो. उद्योगात शिरलो असे म्हणत नाही. शालेय वर्गापासून आपले आणि श्रमाचे वावडे आहे असे मला वाटते. 

    

   मला आठवते मला शालेय जीवनात शारीरिक श्रमाचा आठवड्यातून एक तास दिलेला असायचा पण या तासात कोणीही शारीरिक श्रम करत नव्हते. फक्त टोलवाटोलव करून वेळ निभावणे हेच करायचे. यामुळे लहानपणापासून आपण श्रम आले की टाळाटाळ करण्याची बीजे त्यावेळच्या संस्कारात होती हे आपण विसरतो आहे. याबाबतीत थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आठवते ते म्हणजे 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली शिक्षणाची मीमांसा मुळीच स्वावलंबनावर, उद्योजकतेवर आधारित होती. पण आपण सोयीस्कररीत्या या गोष्टीला बगल देत आहोत असे वाटते. अहो जरा खेड्यातील माणसांकडे पैसे आले तर ते कोणती गाडी मार्केटमध्ये नवीन आहे? चैनीची वस्तू की जी गावात कुणाकडेही नाही अशा वस्तू घेण्याची महमिका त्यांच्या मनात असते. परंतु खेड्यात अशा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहे त्यामुळे ग्रामीण उद्योजकता वाढीस लागेल असे तो काहीच प्रयत्न करत नाही, फक्त मला बाजीराव म्हणा, मी या गावचा सरपंच, माझं ऐका असा तोरा मिरवणाऱ्या मंडळीकडून काय उद्योजकता वाढीस लागेल! मला तर वाटतं परीसरातल्या यशस्वी उद्योजकांची आपण कधी मुलाखत ऐकली आहे का? कि तो कसा यशस्वी झाला आहे. याविषयी आपण कधी प्रबोधन केले आहे का? याचे उत्तर नक्कीच नाही असे येईल. ज्या समाजात उद्योजकांच्या मनातले भाव जर जाणून घेतले नाही तर आपली मुले उद्योजक कशी होतील आणि समाजात उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्मिती कशी होईल. 


      मी तर म्हणतो प्रत्येक गावातील यशस्वी पुरुषाने समाजहितार्थ गावातल्या युवा पिढीसाठी, मुलांसाठी अशी प्रेरक व्याख्याने उपलब्ध करून दिली तर लहान मुलांची नक्कीच मानसिकता बदलेल. समाज बदलायचा असेल तर सुरूवात आपल्यापासून करावी असे मला मनोमन वाटते. परंतु यात कुणाला काही मार्केटिंगचा स्वार्थीपणा दिसत असेल तर ते साफ चुकीचं आहे. उद्योजकता वाढीस लावण्यासाठी काय फक्त एमसीईडी किंवा अन्य संस्थांनी ठेका घेतला आहे का? समाजाची भूमिका कुणी का लक्षात घेत नाही. आज बघितले तर समाजातल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी कुणी पुढाकार घेत आहे का? मुद्दामहून कुणी उद्योजकता शिबिर भरवीत आहे का? उद्योग व्यवसायविषयक मार्गदर्शनाचा फार्स काही संस्था करतात ते खरोखरीच समाजात उद्योजकता पसरविण्यासाठी काही प्रयत्न करतात का? याची कुणीही दखल घेत नाही त्यामुळे होते काय की समाजात दुसऱ्याच अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या युवापिढीला जर आपण काम देऊ शकलो नाही तर त्यांची डोकी कशा प्रकारे चालतात हे आपण पाहतो आहे. समाजात दिवसेंदिवस गुन्हेगारीकरण वाढत चालले आहे हे याचेच द्योतक आहे.

    

       थोर समाजसुधारकांनी समाजाला विचारांचा आणि कृतीचा खजिना ठेवला आहे. त्यांचा या समाजपरिवर्तनातील मथितार्थ समजून घ्या. नुसतीच त्यांची पुण्यतिथी, जयंती साजरी करून काहीच साध्य होणार नाही. केवळ त्यांची आठवण करून समाज विकासाची, उद्योजकतेची फळे मिळणार नाहीत तर समाजातील घातक रुढी, अंधश्रद्धा आणि बुवाबाजी आजही संपलेली नाही. याउलट अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांची निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेने आपणाला काय बघायला मिळाले. अजूनही समाजात विघातक प्रवृत्ती दबा धरून बसल्या आहेत. आज नव्या विचारांच्या बुरख्याखाली समाजाची प्रचंड फसवणूक चालू आहे. नवे बुवा आज निर्माण होत आहे. आपली टिमकी वाजवून समाजाचे सेवक म्हणणारे साधुसंत आज काय करत आहे हे पाहणे गरजेचे ठरते. 


        शब्दाचे गारुडी गावोगावी फिरत असून लोकांना झुलविण्याचे,  नवनवे तंत्र आत्मसात करून हे लोक समाजाला अशा प्रकारे फसवत आहे की, तळागाळातला समाज नाडला जातो. हे नवे डोंबारी तीच जुनी पुंगी वाजवून हा खेळ चोहीकडे करताना दिसून येत असल्यामुळे उद्योजकतेला खीळ बसली आहे असे मला वाटते. म्हणूनच समाज परिवर्तनाची दिशा, विकास आणि जबाबदारी जास्त डोळसपणे सांभाळली पाहिजे. समाज परिवर्तनाला व उद्योजकतेला खीळ घालणाऱ्या गोष्टी आपण मनःपूर्वक तपासून पाहिल्या पाहिजेत. वेळीच असल्या नकली स्कीम्स तपासून पाहिल्या पाहिजेत. जीवन आणि श्रमाची सांगड घालणारे शिक्षण दिले पाहिजे. जो श्रम करतो त्याला प्रतिष्ठा दिलीच गेली पाहिजे. एका गाजलेल्या जुन्या चित्रपटामध्ये एक गीत "दिल को देखो, चेहरा न देखो, चेहरे ने लाखो को लुटा, दिल सच्चा और चेहरा झुठा" या गीताच्या ओळी खऱ्या अर्थाने समाजातील मानवी स्वभावाचे व चेहऱ्याचे वर्णन चपखलपणे करतात.


Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have


    आजपर्यंत समाज सुधारणेत अनेक थोर महात्म्यांचे योगदान लाभले आहे. अनेक उद्योजकांचेही योगदान आहे. परंतु या प्रत्येक विचारांचा केंद्रबिंदू मानवतेची शिकवण आणि समाजाला योग्य दिशा दाखवणारीच ठरली. आधुनिक जीवनाचा पाया काळानुसार बदलत गेला आहे. फॅशन करणारा, लेटेस्ट गाडी वापरणारा आज मॉडर्न समजला जातो. चांगल्या गोष्टी सोडून वाईट संस्काराचे भूत आपल्या मानगुटीवर बसवले जाते. या भुलभुलय्यात आपण इतके अडकत जातो की आपणाला कळत नाही की आपण काय करत आहोत. अनेक जण यापायी लयास गेलेले आपण पाहिले आहे. 

    

       माझ्या माहितीतील एक अशी व्यक्ती आहे की, ज्यांच्याजवळ सर्व सुखसोयीची साधने आहेत तरी ती व्यक्ती आज सायकल वापरते. मी सहज त्यांना प्रश्न विचारला की, "साहेबराव, आज तुमच्याजवळ सर्व असून सायकल का? जग मॉडर्न होत आहे. तुम्ही अजून सायकल वापरतात." हे म्हणाले, "जग जरी मॉडर्न होत चालले तरी आपण मनाचा आणि शरीराचा कधी विचार करतो का? त्याला काय पाहिजे. याचा विचार न करता आपण बाह्य गोष्टी दाखवून मोठेपणा का मिरवायचा? मी दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी सायकल वापरतो, पायी फिरतो माझ्या फळबागेत काम करतो. श्रम केल्याने मला आजार होत नाहीत हे काय कमी आहे काय? देवाने एवढं सगळं देऊनही मी असमाधानी राहतो आणि हा स्वार्थी विचार माणसात बळावत असल्यामुळे मी सायकल वापरतो. माझ्या मुलांनाही वापरायला उद्युक्त करतो. परंतु मी सायकलवर गेल्यावर गावातील लोक मला हसतात, पैसा येऊन पैसा खर्च करत नाही असं म्हणतात, पण मी पैसा नाही शरीर कमावत आहे हे ते विसरून जातात. त्याचे हे बोल एकून समाज कोणत्या थराला जात आहे." या उदाहरणाचा उद्योजकीकरणाचा फार जवळचा संबंध आहे. 


        श्रमाला मोलच राहिलं नाही. छोट्या गोष्टी असतात पण त्याचा समाजात फार मोठ्या अर्थाने संबंध असतो हे जाणून घ्यायला आज कोणाकडेही वेळ नाही आणि फालतू गोष्टी चर्वितचर्वण करत असतात. आपला वेळ अमूल्य आहे हे आज खेडेगावातल्या कोणत्याही कट्टयावर नजर टाका ते फक्त दुसऱ्यांची उणीदुणी, लफडी यावर चर्चा करण्यातच बराचसा वेळ देतात. त्यामुळे आपला विकास कधी होत नाही. विकासाच्या गप्पाच सोडा पण राजकारणात १०० टक्के वाहून गेलेली खेडी पाहून उद्योजकीकरणाचा आदर्श ठेवण्यात आपण कमी पडत चाललो आहे हे लक्षात येते.

      

  मला मान्य आहे की, आज आपण संपूर्ण रामायाणासारखे राहू, वागू शकत नाही; ज्ञानेश्वरांना पचवू शकत नाही; महात्मा गांधींना संपूर्ण पेलू शकत नाही; महात्मा फुले, आगरकर, टिळक, डॉ. आंबेडकर, बाबा आमटे यांना जुन्या विचारांचे म्हणून सोडून देऊ पण त्या त्या काळात काय गरज होती ही त्या महापुरुषांनी ओळखली. म्हणूनच कालचे बदलते संदर्भ लक्षात घ्यायला हवेत. त्यावेळी त्यांना ती गोष्ट आवश्यक वाटत होती म्हणून त्यांनी केली. आज आपल्याला सुधारण्यासाठी काय हवंय हे लक्षात घेतले पाहिजे. सृष्टी नवनवे पांघरुण घेत असते. परिस्थिती नित्य नवीन होत असते. जुने टाकणे हा सृष्टीचा वसा मानवाने लक्षात घेता पाहिजे. परंतु आजकाल सोयीस्कररीत्या या गोष्टींचा अर्थ शोधला जातो. त्यामुळे या नव्या परिवर्तनात जास्त स्वैराचार बोकाळला आहे. 


          पैशाच्या जोरावर मदमस्त झालेला समाज सामान्यांवर अत्याचार करत आहे. आज हिंसात्मक भाषा, कृतीच जास्त वाढलेली दिसून येते. आज समाजामध्ये एक-दुसऱ्याला बनवण्याचे प्रकार जे वेगवेगळ्या संदर्भात झालेले आहे त्या विषयी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. समाज या सर्व बाबी जाणतो, ओळखतो पण त्याच्या हाती काही नसल्यामुळे हतबल आहे. यादृष्टीने युवा पिढीकडूनच अपेक्षा आहे, त्यांनी पुढे येवून उद्योजकता, कर्तृत्व या जोरावर स्वतःला सिद्ध करून या बेगडी जगाला बदलण्यासाठी झटायला हवे तर या समाजामध्ये खऱ्या अर्थाने उद्योजकता रुजण्यास सुरूवात होईल. सर्वत्र असे चालले असं नाही तर आजही समाजात अशा काही चांगल्या संस्था, व्यक्ती आहेत की ते आपल्या परीने अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला नवी दिशा दाखवत आहेत. पण त्यांच्या चांगल्या गोष्टी समाजापुढे येत नाही. 


        आज अशा परिवर्तनाची गरज आहे की, मानवी जीवन सुखी व्हावे. उद्योजकता वाढीस लागावी. माणुसकीचा शोध घेण्यात यावा. संस्कारशील मन घडवण्यात यावे. शालेय जीवनापासून श्रम महत्त्व बिंबवले पाहिजे. तेव्हाच स्वावलंबी जीवन होण्यास आपण मदत कर शकू असे मला मनोमन वाटत राहते. येथे व्यक्तीचा मोठेपणा श्रेष्ठ नसून सामाजिक श्रेष्ठता व राष्ट्रीय ऐक्य मोठे दिसले पाहिजे. म्हणून नवीन परिवर्तन हे संपूर्ण मानवजातीच्या हिताला बरोबर घेणारे असावे आज गाडगेबाबासारखे समाजवादी संताची गरज भासत आहे. गाडगे महाराजांना पडलेले प्रश्न म्हणजे खरंच दगडात देव आहे का? माणस दारु का पितात? सावकार सर्वांना कर्जात का बुडवतो? माणसे अज्ञानी, अंधश्रद्धाळू का? त्यांना पडलेले हे प्रश्न आज सुटलेले आहेत का? तर त्याचे उत्तर नाहीच येईल. कारण आजही शेतकरी आत्महत्त्या करत आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन आणि चंगळवादी झाली आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याविषयी आज समाज किती संवेदनशील आहे याचा विचार केल्यास समाजाची संवेदना हरवत असल्याचे आपल्या लक्षात येईल. 

Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have

       हे सर्व चित्र बदलण्यासाठी त्या काळी गाडगेबाबा अहोरात्र झटले. समाजाची, मनाची खऱ्या अर्थाने नस पकडली. बाबांनी आपल्या कीर्तनातून रामाचा वनवास सांगितला नाही. ते अहिल्येचा उद्धार, पांडवाच्या वनवास कथेत रमले नाही तर त्यांना फक्त दिसत होता समाजातील लाखो दरिद्री नारायणांचा वनवास. हा वनवास संपून किमान अन्न, वस्त्र आणि निवारा मिळावा म्हणून बाबांचे कीर्तनातून रात्रंदिवस भ्रमंती चालू होती. त्यांनी श्रद्धा निर्माण केली परंतु अंधश्रद्धा होऊ दिली नाही. देव दगडात नाही तर कामात आहे, घामात आहे.

      

       माणसांनी 'एकमेकां साह्य करू' सुपंथाचा मार्ग धरला तर आपला देश सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रकारच्या समाज सुधारणेतून उद्योजकताच वाढीस लागेल यात माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************



No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...