name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): भारतीय वनौषधी क्षेत्र ( Indian herbal medicine field open wide)

भारतीय वनौषधी क्षेत्र ( Indian herbal medicine field open wide)

भारतीय वनौषधी क्षेत्र
Indian herbal medicine field open wide
खुल जा सीम सीम...

Bhartiya vanousadhi kshetra

 वनौषधीच्या साठ्यांनी समृद्ध अशा या देशात काही कारणांमुळे मागील काही वर्षे वनौषधी क्षेत्राकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. परंतु वनौषधीचे महत्त्व आता सर्वच जगाला पटले आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे पुन्हा लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. या क्षेत्रातील अडचणी, प्रश्न, वनौषधीची उपलब्धता, होणारा ह्रास याचा विचार करता वनौषधीची लागवड, औषधी निर्माण, त्याची बाजारपेठ, विक्री या सर्वच बाबतीत योग्यरीत्या समन्वय साधल्यास भारतासाठी हे क्षेत्र सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरू शकेल असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.  


      आपला भारत देश अनेक बाबींनी समृद्ध असून भारतातील जंगले म्हणजे औषधी वनस्पतीचे एक भले मोठे भांडारच आहे. औषधी  वनस्पतीपासून मिळणाऱ्या विविध औषधांचा उपयोग करून सर्दी-खोकल्यापासून ते कर्करोगापर्यंत अनेक रोग बरे केले जातात. नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत बऱ्याच वनौषधींचा वापर तेथील आदिवासी आजही करतात. कोणत्या आजारावर कोणती आयुर्वेदिक औषधी मुळी गुणकारी आहे. याचे पारंपरिक ज्ञान त्यांनी जोपासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या रोगनिवारणासाठी वनस्पतीवर आधारित परंपरागत औषधांचा वापर करते. केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने केलेल्या पाहणीनुसार भारतामध्ये सुमारे ९५०० औषधी वनस्पती आढळून येतात व त्या आयुर्वेदिक औषधे निर्माण करणाऱ्या कारखान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. यासंबंधी पायाभूत सुविधा, प्राचीन वारसा, समृद्ध ज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ व आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्या देशात उपलब्ध आहे.

        

         अॅलोपॅथिक औषधांमुळे होत असलेल्या दुष्परिणामांमुळे आयुर्वेदिक औषधांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अॅलोपॅथी औषधांच्या दीर्घ वापरामुळे दुष्परिणाम दिसून आले. त्यामुळे दुष्परिणामरहित वैद्यकीय उपचार पद्धतीचा शोध सुरू झाला. औषधी वनस्पतीवर व निसर्गोपचार भारतातील आधारित प्राचीन आयुर्वेदिक उपचार पद्धती आता पुन्हा जगभर अधिक लोकप्रिय ठरू लागली. देशात मिळणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींमुळे भारतातील आयुर्वेदिक कारखान्यांची गरज भागवून परदेशी निर्यात करण्यास बराच मोठा वाव आहे. सन १९९८-९९ मध्ये वर्तविलेल्या अंदाजानुसार भारतातून सुमारे १२.६० कोटी इतक्या प्रचंड रकमेच्या औषधी वनस्पतींची व त्यापासून बनविलेल्या औषधाची निर्यात केली गेली. वनौषधींची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढतच जाणार. २०५० सालापर्यंत ती ५००,०० कोटी डॉलर्सपर्यंत पोहचणार आहे.


Bhartiya vanousadhi kshetra

 

         औषधी वनस्पतींचे मानवाच्या निरनिराळ्या विकारांवर तसेच रोगावरील उपयुक्ततेबद्दल पुरातन काळापासून पुरावे उपलब्ध आहेत. औषधी वनस्पतींच्या दुर्मिळतेमुळे लोक अॅलोपँथीकडे वळले, परंतु आता लोकांचा कल पुन्हा आयुर्वेदाकडे दिसू लागला. कारण औषधी वनस्पतीपासून मानवी शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत. आयुर्वेदिक वनस्पती महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतांमधील जंगलामध्ये तसेच नागपूर व अमरावती या भागातील आदिवासी क्षेत्रात, सातपुडा पर्वतांच्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. दिवसेंदिवस होत असलेल्या जंगलतोडीमुळे व वाढत्या शहरीकरणामुळे या वनस्पती झपाट्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलामध्ये बऱ्याच वेळा आवश्यक असलेल्या वनस्पती मिळत नाहीत किंवा त्यांची ओळख नसल्यामुळे उपलब्ध असूनदेखील वनस्पतींचे महत्त्व कळू शकत नाही. औषधे तयार करण्याकरिता लागणाऱ्या वनस्पती सध्या जंगलांत फार कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे वनौषधीयुक्त वनस्पतींची मागणी भारतात तसेच परदेशांत वाढत आहे.

    

      आपल्याकडे ओलिताच्या सोयी तुलनात्मदृष्ट्या कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना सर्वस्वी निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे बहुतेक शेतकरी आपल्या शेतात कोरडवाहू पिके घेतात. वनौषधी लागवड सर्वसाधारण हवामान, कोरडवाहू व हलक्या जमिनीवर देखील होऊ शकते व त्यांना असलेली कडवट चव, विशिष्ट उग्र दर्प तसेच सुगंधामुळे या वनस्पती जनावरे खात नाहीत व सहसा वनौषधींची चोरी होत नाही. तसेच दिवसेंदिवस निर्यात होणाऱ्या बाजारपेठाच्या उपलब्धततेमुळे वनौषधीच्या उत्पादनास बराच वाव निर्माण झाला आहे. आयुर्वेदिक वनस्पतीच्या दिवसेंदिवस होत असलेल्या ऱ्हासामुळे या वनस्पतींची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास वनस्पतींच्या विविध जाती जोपासणे शक्य होणार आहे.


Bhartiya vanousadhi kshetra

       मध्यंतरी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या शेतीची लाट आली होती. काही जण 'बाय बैंक' स्कीम घेऊन बाजारात उतरले होते. कोरफडीचे अमाप पीक आले पण करार करूनही कंपनीने घेतले नाही. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक झाली. राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर वनौषधी लागवड केली. उत्पादनही मोठ्या प्रमाणावर आले. परंतु ते उत्पादन खपण्यास फार अडचणी आल्या. त्यामुळे शेतकरी वनौषधींची लागवड करण्यास धजावत नाहीत. याकरिता वनौषधींच्या बाजारपेठांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यामध्ये अभ्यास करतांना खरेदीदारांचे पत्ते, जास्तीत जास्त मागणी असलेल्या वनस्पती, त्यांना मिळणारे दर, मालाची प्रत इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. 

  

औषधी वनस्पतींच्या बाजारपेठांमध्ये खरेदीदार व उत्पादक शेतकरी या दोघांमध्ये फार मोठी दरी असल्याचे आढळून येते. या दोघांमध्ये दुवा साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना खरेदीदारांचे पत्ते, जास्त मागणी असणाऱ्या वनस्पती तसेच हमीभाव यांची माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. करार करून हमीभावाने निश्चित उत्पादन घेत असल्याची हमीही (गॅरंटी) महत्त्वाची आहे. अशा माहिती अभावी शेतकरी या वनस्पतींच्या लागवडीस धजावत नाहीत. परिणामी औषधी निर्माण करणाऱ्या कंपनीसदेखील चांगल्या प्रतीचा हवा तेवढा माल मिळत नाही. यासाठी कंपन्यांनी पुढे येऊन जाहिरातीद्वारे अमुक एक वनस्पती हमीभाव देऊन शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येईल असे प्रसिद्ध करावे व त्याप्रमाणे सरळपणे थेट शेतकऱ्यांशीच कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत दर करार करून औषधी वनस्पतींची खरेदी करावी. त्यामुळे वनौषधीच्या लागवडीस शेतकरीदेखील प्रवृत्त होतील व कंपन्यांनादेखील कच्चा माल योग्य दरात मिळेल. अशा प्रकारे वनौषधींची लागवड राज्यात यशस्वी होऊ शकेल फक्त सध्या योग्य समन्वय नसल्यामुळे हे क्षेत्र थोडे दुर्लक्षित आहे. अगदी आत्तापर्यंत औषधी वनस्पतींची व्यापारी दृष्टीने लागवड करण्याकडे कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. 

Bhartiya vanousadhi kshetra


       वनांमध्ये वनस्पती मुबलकपणे उपलब्ध असतात. त्या पाहिजे तशा आणून वापरल्या गेल्या. अशा वनस्पती काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यावेळी मागणी वाढली. आजही हा वनौषधींचा व्यापार हा विषय काही अपवाद वगळता एवढा गंभीरपणे कोणत्याही संस्थेने हाताळला नाही. कारखानदारांनी याकडे कधी नीट लक्ष दिले नाही. शास्त्रज्ञ अतिसंकीर्ण संशोधनात मग्न राहिले. उत्पादकतेबद्दल कुणी एवढा व्यवहार्य अभ्यास केला नाही. उदा. गव्हाच्या किंवा भाताच्या, टोमॅटोच्या अमुक एक जातीपासून एवढे उत्पन्न मिळाले किंवा पूर्वीपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असे सांगता येते परंतु तसे वनौषधीच्या बाबतीत कोणीही छातीठोकपणे सांगत नसल्यामुळे शेतकरी अधिक उदासीन झाला.


          वनौषधींची बाजारपेठ ही मुख्यतः जंगलतोड व मोठ्या प्रमाणात वनौषधी गोळा करण्यावर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम आदिवासींच्या भरवशावर सुरू आहे. आदिवासींकडून मातीमोल भावाने खरेदी करून सोन्याच्या भावात विकण्याचे प्रकार आजही राजरोसपणे घडत आहेत. ही गोष्ट अनेक परिसंवादांतून, व्याख्यानांतून मांडली जाते पण आदिवासींनी किंवा जंगलपट्टीत राहणाऱ्यांना या वनस्पतींच्या उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक प्रयत्न व्हायला पाहिजे तेवढे होत नाहीत.

      

    औषधी वनस्पती व वनस्पतीवर आधारित औषधी द्रव्ये या क्षेत्रात भारताला मोठी संधी उपलब्ध आहे. सौंदर्य प्रसाधने, आरोग्यवर्धक अन्न, सुगंधी द्रव्ये व तेले या क्षेत्रात भारतीय औषधी वनस्पतींना भरपूर वाव आहे. मागील दशकात औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून औषधी बनविणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन देखील दुपटीने वाढले आहे. अशातच जुन्या औषधांचे आधुनिक पद्धतीने संशोधन होत असल्यामुळे या औषधी वनस्पतींची मागणी सर्वत्र वाढली आहे आणि ही जंगल संपत्ती बाजारपेठेमध्ये कमी पडू लागली आहे. सर्वत्र सहजपणे मिळू शकणाऱ्या वनस्पतींना वगळून ज्या वनस्पतींना सतत मागणी आहे (उदा. अश्वगंधा, सोनामुखी) अशा वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांनी केल्यास फायदा होऊ शकतो व औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनादेखील मुबलक प्रमाणात मिळू शकतात. वनौषधी लागवडीसंबंधी व्यापक प्रमाणात योजना तयार कराव्यात. काही योजना भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या आहेतच त्यांचा वापर करून लागवड वाढविता येईल. त्यामुळे अनेक समस्या सोडविता येतील. पुढील काळात आयुर्वेदाची चांगली औषधे निर्माण होण्यासाठी आत्तापासूनच पावले उचलावीत. सांधिकपणे प्रयत्न व्हायला हवेत. १०-१२ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एका विचाराने ही शेती केली, त्यापासून उत्पन्न काढले व एकत्रितपणे प्रक्रिया केली तर वनौषधीचा व्यापार भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही किंवा आर्थिक चणचण जास्त भासू लागली तर कारखानदारांना खात्रीचा माल दिला तर योग्य दरही मिळेल फक्त त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे.


Bhartiya vanousadhi kshetra

      मी वनौषधी विषयांवर अनेक चर्चासत्रात भाग घेतला आहे, पण शेतकरी माहिती काढतात नंतर कुणी तरी चुकीची माहिती दिली की त्या वाटेलाही जात नाहीत. असे न करता योग्य माणसाकडून खात्रीची माहिती करून घ्या. खरेदीदाराशी संपर्क करून मगच योग्य तो निर्णय घ्या. प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांशी संपर्क ठेवा. मागे मला एका साबण उत्पादकाच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने बोलता बोलता सांगितले की, आम्हाला जावा-सिट्रोनेला, जोजोबा तेलाची खूप गरज असते. त्यासाठी आम्ही लागवड करणारे शेतकरी शोधतो. असे उत्पादक कारखानदार शोधा, त्यांच्याशी बोलणी करा म्हणजे पुढचा मार्ग सुकर होतो.


      औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी उस, कापूस अशा नगदी पिकांच्या तुलनेत कमी खर्च येतो व उत्पन्नाचे प्रमाणही जास्त असते. मात्र यासाठी योग्य जमिनीची निवड, योग्य हवामान, पुरेसा पाणी पुरवठा व लागवडीचे सुयोग्य तंत्र आवश्यक आहे. औषधी वनस्पतींची उपलब्धता वाढावी व त्यांच्यासंबंधी सर्व कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी भारत सरकारने औषधी वनस्पती बोर्डाची स्थापना केली आहे. या उद्देशानुसार औषधी वनस्पतींची लागवड त्यांच्या मालाच्या खरेदीची खात्री देणे व त्या मालाला योग्य भाव देणेस यासंबंधी हे बोर्ड व्यवस्था करणार आहे. या प्रस्तावित योजनेच्या खालील काँट्रॅक्ट शेतीमध्ये अश्वगंधा, अती, भुईआवळा, ब्राह्मी, चिरामा, गुडमार, जन्टामान्सी, कूथ, कुटली, मेकोय, सफेद मुसळी, पुष्कर मूळ, सर्पगंधा, शतावरी, वावडिंग, वत्सनाभ या औषधी वनस्पतींचा समावेश केला आहे. गरजू शेतकरी व या वनस्पतींचा वापर करू इच्छिणाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, औषधी वनस्पती बोर्ड, भारतीय औषध पद्धती व होमिओपॅथी विभाग, रेडक्रॉस सोसायटी बिल्डिंग, रेडक्रॉस रोड, नवी दिल्ली-११०००१ यांच्याशी संपर्क साधावा.

        

      वनौषधींची बाजारपेठ खूप मोठी आहे. गेल्या वर्षभरात जागतिक बाजारपेठेत आयुर्वेदिक वनौषधीची ४५३० कोटी रुपयांची उलाढाल झाली. यापैकी ३० टक्के व्यापार एकट्या युरोपशी झाला. केंद्रीय आरोग्य आणि वाणिज्य खात्याच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या औषधी वनस्पती प्रोत्साहन विभागाच्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. आयुर्वेदिक वनौषधी आपल्याही भूमीत तयार हावी यासाठी अमेरिका व युरोपमधील देश प्रयत्नशील आहेत. गेल्या वर्षी एक हजार एकशे सात कोटी रुपयांची केवळ रोपं भारतातून निर्यात झाली. त्यापैकी दोनशे एकोणीस कोटी रुपयांची रोपं युरोपमध्ये निर्यात केली गेली. निर्यातीमध्ये ९५ टक्के वाटा जंगली झाडांचा तर ५ टक्के मुद्दाम व्यापारासाठी लावलेल्या वनस्पतीचा होता. अॅलोपँथिक औषधांचे दुष्परिणाम होत असल्याचे आढळल्याने अनेक लोक आयुर्वेदिक औषधांकडे वळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 


   या अहवालानुसार पुढील दहा वर्षांच्या काळात ऐशी टक्के लोक आयुर्वेदिक उपचारांकडे वळतील. आयुर्वेदिक उत्पादनांच्या जागतिक व्यापारात सध्या चीन भारताच्या पुढे आहे. पारंपरिक चिनी उपचार पद्धतीत पाच हजार वनौषधींचा (जडीबुटी) वापर केला जातो. तर भारतीय आयुर्वेदाला सात हजार वनौषधी (जडीबुटी) ज्ञात आहेत. जागतिक व्यापारात चीनला सत्तावीस टक्के वाटा मिळविता आला. भारतात सध्या साडेचार लाख वैद्य आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करतात. भारतात आयुर्वेदाबाबत अजूनही पुरेशी जागृती झालेली नाही. याचीही अहवालात नोंद करण्यात आली आहे. या क्षेत्रातील भारतीय प्राचीन वैभवशाली परंपरेचे केवळ गोडवे गाण्यापेक्षा वनौषधी व आयुर्वेदिक औषधीविषयक संशोधनाला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. औषधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना व वनौषधी उत्पादनांसाठी उद्योजकांना या क्षेत्रात प्रचंड वाव आहे. त्याचा यथायोग्य फायदा उचलावा अशी अपेक्षा आहे. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...