केळी लागवड ते प्रक्रिया उद्योगBanana plantation to processing industryअधिक उत्पन्नासाठी प्रक्रिया उद्योग करा !Start a processing industry for more income
केळी हे सर्वांच्या आवडीचे आणि पौष्टिक असे फळ आहे. महाराष्ट्रात सर्वत्र घेण्यात येणारे हे पीक असून यापासून अनेक उपपदार्थ तयार करता येतात. शेतकऱ्यांनी केळी लागवड करून केळी पिकाचे उत्पन्न घेण्याबरोबर त्यापासून विविध उत्पादने तयार करण्याचा विचार करायला हवा. यामुळे मूल्यवर्धनाचा लाभ मिळून उत्पन्नामध्ये भरीव वाढ होईल. यादृष्टीने केळी लागवड ते त्यापासून विविध उत्पादने तयार कसे करता येतील याविषयी उपयुक्त माहितीचा ब्लॉग...
केळी हे सतत झपाट्याने वाढणारे फळपीक आहे. निसर्गाच्या अत्यंत बारीकसारीक सूक्ष्म दैनंदिन बदलांचा त्याच्या वाढीवर परिणाम होत असतो. केळीचा शास्त्रीय परिचय करून द्यायचा असेल तर असे म्हणता येईल की ही एकदलीय वनस्पती आहे. तिला मुसा पॅराडिसिका या आंतरराष्ट्रीय नावाने ओळखले जाते. मात्र आपल्या देशात केळीला अनेक नावांनी ओळखले जाते. इंग्रजीत हिला बनाना असे म्हणतात. तर खाद्य निर्मिती करणाऱ्या केळयांना इंग्रजीत प्लेनटेन अशी संज्ञा आहे. यात आपल्याकडे राजेळी, वनकेळी यांचा समावेश आहे. केवळ पानेच उपयोगात येणाऱ्या व शोभेच्या केळीला वनकेळ असे नाव दिले गेलेले आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसानी आपल्या भागात या पिकाला अनेक निरनिराळी नावे देण्यात सर्वात जास्त मजल मारलेली आहे.
जगप्रख्यात केळीतज्ज्ञ डॉ. सिमंड यांच्या मते केळीचे मूळस्थान आशिया असून त्यातल्या आसाम-थायलंडच्या भागात केळीच्या विविध जाती लागवडीखाली होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने केव्हेडिशी, ग्रोमिशेल, रोबुस्टासारख्या जातीचा समावेश होता. त्यामुळे याच जाती मूळच्या मलेशियाच्या ठरल्या आणि तेथून त्यांचा प्रसार ब्रह्मदेशामार्गे भारतात झाला. तथापि केळीची लागवड आपल्यापेक्षा परदेशी तंत्राने त्या त्या भागात अत्यंत झपाट्याने विकसित होत गेल्याचा पूर्वेतिहास सांगतो. अनादिकालापासून आपल्या पूर्वजांना या केळीची ओळख झाली होती. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या हिंदुस्थानातील रामायण-महाभारतासारख्या ग्रंथांचे देता येईल. या धार्मिक आणि पौराणिक ग्रंथ पोथीपुराणांत केळीचे महत्त्व वर्णिले आहे. यात केळी हे मोक्षाचे माहेरघर आहे असे दाखले देऊन नमूद केलेले आहे.
केळी हे मनुष्यप्राण्यास प्राचीन काळापासून माहिती असलेले फळ आहे. वर्षभर बाजारात उपलब्ध होणारे, गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत परवडणारे, लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे व अल्प किमतीत मिळणारे फळ आहे. म्हणून केळीस अल्पमोली बहुगुणी फळ संबोधल्यास वावगे ठरणार नाही. केळीचे झाड मांगल्याचे तसेच शांततेचे एक प्रतीक म्हणून संबोधले जाते. केळीस मोक्षाचे तसेच अमृताचे फळ असेही मानले जाते. केळीच्या फळापासून शरीरास आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात. तसेच संधिवात, मूत्रपिंड, दाह, आमांश, हृदयविकार, पोटातील कृमी आणि जंत इत्यादी विकारांवर गुणकारी आहे. जगामध्ये खाद्यपदार्थात तांदूळ, गहू आणि दुधानंतर केळीचा समावेश होतो. केळीचे खोड व पाने गार (थंड) असल्यामुळे ज्याप्रमाणे औदुंबराच्या झाडाचे पाणी ग्राईप वॉटरमध्ये वापरून लहान मुलांचे दातदुखी व पोटदुखी थांबविण्यासाठी याचा उपयोग होतो.
केळीच्या खोडाचे व पानांचे पाणी मूत्रपिंडाचे विकार यावर औषधी म्हणून हमखास उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे केळीच्या खोडातील पाणी मुतखडा झाल्यावर सारक म्हणून वापरल्यास लघवीद्वारे विष बाहेर काढण्याचे कार्य करते. पापड तयार करताना पीठ भिजविण्यासाठी केळीचे पाणी वापरतात. तसेच ते अनेक विकारांवर गुणकारी आहे. केळीत कर्बयुक्त पदार्थांचा भरपूर पुरवठा असल्यामुळे शरीराला ऊर्जा पुरवणारे केळ हे उत्तम अन्न आहे. केळीच्या फळात शर्करा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, चुना, लोह, स्फुरद ही खनिजे जातीनिहाय कमी जास्त प्रमाणात दिसून येतात. कच्च्या फळात टॅनिन आणि स्टार्च अधिक असून केळ पिकताना त्यातील साखरेचे प्रमाण वाढीस लागते. केळ्यांमध्ये बहुधा क आणि ब-६ ही जीवनसत्त्वे असतात. शिजवून खाण्याच्या केळांत अ जीवनसत्त्वाचे प्रमाण चांगले असते. इतर फळांच्या मानाने केळी हे संतुलित आहार पुरविणारे अन्न आहे. एकर एकर केळीच्या क्षेत्रातून मिळणाऱ्या फलोत्पादनातून १५ कोटी कॅलरी एवढी ऊर्जा मिळू शकते. अशा प्रकारे आयुर्वेदिक आणि औषधी उपयुक्तता दर्शविणारी केळी ही अत्यंत गुणकारी आहे. अशा प्रकारे आपल्याकडील पिकलेली पिवळी धमक केळी म्हणजे अन्नद्रव्यांची जणू काही सोन्याची खाण आहे. केळीचे अनेक उपयोग मनुष्यप्राण्यांना वरदायी ठरणारे आहेत.
महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, नांदेड, अहमदनगर, पुणे, सोलापूर, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये केळीचे पीक घेतले जाते. केळी हे जळगाव जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. या जिल्ह्याची अर्थव्यवस्था केळी आणि कापूस या नगदी पिकांवर अवलंबून आहे. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाखाली एकूण ४८ हजार क्षेत्र आहे. रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भडगाव, जळगाव, जामनेर हे केळी पिकविण्यात प्रमुख तालुके आहेत. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हे भाग केळी लागवडीत आणि उत्पादकतेच्या बाबतीत आघाडीवर आहेत. यानंतर मराठवाड्याच्या परभणी, नांदेड, वसमत या भागात लागवड आढळते. ज्या शेतकऱ्यांनी ग्रैंड नैन या जातीची टिश्यू कल्चर केळीची रोपे ठिबक सिंचन तंत्र यावर लागवड केली. त्यांनी हेक्टरी ७५ ते १०० मे./टन उत्पादन मिळविलेले आहे. महाराष्ट्र राज्यात केळी पिकास फारसे अनुकूल हवामान नसतानासुद्धा जास्तीची उत्पादकता येते. या यशात उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत केळी संशोधन केंद्राचा फार मोठा वाटा आहे.
केळी हे उष्ण कटिबंधीय पीक असून समशीतोष्ण हवामानातसुद्धा केळीचे पीक चांगले येते. केळीसाठी उष्ण व दमट हवामान असावे. केळीच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी १५ ते ४० अंश सें.ग्रे. तापमान उपयुक्त असते. तापमान १० अंश सें. च्या खाली गेल्यास किंवा ४० अंश सें. च्यावर गेल्यास केळीच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. केळी पिकासाठी सापेक्ष आर्द्रता साधारणतः ६५ ते ७५ टक्के असावी. उन्हाळ्यात वाऱ्याचा वेग ताशी ४० कि. मी. पेक्षा जास्त असल्यास झाडाची पाने फाटतात, मोडतात आणि घड कोलमडून पडतात आणि पर्यायाने केळी पिकाचे फार नुकसान होते. केळी हे उष्ण आणि दमट हवामानात जन्माला आलेले पीक असल्याने, अति थंडी किंवा अगदीच जास्त तापमान केळी पिकाला सहन होत नाही. केळीसाठी सदैव हवामानाची वास्तवता ही उष्ण आणि दमट असावी हे जरी खरे असले तरीसुद्धा काहीही करून तापमान १२ अंशांपेक्षा खाली नसावे आणि ३८ अंशापेक्षा जास्तही नसावे हाच केळी पीक वाढीतला महत्त्वाचा दुवा आहे. या बदलत्या तापमानाला नियंत्रित करण्यासाठी बहुधा नियमित पाणी पुरवठा, स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर मोकळी हवा आणि मध्यम आर्द्रता निर्माण करणे गरजेचे ठरते.
ज्या जमिनीमध्ये केळी लागवड करायची आहे त्या जमिनीच्या प्रतीनुसार केळीच्या मुळांचा विकास होत असतो. झाडास किती कार्यक्षम मुळ्या आहेत त्यावर झाडाचा विकास व उत्पादन अवलंबून असते. साहजिकच ज्या झाडांच्या मुळ्या चांगल्या कार्यक्षम राहतात तितका झाडांचा चांगला विकास आणि तेवढे चांगले उत्पादन ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची असते. केळीचे पीक हे जमिनीच्या बाबतीत फारच चोखंदळ असते. त्यामुळे केळी लावण्यापूर्वी जमिनीची निवडसुद्धा चोखंदळपणे करावी. केळी लागवडीसाठी जमीन हलक्या ते मध्यम प्रतीची, पाण्याचा उत्तम निचरा असलेली, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, भुसभुशीत, पोयट्याची आणि जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक (जमिनीचा सामू) ६ ते ८ च्या दरम्यान असलेली निवडावी. क्षारयुक्त, चोपण, पाणथळ किंवा भरकळीच्या जमिनी केळी लागवडीस अयोग्य असतात. केळीची मुळे ही अत्यंत नाजूक, मांसल आणि संवेदनशील असल्याने जमिनीची पूर्वमशागत जितकी उत्तमरीत्या करता येईल तेवढी करून घ्यावी. त्यासाठी जमीन पल्टी नांगराने नांगरून घ्यावी. त्यानंतर तेथील ढेकळे बारीक करून घेण्यासाठी तव्याचा कुळव, फळी अथवा रीजरचा वापर आवश्यकतेनुसार करून घ्यावा. जेणेकरून नांगरटीतील ढेकळे बारीक भुगा होतील. नंतर जमीन आडवी-उभी कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. त्यानंतर हराळी लव्हाळीसारख्या बारमाही तणांच्या काशा अथवा गाठी जर कुळवणीतून वर आलेल्या दिसल्या तर त्या गोळा करून नष्ट करून टाकाव्यात.
केळीच्या पिकाच्या अनेक सुधारित जाती आहेत. त्यात आता उतीसंवर्धित तंत्राचा उपयोग करून पैदाशीत वाणांचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्यामध्ये केळीच्या ग्रैंड नैन (जी-नाईन) या जातीचा समावेश होतो. साधारणतः २.० ते २.५ मीटर उंच असलेली, दर्जेदार फळे, कमी कालावधीची, प्रत्येक घडास ८ ते १४ फण्या व १६० ते १८० केळीची संख्या पाने आकाराने मोठी असून लांब असतात. घडाचे वजन योग्य मशागत केल्यास २५ ते ३० किलोग्रॅम दरम्यान मिळते. निर्यातीस योग्य. फळ काळात केळीच्या झाडांना बांबूचा आधार द्यावा लागतो. ही जात बुटकी आहे. बुटकेपणामुळे ही जात सोसाट्याच्या वाऱ्यातही तग धरून वाढणारी आहे. ही जात इतर जातीपेक्षा ३० टक्के अधिक उत्पादन देत असल्यामुळे हिची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या जातीच्या बुटकेपणामुळे पानांचा ढालीसारखा पसारा २० टक्के कमी असल्यामुळे हेक्टरी या झाडांची संख्या आपणाला जास्त बसविता येते. साहजिकच उत्पन्नही वाढते. या जातीचा घडाचा दांडा थोडासा मोठा असतो. ही जात निर्यातयोग्य फळ निर्मितीसाठी योग्य आहे.
केळीची अभिवृद्धी अर्थात पुनरुत्पादन पद्धती होय. या पद्धती बहुधा दोन प्रकारच्या असून जास्त करून केळी लागवडीत दिसून येतात. त्यातली पहिली प्रचलित पद्धत म्हणजे गड्यापासून (कंदापासून) लागवड करणे आणि दुसरी नवीन उती संवर्धित (टिश्यू कल्चर) पद्धतीच्या तंत्राने रोपे तयार करून केळीची नगदी लागवड वृध्दिंगत करणे होय. काहीही झालं तरी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार केळीच्या लागवडीतही शुद्ध आणि खात्रीचे बेणे मिळविणे अत्यंत गरजेचे असते. केळी पिकाची लागवड साधारणतः जून, जुलै व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत या दोन वेळेस महाराष्ट्रात लागवड केली जाते.
केळीची लागवड रीजरच्या साह्याने योग्य अंतरावर खोल सऱ्या पाडून त्यामध्ये खड्डे घेऊन लागवड करावी. किंवा योग्य अंतरावर ०.५०x०.५०x०.५० मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये माती व शेणखत यांच्या मिश्रणाने भरून घेऊन लागवड करावी. केळीची लागवड प्रामुख्याने चौरस पद्धत किवा जोड ओळ पद्धतीने केली जाते. सर्वसाधारण बुटक्या आणि पानांचा कमी पसारा असणाऱ्या जातीमध्ये १.५ मी. १.५ किंवा १.३५ १.५० मी. तर उंच वाढणाऱ्या ज्ञातीची १.८ १.८ मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपासून सुरुवातीचे सहा महिने केळी वाढीसाठी अत्यंत नाजूक असतात. या कालावधीत केळी बागेची आंतरमशागत करून शेत तणविरहित आणि जमीन भुसभुशीत ठेवावी. मोठी भर जी असते ती ट्रॅक्टरच्या पॉवर टीलरने बरेच शेतकरी देतात. ही भर सऱ्या वरंब्या फोडून सहजपणे करता येते. शिवाय त्यात ताग किंवा धेंचा यासारखी हिरवळीची पिके तिथे असतील तर ती पॉवर टिलरच्या साह्याने बागेत गाडता येतात. ही कामे बैल अवजारे वापरूनही करता येतात. आंतरमशागतीमुळे बागेत तणे वाढत नाहीत तसेच झाडांची वाढ जोमदार होते. कारण जमिनीत पाण्याचे व हवेचे संतुलन योग्य राखले जाते. त्यानंतर वरंबे बांधून झाडास भर द्यावी. दर ४ ते ६ आठवड्यानी हलकी टिचणी करून किंवा खोदून आणखी भर द्यावी. उन्हाळ्यात सुरुवातीस बागेची चांगली टिचणी करून बांधणी करावी किंवा झाडास भर द्यावी.
केळीच्या जोमदार वाढीसाठी आणि अधिक उत्पन्न मिळण्यासाठी पाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. केळी पिकास पावसाळ्यात मोठा खंड पडल्यास, पिकाच्या वाढीनुसार आणि गरजेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ७ ते १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने केळी पिकास पाणी द्यावे. केळी निसवत (घड घेण्याचा काळ) असताना बागेस पाण्याचा ताण पडल्यास घड सटकतो किंवा मोडतो. म्हणून या काळात बागेला पाणी काळजीपूर्वक द्यावे. केळीची साठ टक्के मुळे जमिनीच्या वरच्या ३० से.मी.च्या स्तरामध्ये असतात आणि अत्यंत नाजूक लुसलुशीत असल्यामुळे सतत वरचा पृष्ठभाग ओला व वाफसा स्थितीत असणे गरजेचे असते. त्यासाठी ठिबक सिंचनाच्या प्रत्येक ओळीला एक याप्रमाणे ५ फुटांवर किंवा ७ फुटांवर नळी मांडावी, नळीवर भारी जमिनीसीठी दर २.५ फुटांवर आणि मध्यम जमिनीसाठी २ फुटांवर हलक्या व मध्यम जमिनीसाठी दीड फूट अंतरावर २ ते ४ लिटर प्रतितास प्रवाही क्षमतेचा ड्रिपर लावावा किंवा पाण्यात क्षार नसल्यास पाणी विहिरीचे किंवा ट्यूबवेलचे असल्यास जैन टर्बो अॅक्युरा इनलाईन सिस्टिम वापरावी. संचाला गरजेप्रमाणे सर्व फिल्टर बसवावे. त्याचप्रमाणे फर्टिगेशन करण्यासाठी व्हेंचुरी किंवा १२० लिटर किंवा १६० लि. क्षमतेची खते देण्याची टाकी (फर्टिलायझर टैंक) बसवावी आणि रोपांच्या ओळीने संपूर्ण बेड ओला राहील या पद्धतीने पाणी द्यावे. हवामानानुसार पाणी मात्र बदलते. तसेच जमिनीच्या प्रतवारीनुसारसुद्धा मात्रा बदलते. काळ्या जमिनीला कमी तर पांढऱ्या, पिवळ्या, चुनखडीयुक्त, खडकाळ जमिनीला गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते, केळीच्या पूर्ण वाढलेल्या झाडास २० ते २५ लिटर पाण्याची दररोज गरज आहे.
केळीसाठी वेळेवर, योग्य ती खते योग्य त्या मात्रेत देणे गरजेचे आहे. केळी पिकासाठी प्रतिझाड किमान १० किलो शेणखत, २०० ग्रॅम नत्र, ४० ग्रॅम स्फुरद आणि २०० ग्रॅम पालाश खताची आवश्यकता असते. अशी शिफारस असून लागवडीनंतर ३० दिवसांनी प्रतिझाड ८० ग्रॅम युरिया, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यावे. दुसरा हप्ता लागवडीनंतर ७५ दिवसांनी द्यावा. यात प्रतिझाड ८० ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी. प्रतिझाड ८० ग्रॅम युरिया लागवडीनंतर १२० दिवसांनी तिसरा हप्ता द्यावा. चौथा खताचा हप्ता हा लागवडीनंतर १६५ दिवसांनी द्यावा. यात प्रतिझाड ८० ग्रॅम युरिया व ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटेशची मात्र द्यावी. खताचा पाचवा ते सातवा हप्ता हा अनुक्रमे प्रतिझाड ४० ग्रॅम युरिया, ४० ग्रॅम युरिया अधिक ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा लागवडीनंतर २१०, २५५ आणि ३०० दिवसांनी द्यावा. खते मुळ्यांच्या कार्यकक्षेत ओळी करून द्यावीत आणि परत झाकावीत. खते वापसा असतानाच द्यावीत. अलीकडे खताची मात्रा ठिबक सिंचनाद्वारे दर आठवड्यास देतात. सुपर फॉस्फेट संपूर्ण मात्र जमिनीतून लागवडीच्या वेळेस किंवा १७ते २८ आठवड्या दरम्यान प्रतिझाड ६ ग्रॅम नत्र व ५ ग्रॅम पालाशची मात्रा द्यावी. २९ ते ४० आठवड्यापर्यंत प्रतिझाड २.५ ग्रॅम नत्र व ४ ग्रॅम पालाशची मात्र द्यावी. ४१ ते ४४ आठवड्याच्या दरम्यान प्रतिझाड ३ ग्रॅम पालाश द्यावे. ठिबक सिंचनातून खते देताना शक्य तेवढी काळजी घ्यावी, शेतात शेणखत शिफारशीत मात्रेत दिल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासल्यास फवारणीतून किंवा दाणेदार स्वरूपात द्यावीत.
केळी लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात अर्थात भर देण्यापूर्वी चार-पाच महिने आधी आपण तेथे नत्र स्थिर करणारी पिके उदा. सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग, वाटाणा ही पिके घ्यायला काहीच हरकत नाही. आणखी एक महत्त्वाची आंतरपीक पद्धतीतील बाब म्हणजे प्रत्येक भागात तिथल्या केळी उत्पादकाची निरनिराळी गरज असू शकते. आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आंतरपिकाचे बदल करणे गरजेचे असते. आपणाकडे कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची, वाल, घेवडा अशी पिके घेतली जातात. काही वेळा फुलझाडेसुद्धा घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने झेंडूची लागवड सर्वत्र केळीत आढळून येते. काही भागात बटाटा, तर काही जागी हिरवळीचीच पिके उदा. ताग, धेंचा, सोयाबीन घेऊन ती गाडली जातात. खरं म्हणजे टिश्यू कल्चर पद्धतीने केळीची लागवड केली असेल तर त्या शेतात किंवा शेताच्या कडेने अथवा आसपाससुद्धा पपईसारखे पीक घेऊ नये. त्याचबरोबर भोपळा, कारली, दोडकी, वांगी, भेंडी, गिलके, कलिंगडे, कोहळे आदी पिके घेण्याचे टाळावे.
केळी पिकात कीड व रोग आढळून येतात त्यात मावा ही कीड पिवळसर रंगाची असून पानांच्या खालच्या बाजूस आढळून येते. केळी पिकाला माव्यापासून सरळ नुकसान होत नाही परंतु पर्णगुच्छ (बंची टॉप) या विषाणूजन्य रोगाच्या विषाणूसाठी वाहक म्हणून मावा कीड काम करते. त्यामुळे या किडीमुळे खूप नुकसान होते. या किडीमुळे केळीची पाने छोटी व्हायला लागतात. काही वेळा पिवळसर होत जातात आणि वळून आतल्या आत जातात. प्रसंगी वाळतात. साहजिकच उत्पादित केळीच्या घडांवर (वाढीवर) त्यांचा परिणाम होतो. या किडीबरोबरच फुलकिडे, कंद पोखरणारा भुंगा, खोड पोखरणारा भुगा, सूत्रकृमी, पानातील रस शोषणारी किड, पाने खाणारी अळी, सुरवंट अळी यासारख्या किडी आढळून येतात. यावर नियंत्रण करणे शक्य आहे. केळी बागेला बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोग आढळून येतात. या किडी व रोगाचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करता येते. कीड व रोगाबरोबरच केळी पिकात तणांचा बंदोबस्त केला नाही तर तेथे केळी बागेत पाणी, सूर्यप्रकाश आणि खाद्य घेण्याची बाबतीत दोघांची चढाओढ सुरू होते. तणे जर वाढली तर रोगराईही वाढते. किडी तणांवर बसतात. त्यामुळे मुख्य केळी पिकाला हानी पोहचते आणि अशा उपद्रवी कीटकांचे साम्राज्य वाढत जाते. म्हणून वेळीच तणांच्या वाढीला आवर घालणे गरजेचे असते. त्यामुळे केळीची लागवड केली तर पहिले ३-४ महिने केळीची बाग तणविरहित ठेवावी. त्यानंतर केळी बागेच्या पानांच्या पसाऱ्यामुळे तणांचा फारसा त्रास होत नाही. कुळवाच्या पाळ्या दिल्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो.
केळीघड तयार होण्याचा कालावधी हा केळीचा वाण, हंगाम आणि व्यवस्थापन यावर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे घड निसवल्यानंतर ११० ते १४० दिवसांत घड काढणीस तयार होतो. बसराई केळीचे लोंगर ७ ते १२ महिन्यात बाहेर पडतात. वाल्हा जातीत ६ ते ७ महिन्यांनी बाहेर पडतात. लाल वेलची, सफेद वेलची आणि मुठेळी जातीत ९ ते १२ महिन्यांनी लोगर बाहेर पडतात, पक्व घडातील फळांचा रंग गर्द हिरवा जाऊन तो फिक्कट हिरवा होतो. फळावरील शिरा जाऊन त्यांना गोलाई येते. अशा वेळी घडांची काढणी करावी. पूर्ण पक्व झालेला घड हा स्थानिक बाजारपेठेसाठी काढणी करावी आणि जर लांबच्या बाजारपेठेसाठी केळी पाठवायची असेल तर घड ७५ ते ८० टक्के पक्व झालेला घड काढावा. जर घडांची साठवण करावयाची असल्यास प्रथम घड स्वच्छ पाण्याने धुऊन ०.१ टक्के कार्बण्डायझिम अधिक १२ टक्के मेणांच्या द्रावणात बुडवावा किंवा घडातील फण्यावर संस्करण करून ते खोक्यात पैकिंग करावे, अशा पेट्या १४ अंश से. ग्रे. तापमानात ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता असलेल्या शीतगृहात २० ते २५ दिवसांपर्यंत चांगले राहू शकतात.
प्रक्रिया :- अन्नप्रक्रिया शाखेतील संशोधनामुळे सध्या केळीपासून विविध पदार्थ बनविणे शक्य झाले आहे. केळीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार अभ्यास करून त्याद्वारे पावडर, रस व दुग्ध पेये तयार केली जातात. जगात केळीच्या प्रक्रियायुक्त उत्पादनात फिलिपाईन्स देश आघाडीवर असून सन २००८-०९ वर्षात या देशाने १६,९६४ टन चिप्स, १४७६ टन केचअप, २.२ टन केळीचे पीठ व पावडर इत्यादी उत्पादनांची निर्यात केली आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जपान, सौदी अरेबिया व संयुक्त अरब देश केळी प्रक्रियायुक्त पदार्थांचे मोठे आयातदार देश आहेत.
केळीपासून बनणारे प्रक्रियायुक्त पदार्थ :-
अ) पिकलेल्या केळीपासून :- (१) गोठवलेली केळी, सुकेळी (२) केळी पल्प, (३) केळी पावडर, (४) केळी ज्यूस, (५) स्क्वॅश, (६) वाईन, (७) कॅन्डी, (८) फूटबार, (९) टॉफी, (१०) जॅम व जेली, (११) स्लायसेस, (१२) मिल्क शेक, (१३) विनेगार, (१४) आरटीएस पेय.
ब) कच्च्या केळीपासून (१) चिप्स, (२) पीठ, (३) सॉस, (४) लोणचे, (५) स्टार्च.
क) इतर मूल्यवर्धित उत्पादने : (१) पानांपासून तयार केलेले कप व प्लेट (२)खोडापासून स्टार्च (३) सालीपासून इथेनॉल, (४) फळांची भाजी, (५) पशुखाद्य (६) खोडापासून धागा, (७) खोडाच्या आतील पांढऱ्या दांड्यापासून कैण्डी व लोणची.
ड) इतर उत्पादनात मुख्य घटक म्हणून होणारा उपयोग:- (۹) आरोग्यवर्धक पेय, (२) बेबी फूड, (३) बिस्किट, (४) चपाती ब्रेड, (५) पंचामृत, (६) भजी व वहा, (७) अप्सम.
अशा प्रकारे केळीपासून प्रक्रिया करता येते. मूल्यवर्धन करणाऱ्या केळीच्या पदार्थाला खूप मागणी असते.
सुकेळी :-
काही विशिष्ट जाती सुकेळी बनवायला योग्य असतात. ठाणे जिल्ह्यातील वसई भागातील राजेळी जातीच्या केळीची सुकेळी बनवतात त्याकरिता ताजी पूर्ण पक्च झालेली टणक फळे निवडून घेतात. अपक्व अगर जास्त झालेली फळे सुकेळी बनवायला अयोग्य असतात. निवडलेली फळे थंड पाण्यात चांगली धुतात. सदर केळी नंतर सोलतात, सोलताना केसाग्रातील टोके शाबूत ठेवतात. नंतर ही फळे उभी चिरून त्याचे सरळ २ भाग करतात किंवा आडवी कापून त्याचे काप करतात. सोलून कापलेली फळे ट्रेवर नीट लावून ते ट्रे धुरी देण्याच्या खोलीत अगर कपाटात ठेवतात. ४५ किलो केळींना ११५ ग्रॅम गंधक पुरा होतो. ही केळी अर्ध्या तासापर्यंत गंधकाच्या धुरीत राहू देतात. धुरी देताना आर्द्रता राहावी म्हणून या ठिकाणी पाणी ठेवणे आवश्यक असते. या धुरीमुळे केळी टिकून राहण्यास मदत होते. केळींना आकर्षक सोनेरी पिवळी छटा येते. अशी धुरी दिलेली फळे सुकविण्याच्या जागेत ती १४० अंश फॅरनहिट एवढ्या उष्णतामानावर ठेवतात. या सुकविण्याच्या क्रियेच्या वेळी फळे दोनदा पलटावी लागतात. सुमारे १५ तासांनंतर उष्णतामान कमी करतात. सुकविण्याची ही क्रिया १२८ अंश फॅरनहिट एवढ्या उष्णतामानावर पूर्ण करतात. अशा रीतीने तयार झालेली सुकेळी उघड्यावर ठेवल्यास ती झटपट बिघडतात. त्याकरिता ती बंद काचेच्या बाटलीत किंवा पॉलिथिनच्या कागदात गुंडाळून ठेवतात.
केळीचे काप :
कच्च्या केळीचे काप तयार करण्याकरिता कोणत्याही जातीची कच्ची केळी निवडावीत. नंतर ती केळी ओल्या फडक्याने पुसून घ्यावीत. साल काढल्यानंतर केळीची दोन्ही बाजूंची टोके चाकूने कापून नंतर त्याचे काप करावेत. हे काप स्टेनलेस स्टीलच्या चाकूने करावेत अन्यथा साध्या चाकूने केळीचे काप काळे पडतात. हे काप पिंगट पडू नयेत म्हणून ०.१ टक्का सायट्रिक अॅसिडच्या द्रावणात किंवा टारटारीक आम्ल द्रावणात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हे काप त्या द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवावेत. नंतर हे काप बांबूच्या ट्रेवर उन्हात पसरावेत त्यानंतर त्या कापांना गंधकाची धुरी द्यावी. बंद खोलीत गंधकाची धुरी देण्याकरिता तासभर हे ट्रे बंद खोलीत ठेवावेत. ०.५ तोळा गंधक जाळून ही धुरी केळीच्या कापांना द्यावी. नंतर हे काप एक तर उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवावेत. काप वाळवतांना बाहेरील कोणत्याही ओलाव्याचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी. होम ड्रायरमधील उष्णतामान १४० अंश ते १४५ अंश फॅ. ठेवावे. वाळलेले काप बटाट्याच्या कापासारखे तेलात तळून खातात किंवा वाळलेले काप दळून त्याचे पीठ तयार करतात. है पीठ मव्हाच्या पिठातसुद्धा मिसळतात.
साखरेच्या पाकातील सीलबंद डब्यातील केळीचे काप :
चांगल्या जातीच्या पिकलेल्या केळीचे काप साखरेच्या पाकात घालून हवाबंद डब्यात साठवता येतात. यासाठी चांगली पिकलेली (जास्त नको) केळी याकरिता निवडून त्यांची साल काढून त्याचे स्टेनलेस स्टीलच्या चाकूने काप करावेत. २५ ते ३० टक्के साखरेचा पाक व त्यात २ टक्के आम्लतेचे द्रावण टाकावे. १ कप साखर, ३ कप पाण्यात विरघळून त्यात १५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. मिश्रण उकळेपर्यंत तापवून नंतर चांगले गाळून घ्यावे. १ पौड कॅनमध्ये १२ ते १३ औस केळीचे काप भरावेत, त्यावर वरीलप्रमाणे साखरेचा गरम काप डब्याच्या वरच्या काठापासून १/४ इंच अंतर सोडून भरावा, त्यानंतर असे भरलेले डबे गरम पाण्याच्या वर १ ते १.५ इंच असावा. पाकातील हवा निघून जाण्याकरिता ही प्रक्रिया करावी लागते. त्यानंतर ते डबे काढून कॅन सीलर मशीनच्या साह्याने सील करावेत. ते सील केलेले कॅन निर्जंतूक करण्याकरिता प्रेशर कुकरमध्ये २० ते २५ मिनिटे ठेवावेत. त्यानंतर ते डबे थंड पाण्यात ठेवावेत. याखेरीज तामिळनाडू राज्यात पंचामृत हे डोंगरी केळीपासून बनवतात. गूळ, साखर, मनुका यापासून केळीचा जाम बनवितात. त्यालाच पंचामृतम म्हणतात. भारतातल्या देवळांमध्ये हा पदार्थ वेगवेगळ्या आकारांच्या डब्यांमध्ये मिळतो.
निर्यातीकरिता केळीचे टिकाऊ पदार्थ :
जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात केळी पिकविणाऱ्या देशांत केळीचे विविध टिकाऊ पदार्थ तयार करून ते निर्यात केले जातात, खालील तक्त्यात केळीपासून बनविलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची यादी दिलेली आहे.
१) पुरी पिकलेल्या केळीपासून बनवतात
२) डबाबंद काप पिकलेल्या केळीपासून बनवतात
३) सुकेळी ही पिकलेली केळी सोलून, वाळवून बनवतात
४) केळीचे पीठ ही कच्चा केळी वाळवून बनवतात
५) गोठविलेली केळी ही पिकलेली केळी पुरी वाळवून बनवतात
६) काचऱ्या या कच्च्या केळीचे काप वाळवून बनवतात.
याखेरीज केळीपासून रस, जाम, गोठविलेले काप, व्हिनेगर व अल्कोहोलिक पेय तयार करतात. १९८३ मध्ये होण्डुरास या केळी पिकवणाऱ्या देशाने ८००० टन केळीची पुरी व १००० टन हवाबंद केळीचे काप याची निर्यात केली होती.
केळीची पुरी :-
केळीपासून तयार केलेली पुरी वर्षभर टिकते व तिचा वापर विविध उपपदार्थ तयार करण्यासाठी करू शकतो. उदा. रस, पावडर, दुग्धपेय इत्यादी केळीचा गर एकजीव करून त्यास उष्णतेची प्रक्रिया देतात व नंतर त्याची पुरी बनवितात. निर्जंतूक पिशवीत पॅकिंग करून हा पदार्थ वर्षभर व्यवस्थित ठेवता येतो.
स्टार्च :-
भारतात जवळजवळ १९९७ मध्ये केळीच्या खोडापासून स्टार्च बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यात यश आले नाही. घड काढल्यापासून २ दिवसांच्या आत खोडापासून स्टार्च काढला पाहिजे नाही तर त्यातील स्टार्चचे प्रमाण झपाट्याने कमी होते. केळी निर्यात करणाऱ्या दक्षिण व मध्य अमेरिकन देशात हिरव्या कच्च्या केळीपासून स्टार्च करण्याचे कारखाने उभारण्यात आले आहे. बसराई जातीच्या कच्च्या केळीत ४८ टक्के स्टार्च असते.
केळीची पावडर :-
यासाठी पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर होतो. अशा पूर्ण पिकलेल्या फळाची साल काढून गर एकत्र मिसळतात व एकजीव करतात. त्यानंतर तीन मिनिटांपर्यंत १०० अंश सेंटिग्रेड इतक्या तापमानाची उष्णता प्रक्रिया देतात त्यामध्ये ७० पी. पी. एम. पोटॅशियम मेटाबायसल्फेट टाकून ड्रायरच्या साह्याने वाळवितात. उत्तम प्रतीच्या पावडरसाठी फ्रीज ड्रायरचा वापर करतात. पावडर तयार झाल्यावर कंटेनरमध्ये वा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये हवाबंद करून पॅकिंग करतात.
केळीचा रस :-
पूर्ण पिकलेल्या केळीचा गर एकजीव करून त्यास ३ मिनिटांपर्यंत १०० अंश से. तापमानाची उष्णता प्रक्रिया देतात. या गरामध्ये ०.२ टक्के पेक्टिन नावाचे विकर घालून ५ अंश से. तापमानात २ तास ठेवतात. यामुळे फळामधील अद्राव्य स्वरूपातील पेक्टिनचे रूपांतर द्राव्य पेक्टिनमध्ये होते. नंतर या मिश्रणातून दाबाच्या साह्याने अद्राव्य घटक वेगळे करतात व ८५ अंश से. तापमानास १५ मिनिटे ठेवतात, हा रस थंड करून ७० पीपीएम मेटाबायसल्फेट त्यात मिसतात. हा रस निर्जंतूक बाटल्यांमध्ये भरतात व १०० अंश तापमानात पुन्हा १५ मिनिटे उष्णता प्रक्रिया देतात.
जनावरांचे खाद्य :-
भारताबाहेर केळी पिकविणाऱ्या देशांत व भारतात चारा टंचाईच्या काळात केळीचे खोड व पाने जनावरांचे खाद्य म्हणून वापरतात. केळीच्या पिठाचा वापर शेळ्या, डुकरे, कोंबड्या यांना खाद्य म्हणून करतात. फिलिपाईन्समध्ये कच्च्या केळीचे उन्हात वाळविलेले काप जपान व तैवान देशांत निर्यात केले जातात. तेथे त्यांचा वापर जनावरांचे खाद्य म्हणून करतात. वाया गेलेल्या केळीचे सायलेज म्हणून साठविण्याची शिफारस करतात. कच्च्या वाया गेलेल्या केळीच्या फळांच्या थरावर कॅल्शियम कार्बाईड वापरतात. त्याला वरून प्लॅस्टिक कापडाने झाकतात. केळी नरम झाल्यास त्याचे तुकडे करून खड्ड्यात टाकून वरून काळ्या पॉलिथिनने झाकून माती टाकतात. सहा आठवड्यानंतर ते डुकरांना खाद्य म्हणून देतात.
अशा रीतीने केळीची काढणी करून त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ केल्यास मूल्यवर्धन होऊन प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली मागणी येईल.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment