निमातर्फे दोन दिवसीय स्टार्टअप समिटचे आयोजन
Two day startup summit organized by NIMA
NIMA SUMMIT NASHIK : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या पुढाकाराने २५ व २६ एप्रिल रोजी राज्यातील पहिल्या निमा स्टार्टअप समिटचे आयोजन करण्यात आले आहे.
या समिटच्या माध्यमातून २५० हून अधिक स्टार्टअप आणि शंभरहून अधिक महिला नवउद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चर्चासत्र व योजनांची माहिती
समिटमध्ये दोन दिवसात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्टार्टअप, उद्योग उभारणी, पेटंट नोंदणीची माहिती, बँका व शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याप्रसंगी सचिव निखिल पांचाल, सचिव मनिष रावल, उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, आशिष नहार, खजिनदार राजेंद्र वडनेरे, श्रीकांत पाटील हे उपस्थित होते.
निमा स्टार्टअप हब
निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे म्हणाले, निमा पॉवर, निमा बँक समिट, बीटूबी, निमा इंडेक्स यासारखे उपक्रम राबवून निमाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या निमा स्टार्टअप हबच्या माध्यमातून निमाने विविध स्तरावर मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले आहे.
महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध कार्यशाळा घेऊन महिला उद्योजकांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम जोमाने सुरू असून याच मोहिमेचा पुढील भाग म्हणून या समिटचे आयोजन करण्यात आले असल्याचे बेळे यांनी सांगितले. या समिटमध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजिका आणि स्टार्टअप यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही बेळे यांनी केले.
प्रदर्शन दालन उपलब्ध
ज्या स्टार्टअपने उत्पादकीय मॉडेल बनविले त्यांच्यासाठी समिटमध्ये प्रदर्शन दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्टार्टअपला आर्थिक सहाय्य देणे, गुंतवणूक करणे, तसेच जॉईंट वेंचर करणे, याबरोबरच फक्त अर्थसहाय्य देण्यासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील दोनशेहून अधिक गुंतवणूकदारांनाही पाचारण करण्यात येणार आहे.
समिटच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
समिटच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस निमाचे रवी श्यामदासानी, कैलास पाटील, राजेंद्र कोठावदे, किशोर राठी, सतीश कोठारी, संजय सोनवणे आदींसह स्टार्ट उपसमितीचे सदस्य व उद्योजक उपस्थित होते. राजेंद्र अहिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार निखिल पांचाळ यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा