name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

ससेपालन व्यवसाय : कमी खर्चात जास्त नफा देणारी सुवर्णसंधी | Rabbit Farming Business Guide


ससेपालन 
(Rabbit farming) 
कृषियोगचा ससेपालन (रॅबिट) विशेषांक

Sasepalan

 कृषियोग प्रकाशनाने अनेक चांगले ट्रेंडीग विषयावर विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्याच मालिकेतील ससेपालन (रॅबिट) विशेषांक होय. या अंकात ससेपालन संकल्पना, मांसासाठी ससेपालन, ससेपालन व्यवसायाची पूर्वतयारी, ससेपालनाचे फायदे, सशाच्या विविध जाती, सशाची शारीरिक रचना, सशेपालनाची पद्धत, सश्याचा आहार व खाद्य व्यवस्थापन, सशाचे प्रजनन, व्यावसायिक प्रजनन तक्ता दिला आहे. 


   या अंकात सश्याच्या पिल्लांचे संगोपन, प्रमुख आजार व उपाय, ससा आजारी पडू नये म्हणून प्रतिबंधक औषधे, कृषिवृत्त, रॅबीट फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स सोसायटीचे निवेदन, उत्पादन, ससेपालन करणारे फार्मर / ब्रिडर फार्म, ससेपालनाच्या यशकथा, महिला शेतकरी सौ. सिमा शिंदे यांचे सशेपालन, एका सशेपालकाचे अनुभव, सशेपालनात अतिमहत्वाच्या सूचना, सशेपालनाचा प्रकल्प अहवाल या सर्वांगीण विषयाचा अंतर्भाव या विशेषांकात केला आहे. 

Sasepalan

    आपल्या देशात लोकरीसाठी ससेपालन बऱ्याच वर्षापासून करतात. परंतु मांसासाठी ससेपालन हा एक नवीन व्यवसाय आहे. त्यासाठी घर, छत, शेड अशा लहान जागेत आयात केलेले ससेपालन करता येते. केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांत यशस्वीपणे हा व्यवसाय चालत असून महाराष्ट्रात देखील तो सहज करता येण्यासारखा आहे. 


   ससे हे शाकाहारी प्राणी असून ते हिरवा घास व थोडासा खुराक खाऊन त्याचे चांगल्या मांसात रुपांतर करण्याची क्षमता आहे. मांसासाठी ससेपालन छोट्या  प्रमाणात परसबागेत करतात. शहरात गच्चीवरही हा व्यवसाय करता येऊ शकतो. अतिशय निर्मळ स्वच्छ,  रंगीबेरंगी आणि मनमोहक ससे पाळले तर विक्रीची काळजी नाही. व्यापारासाठी स्पर्धा नाही. कोणत्याही प्रकारची शासकीय संमतीची, कागदपत्रांची आवश्यकता नाही.

Sasepalan

   सशाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. वैज्ञानिकांनी ह्या प्राण्यामधील महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. मुलाबाळांमध्ये प्रिय असलेला हा ससा दिसला व मनुष्य क्षणभर थांबला नाही हे होणे शक्य नाही. अंगावरचे केस, प्रेमळ स्वभाव, गुबगुबीत शरीरयष्टी लहान थोरांना आकर्षित करते. टुणकन उड्या मारतांना ससा बघितला की कितीही दडपण असले तरी आनंद होतो.


  ससेपालन या व्यवसायापासून कोणतीही दुर्गंधी आणि ध्वनीप्रदूषण होत नाही. जादा भांडवल, गुंतवणुकीची आवश्यकता नाही. कमी जागेमध्ये कमी परिश्रमाशिवाय हा व्यवसाय करता येतो. विजेची गरज लागत नाही. कमीत कमी खाद्याबरोबर, आजाराची काळजी नसते. विशेष म्हणजे कमीत कमी कालावधीत भरपूर कमाई मिळवून देणारा हा फायदेशीर व्यवसाय आहे. प्रथिनयुक्त सश्यांचे मांस हे महत्वपूर्ण आहाराची भूमिका बजावू शकतात.

Sasepalan

  सश्याचे मटन हे अधिक प्रोटीन, चरबी कमी व कोलेस्ट्रॉल आणि सोडिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे मटन अधिक रुचकर, पाचक व आरोग्यदायक असते. ब्रीडर ससे जाळीसहित खरेदी केल्यास ब्रीडर ससे ४५ दिवसाला एकदा ६ ते ७ याप्रमाणे वर्षापर्यंत निरंतरपणे ५ ते १५ पिल्ले देतात. ब्रीडर ससा पिल्लांना ३० दिवसांपर्यंत आपले दूध पाजतो. त्यानंतर पिल्ले खाद्य खाण्यास सुरूवात करतात. पिल्ले २ ते ४ महिन्यात अंदाजे अडीच ते साडेतीन किलो वजनाचे होते. मोठे झालेल्या व मांसानीयुक्त सुदृढ सशांना रू. १०० किलो प्रमाणे भाव मिळतो. 

Sasepalan

 मांसाकरिता सश्याच्या ग्रेजांईट, व्हाईट, जाईंट, सोविएत विचळ, युनीलँड व्हाईट या जाती चांगल्या आहेत. यातील वैशिष्ट्ये म्हणजे चांगली प्रजनन क्षमता, वाढीचे प्रमाण, दोन वितातील कमी अंतर, कमीत कमी गर्भकाळ, एका वर्षात अनेक पिल्ले देण्याची क्षमता, पिल्ले १२ आठवड्यात १.५ ते २.० किलोचे होऊन विक्रीस उपलब्ध करता येतात. अंदाजे ५० ब्रीडर ससे असल्यास प्रत्येक वेळी ४०० ते ५०० याप्रमाणे ८ वर्षापर्यंत पिल्ले देतात. चिकनमध्ये सशांपेक्षा ४ पटीपेक्षा अधिक चर्बी असते पण प्रथिन चिकनपेक्षा दुप्पट आहे. सशाचे मांस विश्वातच श्रेष्ठ आहे. 

Sasepalan

  एक किलो चिकन मध्ये ५०-५० टक्क्यांप्रमाणे हाडे आणि मांस मिळते. पण हे प्रमाण सशांमध्ये म्हणजे ३० टक्के हाडे आणि ७० टक्के मांस मिळते. हा व्यवसाय वृक्षस्वरूपात वाढला आहे. रशिया, जपान, जर्मनी, पोर्तुगाल, आखाती राष्ट्रांमध्ये सशांच्या मांसाला अतिशय मागणी आहे. ससेपालन व्यवसाय सरळ, सोपा, लाभदायक आणि परिश्रमाविना करता येणारा आहे. सशांचे मांस खाण्यावर कोणत्याही धर्माचे बंधन नाही. सशाची - शिकार पूर्वापार केली जात आहे. 


  ससेपालनातून वर्षभर उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतीपूरक किंवा एका स्वतंत्र - व्यवसाय म्हणूनही ससेपालन व्यवसायाकडे - पाहता येईल. ससेपालनातून अनेक - प्रकारची उत्पादने मिळू शकतात व त्यामुळे - अनेक प्रकारे उत्पन्न मिळू शकते. उदा. थंड हवेच्या ठिकाणी लोकरीसाठी ससेपालन, - केसाळ कातडीसाठी विविध जाती विकसित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मांस - उत्पादनासाठी मोठ्या आकाराच्या जाती - उपलब्ध आहेत. ससे औषधनिर्मिती, प्रयोगशाळेत तसेच शैक्षणिक कार्यासाठी वापरतात.

Sasepalan

  मादीची वर्षाकाठी अनेकदा विण्याची क्षमता असल्यामुळे वर्षभर मांस उत्पादन होऊन सतत आर्थिक लाभ घेणे शक्य आहे. सशाचे खाद्य म्हणून स्वस्त घास, गवत तसेच पालेभाज्यांचा टाकाऊ भाग इत्यादींचा सहज वापर करता येतो. आंबोण व हिरवा चारा किंवा वाळलेला चारा या दोन्ही प्रकारच्या खाद्यावर ससे पाळता येतात. चारा नसेल तेव्हा केवळ हिरव्या चाऱ्यावर ससे पाळता येतात. 


   ससा आकाराने लहान व हाताळण्यास सोपा असल्यामुळे मांस उत्पादन व विक्रीच्या दृष्टिने अत्यंत सोईस्कर आहे. सशापासून विविध रंगाची केसाळ कातडी मिळते. सशाच्या मांसात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला सुरक्षित मांस असे मानले जाते. ते अधिक प्रथिने व कमी चरबीमुळे तुलनात्मकदृष्ट्या अधिक सत्वयुक्त असते. लोकर उत्पादनासाठी स्वतंत्र जाती उपलब्ध आहेत.

Sasepalan

     पिले जन्मल्यानंतर सुमारे १ महिना आईच्या दुधावरच जगतात. त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी लागणारा खर्च कमी होतो. अत्यंत कमी जागेत ससे पाळता येतात. पिले वयाच्या केवळ १०-१२ आठवड्यातच कत्तलीस तयार होतात. कत्तलीनंतर सशांपासून केसाळ कातडी मिळते त्यापासून सुंदर उपयुक्त वस्तू तयार करता येतात. 

Sasepalan

   कृषियोगचा ससेपालन (रॅबिट) विशेषांक ४५ पानांचा असून  किंमत २५ रुपये आहे. या अंकाचे संपादक दीपक अहिरे असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे. विशेषांक हवा असल्यास पोस्टाने पाठविण्याची सोयही आहे. 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

केळी लागवड ते प्रक्रिया उद्योग (Banana plantation to processing industry)

केळी लागवड ते प्रक्रिया उद्योग
Banana plantation to processing industry
अधिक उत्पन्नासाठी प्रक्रिया उद्योग करा !
Start a processing industry for more income

Keli lagvad te prakriya udyog

    केळी हे सर्वांच्या आवडीचे आणि पौष्टिक असे फळ आहे. महाराष्ट्रात सर्वत्र घेण्यात येणारे हे पीक असून यापासून अनेक उपपदार्थ तयार करता येतात. शेतकऱ्यांनी केळी लागवड करून केळी पिकाचे उत्पन्न घेण्याबरोबर त्यापासून विविध उत्पादने तयार करण्याचा विचार करायला हवा. यामुळे मूल्यवर्धनाचा लाभ मिळून उत्पन्नामध्ये भरीव वाढ होईल. यादृष्टीने केळी लागवड ते त्यापासून विविध उत्पादने तयार कसे करता येतील याविषयी उपयुक्त माहितीचा ब्लॉग...


  केळी हे सतत झपाट्याने वाढणारे फळपीक आहे. निसर्गाच्या अत्यंत बारीकसारीक सूक्ष्म दैनंदिन बदलांचा त्याच्या वाढीवर परिणाम होत असतो. केळीचा शास्त्रीय परिचय करून द्यायचा असेल तर असे म्हणता येईल की ही एकदलीय वनस्पती आहे. तिला मुसा पॅराडिसिका या आंतरराष्ट्रीय नावाने ओळखले जाते. मात्र आपल्या देशात केळीला अनेक नावांनी ओळखले जाते. इंग्रजीत हिला बनाना असे म्हणतात. तर खाद्य निर्मिती करणाऱ्या केळयांना इंग्रजीत प्लेनटेन अशी संज्ञा आहे. यात आपल्याकडे राजेळी, वनकेळी यांचा समावेश आहे. केवळ पानेच उपयोगात येणाऱ्या व शोभेच्या केळीला वनकेळ असे नाव दिले गेलेले आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसानी आपल्या भागात या पिकाला अनेक निरनिराळी नावे देण्यात सर्वात जास्त मजल मारलेली आहे. 

Keli lagvad te prakriya udyog


      जगप्रख्यात केळीतज्ज्ञ डॉ. सिमंड यांच्या मते केळीचे मूळस्थान आशिया असून त्यातल्या आसाम-थायलंडच्या भागात केळीच्या विविध जाती लागवडीखाली होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने केव्हेडिशी, ग्रोमिशेल, रोबुस्टासारख्या जातीचा समावेश होता. त्यामुळे याच जाती मूळच्या मलेशियाच्या ठरल्या आणि तेथून त्यांचा प्रसार ब्रह्मदेशामार्गे भारतात झाला. तथापि केळीची लागवड आपल्यापेक्षा परदेशी तंत्राने त्या त्या भागात अत्यंत झपाट्याने विकसित होत गेल्याचा पूर्वेतिहास सांगतो. अनादिकालापासून आपल्या पूर्वजांना या केळीची ओळख झाली होती. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या हिंदुस्थानातील रामायण-महाभारतासारख्या ग्रंथांचे देता येईल. या धार्मिक आणि पौराणिक ग्रंथ पोथीपुराणांत केळीचे महत्त्व वर्णिले आहे. यात केळी हे मोक्षाचे माहेरघर आहे असे दाखले देऊन नमूद केलेले आहे.


        केळी हे मनुष्यप्राण्यास प्राचीन काळापासून माहिती असलेले फळ आहे. वर्षभर बाजारात उपलब्ध होणारे, गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत परवडणारे, लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे व अल्प किमतीत मिळणारे फळ आहे. म्हणून केळीस अल्पमोली बहुगुणी फळ संबोधल्यास वावगे ठरणार नाही. केळीचे झाड मांगल्याचे तसेच शांततेचे एक प्रतीक म्हणून संबोधले जाते. केळीस मोक्षाचे तसेच अमृताचे फळ असेही मानले जाते. केळीच्या फळापासून शरीरास आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात. तसेच संधिवात, मूत्रपिंड, दाह, आमांश, हृदयविकार, पोटातील कृमी आणि जंत इत्यादी विकारांवर गुणकारी आहे. जगामध्ये खाद्यपदार्थात तांदूळ, गहू आणि दुधानंतर केळीचा समावेश होतो. केळीचे खोड व पाने गार (थंड) असल्यामुळे ज्याप्रमाणे औदुंबराच्या झाडाचे पाणी ग्राईप वॉटरमध्ये वापरून लहान मुलांचे दातदुखी व पोटदुखी थांबविण्यासाठी याचा उपयोग होतो.


     केळीच्या खोडाचे व पानांचे पाणी मूत्रपिंडाचे विकार यावर औषधी म्हणून हमखास उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे केळीच्या खोडातील पाणी मुतखडा झाल्यावर सारक म्हणून वापरल्यास लघवीद्वारे विष बाहेर काढण्याचे कार्य करते. पापड तयार करताना पीठ भिजविण्यासाठी केळीचे पाणी वापरतात. तसेच ते अनेक विकारांवर गुणकारी आहे. केळीत कर्बयुक्त पदार्थांचा भरपूर पुरवठा असल्यामुळे शरीराला ऊर्जा पुरवणारे केळ हे उत्तम अन्न आहे. केळीच्या फळात शर्करा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, चुना, लोह, स्फुरद ही खनिजे जातीनिहाय कमी जास्त प्रमाणात दिसून येतात. कच्च्या फळात टॅनिन आणि स्टार्च अधिक असून केळ पिकताना त्यातील साखरेचे प्रमाण वाढीस लागते. केळ्यांमध्ये बहुधा क आणि ब-६ ही जीवनसत्त्वे असतात. शिजवून खाण्याच्या केळांत अ जीवनसत्त्वाचे प्रमाण चांगले असते. इतर फळांच्या मानाने केळी हे संतुलित आहार पुरविणारे अन्न आहे. एकर एकर केळीच्या क्षेत्रातून मिळणाऱ्या फलोत्पादनातून १५ कोटी कॅलरी एवढी ऊर्जा मिळू शकते. अशा प्रकारे आयुर्वेदिक आणि औषधी उपयुक्तता दर्शविणारी केळी ही अत्यंत गुणकारी आहे. अशा प्रकारे आपल्याकडील पिकलेली पिवळी धमक केळी म्हणजे अन्नद्रव्यांची जणू काही सोन्याची खाण आहे. केळीचे अनेक उपयोग मनुष्यप्राण्यांना वरदायी ठरणारे आहेत.

Keli lagvad te prakriya udyog

  महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, नांदेड, अहमदनगर, पुणे, सोलापूर, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये केळीचे पीक घेतले जाते. केळी हे जळगाव जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. या जिल्ह्याची अर्थव्यवस्था केळी आणि कापूस या नगदी पिकांवर अवलंबून आहे. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाखाली एकूण ४८ हजार क्षेत्र आहे. रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भडगाव, जळगाव, जामनेर हे केळी पिकविण्यात प्रमुख तालुके आहेत. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हे भाग केळी लागवडीत आणि उत्पादकतेच्या बाबतीत आघाडीवर आहेत. यानंतर मराठवाड्याच्या परभणी, नांदेड, वसमत या भागात लागवड आढळते. ज्या शेतकऱ्यांनी ग्रैंड नैन या जातीची टिश्यू कल्चर केळीची रोपे ठिबक सिंचन तंत्र यावर लागवड केली. त्यांनी हेक्टरी ७५ ते १०० मे./टन उत्पादन मिळविलेले आहे. महाराष्ट्र राज्यात केळी पिकास फारसे अनुकूल हवामान नसतानासुद्धा जास्तीची उत्पादकता येते. या यशात उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत केळी संशोधन केंद्राचा फार मोठा वाटा आहे.


   केळी हे उष्ण कटिबंधीय पीक असून समशीतोष्ण हवामानातसुद्धा केळीचे पीक चांगले येते. केळीसाठी उष्ण व दमट हवामान असावे. केळीच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी १५ ते ४० अंश सें.ग्रे. तापमान उपयुक्त असते. तापमान १० अंश सें. च्या खाली गेल्यास किंवा ४० अंश सें. च्यावर गेल्यास केळीच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. केळी पिकासाठी सापेक्ष आर्द्रता साधारणतः ६५ ते ७५ टक्के असावी. उन्हाळ्यात वाऱ्याचा वेग ताशी ४० कि. मी. पेक्षा जास्त असल्यास झाडाची पाने फाटतात, मोडतात आणि घड कोलमडून पडतात आणि पर्यायाने केळी पिकाचे फार नुकसान होते. केळी हे उष्ण आणि दमट हवामानात जन्माला आलेले पीक असल्याने, अति थंडी किंवा अगदीच जास्त तापमान केळी पिकाला सहन होत नाही. केळीसाठी सदैव हवामानाची वास्तवता ही उष्ण आणि दमट असावी हे जरी खरे असले तरीसुद्धा काहीही करून तापमान १२ अंशांपेक्षा खाली नसावे आणि ३८ अंशापेक्षा जास्तही नसावे हाच केळी पीक वाढीतला महत्त्वाचा दुवा आहे. या बदलत्या तापमानाला नियंत्रित करण्यासाठी बहुधा नियमित पाणी पुरवठा, स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर मोकळी हवा आणि मध्यम आर्द्रता निर्माण करणे गरजेचे ठरते.


  ज्या जमिनीमध्ये केळी लागवड करायची आहे त्या जमिनीच्या प्रतीनुसार केळीच्या मुळांचा विकास होत असतो. झाडास किती कार्यक्षम मुळ्या आहेत त्यावर झाडाचा विकास व उत्पादन अवलंबून असते. साहजिकच ज्या झाडांच्या मुळ्या चांगल्या कार्यक्षम राहतात तितका झाडांचा चांगला विकास आणि तेवढे चांगले उत्पादन ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची असते. केळीचे पीक हे जमिनीच्या बाबतीत फारच चोखंदळ असते. त्यामुळे केळी लावण्यापूर्वी जमिनीची निवडसुद्धा चोखंदळपणे करावी. केळी लागवडीसाठी जमीन हलक्या ते मध्यम प्रतीची, पाण्याचा उत्तम निचरा असलेली, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, भुसभुशीत, पोयट्याची आणि जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक (जमिनीचा सामू) ६ ते ८ च्या दरम्यान असलेली निवडावी. क्षारयुक्त, चोपण, पाणथळ किंवा भरकळीच्या जमिनी केळी लागवडीस अयोग्य असतात. केळीची मुळे ही अत्यंत नाजूक, मांसल आणि संवेदनशील असल्याने जमिनीची पूर्वमशागत जितकी उत्तमरीत्या करता येईल तेवढी करून घ्यावी. त्यासाठी जमीन पल्टी नांगराने नांगरून घ्यावी. त्यानंतर तेथील ढेकळे बारीक करून घेण्यासाठी तव्याचा कुळव, फळी अथवा रीजरचा वापर आवश्यकतेनुसार करून घ्यावा. जेणेकरून नांगरटीतील ढेकळे बारीक भुगा होतील. नंतर जमीन आडवी-उभी कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. त्यानंतर हराळी लव्हाळीसारख्या बारमाही तणांच्या काशा अथवा गाठी जर कुळवणीतून वर आलेल्या दिसल्या तर त्या गोळा करून नष्ट करून टाकाव्यात.

Keli lagvad te prakriya udyog


       केळीच्या पिकाच्या अनेक सुधारित जाती आहेत. त्यात आता उतीसंवर्धित तंत्राचा उपयोग करून पैदाशीत वाणांचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्यामध्ये केळीच्या ग्रैंड नैन (जी-नाईन) या जातीचा समावेश होतो. साधारणतः २.० ते २.५ मीटर उंच असलेली, दर्जेदार फळे, कमी कालावधीची, प्रत्येक घडास ८ ते १४ फण्या व १६० ते १८० केळीची संख्या पाने आकाराने मोठी असून लांब असतात. घडाचे वजन योग्य मशागत केल्यास २५ ते ३० किलोग्रॅम दरम्यान मिळते. निर्यातीस योग्य. फळ काळात केळीच्या झाडांना बांबूचा आधार द्यावा लागतो. ही जात बुटकी आहे. बुटकेपणामुळे ही जात सोसाट्याच्या वाऱ्यातही तग धरून वाढणारी आहे. ही जात इतर जातीपेक्षा ३० टक्के अधिक उत्पादन देत असल्यामुळे हिची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या जातीच्या बुटकेपणामुळे पानांचा ढालीसारखा पसारा २० टक्के कमी असल्यामुळे हेक्टरी या झाडांची संख्या आपणाला जास्त बसविता येते. साहजिकच उत्पन्नही वाढते. या जातीचा घडाचा दांडा थोडासा मोठा असतो. ही जात निर्यातयोग्य फळ निर्मितीसाठी योग्य आहे.


  केळीची अभिवृद्धी अर्थात पुनरुत्पादन पद्धती होय. या पद्धती बहुधा दोन प्रकारच्या असून जास्त करून केळी लागवडीत दिसून येतात. त्यातली पहिली प्रचलित पद्धत म्हणजे गड्यापासून (कंदापासून) लागवड करणे आणि दुसरी नवीन उती संवर्धित (टिश्यू कल्चर) पद्धतीच्या तंत्राने रोपे तयार करून केळीची नगदी लागवड वृध्दिंगत करणे होय. काहीही झालं तरी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार केळीच्या लागवडीतही शुद्ध आणि खात्रीचे बेणे मिळविणे अत्यंत गरजेचे असते. केळी पिकाची लागवड साधारणतः जून, जुलै व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत या दोन वेळेस महाराष्ट्रात लागवड केली जाते. 


  केळीची लागवड रीजरच्या साह्याने योग्य अंतरावर खोल सऱ्या पाडून त्यामध्ये खड्डे घेऊन लागवड करावी. किंवा योग्य अंतरावर ०.५०x०.५०x०.५० मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये माती व शेणखत यांच्या मिश्रणाने भरून घेऊन लागवड करावी. केळीची लागवड प्रामुख्याने चौरस पद्धत किवा जोड ओळ पद्धतीने केली जाते. सर्वसाधारण बुटक्या आणि पानांचा कमी पसारा असणाऱ्या जातीमध्ये १.५ मी. १.५ किंवा १.३५ १.५० मी. तर उंच वाढणाऱ्या ज्ञातीची १.८ १.८ मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपासून सुरुवातीचे सहा महिने केळी वाढीसाठी अत्यंत नाजूक असतात. या कालावधीत केळी बागेची आंतरमशागत करून शेत तणविरहित आणि जमीन भुसभुशीत ठेवावी. मोठी भर जी असते ती ट्रॅक्टरच्या पॉवर टीलरने बरेच शेतकरी देतात. ही भर सऱ्या वरंब्या फोडून सहजपणे करता येते. शिवाय त्यात ताग किंवा धेंचा यासारखी हिरवळीची पिके तिथे असतील तर ती पॉवर टिलरच्या साह्याने बागेत गाडता येतात. ही कामे बैल अवजारे वापरूनही करता येतात. आंतरमशागतीमुळे बागेत तणे वाढत नाहीत तसेच झाडांची वाढ जोमदार होते. कारण जमिनीत पाण्याचे व हवेचे संतुलन योग्य राखले जाते. त्यानंतर वरंबे बांधून झाडास भर द्यावी. दर ४ ते ६ आठवड्यानी हलकी टिचणी करून किंवा खोदून आणखी भर द्यावी. उन्हाळ्यात सुरुवातीस बागेची चांगली टिचणी करून बांधणी करावी किंवा झाडास भर द्यावी.

Keli lagvad te prakriya udyog

   केळीच्या जोमदार वाढीसाठी आणि अधिक उत्पन्न मिळण्यासाठी पाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. केळी पिकास पावसाळ्यात मोठा खंड पडल्यास, पिकाच्या वाढीनुसार आणि गरजेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ७ ते १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने केळी पिकास पाणी द्यावे. केळी निसवत (घड घेण्याचा काळ) असताना बागेस पाण्याचा ताण पडल्यास घड सटकतो किंवा मोडतो. म्हणून या काळात बागेला पाणी काळजीपूर्वक द्यावे. केळीची साठ टक्के मुळे जमिनीच्या वरच्या ३० से.मी.च्या स्तरामध्ये असतात आणि अत्यंत नाजूक लुसलुशीत असल्यामुळे सतत वरचा पृष्ठभाग ओला व वाफसा स्थितीत असणे गरजेचे असते. त्यासाठी ठिबक सिंचनाच्या प्रत्येक ओळीला एक याप्रमाणे ५ फुटांवर किंवा ७ फुटांवर नळी मांडावी, नळीवर भारी जमिनीसीठी दर २.५ फुटांवर आणि मध्यम जमिनीसाठी २ फुटांवर हलक्या व मध्यम जमिनीसाठी दीड फूट अंतरावर २ ते ४ लिटर प्रतितास प्रवाही क्षमतेचा ड्रिपर लावावा किंवा पाण्यात क्षार नसल्यास पाणी विहिरीचे किंवा ट्यूबवेलचे असल्यास जैन टर्बो अॅक्युरा इनलाईन सिस्टिम वापरावी. संचाला गरजेप्रमाणे सर्व फिल्टर बसवावे. त्याचप्रमाणे फर्टिगेशन करण्यासाठी व्हेंचुरी किंवा १२० लिटर किंवा १६० लि. क्षमतेची खते देण्याची टाकी (फर्टिलायझर टैंक) बसवावी आणि रोपांच्या ओळीने संपूर्ण बेड ओला राहील या पद्धतीने पाणी द्यावे. हवामानानुसार पाणी मात्र बदलते. तसेच जमिनीच्या प्रतवारीनुसारसुद्धा मात्रा बदलते. काळ्या जमिनीला कमी तर पांढऱ्या, पिवळ्या, चुनखडीयुक्त, खडकाळ जमिनीला गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते, केळीच्या पूर्ण वाढलेल्या झाडास २० ते २५ लिटर पाण्याची दररोज गरज आहे.


  केळीसाठी वेळेवर, योग्य ती खते योग्य त्या मात्रेत देणे गरजेचे आहे. केळी पिकासाठी प्रतिझाड किमान १० किलो शेणखत, २०० ग्रॅम नत्र, ४० ग्रॅम स्फुरद आणि २०० ग्रॅम पालाश खताची आवश्यकता असते. अशी शिफारस असून लागवडीनंतर ३० दिवसांनी प्रतिझाड ८० ग्रॅम युरिया, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यावे. दुसरा हप्ता लागवडीनंतर ७५ दिवसांनी द्यावा. यात प्रतिझाड ८० ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी. प्रतिझाड ८० ग्रॅम युरिया लागवडीनंतर १२० दिवसांनी तिसरा हप्ता द्यावा. चौथा खताचा हप्ता हा लागवडीनंतर १६५ दिवसांनी द्यावा. यात प्रतिझाड ८० ग्रॅम युरिया व ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटेशची मात्र द्यावी. खताचा पाचवा ते सातवा हप्ता हा अनुक्रमे प्रतिझाड ४० ग्रॅम युरिया, ४० ग्रॅम युरिया अधिक ८० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा लागवडीनंतर २१०, २५५ आणि ३०० दिवसांनी द्यावा. खते मुळ्यांच्या कार्यकक्षेत ओळी करून द्यावीत आणि परत झाकावीत. खते वापसा असतानाच द्यावीत. अलीकडे खताची मात्रा ठिबक सिंचनाद्वारे दर आठवड्यास देतात. सुपर फॉस्फेट संपूर्ण मात्र जमिनीतून लागवडीच्या वेळेस किंवा १७ते २८ आठवड्या दरम्यान प्रतिझाड ६ ग्रॅम नत्र व ५ ग्रॅम पालाशची मात्रा द्यावी. २९ ते ४० आठवड्यापर्यंत प्रतिझाड २.५ ग्रॅम नत्र व ४ ग्रॅम पालाशची मात्र द्यावी. ४१ ते ४४ आठवड्याच्या दरम्यान प्रतिझाड ३ ग्रॅम पालाश द्यावे. ठिबक सिंचनातून खते देताना शक्य तेवढी काळजी घ्यावी, शेतात शेणखत शिफारशीत मात्रेत दिल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासल्यास फवारणीतून किंवा दाणेदार स्वरूपात द्यावीत.


    केळी लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात अर्थात भर देण्यापूर्वी चार-पाच महिने आधी आपण तेथे नत्र स्थिर करणारी पिके उदा. सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग, वाटाणा ही पिके घ्यायला काहीच हरकत नाही. आणखी एक महत्त्वाची आंतरपीक पद्धतीतील बाब म्हणजे प्रत्येक भागात तिथल्या केळी उत्पादकाची निरनिराळी गरज असू शकते. आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आंतरपिकाचे बदल करणे गरजेचे असते. आपणाकडे कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची, वाल, घेवडा अशी पिके घेतली जातात. काही वेळा फुलझाडेसुद्धा घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने झेंडूची लागवड सर्वत्र केळीत आढळून येते. काही भागात बटाटा, तर काही जागी हिरवळीचीच पिके उदा. ताग, धेंचा, सोयाबीन घेऊन ती गाडली जातात. खरं म्हणजे टिश्यू कल्चर पद्धतीने केळीची लागवड केली असेल तर त्या शेतात किंवा शेताच्या कडेने अथवा आसपाससुद्धा पपईसारखे पीक घेऊ नये. त्याचबरोबर भोपळा, कारली, दोडकी, वांगी, भेंडी, गिलके, कलिंगडे, कोहळे आदी पिके घेण्याचे टाळावे.

Keli lagvad te prakriya udyog


  केळी पिकात कीड व रोग आढळून येतात त्यात मावा ही कीड पिवळसर रंगाची असून पानांच्या खालच्या बाजूस आढळून येते. केळी पिकाला माव्यापासून सरळ नुकसान होत नाही परंतु पर्णगुच्छ (बंची टॉप) या विषाणूजन्य रोगाच्या विषाणूसाठी वाहक म्हणून मावा कीड काम करते. त्यामुळे या किडीमुळे खूप नुकसान होते. या किडीमुळे केळीची पाने छोटी व्हायला लागतात. काही वेळा पिवळसर होत जातात आणि वळून आतल्या आत जातात. प्रसंगी वाळतात. साहजिकच उत्पादित केळीच्या घडांवर (वाढीवर) त्यांचा परिणाम होतो. या किडीबरोबरच फुलकिडे, कंद पोखरणारा भुंगा, खोड पोखरणारा भुगा, सूत्रकृमी, पानातील रस शोषणारी किड, पाने खाणारी अळी, सुरवंट अळी यासारख्या किडी आढळून येतात. यावर नियंत्रण करणे शक्य आहे. केळी बागेला बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोग आढळून येतात. या किडी व रोगाचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करता येते. कीड व रोगाबरोबरच केळी पिकात तणांचा बंदोबस्त केला नाही तर तेथे केळी बागेत पाणी, सूर्यप्रकाश आणि खाद्य घेण्याची बाबतीत दोघांची चढाओढ सुरू होते. तणे जर वाढली तर रोगराईही वाढते. किडी तणांवर बसतात. त्यामुळे मुख्य केळी पिकाला हानी पोहचते आणि अशा उपद्रवी कीटकांचे साम्राज्य वाढत जाते. म्हणून वेळीच तणांच्या वाढीला आवर घालणे गरजेचे असते. त्यामुळे केळीची लागवड केली तर पहिले ३-४ महिने केळीची बाग तणविरहित ठेवावी. त्यानंतर केळी बागेच्या पानांच्या पसाऱ्यामुळे तणांचा फारसा त्रास होत नाही. कुळवाच्या पाळ्या दिल्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो.


     केळीघड तयार होण्याचा कालावधी हा केळीचा वाण, हंगाम आणि व्यवस्थापन यावर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे घड निसवल्यानंतर ११० ते १४० दिवसांत घड काढणीस तयार होतो. बसराई केळीचे लोंगर ७ ते १२ महिन्यात बाहेर पडतात. वाल्हा जातीत ६ ते ७ महिन्यांनी बाहेर पडतात. लाल वेलची, सफेद वेलची आणि मुठेळी जातीत ९ ते १२ महिन्यांनी लोगर बाहेर पडतात, पक्व घडातील फळांचा रंग गर्द हिरवा जाऊन तो फिक्कट हिरवा होतो. फळावरील शिरा जाऊन त्यांना गोलाई येते. अशा वेळी घडांची काढणी करावी. पूर्ण पक्व झालेला घड हा स्थानिक बाजारपेठेसाठी काढणी करावी आणि जर लांबच्या बाजारपेठेसाठी केळी पाठवायची असेल तर घड ७५ ते ८० टक्के पक्व झालेला घड काढावा. जर घडांची साठवण करावयाची असल्यास प्रथम घड स्वच्छ पाण्याने धुऊन ०.१ टक्के कार्बण्डायझिम अधिक १२ टक्के मेणांच्या द्रावणात बुडवावा किंवा घडातील फण्यावर संस्करण करून ते खोक्यात पैकिंग करावे, अशा पेट्या १४ अंश से. ग्रे. तापमानात ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता असलेल्या शीतगृहात २० ते २५ दिवसांपर्यंत चांगले राहू शकतात. 

  प्रक्रिया :- अन्नप्रक्रिया शाखेतील संशोधनामुळे सध्या केळीपासून विविध पदार्थ बनविणे शक्य झाले आहे. केळीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार अभ्यास करून त्याद्वारे पावडर, रस व दुग्ध पेये तयार केली जातात. जगात केळीच्या प्रक्रियायुक्त उत्पादनात फिलिपाईन्स देश आघाडीवर असून सन २००८-०९ वर्षात या देशाने १६,९६४ टन चिप्स, १४७६ टन केचअप, २.२ टन केळीचे पीठ व पावडर इत्यादी उत्पादनांची निर्यात केली आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जपान, सौदी अरेबिया व संयुक्त अरब देश केळी प्रक्रियायुक्त पदार्थांचे मोठे आयातदार देश आहेत.

Keli lagvad te prakriya udyog

केळीपासून बनणारे प्रक्रियायुक्त पदार्थ :-

अ) पिकलेल्या केळीपासून :- (१) गोठवलेली केळी, सुकेळी (२) केळी पल्प, (३) केळी पावडर, (४) केळी ज्यूस, (५) स्क्वॅश, (६) वाईन, (७) कॅन्डी, (८) फूटबार, (९) टॉफी, (१०) जॅम व जेली, (११) स्लायसेस, (१२) मिल्क शेक, (१३) विनेगार, (१४) आरटीएस पेय.

ब) कच्च्या केळीपासून (१) चिप्स, (२) पीठ, (३) सॉस, (४) लोणचे, (५) स्टार्च.

क) इतर मूल्यवर्धित उत्पादने : (१) पानांपासून तयार केलेले कप व प्लेट (२)खोडापासून स्टार्च (३) सालीपासून इथेनॉल, (४) फळांची भाजी, (५) पशुखाद्य (६) खोडापासून धागा, (७) खोडाच्या आतील पांढऱ्या दांड्यापासून कैण्डी व लोणची.

ड) इतर उत्पादनात मुख्य घटक म्हणून होणारा उपयोग:- (۹) आरोग्यवर्धक पेय, (२) बेबी फूड, (३) बिस्किट, (४) चपाती ब्रेड, (५) पंचामृत, (६) भजी व वहा, (७) अप्सम.

अशा प्रकारे केळीपासून प्रक्रिया करता येते. मूल्यवर्धन करणाऱ्या केळीच्या पदार्थाला खूप मागणी असते.

सुकेळी :- 

       काही विशिष्ट जाती सुकेळी बनवायला योग्य असतात. ठाणे जिल्ह्यातील वसई भागातील राजेळी जातीच्या केळीची सुकेळी बनवतात त्याकरिता ताजी पूर्ण पक्च झालेली टणक फळे निवडून घेतात. अपक्व अगर जास्त झालेली फळे सुकेळी बनवायला अयोग्य असतात. निवडलेली फळे थंड पाण्यात चांगली धुतात. सदर केळी नंतर सोलतात, सोलताना केसाग्रातील टोके शाबूत ठेवतात. नंतर ही फळे उभी चिरून त्याचे सरळ २ भाग करतात किंवा आडवी कापून त्याचे काप करतात. सोलून कापलेली फळे ट्रेवर नीट लावून ते ट्रे धुरी देण्याच्या खोलीत अगर कपाटात ठेवतात. ४५ किलो केळींना ११५ ग्रॅम गंधक पुरा होतो. ही केळी अर्ध्या तासापर्यंत गंधकाच्या धुरीत राहू देतात. धुरी देताना आर्द्रता राहावी म्हणून या ठिकाणी पाणी ठेवणे आवश्यक असते. या धुरीमुळे केळी टिकून राहण्यास मदत होते. केळींना आकर्षक सोनेरी पिवळी छटा येते. अशी धुरी दिलेली फळे सुकविण्याच्या जागेत ती १४० अंश फॅरनहिट एवढ्या उष्णतामानावर ठेवतात. या सुकविण्याच्या क्रियेच्या वेळी फळे दोनदा पलटावी लागतात. सुमारे १५ तासांनंतर उष्णतामान कमी करतात. सुकविण्याची ही क्रिया १२८ अंश फॅरनहिट एवढ्या उष्णतामानावर पूर्ण करतात. अशा रीतीने तयार झालेली सुकेळी उघड्यावर ठेवल्यास ती झटपट बिघडतात. त्याकरिता ती बंद काचेच्या बाटलीत किंवा पॉलिथिनच्या कागदात गुंडाळून ठेवतात.

केळीचे काप : 

कच्च्या केळीचे काप तयार करण्याकरिता कोणत्याही जातीची कच्ची केळी निवडावीत. नंतर ती केळी ओल्या फडक्याने पुसून घ्यावीत. साल काढल्यानंतर केळीची दोन्ही बाजूंची टोके चाकूने कापून नंतर त्याचे काप करावेत. हे काप स्टेनलेस स्टीलच्या चाकूने करावेत अन्यथा साध्या चाकूने केळीचे काप काळे पडतात. हे काप पिंगट पडू नयेत म्हणून ०.१ टक्का सायट्रिक अॅसिडच्या द्रावणात किंवा टारटारीक आम्ल द्रावणात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हे काप त्या द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवावेत. नंतर हे काप बांबूच्या ट्रेवर उन्हात पसरावेत त्यानंतर त्या कापांना गंधकाची धुरी द्यावी. बंद खोलीत गंधकाची धुरी देण्याकरिता तासभर हे ट्रे बंद खोलीत ठेवावेत. ०.५ तोळा गंधक जाळून ही धुरी केळीच्या कापांना द्यावी. नंतर हे काप एक तर उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवावेत. काप वाळवतांना बाहेरील कोणत्याही ओलाव्याचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी. होम ड्रायरमधील उष्णतामान १४० अंश ते १४५ अंश फॅ. ठेवावे. वाळलेले काप बटाट्याच्या कापासारखे तेलात तळून खातात किंवा वाळलेले काप दळून त्याचे पीठ तयार करतात. है पीठ मव्हाच्या पिठातसुद्धा मिसळतात.


साखरेच्या पाकातील सीलबंद डब्यातील केळीचे काप :  

         चांगल्या जातीच्या पिकलेल्या केळीचे काप साखरेच्या पाकात घालून हवाबंद डब्यात साठवता येतात. यासाठी चांगली पिकलेली (जास्त नको) केळी याकरिता निवडून त्यांची साल काढून त्याचे स्टेनलेस स्टीलच्या चाकूने काप करावेत. २५ ते ३० टक्के साखरेचा पाक व त्यात २ टक्के आम्लतेचे द्रावण टाकावे. १ कप साखर, ३ कप पाण्यात विरघळून त्यात १५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. मिश्रण उकळेपर्यंत तापवून नंतर चांगले गाळून घ्यावे. १ पौड कॅनमध्ये १२ ते १३ औस केळीचे काप भरावेत, त्यावर वरीलप्रमाणे साखरेचा गरम काप डब्याच्या वरच्या काठापासून १/४ इंच अंतर सोडून भरावा, त्यानंतर असे भरलेले डबे गरम पाण्याच्या वर १ ते १.५ इंच असावा. पाकातील हवा निघून जाण्याकरिता ही प्रक्रिया करावी लागते. त्यानंतर ते डबे काढून कॅन सीलर मशीनच्या साह्याने सील करावेत. ते सील केलेले कॅन निर्जंतूक करण्याकरिता प्रेशर कुकरमध्ये २० ते २५ मिनिटे ठेवावेत. त्यानंतर ते डबे थंड पाण्यात ठेवावेत. याखेरीज तामिळनाडू राज्यात पंचामृत हे डोंगरी केळीपासून बनवतात. गूळ, साखर, मनुका यापासून केळीचा जाम बनवितात. त्यालाच पंचामृतम म्हणतात. भारतातल्या देवळांमध्ये हा पदार्थ वेगवेगळ्या आकारांच्या डब्यांमध्ये मिळतो.

निर्यातीकरिता केळीचे टिकाऊ पदार्थ : 

जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात केळी पिकविणाऱ्या देशांत केळीचे विविध टिकाऊ पदार्थ तयार करून ते निर्यात केले जातात, खालील तक्त्यात केळीपासून बनविलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची यादी दिलेली आहे.

१) पुरी पिकलेल्या केळीपासून बनवतात 

२) डबाबंद काप पिकलेल्या केळीपासून बनवतात

३) सुकेळी ही पिकलेली केळी सोलून, वाळवून बनवतात

४) केळीचे पीठ ही कच्चा केळी वाळवून बनवतात 

५) गोठविलेली केळी ही पिकलेली केळी पुरी वाळवून बनवतात 

६) काचऱ्या या कच्च्या केळीचे काप वाळवून बनवतात.


     याखेरीज केळीपासून रस, जाम, गोठविलेले काप, व्हिनेगर व अल्कोहोलिक पेय तयार करतात. १९८३ मध्ये होण्डुरास या केळी पिकवणाऱ्या देशाने ८००० टन केळीची पुरी व १००० टन हवाबंद केळीचे काप याची निर्यात केली होती.


केळीची पुरी :- 

केळीपासून तयार केलेली पुरी वर्षभर टिकते व तिचा वापर विविध उपपदार्थ तयार करण्यासाठी करू शकतो. उदा. रस, पावडर, दुग्धपेय इत्यादी केळीचा गर एकजीव करून त्यास उष्णतेची प्रक्रिया देतात व नंतर त्याची पुरी बनवितात. निर्जंतूक पिशवीत पॅकिंग करून हा पदार्थ वर्षभर व्यवस्थित ठेवता येतो.

स्टार्च :- 

भारतात जवळजवळ १९९७ मध्ये केळीच्या खोडापासून स्टार्च बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यात यश आले नाही. घड काढल्यापासून २ दिवसांच्या आत खोडापासून स्टार्च काढला पाहिजे नाही तर त्यातील स्टार्चचे प्रमाण झपाट्याने कमी होते. केळी निर्यात करणाऱ्या दक्षिण व मध्य अमेरिकन देशात हिरव्या कच्च्या केळीपासून स्टार्च करण्याचे कारखाने उभारण्यात आले आहे. बसराई जातीच्या कच्च्या केळीत ४८ टक्के स्टार्च असते.

केळीची पावडर :- 

यासाठी पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर होतो. अशा पूर्ण पिकलेल्या फळाची साल काढून गर एकत्र मिसळतात व एकजीव करतात. त्यानंतर तीन मिनिटांपर्यंत १०० अंश सेंटिग्रेड इतक्या तापमानाची उष्णता प्रक्रिया देतात त्यामध्ये ७० पी. पी. एम. पोटॅशियम मेटाबायसल्फेट टाकून ड्रायरच्या साह्याने वाळवितात. उत्तम प्रतीच्या पावडरसाठी फ्रीज ड्रायरचा वापर करतात. पावडर तयार झाल्यावर कंटेनरमध्ये वा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये हवाबंद करून पॅकिंग करतात.

केळीचा रस :- 

पूर्ण पिकलेल्या केळीचा गर एकजीव करून त्यास ३ मिनिटांपर्यंत १०० अंश से. तापमानाची उष्णता प्रक्रिया देतात. या गरामध्ये ०.२ टक्के पेक्टिन नावाचे विकर घालून ५ अंश से. तापमानात २ तास ठेवतात. यामुळे फळामधील अद्राव्य स्वरूपातील पेक्टिनचे रूपांतर द्राव्य पेक्टिनमध्ये होते. नंतर या मिश्रणातून दाबाच्या साह्याने अद्राव्य घटक वेगळे करतात व ८५ अंश से. तापमानास १५ मिनिटे ठेवतात, हा रस थंड करून ७० पीपीएम मेटाबायसल्फेट त्यात मिसतात. हा रस निर्जंतूक बाटल्यांमध्ये भरतात व १०० अंश तापमानात पुन्हा १५ मिनिटे उष्णता प्रक्रिया देतात.

जनावरांचे खाद्य :- 

   भारताबाहेर केळी पिकविणाऱ्या देशांत व भारतात चारा टंचाईच्या काळात केळीचे खोड व पाने जनावरांचे खाद्य म्हणून वापरतात. केळीच्या पिठाचा वापर शेळ्या, डुकरे, कोंबड्या यांना खाद्य म्हणून करतात. फिलिपाईन्समध्ये कच्च्या केळीचे उन्हात वाळविलेले काप जपान व तैवान देशांत निर्यात केले जातात. तेथे त्यांचा वापर जनावरांचे खाद्य म्हणून करतात. वाया गेलेल्या केळीचे सायलेज म्हणून साठविण्याची शिफारस करतात. कच्च्या वाया गेलेल्या केळीच्या फळांच्या थरावर कॅल्शियम कार्बाईड वापरतात. त्याला वरून प्लॅस्टिक कापडाने झाकतात. केळी नरम झाल्यास त्याचे तुकडे करून खड्ड्यात टाकून वरून काळ्या पॉलिथिनने झाकून माती टाकतात. सहा आठवड्यानंतर ते डुकरांना खाद्य म्हणून देतात.

    अशा रीतीने केळीची काढणी करून त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ केल्यास मूल्यवर्धन होऊन प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली मागणी येईल. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************







अन्नप्रक्रिया उद्योगातून स्वयंरोजगाराची संधी : मिरची व सिमला मिरची प्रक्रिया | Self-Employment Opportunity from Food Processing Industry – Chilli & Capsicum Processing

🌾 अन्नप्रक्रिया उद्योगातून स्वयंरोजगाराची संधी
Annaprakriya Udyogatun Swayamrojgarachi Sandhi

Annaprakriya udyogatun swayamrojgarachi sandhi

    भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नाही. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून अन्नप्रक्रिया उद्योग पुढे येत आहे. फळे व भाज्यांवर प्रक्रिया करून विविध टिकाऊ व मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात, ज्यांना देश-विदेशात मोठी मागणी आहे.

    कांद्यापासून पेस्ट, पावडर, तेल; टोमॅटो व फळांपासून जॅम, जेली, केचप, टूटी-फ्रुटी, लोणचे, मार्मालेड, केक, चॉकलेट यांसारखी उत्पादने तयार करून स्वयंरोजगार व रोजगारनिर्मिती शक्य होते. शासनाची धोरणेही अन्नप्रक्रिया उद्योगाला पूरक आहेत.


🌶️ मिरची प्रक्रिया (Chilli Processing)

    मिरची ही नाशवंत भाजी असून साठवणीत २० ते ४०% नुकसान होते. प्रक्रिया करून टिकाऊ उपपदार्थ तयार केल्यास हे नुकसान टाळता येते व निर्यातीतून परकीय चलन मिळते.

1️⃣ ओलियोरेझीन निर्मिती

    मिरची पावडरपासून योग्य विलायक (असेटोन, इथेनॉल, EDC) वापरून ओलियोरेझीन तयार केले जाते. हळद, आले, मिरी यांच्यापासूनही ओलियोरेझीन बनवता येते. अत्यंत तिखट मिरचीपासून अधिक दर्जेदार ओलियोरेझीन मिळते.

2️⃣ वाळलेल्या लाल मिरचीपासून चिली सॉस

  • सॉस प्रकार १ : भाजलेल्या व उकडलेल्या मिरच्यांची पेस्ट

  • सॉस प्रकार २ : पीठ, तेल, मिरची पावडर व मसाल्यांसह

  • सॉस प्रकार ३ : उकडलेल्या मिरच्यांच्या गरापासून तयार पेस्ट

3️⃣ ताज्या लाल मिरचीचा चिली सॉस

    ताज्या मिरच्यांपासून मीठ, लसूण, कांदा, लोणी/तूप वापरून तयार होणारा सॉस बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीयोग्य आहे.

4️⃣ ताज्या हिरव्या मिरचीचा चिली सॉस

    हिरवी मिरची, टोमॅटो व मीठ वापरून तयार होणारा हा सॉस ४–५ दिवस रेफ्रिजरेटरमध्ये टिकतो.

5️⃣ मिरचीचे लोणचे

  • व्हिनेगर लोणचे

  • तेलाचे लोणचे

  • मिठाचे लोणचे

भारतात प्रामुख्याने मोहरी/तिळाचे तेल वापरून लोणची तयार केली जातात, जी दीर्घकाळ टिकतात.

6️⃣ मिरची सांडगे

भरलेल्या मिरच्यांपासून उन्हात वाळवून तयार केलेले सांडगे हे घरगुती तसेच व्यावसायिक उत्पादन म्हणून लोकप्रिय आहेत.


🫑 सिमला मिरची प्रक्रिया (Capsicum Processing)


Annaprakriya udyogatun swayamrojgarachi sandhi

    सिमला मिरची (ढोबळी मिरची) ला बाजारात मोठी मागणी आहे. हिरवी, लाल, पिवळी व जांभळी सिमला मिरची प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त आहे.

1️⃣ पीठ पेरून भाजी

2️⃣ मसाला पेरून भाजी

3️⃣ रस भाजी

4️⃣ सिमला मिरची भरून भाजी

ही उत्पादने रेडी-टू-ईट / रेडी-टू-कूक स्वरूपात विक्रीस मोठी संधी देतात.


💼 स्वयंरोजगार व उत्पन्नाची संधी

मिरची व सिमला मिरची प्रक्रिया उद्योगातून

  • उत्पादन खर्च कमी

  • मूल्यवर्धन जास्त

  • स्थानिक व निर्यात बाजार उपलब्ध

  • युवक व शेतकऱ्यांसाठी रोजगारनिर्मिती

अशी शाश्वत व फायदेशीर व्यवसाय संधी निर्माण होते.


✍️ © दीपक केदू अहिरे
📍 नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

गावोगावी कर्मवीर व उद्योगवीर घडवायला हवे ! | Karmaveer and industrial hero should be made from village to village

उद्योजकीय समाज काळाची गरज !
The need of entrepreneurial society

गावोगावी कर्मवीर व उद्योगवीर घडवायला हवे !
Karmaveer and industrial hero should be made from village to village


Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have

देश असो वा राज्य खेडे हे त्यांची छोटी आवृत्ती असते. व्यक्ती-व्यक्तीच्या माध्यमातून राष्ट्र घडते, या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे व असावे हा चिंतनाचा विषय आहे. पण आज ग्रामीण भागातील परिस्थिती ही निश्चितच चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी देशातील प्रत्येकाने 'जबाबदार' होण्याची तसेच देशाच्या युवा पिढीवर उद्योजकीय संस्कार रुजविण्याची अत्यंत गरज आहे. ग्रामीण भागातील विदारक व चिंताजनक परिस्थितीविषयी भाष्य करणारा हा लेख/ब्लॉग...


      उद्योजकच्या दिवाळी अंकासाठी सगळे हटके विषय असल्याचे कळले आणि मीही 'कृषी या एकाच विषयाशी मोट बांधून वर्षभर लिखाण करत असतो. मग हटके विषयावर कधी लिहिणार म्हणून हा लेख उद्योजक दिवाळी अंकासाठी लिहीत आहे. ग्रामीण सुधारणेतून उद्योजकता कशी वाढीस लागेल याविषयी मी माझ्यापरीचे असलेले स्वैर निरीक्षण आपल्यासमोर मांडत आहे. यात कुणालाही स्थल कालपरत्वे कोणी दुखावले आहे असे वाटत असेल तर प्रथमतः मी माफी मागतो. परंतु चांगले होण्यासाठी जशी आपण कडू औषधे घेतो तशी ही लेखरुपी गोळी काम करेल असे वाटते.

     

   ग्रामीण उद्योजकतेला भाऊबंदकीचा शाप आहे असे अनेकांना वाटते ते मलाही खरे वाटत आहे. भाऊबंदकी म्हणजे काय? यात तुमचे सगेसोयरे येत नाही यात तुम्ही ज्या ठिकाणचे, गावाचे आहात तेथील तुमचा भाऊ, काका, चुलते ही भाऊबंदकी येते. यात ग्रामीण भागातील प्रवृत्ती वर्षानुवर्षे तशीच जपली जाते की अमुक एक चांगला व्यवसाय करत आहे तर त्याच्या डोक्यात वेगळंच खूळ घालून त्याला देशोधडीला लावण्याचा प्रकार वर्षानुवर्षे आपण पाहत आहोत. या बाबीकडे आपण डोळेझाक न करता उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याच वेळी दिली पाहिजे म्हणजे आपला रोखठोक स्वभाव त्यांच्या लक्षात येईल. उद्योजकता जोपासणे ही काही विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही की ती त्यांनी जोपासली पाहिजे. हा वर्षानुवर्षे आपण संस्कार जोपासत आलो आहोत. ही भावना भीतीदायक असल्यामुळे आपण उद्योगात 'पडलो' असे म्हणतो. उद्योगात शिरलो असे म्हणत नाही. शालेय वर्गापासून आपले आणि श्रमाचे वावडे आहे असे मला वाटते. 

    

   मला आठवते मला शालेय जीवनात शारीरिक श्रमाचा आठवड्यातून एक तास दिलेला असायचा पण या तासात कोणीही शारीरिक श्रम करत नव्हते. फक्त टोलवाटोलव करून वेळ निभावणे हेच करायचे. यामुळे लहानपणापासून आपण श्रम आले की टाळाटाळ करण्याची बीजे त्यावेळच्या संस्कारात होती हे आपण विसरतो आहे. याबाबतीत थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आठवते ते म्हणजे 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली शिक्षणाची मीमांसा मुळीच स्वावलंबनावर, उद्योजकतेवर आधारित होती. पण आपण सोयीस्कररीत्या या गोष्टीला बगल देत आहोत असे वाटते. अहो जरा खेड्यातील माणसांकडे पैसे आले तर ते कोणती गाडी मार्केटमध्ये नवीन आहे? चैनीची वस्तू की जी गावात कुणाकडेही नाही अशा वस्तू घेण्याची महमिका त्यांच्या मनात असते. परंतु खेड्यात अशा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहे त्यामुळे ग्रामीण उद्योजकता वाढीस लागेल असे तो काहीच प्रयत्न करत नाही, फक्त मला बाजीराव म्हणा, मी या गावचा सरपंच, माझं ऐका असा तोरा मिरवणाऱ्या मंडळीकडून काय उद्योजकता वाढीस लागेल! मला तर वाटतं परीसरातल्या यशस्वी उद्योजकांची आपण कधी मुलाखत ऐकली आहे का? कि तो कसा यशस्वी झाला आहे. याविषयी आपण कधी प्रबोधन केले आहे का? याचे उत्तर नक्कीच नाही असे येईल. ज्या समाजात उद्योजकांच्या मनातले भाव जर जाणून घेतले नाही तर आपली मुले उद्योजक कशी होतील आणि समाजात उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्मिती कशी होईल. 


      मी तर म्हणतो प्रत्येक गावातील यशस्वी पुरुषाने समाजहितार्थ गावातल्या युवा पिढीसाठी, मुलांसाठी अशी प्रेरक व्याख्याने उपलब्ध करून दिली तर लहान मुलांची नक्कीच मानसिकता बदलेल. समाज बदलायचा असेल तर सुरूवात आपल्यापासून करावी असे मला मनोमन वाटते. परंतु यात कुणाला काही मार्केटिंगचा स्वार्थीपणा दिसत असेल तर ते साफ चुकीचं आहे. उद्योजकता वाढीस लावण्यासाठी काय फक्त एमसीईडी किंवा अन्य संस्थांनी ठेका घेतला आहे का? समाजाची भूमिका कुणी का लक्षात घेत नाही. आज बघितले तर समाजातल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी कुणी पुढाकार घेत आहे का? मुद्दामहून कुणी उद्योजकता शिबिर भरवीत आहे का? उद्योग व्यवसायविषयक मार्गदर्शनाचा फार्स काही संस्था करतात ते खरोखरीच समाजात उद्योजकता पसरविण्यासाठी काही प्रयत्न करतात का? याची कुणीही दखल घेत नाही त्यामुळे होते काय की समाजात दुसऱ्याच अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या युवापिढीला जर आपण काम देऊ शकलो नाही तर त्यांची डोकी कशा प्रकारे चालतात हे आपण पाहतो आहे. समाजात दिवसेंदिवस गुन्हेगारीकरण वाढत चालले आहे हे याचेच द्योतक आहे.

    

       थोर समाजसुधारकांनी समाजाला विचारांचा आणि कृतीचा खजिना ठेवला आहे. त्यांचा या समाजपरिवर्तनातील मथितार्थ समजून घ्या. नुसतीच त्यांची पुण्यतिथी, जयंती साजरी करून काहीच साध्य होणार नाही. केवळ त्यांची आठवण करून समाज विकासाची, उद्योजकतेची फळे मिळणार नाहीत तर समाजातील घातक रुढी, अंधश्रद्धा आणि बुवाबाजी आजही संपलेली नाही. याउलट अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांची निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेने आपणाला काय बघायला मिळाले. अजूनही समाजात विघातक प्रवृत्ती दबा धरून बसल्या आहेत. आज नव्या विचारांच्या बुरख्याखाली समाजाची प्रचंड फसवणूक चालू आहे. नवे बुवा आज निर्माण होत आहे. आपली टिमकी वाजवून समाजाचे सेवक म्हणणारे साधुसंत आज काय करत आहे हे पाहणे गरजेचे ठरते. 


        शब्दाचे गारुडी गावोगावी फिरत असून लोकांना झुलविण्याचे,  नवनवे तंत्र आत्मसात करून हे लोक समाजाला अशा प्रकारे फसवत आहे की, तळागाळातला समाज नाडला जातो. हे नवे डोंबारी तीच जुनी पुंगी वाजवून हा खेळ चोहीकडे करताना दिसून येत असल्यामुळे उद्योजकतेला खीळ बसली आहे असे मला वाटते. म्हणूनच समाज परिवर्तनाची दिशा, विकास आणि जबाबदारी जास्त डोळसपणे सांभाळली पाहिजे. समाज परिवर्तनाला व उद्योजकतेला खीळ घालणाऱ्या गोष्टी आपण मनःपूर्वक तपासून पाहिल्या पाहिजेत. वेळीच असल्या नकली स्कीम्स तपासून पाहिल्या पाहिजेत. जीवन आणि श्रमाची सांगड घालणारे शिक्षण दिले पाहिजे. जो श्रम करतो त्याला प्रतिष्ठा दिलीच गेली पाहिजे. एका गाजलेल्या जुन्या चित्रपटामध्ये एक गीत "दिल को देखो, चेहरा न देखो, चेहरे ने लाखो को लुटा, दिल सच्चा और चेहरा झुठा" या गीताच्या ओळी खऱ्या अर्थाने समाजातील मानवी स्वभावाचे व चेहऱ्याचे वर्णन चपखलपणे करतात.


Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have


    आजपर्यंत समाज सुधारणेत अनेक थोर महात्म्यांचे योगदान लाभले आहे. अनेक उद्योजकांचेही योगदान आहे. परंतु या प्रत्येक विचारांचा केंद्रबिंदू मानवतेची शिकवण आणि समाजाला योग्य दिशा दाखवणारीच ठरली. आधुनिक जीवनाचा पाया काळानुसार बदलत गेला आहे. फॅशन करणारा, लेटेस्ट गाडी वापरणारा आज मॉडर्न समजला जातो. चांगल्या गोष्टी सोडून वाईट संस्काराचे भूत आपल्या मानगुटीवर बसवले जाते. या भुलभुलय्यात आपण इतके अडकत जातो की आपणाला कळत नाही की आपण काय करत आहोत. अनेक जण यापायी लयास गेलेले आपण पाहिले आहे. 

    

       माझ्या माहितीतील एक अशी व्यक्ती आहे की, ज्यांच्याजवळ सर्व सुखसोयीची साधने आहेत तरी ती व्यक्ती आज सायकल वापरते. मी सहज त्यांना प्रश्न विचारला की, "साहेबराव, आज तुमच्याजवळ सर्व असून सायकल का? जग मॉडर्न होत आहे. तुम्ही अजून सायकल वापरतात." हे म्हणाले, "जग जरी मॉडर्न होत चालले तरी आपण मनाचा आणि शरीराचा कधी विचार करतो का? त्याला काय पाहिजे. याचा विचार न करता आपण बाह्य गोष्टी दाखवून मोठेपणा का मिरवायचा? मी दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी सायकल वापरतो, पायी फिरतो माझ्या फळबागेत काम करतो. श्रम केल्याने मला आजार होत नाहीत हे काय कमी आहे काय? देवाने एवढं सगळं देऊनही मी असमाधानी राहतो आणि हा स्वार्थी विचार माणसात बळावत असल्यामुळे मी सायकल वापरतो. माझ्या मुलांनाही वापरायला उद्युक्त करतो. परंतु मी सायकलवर गेल्यावर गावातील लोक मला हसतात, पैसा येऊन पैसा खर्च करत नाही असं म्हणतात, पण मी पैसा नाही शरीर कमावत आहे हे ते विसरून जातात. त्याचे हे बोल एकून समाज कोणत्या थराला जात आहे." या उदाहरणाचा उद्योजकीकरणाचा फार जवळचा संबंध आहे. 


        श्रमाला मोलच राहिलं नाही. छोट्या गोष्टी असतात पण त्याचा समाजात फार मोठ्या अर्थाने संबंध असतो हे जाणून घ्यायला आज कोणाकडेही वेळ नाही आणि फालतू गोष्टी चर्वितचर्वण करत असतात. आपला वेळ अमूल्य आहे हे आज खेडेगावातल्या कोणत्याही कट्टयावर नजर टाका ते फक्त दुसऱ्यांची उणीदुणी, लफडी यावर चर्चा करण्यातच बराचसा वेळ देतात. त्यामुळे आपला विकास कधी होत नाही. विकासाच्या गप्पाच सोडा पण राजकारणात १०० टक्के वाहून गेलेली खेडी पाहून उद्योजकीकरणाचा आदर्श ठेवण्यात आपण कमी पडत चाललो आहे हे लक्षात येते.

      

  मला मान्य आहे की, आज आपण संपूर्ण रामायाणासारखे राहू, वागू शकत नाही; ज्ञानेश्वरांना पचवू शकत नाही; महात्मा गांधींना संपूर्ण पेलू शकत नाही; महात्मा फुले, आगरकर, टिळक, डॉ. आंबेडकर, बाबा आमटे यांना जुन्या विचारांचे म्हणून सोडून देऊ पण त्या त्या काळात काय गरज होती ही त्या महापुरुषांनी ओळखली. म्हणूनच कालचे बदलते संदर्भ लक्षात घ्यायला हवेत. त्यावेळी त्यांना ती गोष्ट आवश्यक वाटत होती म्हणून त्यांनी केली. आज आपल्याला सुधारण्यासाठी काय हवंय हे लक्षात घेतले पाहिजे. सृष्टी नवनवे पांघरुण घेत असते. परिस्थिती नित्य नवीन होत असते. जुने टाकणे हा सृष्टीचा वसा मानवाने लक्षात घेता पाहिजे. परंतु आजकाल सोयीस्कररीत्या या गोष्टींचा अर्थ शोधला जातो. त्यामुळे या नव्या परिवर्तनात जास्त स्वैराचार बोकाळला आहे. 


          पैशाच्या जोरावर मदमस्त झालेला समाज सामान्यांवर अत्याचार करत आहे. आज हिंसात्मक भाषा, कृतीच जास्त वाढलेली दिसून येते. आज समाजामध्ये एक-दुसऱ्याला बनवण्याचे प्रकार जे वेगवेगळ्या संदर्भात झालेले आहे त्या विषयी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. समाज या सर्व बाबी जाणतो, ओळखतो पण त्याच्या हाती काही नसल्यामुळे हतबल आहे. यादृष्टीने युवा पिढीकडूनच अपेक्षा आहे, त्यांनी पुढे येवून उद्योजकता, कर्तृत्व या जोरावर स्वतःला सिद्ध करून या बेगडी जगाला बदलण्यासाठी झटायला हवे तर या समाजामध्ये खऱ्या अर्थाने उद्योजकता रुजण्यास सुरूवात होईल. सर्वत्र असे चालले असं नाही तर आजही समाजात अशा काही चांगल्या संस्था, व्यक्ती आहेत की ते आपल्या परीने अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला नवी दिशा दाखवत आहेत. पण त्यांच्या चांगल्या गोष्टी समाजापुढे येत नाही. 


        आज अशा परिवर्तनाची गरज आहे की, मानवी जीवन सुखी व्हावे. उद्योजकता वाढीस लागावी. माणुसकीचा शोध घेण्यात यावा. संस्कारशील मन घडवण्यात यावे. शालेय जीवनापासून श्रम महत्त्व बिंबवले पाहिजे. तेव्हाच स्वावलंबी जीवन होण्यास आपण मदत कर शकू असे मला मनोमन वाटत राहते. येथे व्यक्तीचा मोठेपणा श्रेष्ठ नसून सामाजिक श्रेष्ठता व राष्ट्रीय ऐक्य मोठे दिसले पाहिजे. म्हणून नवीन परिवर्तन हे संपूर्ण मानवजातीच्या हिताला बरोबर घेणारे असावे आज गाडगेबाबासारखे समाजवादी संताची गरज भासत आहे. गाडगे महाराजांना पडलेले प्रश्न म्हणजे खरंच दगडात देव आहे का? माणस दारु का पितात? सावकार सर्वांना कर्जात का बुडवतो? माणसे अज्ञानी, अंधश्रद्धाळू का? त्यांना पडलेले हे प्रश्न आज सुटलेले आहेत का? तर त्याचे उत्तर नाहीच येईल. कारण आजही शेतकरी आत्महत्त्या करत आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन आणि चंगळवादी झाली आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याविषयी आज समाज किती संवेदनशील आहे याचा विचार केल्यास समाजाची संवेदना हरवत असल्याचे आपल्या लक्षात येईल. 

Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have

       हे सर्व चित्र बदलण्यासाठी त्या काळी गाडगेबाबा अहोरात्र झटले. समाजाची, मनाची खऱ्या अर्थाने नस पकडली. बाबांनी आपल्या कीर्तनातून रामाचा वनवास सांगितला नाही. ते अहिल्येचा उद्धार, पांडवाच्या वनवास कथेत रमले नाही तर त्यांना फक्त दिसत होता समाजातील लाखो दरिद्री नारायणांचा वनवास. हा वनवास संपून किमान अन्न, वस्त्र आणि निवारा मिळावा म्हणून बाबांचे कीर्तनातून रात्रंदिवस भ्रमंती चालू होती. त्यांनी श्रद्धा निर्माण केली परंतु अंधश्रद्धा होऊ दिली नाही. देव दगडात नाही तर कामात आहे, घामात आहे.

      

       माणसांनी 'एकमेकां साह्य करू' सुपंथाचा मार्ग धरला तर आपला देश सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रकारच्या समाज सुधारणेतून उद्योजकताच वाढीस लागेल यात माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...