चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये Chakravarti Baliraja National Literary Conference in Nashik
चक्रवर्ती बळीराजा टि.व्ही. सिरिअल निमिर्तीची घोषणाChakravarti Baliraja TV Serial Production Announcement
![]() |
बळीराजा : ईडा पिडा टळो। बलीचे राज्य येवो।। |
नाशिक : गोदावरी नदीच्या तिरावर कृषी संस्कृतीचा जागर करण्याच्या हेतूने जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी द्राक्षभूमी व देवभूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक नगरीत दुसरे चक्रवर्ती बळीराजा साहित्य संमेलन २५ व २६ मे या दोन दिवसात संपन्न होणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभरातील बळीराजाच्या विविध पैलूंवर कार्य करणारे अनेक अभ्यासक, संशोधक, कलावंत, किर्तनकार, प्रवचनकारांचा समावेश बळीराजा साहित्य संमेलनात असणार आहे. हे संमेलन चक्रवर्ती बळीराजा साहित्य नगरी, बळीराजा मंदिर परिसर, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक या स्थळी भरविण्यात येणार आहे.
![]() |
बळीराजा |
या बळिराजा साहित्य संमेलनात चक्रवर्ती बळीराजा कोण, त्याची संस्कृती कोणती, असे विविध परिसंवाद तसेच नाटक, कवी संमेलन, लोकगीत, धनगरी ओवी, पोवाडे, भजन, कीर्तनाचा समावेश असणार आहे. सलग दोन दिवस हे संमेलन बहरणार असून या संमेलनात चक्रवर्ती बळीराजाच्या इतिहासाचे संशोधक व विचारवंत संमेलनात उपस्थित राहणार आहेत. संमेलनानिमित्ताने समाजातील मान्यवरांचा बळीराजा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात येणार आहे.
चक्रवर्ती बळीराजांनी समस्त माणसांनी कसे वागावे यासाठी कृषी संस्कृतीची स्थापना केली नाग, बैल, काळी आईचे महत्व स्पष्ट केले. याच बळीराजाच्या उज्वल संस्कृतीचा पुरावा म्हणजे आजचा कृषीप्रधान भारत देश आहे. बळी संस्कृती ही भारताची सुवर्णमयी संस्कृती आहे. बळीराजाने मातेला प्रमाण मानून अंबाई, तुळजाभवानी, येडाई, मरी काळूआई, रेणुका, नवलाई अशा नऊ कुळमातांची जागरण परंपरा सुरु केली. आज ज्या कुलदैवतांची आपण मनोभावे आराधना करतो ते खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा हे बळीराजांचे राखणदार आहेत. रक्षाबंधन, मकरसंक्रांत, ओनम, नवरात्र, काल बैसाखी, बिहू, पोंगल, दिपावली यासारखे सण ज्यांनी सुरु केले तो राजा बळी होय.
यावेळी चक्रवर्ती बळीराजा टि.व्ही. सिरिअलच्या निर्मितीची घोषणाही करण्यात आली.ही सिरिअल लेखक शरद तांदळे यांच्या "चक्रवर्ती बळीराजा" या कादंबरीवर आधारीत असेल. त्याचे दिग्दर्शन संजय पाटील करणार आहे. सध्या या संमेलनाची पूर्वतयारी सुरु आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजन समितीशी संपर्क साधून संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीस तन,मन,धन स्वरुपात मदत करण्याचे आवाहन बळी महाराज देवस्थान ट्रस्ट, नाशिक, चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र, बळी अमर मित्र मंडळ, नाशिक या संस्थेच्या संयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन, नाशिक २०२५ (वर्ष दुसरे), कार्यालय: बळी महाराज मंदिर, मुंबई-आग्रा रोड, नाशिक पिनकोड ४२२००३ E-mail: balirajasahityasammelan@gmail.com यावर संपर्क करावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment