महत्वाकांक्षा
Ambition
महत्त्वाकांक्षेचा अर्थ व गरज
अम्बिशन (Ambition) या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे “ध्येयपूर्तीची प्रबळ इच्छा”. मानवी जीवनातील प्रत्येक यशस्वी प्रवासामागे एखादी ठाम महत्त्वाकांक्षा असते. महत्त्वाकांक्षा नसलेला व्यक्ती म्हणजे समुद्रात दिशेविना भटकणारी होडी. ती व्यक्ती कदाचित काही साध्य करू शकेल, पण त्यामध्ये सातत्य, प्रगती आणि आत्मसंतोष नसेल. म्हणूनच महत्त्वाकांक्षा ही जीवनातील प्रगतीची मूलभूत गरज मानली जाते.
महत्त्वाकांक्षेचे प्रकार
महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते त्यात शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पाहिली तर उच्च शिक्षण घेणे, संशोधन करणे, नवीन शोध लावणे. व्यावसायिक महत्त्वाकांक्षेत एखाद्या क्षेत्रात करिअर घडविणे, स्वतःचा व्यवसाय उभारणे किंवा उच्च पद मिळविणे. सामाजिक महत्त्वाकांक्षेत समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे, ग्रामीण भागाचा विकास साधणे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पाहिली तर स्वतःच्या जीवनमानात सुधारणा करणे, कुटुंबाला सुखसोयी उपलब्ध करून देणे या आहेत.
महत्त्वाकांक्षेची सकारात्मक बाजू
योग्य दिशेने नेलेली महत्त्वाकांक्षा ही यशाची गुरुकिल्ली ठरते. ती व्यक्तीला मेहनतीकडे प्रवृत्त करते, शिस्त घडवते आणि आत्मविश्वास वाढवते. इतिहासात डोकावले तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींनी आपल्या ठाम महत्त्वाकांक्षेमुळे समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांचे ध्येय फक्त वैयक्तिक नव्हते, तर समाजहिताचे होते. त्यामुळे योग्य महत्त्वाकांक्षा ही वैयक्तिक प्रगतीसोबतच सामूहिक प्रगतीचेही साधन ठरते.
महत्त्वाकांक्षेची नकारात्मक बाजू
तथापि, महत्त्वाकांक्षा जर अतिरेकी झाली, तर ती व्यक्तीला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. स्पर्धेत आंधळेपणाने धावण्यामुळे ताणतणाव, असंतोष आणि कधीकधी नैतिक मूल्यांचा ऱ्हासही होऊ शकतो. केवळ स्वतःच्या फायद्यापुरती मर्यादित असलेली महत्त्वाकांक्षा इतरांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे महत्त्वाकांक्षा ही नेहमी मर्यादित, संतुलित आणि नैतिक चौकटीत राहणे आवश्यक आहे.
संतुलन व निष्कर्ष
महत्त्वाकांक्षा ही जीवनाची दिशा ठरवते, पण ती विवेकबुद्धीने नियंत्रित करणे आवश्यक आहे. शिक्षण, कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्त या चार गोष्टी महत्त्वाकांक्षेला यशाच्या मार्गावर नेणारे आधारस्तंभ आहेत. संतुलित महत्त्वाकांक्षा व्यक्तीला यशस्वी करते, समाजासाठी उपयुक्त ठरवते आणि जीवनाला अर्थपूर्ण बनवते.
अखेरीस असे म्हणता येईल की, महत्त्वाकांक्षा ही मानवी जीवनातील प्रेरणेचा मूळ स्रोत आहे. योग्य मार्गावर ठेवलेली महत्त्वाकांक्षा ही केवळ वैयक्तिक ध्येयपूर्तीपुरती मर्यादित न राहता समाजाच्या प्रगतीलाही चालना देते. म्हणूनच प्रत्येकाने आपली महत्त्वाकांक्षा निश्चित करून ती साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महत्वाकांक्षा
Ambition
या जगी ज्यांनी केले विशेष,
ती माणसं महत्वाकांक्षी,
सामान्य माणसं गुंततात,
छोट्या गोष्टीत आकांक्षी...
शिवरायांची महत्वाकांक्षा,
होती स्वराज्य मिळवण्याची,
अशीच माणसं ठरतात,
केंद्रीभूत विश्वाच्या सामर्थ्याची...
महत्वकांक्षेच्या पूर्तेतेसाठी,
अंगी येते खूप झपाटलेपण,
आंकाक्षेचा करावा लागतो त्याग,
वळवाव लागतं मन...
अज्ञान दूर होण्यासाठी,
कर्मवीर अनवाणी पायाने फिरले,
पूर्ती केली महत्वकांक्षेची,
सर्व अडचणींना दूर सारले...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com


No comments:
Post a Comment