name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): December 2022

शेतीपूरक ‘कडकनाथ’ व्यवसायातून प्रक्रिया उत्पादने (Agribusiness Kadaknath : success story)

 शेतीपूरक ‘कडकनाथ’ व्यवसायातून प्रक्रिया उत्पादने

(Agribusiness Kadaknath : success story)

आपल्या महाराष्ट्रात विविध शेतीपूरक व्यवसाय केले जातात. त्यात कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायही चांगलाच स्थिरावला असून या व्यवसायात अनेक मंडळीनी पदार्पण केले. पण काळाच्या ओघात काहींचा जम बसला नाही. परंतु आडगाव नाशिक येथील श्री. संदीप सोनवणे यांनी अवघ्या १०० पक्ष्यांपासून सुरु केलेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय आता तर २५००० पक्ष्यापर्यंत पोहचला आहे. टप्याटप्प्याने या व्यवसायात त्यांनी विकास केला असून केवळ अंडी, चिकन, विक्रीवर न थांबता त्यांनी विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित उत्पादने विकसित केली आहेत. ही उत्पादने विक्रीसाठी पारंपारिक स्टोअर्स, ई कॉमर्स प्लेटफॉर्म, वेबसाईट, महिला संचालित सुसज्ज दालने, विविध विक्री प्रदर्शने या माध्यमातून कडकनाथ व्यवसायाला नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या या यशाची दखल साम टी.व्ही. यांनी घेतली असून त्यांची निवड ‘यंग अपकमिंग महाराष्ट्रीयन बिजनेसमन अवार्ड’ या मोलाच्या पुरस्कारासाठी केली आहे. हा पुरस्कार राज्यातील तरुण यशस्वी उद्योजकांना दिला जातो. सदर पुरस्काराचे वितरण दुबई येथे नुकतेच झाले. या पुरस्कारासाठी मी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यावर मुलाखत घ्यायची ठरवली...

    श्री.संदीप सोनवणे यांना कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय का करावासा वाटला या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले कि, मी मुळचा शेतकरी कुटुंबातील असून वडिलांच्या अपघाती निधनामुळे कमी वयातच माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. रोजगाराची संधी शोधण्यासाठी मी १९९१ साली वयाच्या १८व्या वर्षी नाशिकला आलो. परंतु अपेक्षित काम मिळत नव्हते म्हणून उदरनिर्वाहासाठी रिक्शा चालवली. पुढे थोडा स्थिरस्थावर झाल्यानंतर २००४ साली बांधकाम व्यवसाय सुरु केला. त्यात मला अपेक्षित यश मिळत गेले. आता काहीतरी नाविन्यपूर्ण व्यवसाय करावा. त्यातल्या त्यात मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती व शेतीपूरक व्यवसायाची आवड होतीच. पण काय व्यवसाय करावा हे निश्चित सुचत नव्हते या दरम्यान २०१३ मध्ये तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या निवासस्थानी मी कडकनाथ पक्षी पहिला. त्याच्याविषयी जाणून घेतले. त्याच्या अंडी आणि मांस यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याविषयी कुतूहल निर्माण झाले. या पक्ष्याविषयी सखोल जाणून घेतले. अभ्यास केला. इंटरनेटवरून माहिती मिळवली. या पक्ष्याचा मूळ अधिवास असलेल्या मध्यप्रदेशातील झाबुवा येथे भेट देऊन माहिती घेतली. तेथील कडकनाथ फार्मचा अभ्यास करून पुढे हाच व्यवसाय करायचा निश्चित ठरवले असल्याची माहिती श्री.सोनवणे यांनी दिली.

    कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय ठाम झाल्यानंतर २०१५ मध्ये सुमारे २ लाख रुपये गुंतवणूक करत छोटे शेड उभारले. १०० पक्ष्यांपासून हा व्यवसाय सुरु केला आज तर त्यांच्याकडे २५ हजार कडकनाथ पक्षी आहेत. अन्य पोल्ट्री व्यवसायापेक्षा कडकनाथ कोंबडीपालन हा व्यवसाय उत्पादन खर्च, मेहनत व उत्पादन या अंगाने वेगळा असल्याची माहिती त्यांनी दिली. कुशल मनुष्यबळाच्या आधारे नियोजनबद्ध कामकाज चालते. पक्ष्यांच्या शेडसह परिसराची दिवसातून दोनदा स्वच्छता केली जाते. विभागनिहाय कामकाजाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. व्यवसायात गुणवत्ता व नियंत्रण या बाबीकडे लक्ष दिले जाते. बदलत्या काळात अर्ध स्वयंचलित यंत्राच्या साह्याने काटेकोर कामकाज केले जाते. दैनंदिन सर्व कामकाजाच्या अचूक नोंदी ठेवल्या जातात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आरओ शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

    पक्षीनिर्मितीकरिता अत्याधुनिक उबवण कक्षाची उभारणी केली आहे.यात वातावरण नियंत्रण, मोजणी, लसीकरण सुविधा यांचा अंतर्भाव आहे. या टप्प्यावर कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. हैचरीजचे उत्पादनक्षमता प्रतिमाह ३० हजार पक्षी पिले इतके आहे. हैचरीमधून पिले तयार झाल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. १ ते २० दिवस, २० ते ६० दिवस व ६० ते १८० दिवस असे वयोमानानिहाय पक्ष्यांना ठेवले जाते. यामध्ये त्या वयोमानानुसार योग्य ते तापमान, प्रकाशयोजना, लसीकरण व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार विलगीकरण यांची सोय केली आहे.

    कडकनाथ पक्ष्याची पिल्ले आणल्यानंतर पुढे साधारण सहा महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरु झाले. परंतु ब्रोईलर अंडीच्या तुलनेत कडकनाथ अंड्याचा दर अधिक आहे. परिणामी ग्राहकांची मागणी कमी राहत असल्याने सुरुवातीला अंडी विक्रीमध्ये खूप अडचणी आल्या. मात्र आम्ही ग्राहकांना सैम्पल अंडी देऊन याचे महत्व पटवून दिले. विक्रीसाठी मार्केटींगची खास यंत्रणा उभारली. त्यातून प्रामुख्याने मुंबई शहरात ग्राहकांचे जाळे विणले गेले. हीच बाब त्यांच्यासाठी मोठी जमेची ठरली.

    मागणी व वेळेवर पुरवठा होऊ लागल्याने ग्राहकांनी त्यास पसंती दिली असल्याचे श्री.सोनवणे यांनी सांगितले. पुढे नाशिक, पुणे , मुंबई येथे स्वतंत्र विक्री दालने सुरु केली. या विक्री दालनानंतर ई कॉमर्स प्लेटफॉर्मचा त्यांनी विक्रीसाठी अवलंब केला. सोशल मिडियावर जाहिरातीचा वापर करून विक्री हळूहळू वाढत गेली. सध्या बाजारात ग्राहकांना कडकनाथ अंड्याचे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अस्सल कडकनाथ अंडी मिळावी. बनावट विक्री रोखण्याच्या उद्देशाने प्रत्येक अंड्यावर ट्रेडमार्कचा शिक्का मारला जातो. यामुळे ग्राहकांची फसवणूक टळते. व्यवसायात गुणवत्तेसह पारदर्शकता जपणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. कडकनाथ पक्षीपालनाचा हा व्यवसाय कडकनाथ अग्रो वर्ल्ड या नावाने नोंदणीकृत केला आहे. त्यांनी २०१८ मध्ये कडकनाथ या नावानेच ट्रेडमार्क मिळवला आहे. नावाचे अधिकार मिळावीत कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे श्री.सोनवणे यांनी सांगितले.

    कोणत्याही कुक्कुटपालनात खाद्य हा महत्वाचा घटक आहे. गुणवत्तापूर्ण खाद्य पक्ष्यांना उपलब्ध करण्यासाठी श्री. सोनवणे यांनी पक्षी खाद्य निर्मितीसाठी स्वतःचे युनिट उभारले असून त्याची उत्पादनक्षमता प्रती तास ५ क्विंटल इतकी आहे. याद्वारे एका दिवसात (८ तासात) तीन दिवसांचे कुक्कुटखाद्य तयार होते. खाद्यानिर्मिती करताना नैसर्गिक घटक मिसळावे लागतात. यामुळे गुणवत्तापूर्ण अंडी मिळतात. सुरवातीला अंड्यातील उपलब्ध घटक तपासण्यासाठी अंडी प्रयोगशाळेत पाठवली. मात्र तपासणीत काही घटक कमी निघाल्याने गांभीर्याने त्याची कारणे शोधली. तज्ञांच्या सल्ल्यानुसार खाद्यानिर्मितीत सोयाबीन, फिशमिल, मका यासह खनिजे अशी विविध १८ नैसर्गिक घटक मिसळून खाद्य तयार करून दिले. नंतर पुन्हा अंडी प्रयोगशाळेत तपासली असता अपेक्षित घटक उपलब्ध असल्याचे दिसून आले. यातून श्री. सोनवणे यांचा आत्मविश्वास वाढला. आणि गुणवत्तापूर्ण अंड्याचे उत्पादन मिळाले.

    कडकनाथ अंड्याची टिकवणक्षमता अवघी ७ दिवस आहे. यात प्रामुख्याने हिवाळा व पावसाळा वगळता उन्हाळ्यात मागणी कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात शिल्लक राहणाऱ्या प्रती दिन सुमारे २ हजार अंड्याचे करायचे काय हा प्रश्नच होता यावर सलग सहा महिने संशोधन करत अंड्यापासून भुकटी निर्मितीचा प्रयोगही केला भुकटीची साठवणक्षमता योग्य वातावरणात ६ महिन्यापर्यंत आहे. यामुळे उन्हाळ्यातील शिल्लक राहणाऱ्या अंड्याची समस्या व जोखीम कमी झाली. हा प्रयोग सिद्ध झाल्यानंतर आणखी प्रक्रिया उत्पादनांची मालिका नावारूपाला आली असल्याची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली.

    नाविन्यपूर्ण प्रक्रिया उत्पादनाविषयी माहिती देताना श्री. सोनवणे यांनी सांगितले की, निम्म्या अंड्याची थेट विक्री तर निम्म्या अंड्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन उत्पादने बाजारात आणली आहेत. प्रक्रियेतून अंड्यापासून भुकटी तयार केल्यानंतर त्यांनी रेडी टू कुक पद्धतीने मसाला मिश्रित आम्लेट व प्रोटीन पावडर अशी दोन प्रमुख उत्पादने सहा महिन्यापर्यंत टिकतात. यासह कडकनाथ नर कोंबड्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या मिलेनिअम धातूचे संकलन केले जाते. त्यापासून बलवर्धक भुकटी ब्लाक व्हीगर नावाने बाजारात आणली. याच्या शासकीय प्रयोगशाळेतून चाचण्या घेतल्या असून पेटंट मिळवले असल्याची माहिती श्री.सोनवणे यांनी दिली.

    कडकनाथ कोंबडीचे ताजे व फ्रोझन पद्धतीने पिशवीबंद मांस विक्री केली जाते. ज्याची टिकवणक्षमता ९० दिवस आहे. पक्ष्याची अंडी देण्याची क्षमता संपल्यानंतर या कोंबड्याच्या मांसापासून प्रक्रियायुक्त पाळीव प्राण्यासाठी खाद्य (पेटफूड) बाजारात आणले आहे. कडकनाथ शाम्पू, अंड्याची पावडर, कडकनाथ वियाग्रा, कडकनाथ फेसपैक, कडकनाथ हेअर पैक अशी अनेकविध उपयोगी उत्पादने तयार केली आहेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व जंक फूडला पर्याय देण्याच्या उद्देशाने कडकनाथ अंडी व मांसापासून आरोग्यवर्धक पिझ्झा, बर्गर यांसह नव्या दहा पाककृतीवर काम सुरु आहे. ते अधिक आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी सतत संशोधन व विकासकार्य सुरु आहे. या उत्पादनासाठी मैदा व इतर बेस न वापरता तृणधान्य व कडधान्याचा वापर केला जात आहे. गोड व तिखट या दोन्ही प्रकारात हे पदार्थ विकसित केले जात आहेत. ही उत्पादने बाजारात येत असल्याची माहितीही श्री. सोनवणे यांनी दिली.

    बदलत्या बाजारपेठेमध्ये आकर्षक ब्रांडीग त्यांनी केले असून प्रक्रियायुक्त उत्पादने विक्रीसाठी www.kadaknath.com नावाची वेबसाईट तयार केली असून यासह kadaknath77 नावाने सोशल मिडियावर फेसबुक, यु ट्यूब, ट्वीटर, इंस्टाग्राम या माध्यमाद्वारे उत्पादनाचा ते प्रचार आणि प्रसार करतात. यासोबत ग्राहकांना आकर्षक पैकेजिंग, ब्रांडिंग केले जात असल्याची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली. प्रीमियम व इकॉनामी प्रकारात अंडी विक्री केली जाते. सण, उत्सव या धर्तीवर भेट देण्यासाठी कडकनाथ हेल्दी प्रीमियम गिफ्ट बॉक्स संकल्पना सुरु केली. यातून दिवाळी व रमजान सणाच्या खास बाजारपेठेमध्ये शिरकाव केली असल्याची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली. या उत्पादनाला अनेक सेलीब्रेटी व ग्राहकांनी आगाऊ मागणी करून पसंती नोंदवली आहे.

    सुरुवातीला मुंबईत थेट पद्धतीने अंडी विक्रीची व्यवस्था बसवली आहे. त्या अंडी विक्रीसाठी ई कॉमर्स व्यासपीठाचा अवलंब सुरु केला. आज फ्लीपकार्ट, अमेझॉन या व्यासपीठावरून त्यांच्या उत्पादनाला अ वर्ग श्रेणी आहे. या व्यासपीठावरून दररोज सुमारे २ हजार अंडी व ५० ते १०० किलोपर्यंत चिकन विक्री होते. रेडी टू कुक आम्लेट ४०० ते ५०० पैकेट विकले जातात. यासह नेचर बास्केट, फूड हॉंल, ईझी डे क्लब, यांच्या माध्यमातून सुमारे १०० स्टोअर्समध्ये देशभरात अंडी बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे दिल्ली,कलकत्ता, चेन्नई या महानगरासह पुणे, बंगळूर, अहमदाबाद या मोठ्या शहरामध्ये मागणी वाढली. प्रामुख्याने आखाती देशांमधील दुबई, कतार,शारजाह येथे अंडी व चिकन निर्यातीस मोठी मागणी असते. बदलते मार्केटिंग ट्रेड अभ्यासून आपल्या उत्पादनामध्ये नाविन्यपूर्णता आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असतो. 

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकनाथ अंडी व चिकनला मागणी वाढली असल्याचे ते म्हणाले. ही उत्पादने विक्रीसाठी आवश्यक जनजागृती वेबसाईटद्वारे केली होती. श्री. सोनवणे साहेबांचा अफाट जनसंपर्क असून मित्रपरिवाराचा गोतावळाही मोठा आहे. सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेते, प्रशासकीय सेवेतील अधिकारी, उद्योजक आणि व्यापारी ह्यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. नेहमी सदैव कार्यरत असणारे, शून्यातून आपली वेगळी वाट निवडणारे श्री. सोनवणेसाहेबांना मी शुभेच्छा देऊन मी त्यांची रजा घेतली. अधिक माहितीसाठी digikadaknathagroworld@gmail.com या इमेल वर संपर्क करावा,

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com 

www.DigitalKrushiyog.com

#यशोगाथा 

www.kadaknath.com

#प्रक्रिया उत्पादने 

#Kadaknath77


चाळीतील कांदा नुकसान टाळण्यासाठी गोदाम इनोव्हेशन्स यंत्र (To prevent onion damage Godam Innovations Yantra)

चाळीतील कांदा नुकसान टाळण्यासाठी  
To prevent onion damage 

गोदाम इनोव्हेशन्स यंत्र 
Warehouse Innovations Machine

Chalitil kanda nuksan talnyasathi godam innovation's yantra

     

 भारत हा कृषीप्रधान देश आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ नाशिकमध्ये आहे. चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण खूप आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. ते टाळण्यासाठी नाशिक येथील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चाळीतील खराब कांद्याची माहिती मिळणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.

Chalitil nuksan talnyasathi godam innovation's yantra

 नाशिकला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी ४० टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो टन कांदा येथून निर्यात केला जातो. बाजारात भाव नसेल तर शेतकरी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो. वातावरणातील बदलांमुळे चाळीत साठवलेला ४० टक्के कांदा खराब होतो. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कुटुंबातील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे तंत्र विकसित केले आहे.
    
    इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना तिची निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक येथील 'डिजिटल इम्पॅक्ट स्वेअर' नावाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये झाली. याच काळात तिचे लक्ष 'कांदा' या विषयाकडे वळले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याला मोठी मागणी असूनसुद्धा शेतकरी त्रस्त का हा प्रश्न तिला पडला? याबाबत संशोधन करण्यास तिने सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते. चांगला भाव मिळाल्यास कांदा बाजारात विकला जातो. भाव चांगला नसल्यास हा कांदा चाळीत साठवून ठेवला जातो. यातील बहुतांशी कांदा हवेतील आर्द्रता आणि योग्य तापमान न मिळाल्याने खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते.
Chalitil nuksan talnyasathi godam innovations

    कांदा खराब होण्याची सुरुवात झाल्याचे शेतकऱ्यांना खूप उशीरा समजते. तोपर्यंत मोठ्या प्रमाणत कांदा सडून खराब झालेला असतो. कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू होताच शेतकऱ्यांना कळाले तर नुकसान वीस टक्क्यावरच थांबवता येईल असा विचार करून नेमक्या याच प्रश्नावर कल्याणी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केले. कल्याणीने शोधलेल्या 'अरली स्टेज स्टार्टअप लेवरीजेस इंटरनेट ऑफ टिंग टेकनॉलॉजी' या तंत्रज्ञानामुळे सडलेल्या कांद्यातून बाहेर पडणारा विशिष्ट वायू शोधून त्याची पूर्वकल्पना देऊन शेतकऱ्यांना सावध केले जाते. ही पूर्वकल्पना मिळाल्यानंतर शेतकरी सडलेला कांदा चाळीतून बाहेर काढतात. त्यामुळे उर्वरित कांदा चांगला राहतो. याशिवाय कांदा चाळीतील तापमान, आद्रतेची माहिती रियल टाईम डाटा सिस्टीमद्वारे कंपनीच्या मुख्य केंद्रात एकत्र केली जाते. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना सावध केले जाते. त्यानंतर शेतकरी तापमान, आद्रता कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी तात्काळ विविध उपाययोजना करू शकतात. ज्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टाळता येते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक परिसरातील शेतकरी चाळीतील कांदा सुरक्षित ठेवत आहेत. साधारणपणे सात ते आठ टनाच्या चाळीसाठी एक डीव्हाईस पुरेसे आहे.

    साधारण शेतकऱ्याने १० टन कांदा चाळीत साठवला तर त्यातील ३० ते ४० टक्के कांदा वातावरणामुळे खराब होतो. ही बाब डोळ्यासमोर ठेऊन कल्याणी शिंदे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र विकसित केले आहे. हे डिव्हाईस कांदा चाळीत लावल्यानंतर कांदा खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास त्यातून निघणारा वायू डिटेक्ट करतो. शेतकऱ्याला तत्काळ याबाबत अलर्ट मिळतो. चाळीत साठवलेला कांदा तापमानातील बदल आणि पाऊस, थंडी आणि हवेतील आद्रता वाढल्यामुळे सडतो. कुजतो आजवर शेतकऱ्यांना चाळीतील कांदा सडतो आहे. हे केवळ वासावरून कळायचे पण कांद्याचा वास आला आणि तात्काळ उपायोजना केली तरी किमान ३० टक्केपर्यंत कांदा वाया गेलेला असतो. काही शेतकऱ्यांना कांदा चाळी बसल्यानंतर म्हणजेच कांदा सडून कांद्याचा ढीग कमी होणे. कांदा सडून नुकसान झाल्याचे कळते. या परिस्थितीत तर तब्बल ६० ते ७० टक्के कांदा वाया जातो. या नुकसानीत कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होतो.

    कल्याणी सध्या या पायाभूत संशोधनाच्या पुढच्या टप्प्यावर काम करीत असून त्यांनी टाटा स्टील आणि सह्याद्री फार्मच्या सहकार्याने 'कम्युनिटी क्लायमेट कंट्रोल वेअर हाऊस' या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेतून सह्याद्री फार्मच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर, मध्यप्रदेशातील जबलपूर आणि उत्तर प्रदेशातील संभल या ठिकाणी तीन गोदामाची रचना आणि पर्यवेक्षणाचे काम केले जात आहे. या तीन ठिकाणी सुमारे ५०० टन कांद्याचे साठवणूक केली आहे. भविष्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांनी सामूहिक तत्त्वावर कम्युनिटी क्लायमेट कंट्रोल वेअर हाऊसची उभारणी करावी. जेणेकरून कमी खर्चात कांद्याचे अत्याधुनिक पद्धतीने साठवणूक कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करून त्या काम करीत आहेत. कल्याणी शिंदे यांनी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी शोधलेले हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरत आहे.

 २०१८ मध्ये 'गोदाम इनोव्हेशन्स'ची कल्पना मांडल्यानंतर कल्याणीला 'डायरेक्टर ऑफ ओनीयन अँड गार्लिक रिसर्च सेंटर'कडून ३ लाख रुपयांचा निधी मिळाला. 'अनलिमिटेड इंडिया'कडूनही तिला २ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून तिने काही ठिकाणी यशस्वीरित्या गोदाम इनोव्हेशन्सची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. पुढील वर्षात ३५ कांदा चाळींमध्ये गोदाम इनोव्हेशन्सचे युनिट बसवणार असल्याचे कल्याणीने सांगितले. अधिक माहितीसाठी kalyani@godaminnovations.com या इमेल वर संपर्क करावा.

© दीपक केदू अहिरे,नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

भाजीपाला विक्रेते ते अमेझ ग्रुपचे डायरेक्टर (vegetable seller to Amaze group directer )

 भाजीपाला विक्रेते ते अमेझ ग्रुपचे 

डायरेक्टर इंजि..अक्षय काटकर

(vegetable seller to Amaze group directer)

कोरोना कालावधीत अनेकांचे                

नाशिक येथे आयोजित सेवाह आंत्रप्रीनर्स कोनक्लेव २०२० मध्ये इंजीनीयर असलेले श्री. अक्षय काटकर यांची ओळख करून देण्यात आली. तळागाळातून आलेले बेरोजगार तरुण, भाजीपाला विक्रेते म्हणून काम केलेले श्री.काटकर आज कोट्यवधीची उलाढाल अमेझ ग्रुपतर्फे करतात त्यांच्याशी ओळख करून घेत मी त्यांची उद्योजकसाठी मुलाखत घेतली. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतला. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारले असता ते म्हणाले कि, माझा जन्म  औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे झाला आहे. माझे आईवडील हे दोघेही शेती करतात. माझे प्राथमिक शिक्षण गंगापूर तालुक्यातील जाखमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर मी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गंगापूरच्या न्यू हायस्कूलमध्ये घेतले. नंतर बी.ए.पदवी घेतली. त्याचवेळेस मी औरंगाबादच्या हायटेक कॉलेजमध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. मला बांधकाम क्षेत्रात रस असल्यामुळे मी हे शिक्षणाचे क्षेत्र निवडले.

माझे सर्व शिक्षण मराठी शाळेमध्ये झाल्यामुळे डोक्यावरून सगळी इंग्लिश गेली असल्याचे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणजे मी पहिल्याच वर्षी नापास झालो. हायटेक कॉलेजनंतर मी पुन्हा नव्याने एम. आय. टी. इंजीनीअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. घरच्या गरीब परीस्थितीची जाणीव होती व परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे असे मनोमन वाटू लागले म्हणून शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला. कॉलेजची फी व इतर बाबींसाठी मी गंगापूर शहरातील नामवंत विधिज्ञ बी.पी. जोशी यांच्याकडे संगणक टायपींग करीत असे. शालेय शिक्षण घेत असताना सुद्धा मी आणि माझा लहान भाऊ गौरव भाजीपाला विकत असू. हेच ते उद्योगाचे बाळकडू मला लहान वयातच मिळाले असल्याचे श्री काटकर यांनी स्पष्ट केले.

इंजीनिअरिंग झाल्यानंतर मी लगेच इंटरनेट कैफे चालू केला. माझे चुलते व आतेभावाचे प्रिंटींग प्रेस असल्यामुळे मी त्यांच्याकडेही काम केले. थोड्या पैशाची बचत केली. त्यावेळी इंटरनेट हे लोकांची गरज बनले होते हे ओळखून मी नेट कैफे गंगापूर शहरात टाकला. एका मित्रासोबत केलेला हा बिझनेस दोन महिन्यानंतर बंद पडला. अपयश काय असते याचा पूर्ण धडा घेतला. पैशाची चणचण भासू लागल्यामुळे नोकरी करणे भाग पडले. अनेक वेळा विचार करायचो कि मी चांगले टायपिंग करतो तर हा व्यवसाय करून पाहावा म्हणून गंगापूर दिवाणी न्यायालयासमोर संगणक टायपिंगचा व्यवसाय चालू केला. त्यावेळेस सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजि. वाय.टी.कंगणकर साहेब, वकील मनोरकर, पानकडे साहेब यांची खूप मोलाची मदत मिळाली. माझा संगणक टायपिंगचा बिझनेस चांगला व्यवस्थित स्थिरस्थावर होत असताना टपरी मालक यांनी त्रास द्यायला सुरवात केली. ते माझ्याकडून जास्त भाडे आकारू लागले. मला त्यांचे बोलणेही सहन होत नसे. या जाचातून सुटका व्हावी म्हणून मी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मी पुहा जोशी साहेबांकडे नोकरी करण्यास सुरुवात केली. व्यवसायातून नोकरी आणि नोकरीतून व्यवसाय असा प्रवास वारंवार घडू लागला असल्याचे श्री.काटकर यांनी सांगितले.  

जोशी साहेबांकडे अनेक नामवंत उद्योजक, बिल्डर येत असत. ते पाहून मला असे वाटायचे कि आपण नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हायचे. पण ते कसे शक्य आहे. ती काय जादूची कांडी आहे काय? असे विचार येऊ लागले. परंतु मला माहित होते कि मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे काम करत राहिलो. घरची परीस्थिती बेताची असल्यामुळे झगडत राहिलो. मिळेल ते काम करत राहिलो. कारण मला माझं उद्योजक व्हायचं स्वप्न होत. मध्ये मध्ये याला तपासायचो पण हाती काहीच लागत नव्हत. वडिलांना त्यावेळी काही लोक म्हणायची कि याला ट्रक्टर ड्रायव्हर करा. पण मला काहीतरी वेगळे करायचे होते. माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा करायचा होता म्हणून मी आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकलो. पण समस्या काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यातच माझ्या वडिलांचा भयंकर अपघात झाला. त्यांचा पाय निकामी झाला.

प्रत्येकवेळी नवीन संकट माझ्यासमोर ठाण मांडत असे.त्यामुळे पैशाची खूपच कमतरता भासत असे. अनेकवेळा वाटायचे कि आत्महत्या करावी. पण घरच्या जबाबदारीमुळे मी पुन्हा जगण्याचा निर्णय घ्यायचो. अशातच मला पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली. स्वामी विवेकानंदाचे कर्मयोग पुस्तक मी वाचले आणि माझे जीवनच बदलवून टाकण्याचा मी निर्णय घेतला. पुस्तक घेण्यासाठीहि पैसे नसायचे. पण अडीअडचणीतून मार्ग काढून मी पुस्तक वाचत राहिलो. सध्या माझ्याकडे एक हजार पुस्तके संग्रही आहेत. पुस्तकांनी मला माझ्या जगण्याचा मार्ग सुकर केला असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.

दरम्यान मला चांगल्या पगाराची एम.एन.सी. कंपनीत नोकरी लागली. थोडा पैसा जास्त मिळू लागला. बचतीची सवय जोपासली. मी माझे पैसे वाचवून छोट्या मोठ्या बिझिनेस सेमिनारला जात असू यात मला खुप माहिती मिळत गेली. व्यवसाय कसा करावा, का करावा याचे शास्त्र मला कळले. विविध संस्थाना भेटी दिल्या. काही बिझिनेस संदर्भात प्रशिक्षण घेतले. यात एम.सी.ई.डी.,सेवाह एज्युकेशन हब यांना भेटी दिल्या. सेवाह एज्युकेशन नाशिकच्या आश्विनी धुप्पे यांना माझ्या सर्व परिस्थितीविषयी सांगितले. त्यांनी बिझिनेस संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मी २००८ ते २०२० पर्यंत नोकरी व्यवसाय अशा व्यापात अडकलो होतो. आता मी माझ्या व्यवसायाच्या, उद्योगाचे स्वप्न पूर्ण करण्यास सज्ज झालो.

इंजिनीअर असलेल्या श्री. अक्षय काटकर यांनी सुमूहर्तावर अमेझ ग्रुपची स्थापना केली. दिनांक २८/०८/२०२० रोजी लाकडाऊनमध्ये अमेझ ग्रुपचे पहिले ऑफिस गंगापूर शहरात सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे  इंजिनियर मित्र मंगेश नरोडे याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्री. नरोडे यांस १२ वर्षाचा स्टक्चरल अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळवण्यासाठी मी त्यांच्याशी भागीदारी केली. औरंगाबाद येथे सुद्धा आम्ही ऑफिस चालू केले आहे. आजमितीला अमेझ ग्रुपमध्ये आर्किटेक्चर प्लानिंग, थ्रीडी डिझाईन, स्टक्चरल डिझाईन, इंटेरियर डिझाईन, सर्वेयिंग, मोजणी, लैन्डस्केपींग व कन्सल्टिंग इंजिनीअरिंगमधील होणारी सर्व कामे केली जातात.

अमेझ ग्रुपची अनेक वैशिष्ट काळानुरूप सिद्ध झाली आहेत. त्यांच्याकडे २ आर्किटेक्ट आणि ६ सिव्हिल इंजिनीअर अशी अनुभवी टीम आहे. आजमितीला त्यांच्या २५० साईटस चालू आहेत. पिंपरी चिंचवड,औरंगाबाद,बीड, सुरत, गुजरात, उत्तराखंड, यवतमाळ, जालना, बुलढाणा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये त्यांची कामे चालु आहेत. त्यांचे सर्व प्लान हे नाविन्यपूर्ण असून संपूर्ण स्टक्चरल डिझाईनसह आहेत. प्रत्येक कामाची टेक्निकल टेस्टिंग केली जाते. प्रत्येक कामाचा प्लान विंडो, डोअर व अनेक प्लान ग्राहकास दिले जातात. प्रत्येक धर्माच्या वास्तुशास्रासह हे दिले जाते. ग्राहकांचा प्रत्येक महिन्याला फिडबैक, प्रतिसाद हा घेतला जातो. शंभर टक्के पारदर्शी काम, २१ साईट व्हिजीट व जोब कार्ड असे अनेक प्रकारची गुणविशेष सांगता येतील. या आधुनिक युगात नाविन्यपूर्ण काय आणि कशा प्रकारच्या सेवा देता येतील याविषयी आम्ही नेहमीच अग्रेसर राहत असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.

या कॉक्रीटच्या युगामध्ये झाडांची संख्या खुप कमी होत आहे त्यासाठी त्यांनी एक घर एक झाड हा उपक्रम सुरु केला आहे त्यासाठी त्यांनी प्रोत्साहनपर सन्मानचिन्हही दिले जात असल्याचे सांगितले. सामाजिक कार्याची आवड लहानपणापासून जोपासल्यामुळे आपण समाजाचे काही देणे लागतो या कार्यासाठी क्रीएटीव्ह युथ फौंडेशनची स्थापना केली आहे. श्री. काटकर ज्या जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकले त्या शाळेला त्यांनी संगणक भेट दिली आहे. दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेची, विद्यार्थाची  गुणवत्ता कशी वाढीस लागेल यासाठी श्री काटकर यांनी सहकार्य केले आहे. पुढेही करत राहणार. वृक्षारोपणाची चळवळ व्यापक करून वृक्षाचे जतन करण्यासाठी नेहमी त्यांचा कटाक्ष असतो. या सर्व कार्यात त्यांचे मित्र रवींद्र एरंडे, अड मानसी जोशी, प्रसाद चव्हाण, संतोष भिंगारे यांचा सक्रीय सहभाग असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले. अशा उपक्रमशील उद्योजकास मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करून मी त्यांची रजा घेतली.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.DigitalKrushiyog.com




#Success story
#Success
#success story of the farmers
#successful entraprenuar
#important success story


औषधी वनस्पती आवळा : लागवड ते प्रक्रिया (Medicinal plant Amla: cultivation to processing)

औषधी वनस्पती आवळा : लागवड ते प्रक्रिया

Medicinal plant : Awala
Planting to processing 


     आवळा हे फळ पुरातन काळापासून प्रसिद्ध असून आवळ्याचा उपयोग आरोग्यवर्धक असून औषधी व गुणकारी म्हणून प्रसिद्ध आहे. 

  आयुर्वेदात आवळ्याला अमृतफळ म्हणून ओळखले जाते. आवळे आंबट,गोड, तिखट, तुरट, कडू या  रसांनी युक्त असतात.
          आवळा हे फळ अनेक उद्योगांना चालना देणारे आहे. आवळ्यापासून सुपारी, वडाख, आवळकाठी, मोरावळा, जेलीसरबत, कँडी, लोणचे, चटणी, आम्ल-पित्तनाशक चूर्ण, महासुदर्शन चूर्ण, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण इ. कितीतरी औषधांची निर्मिती करता येईल. औषध निर्मितीमध्ये आवळ्याला महत्त्वाचे स्थान असल्यामुळे अनेक तरुणांना विशेषतः महिला वर्गाला या उद्योगाचा फायदा होईल.

वनस्पती परिचय :


                     आवळा हे युफॉर्बिरेशी (Euphorbiaceae)  कुळातील असून त्याचे लॅटिन नाव एम्ब्लिका ऑफिसिनेसीस (Emblica officinalis) असे आहे. आवळ्याला आमला, आमलकी इमलीका, श्रीफळ, धात्री इ. असे पर्यायी नावे आहेत. 
 आवळ्याचे झाड मध्यम आकारमानाचे, पानगळ होणारे असून त्याचे मूळ स्थान दक्षिण पूर्व आशिया येथे आहे. भारतामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार राज्यात याची लागवड अधिक आढळते.
        आवळ्याची झाडाची पाने साधारणत: चिंचेच्या पानाप्रमाणे बारीक पातळ असतात. फुलांचा रंग पिवळा असून गुच्छात येणारी फळे गोलाकार असून सुरुवातीला हिरवळ नंतर पिवळसर रंगाची होतात. नंतर तांबूस पिवळी होतात. फुलावर विभागलेल्या सहा रेषा असून बी कठीण कवचाचे असते.

औषधी गुणधर्म व उपयोग :


      औषधी गुणधर्म व आहारात पौष्टिकता असलेल्या या फळाचा वापर त्रिफळा चुर्णात केला जातो. १०० ग्राम आवळ्यात ४५० ते ७२० मी. ग्रॅम.क जीवनसत्व असते. सतत आवळा सेवनाने तारुण्य अवस्थेत राहता येते. आवळ्याची फळे आम्ल तुरट असतात. त्यामुळे वायूचा नाश होतो. तसेच रक्तपित्त व मधुमेह यांचा नाश होतो. 
  आवळा फळ शुक्र व धातु वर्धक आहे. केसांसाठी हितकारक असून पित्त व कफनाशक आहे. दृष्टी सतेज करणारा आहे. क्षयरोग, अस्थमा यासारख्या रोगांमध्ये आवळ्याच्या सेवनाने गुण येतो. हृदयरोगावर, बद्धकोष्ठ, रक्तविकार, रक्तस्राव, कावीळ आदी रोगासाठी आवळ्याचा रस गुणकारी ठरला आहे.
   आवळ्याच्या नियमित सेवनाने वंधत्व नाहीसे होते. केस गळू नये व पांढरे होऊ नये म्हणून आवळ्याच्या रसाचे सेवन उपयुक्त ठरते. आवळ्यापासून मोरावळा, ज्याम, जेली, सरबत, सुपारी, आवळकंठी, लोणचे, चटणी, आवळा कीस, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण, आम्लपित्त नाशक चूर्ण, महासुदर्शन चूर्ण अशा कितीतरी औषधी गुणयुक्त पदार्थांची निर्मिती करता येते.

आवळा गरामधील घटकद्रव्ये 


       खालील दिलेल्या माहितीत आवळा गरामधील घटकद्रव्ये दिलेली आहेत.  आवळा गरामधील घटकद्रव्य जलांश (८१.२), प्रथिने (०.५) मेद (०.१),खनिजे (०.७), तंतू (३.४), कर्बोदके (१४.१), कॅल्शियम (०.०५), फॉस्फरस (०.०२टक्के), लोह (१.२ मी. ग्रॅम/१०० ग्रॅम), जीवनसत्त्व सी (६०० मी. ग्रॅम/१०० ग्रॅम) आवळ्यापासून मोरावळा किसाचा तसेच अख्खा आवळ्याचा मोरावळा तयार करतात.  मोरावळ्याचा उपयोग उत्तम टॉनिक, पित्तशामक उपयोग आहे.

आवळा प्रक्रिया 


      किसाचा मोरावळा तयार करण्यासाठी आवळा स्वच्छ धुऊन घ्यावा. नंतर स्टीलच्या किसणीवर किसून घ्यावा. किसलेल्या आवळ्याच्या प्रमाणात साखर घेऊन (दुप्पट) किसात मिसळावी. 
  तयार झालेले मिश्रण एका पातेल्यात घालून त्यावर स्वच्छ फडके बांधून उन्हात ठेवावे. साखरेचा पाक होईपर्यंत ठेवावे. नंतर त्यात वाळा पावडर घालावी. हे प्रमाण एक किलोस २० ग्रॅम वाळा पावडर टाकावी. अशा पद्धतीने किसाचा मोरावळा तयार करता येतो.
आख्या आवळ्याचा मोरावळा बनवण्यासाठी आवळ्याला टोचणीने टोचावे. नंतर त्या आवळ्यांना वाफलून घ्यावे. नंतर दुप्पट साखर घेऊन आवळे वाफळविताना राहिलेले पाणी घेऊन त्याचा पाक करावा. व त्या पाकात आवळे टाकून उकळी आणावी. पाक घट्ट होऊ देऊ नये. अशा पद्धतीने आवळ्याचा मोरावळा तयार करतात.

आवळा चटणी :


        आवळ्यापासून आवळा चटणी तयार होते. त्यासाठी स्वच्छ डाग नसलेले १ किलो आवळे घ्यावे, गरम मसाला चार चमचे, लाल तिखट दोन चमचे, एक चमचा वेलदोड्याचे दाणे, दोन चमचे जिरे, एक चमचा शेंगदाण्याची पूड, दोन चमचे बडीशेप, दोन चमचे सुंठ पूड, चवीनुसार साखर मीठ व व्हीनेगार टाकावे. यासाठी सर्वप्रथम १५ मिनिटे आवळे उकळून घ्यावेत. आवळे मऊ झाल्यावर त्यातील बिया काढून घ्याव्यात. 
  ग्राइंडरमधून गर काढून घ्यावा. जिरे, बडीशेप, सुंठ पूड व सर्व मसाला टाकून मिक्स करून घ्यावा. चवीपुरते मीठ व थोडे व्हीनेगार घालून सर्व मिक्स करून घट्ट झाल्यावर बरणीत भरावे. चटणी सेवनाने पचनास मदत होऊन क जीवनसत्व मिळते. 

आवळा लोणचे :


    आवळा लोणचे बनवण्यासाठी आवळे पाच किलो, मीठ एक किलो, लाल मिरची पाचशे ते सातशे ग्रॅम, मेथी दीडशे ग्रॅम, मोहरी अडीचशे ग्रॅम, बडीशेप दोनशे ग्रॅम, हिंग आठ ग्रॅ,  तेल एक किलो, २५ ग्रॅम सोडियम बेंजोएट एवढे साहित्य लागते.   यासाठी पूर्ण पिकलेले बिनाडागीचे आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत. पाण्यामध्ये मीठ टाकून उकळावे. त्यानंतर उकळत्या पाण्यात फोडी मोकळ्या करून घ्याव्यात. बिया काढून टाकाव्यात. बडीशेप बारीक करून घ्यावी. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल करून घ्यावे. तेल गरम झाले की त्यात मेथी, मोहरी, बडीशेप भुकटी टाकावी. आवळ्याच्या फोडीला हळद लावावी. सर्व मिश्रण थोडा वेळ गरम करून घ्यावे. गरम केल्यावर त्यात लाल मिरची पावडर आणि हिंग टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आणि नंतर त्यात सोडियम बेंझोईट मिसळून लोणचे बरणीत मुरण्यासाठी ठेवावे.
     आवळा लोणचे खराब होऊ नये म्हणून लोणचे जास्त काळ टिकवण्यासाठी सोडियम बेंझोईट टाकावे. याचे प्रमाण एकदम कमी झाल्यास लोणचे खराब होते. बुरशी येते. लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास लोणचे काळे पडते. लोणचे खराब होऊ नये म्हणून त्यात प्रती किलो एक ग्रॅम या प्रमाणात सोडियम बेंझोइट टाकून ते निर्जंतुक बरणीत ठेवावे. व काढतेवेळी स्वच्छ चमचा वापरावा. ताजे डाग नसलेले आवळे स्वच्छ धुऊन गरम पाण्यात दहा मिनिटे ठेवून बाहेर काढावेत.
      जास्त तीव्रता असलेल्या मिठाच्या पाण्यात ठेवू नये. ठेवल्यास सुरकत्या पडतात. आवळ्याचे लोणचे बनवीत असताना फोडी गरम झाल्यास करवटपणा येतो. तसेच मसाल्यामध्ये फोडी जास्त वेळ परतवल्याने लोणच्याला कडवटपणा येतो. लोणचे चविष्ट न होणे, लोणच्याला मिठाचे प्रमाण कमी पडणे, पूर्णपणे मिक्स न होणे, आवळ्याच्या फोडी मऊ पडणे, त्यासाठी मीठ टाकतेवेळी पूर्णपणे मिक्स होण्यासाठी व्यवस्थित हलवून घेणे गरजेचे आहे.

हवामान :

    हे झाड कोणत्याही हवामानात येते. समशितोष्ण हवामानाबरोबरच कोरड्या व उष्ण हवामानातही चांगले येते. मोठी झाडे, कडक व उष्ण तापमान (४६ सें.मी.) व अतिशय गोठवणारी थंडी सहन करू शकतात. 
 कोकणातील उष्ण व दमट हवामानातसुद्धा आवळा पीक चांगले येते. आवळ्याची लागवड हिमालयासारख्या थंड प्रदेशापासून ते राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात घेतले जाते. आवळ्याचे झाड १० अंश ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंतचे  तापमान सहन करू शकते. आवळ्याची लागवड समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीपर्यंत करता येते.

जमीन :


     हलकी ते मध्यम जमीन तसेच काळ्या सुपीक तसेच पोयट्याच्या मुरमाड जमिनीत हे पीक चांगले येते. जमिनीचा सामू ७.५ ते ९ असल्यासही आवळा पिकापासून चांगले उत्पन्न येते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आवळ्याची लागवड करू नये.   लागवडीसाठी निवडलेली जात, कलम आणि जमिनीचा मगदूर यापासून दोन रांगा आणि दोन झाडातील अंतर दिलेले आहे. खालील दिलेल्या माहितीनुसार जमिनीनुसार दोन रांगा व दोन झाडातील अंतर दिलेले आहे. काळीभारी पोयटाच्या जमिनीत देशी आवळा १० बाय १० मीटर कलम आवळा ८ बाय ८ मीटर तर मध्यम जमिनीत ८ बाय ८ मीटर देशी आवळा तर कलम आवळा ७ बाय ७ मीटर तसेच हलकी क्षारयुक्त चोपण जमिनीत देशी आवळा ७ बाय ७ मीटर तर कलम आवळा ६ बाय ६ मीटर अंतरावर लावावे.

पूर्वमशागत :

       लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करावी. भुसभुशीत करावी. जमिनीची आखणी करून २४ फूट अंतरावर शक्यतो कंटुर मार्किंग करून त्यावर १२ फूट अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. मापाचे खड्डे उन्हाळ्यापूर्वी खोदावे. हे खड्डे मे महिन्यात १५ दिवस ऊन्हात तापू द्यावेत. नंतर खत मातीने भरून घ्यावेत.
     प्रत्येक खड्ड्यासाठी २५ किलो शेणखत + १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ३०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम फॉलीडॉल भूकटी व ३ घमेले पोयटा माती यांच्या मिश्रणाने खड्डे भरावे. खड्ड्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे भरलेल्या खड्ड्यांमध्ये जून महिन्यात पावसाच्या सुरुवातीस जातीवंत कलमांची लागवड करावी. आवळ्याची लागवड कलम लावून करावी. कलम करण्यासाठी डोळा किंवा मृदूकाष्ट कलम पद्धती वापरतात.

जाती :

          कोणत्याही पिकाचे उत्पादन हे त्याच्या जातीवर अवलंबून असते. भरघोस उत्पन्न घेण्यासाठी योग्य जातींची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. आवळ्यामध्ये अनेक प्रकारच्या सुधारित जाती आहेत. 
  आवळ्याच्या प्रमुख जाती बनारसी, चकैय्या, फ्रान्सिस, कृष्णा, कांचन, एन -९-६,एन. एस. ७, एल ए १०, बळवंत, आनंद -१, आनंद - २, नरेंद्र आवळा -७, कृष्णा ( नरेंद्र -५) या आहेत. 
   यात नरेंद्र आवळा जातीची झाडे सरळ वाढत असून ३-४ वर्षात भरपूर फळे येतात. फळाच्या गटात रेषा नसतात. या जातीच्या फळांना मोठी मागणी असते.


अभिवृद्धी :

        ठिगळ पद्धतीने गावठी झाडावर डोळा भरून त्याचप्रमाणे मृदकाष्ट कलमे करून या फळझाडाची  लागवड करतात. आवळ्याची अभिवृद्धी शाखीय म्हणजे सुधारित कलम पद्धतीने करण्यात येते. स्थानिक परिस्थितीनुसार व उपलब्ध बाबीनुसार भेट कलम, डोळा भरून, शेंडा कलम करून, इन सी टू पद्धतीने कलम करून लागवड करावी. कलम तयार करताना भरपूर उत्पन्न देणारी, उत्कृष्ट फळे देणाऱ्या जातीच्या झाडाची निवड करावी.

लागवड :
     साधारणतः पावसाळ्यात निरोगी रोप खड्डयात मध्यभागी लावावे. रोपे संध्याकाळचे वेळी सूर्यास्तापूर्वी १ ते २ तास आकाश ढगाळलेले असताना लावावीत. रोपाभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. रोपांना काठीचा आधार द्यावा. वाऱ्याने रोप कोलमडणार नाही याची काळजी घ्यावी.

आंतरमशागत :

   आवळ्याच्या कलमावर जोडाखाली खुंटावर नवीन फूट येते. ती वेळोवेळी काढावी जेणेकरून कलमांची जोरदार वाढ होईल. झाडाच्या फांद्या जमिनीपासून २ ते ५ फूट उंचीवर वाढू द्याव्यात. फक्त कलमाच्या काडीवर व डोळ्यातून आलेली फुट ठेवावी.
  सुरुवातीच्या काळात कलमांना वळण देणे आवश्यक असते. यासाठी जमिनीपासून ०.७५ ते १ मी. उंचीपर्यंत एक मुख्य खोड सरळ वाढवावे. व त्याचा शेंडा कापून नंतर त्यावर पुढे चार दिशांना जोरदार फांद्या वाढू द्याव्यात. 
   आकार देण्यासाठी अतिरिक्त झालेल्या फांद्यांची छाटणी करावी. पावसाळा संपल्यावर बुंध्यापासून दोन फुटापर्यंतची जमीन भुसभुशीत करावी. त्यावर पालापाचोळा, वाळलेले गवताचे आच्छादन करावे. आच्छादनाखाली वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मिथील पॅराथीऑनची भुकटी मातीत  मिसळावी. 


खते :

        आवळा कोरडवाहू पीक असले तरी नियमितपणे खत व पाणी देणे गरजेचे आहे.  पूर्ण वाढीच्या प्रत्येक झाडास २.५ किलो बागेतील, २.५ किलो लिंबोळी पेंड आणि २० किलो कंपोस्ट खत घालावे.  शक्यतो कुजलेले शेणखत अथवा गांडूळखत वापरावे. 

   पहिल्या वर्षी प्रत्येक झाडास १० किलो शेणखत, २०० ग्रॅम युरिया, ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा वाढवत जाऊन दहाव्या वर्षी व त्यानंतर प्रत्येक झाडास प्रती वर्षी १०० किलो शेणखत,२ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ कि. म्युरेट ऑफ पोटॅश ही खते बांगडी पद्धतीने द्यावीत.

पाणी व्यवस्थापन :

           
    लागवडीनंतर पहिली ३ वर्षे जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. नियमित पाणी पुरवठ्यामुळे कलमांची जोमदार वाढ होईल. मोठ्या झाडांना फुलोऱ्यापासून फळ धारणेच्या काळात पाणी दिल्यास उत्पादनात वाढ होते. आवळा हे कोरडवाहू पीक आहे. परंतु कलमे जागविण्यासाठी पहिली तीन वर्षे आवश्यकतेनुसार २० ते ३० लिटर पाणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. ज्या ठिकाणी सिंचनाची सोय आहे. त्या ठिकाणी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिल्यास वर्षातून दोन हंगामात फळे मिळतात. बिगर हंगामातील फळांना चांगला बाजारभाव मिळतो.

कीड व रोग :

      १) साल व खोड पोखरणारी अळी-  पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसा प्रादुर्भाव आढळून आल्यास या किडीच्या आळ्या पोखरलेल्या खोड्यातून काढून नष्ट कराव्यात. किंवा त्या  छिद्रामध्ये डी.डी. व्ही.पी. हे कीटकनाशक ओतून बंद करावीत. किंवा निंबोळी तेल मिश्रित गेरूची पेस्ट लावावी.     २) पानांवर तांबेरा रोग आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी झायबेन हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याप्रमाणे फवारावे. ३) फळांवरील नेक्रोसिस हा बोरॉनच्या कमतरतेमुळे आढळतो. म्हणून झाडावर फळधारणेच्यावेळी ०.६ टक्के बोरॉनची १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारणी दोन वेळा करावी.

फळांची काढणी :

            आवळ्याच्या झाडाला ३ ते ४ वर्षांनी फळे मिळण्यास सुरुवात होते. पक्क झालेली फळे हिरवट पिवळी रंगाची किंवा विटकरी रंगाची टणक असतात. अशा फळांची तोडणी करावी. 
  सुधारित जातीच्या आवळा कलम लागवडीस २ वेळा बहार येतो. पहिला एप्रिल- मे आणि दुसरा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात येतो. फुलोरा आल्यापासून ५ महिन्यात फळे तयार होतात. 


उत्पादन :

          चौथ्या वर्षापासून प्रति झाडास ४-५ किलो आवळे येतात. पाचव्या वर्षी १५ ते २० किलो व सहाव्या वर्षी १०० किलोच्या वर, सातव्या वर्षी १५० ते २०० किलोपर्यंत आवळ्याचे उत्पादन मिळते. एका फळाचे वजन १५ ते २८ ग्रॅम भरते. सरासरी उत्पादन विचारात घेता एकरी १११ झाडापासून १५२० किलो एकरी उत्पादन मिळते. व आवळ्याचा प्रति किलो भाव विचारात घेता २५ रुपये प्रति किलो दराने सुमारे ३८ हजार रुपये आर्थिक उत्पन्न आठव्या वर्षापासून मिळू लागते.
#आवळाप्रक्रिया #आवळालागवड #आवळाउत्पादन
#आवळ्याचे औषधी गुणधर्म व उपयोग
#Amla processing #Amla production
आवळा वैशिष्ट्ये #आवळा

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...