युवा मनावर प्रभाव टाकणारी : श्यामची आईInfluencer on Young Minds : Shyam's mother
चांगली पुस्तके ख-या मित्राप्रमाणे असतात. ती प्रेरणा ठरतात. मनाला उभारी देतात. मार्गदर्शन करतात.
भावविश्वाच्या कल्पनेत, दुनियेत वावरणारे युवा मन कधी कधी गोंधळते. व्यवहारी जीवनातील अडचणीमुळे निराश, वैफल्यग्रस्त होते. अशा वेळी मार्गदर्शक ठरतात ती अशी पुस्तके, मनाची मरगळ झटकून टाकणारी, प्रेमाने पाठीवरून हात फिरविण्याबरोबरच ममतेच्या मायेची उब देतात. "श्यामची आई" हे साने गुरुजीचे पुस्तक मुलांप्रमाणेच अनेक युवकांना प्रेरणा देणारे, संस्कार घडविणारे व जीवनाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास शिकविणारे आहे. दीपक अहिरे या युवकांवरही असाच प्रभाव या पुस्तकाचा आहे.
मी भाग्यवान
मी भाग्यवान आहे, खरंच मी भाग्यवान आहे! कारण श्यामच्या आईला मी पाहिले आहे. तिच्या अंगा खांद्यावर खेळलो आहे. तिने भरवलेले घास मी मिटक्या मारीत खाल्ले आहेत. आपल्या कुशीत अंगाई म्हणत तिने मला झोपवले आहे. तिनेच मला जग दाखविले आहे. व जगात वागायचे कसे हेही शिकविले आहे.
माझी आई पूर्वजन्मी श्यामची आई होती. तेच प्रेम, तेच वात्सल्य, तोच त्याग आणि तेच गुण घेऊन ती ह्या जन्मी माझी आई झाली आहे. पण मला फार उशिरा समजले. माझ्या सुदैवाने "श्यामची आई" हे मातृप्रेमाचे अमर काव्य मी वाचले आणि आईचे हृदय मला उमगले. माझ्या आईची मला ओळख झाली.
प्रेमाचा महासागर
"श्यामची आई" आईच्या हृदयाची ती कथा आणि व्यथा आहे. म्हणूनच त्या कथेत जीव आहे. आपल्या पोरावर प्रेम तर सगळ्याच माता करतात. श्यामची आई तर प्रेमाचा महासागर आहे. महासागराला जसा अंत नाही तसा तिच्या प्रेमालाही अंत नाही.
आपल्या सानिध्यात येणाऱ्या सर्वाना ती प्रेम लुटत आली आहे. त्यातून मोरू गाय, मनी मांजरीण सुद्धा सुटलेली नाही. यशोदा सारख्या कांडपिणीच्या आजारपणात तिने तिला औषधपाणी व खाऊपिऊ घातले आहे. आणि म्हणूनच यशोदा म्हणते, "देवमाणूस आहे माउली"
मुलांवर चांगले संस्कार
केवळ प्रेमपूर्ती म्हणून मला श्यामची आई आवडली नाही तर प्रेमाबरोबरच आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी ती सतत धडपडत राहिली. माझी मुले मोठी झाली नाही तरी चालतील पण ती गुणी होवू देत. असे तिला सतत वाटायचे " पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप या तिच्या उद्गगारावरून तिच्या संस्काराची कल्पना येते.
गुरुजींच्या जीवनात आचाराचे व विचाराचे जे सौन्दर्य दिसते ते तिच्यामुळेच आपल्या मुलांना थोपटून थोपटून कौतुकाने आणि प्रसंगी शिक्षाही करून तिने आकार दिला आहे.
श्रमदेवता
श्यामची आई श्रमदेवता होती. सासरी आल्यापासून तिला कधीच उसंत मिळाली नाही. घरादारातले काम, सर्वांचे आजारपण व सर्वांची सेवा करण्यातच तिचे आयुष्य गेले. आळशीपणाने बसून राहणे वाईट असे ती समजत असे. आपल्या मुलांना तिने कष्टाची सवय लावली. श्यामने पत्रावळ लावली नाही म्हणून तिने त्याला जेवण दिले नाही. श्याम दळणे, धुणी धुणे, भांडे घासणे ही कामे आवडीने करीत असे. माणसाने पाप करावयास लाजावे, काम करतांना लाजू नये हे तिनेच माझ्या मनावर बिंबवले. श्रीमंत व भिकारी हे दोघेही समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत. कारण ते काम करीत नाहीत. श्रमातच आत्मोद्धार आहे असे तिला वाटत असे. आपल्या माणसासाठी तर कष्टाची फिकर तिने कुठेच केलेली आहे असे दिसत नाही. दादाचे पाय चेपण्यासाठी श्याम गेला नाही तेव्हा सर्व पसारा टाकून ती गेली आहे. यशवंताला ती लहानपणी मांडीवर घेऊन बसत असे. यशवंत जेव्हा म्हणतो, "आई तुझी मांडी दुखत असेल तेव्हा तिच्यातील माता उत्तर देते, उलट तुलाच माझ्या मांडीचे हाडे खुपत असतील. आपल्या नवऱ्याला देवाला फुले आणण्यासाठी ते दूर गावी पाठवते आणि कष्टाचे पाठ देते
स्वाभिमानाचे प्रतीक
आदर्श, स्वाभिमानी व्यक्तीचे नाव सांगा असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी तत्क्षणी सांगेन "श्यामची आई" गरीबीबरोबर लाचारी येत असते. पण गरिबीत सुद्धा स्वाभिमान न सोडणारी श्यामची आई होती. लग्नामध्ये श्यामने दक्षिणा घेतली तेव्हा गृहस्थाने जगास द्यावे. जगापासून घेऊ नये, हे तिनेच शामला पटवून दिले. माहेरच्या घरात लाचारीने जगण्यापेक्षा स्वतःचे दागिने विकून तिने नवऱ्यास घर बांधावयास लावले व ती झोपडी तिला स्वर्गापेक्षा प्रिय वाटली. सावकाराच्या कारकुनाचे कुजके अभद्र बोलणे ऐकण्यापेक्षा घरदार जप्त झाले तरी चालेल, मजुरी करता येईल" हे तिचे विचार तिच्या स्वाभिमानी स्वभावाचेच प्रतीक आहे.
पती हाच दागिना
सीता व सावित्री यांच्या देशात पतिव्रता स्त्रियांची परंपरा अजून चालू आहे. हे श्यामच्या आईवरून मला दिसून आले. आपल्या पतीवर तिचे जिवापाड प्रेम आहे. पती हाच दागिना असे ती मानत असे. व त्याची सेवा करीत असे. भाऊबीजेच्या पैशातून स्वतःसाठी लुगडी न आणता तिने नवऱ्यासाठी धोतरे आणली. नवऱ्याचा अपमान करणाऱ्या स्वतःच्या बापाला सुद्धा तिने हाकलून दिले यावरून तिची पतीनिष्ठा दिसून येते. प्रसंगी पतीलाही ध्येयवादाचे धडे द्यावयास तिने कमी केले नाही. आपल्या माघारी त्यांची हेळसांड होईल याची तिला काळजी वाटत होती. त्यांना जपा असा उपदेश तिने मुलांना केला होता. तुमच्या मांडीवर मरण येणे याहून दुसरे भाग्य कोणते? हा तिचा प्रश्न तिची प्रतिनिष्ठा दाखवून देतो.
विकासाची प्रेरणा
श्यामची आई आपल्या मुलांसाठीच जास्त जगली असे म्हणायला हरकत नाही. सर्व अपमान, गैरसमज, लोकनिंदा स्वतः सहन करून ती मुलांना निवारा देत राहिली. आपल्या प्रेमळ पंखाखाली आपले पिलांना घेऊन त्यांना विकासाची प्रेरणा देत राहिली. जगामध्ये जे जे सुंदर उदात्त व मंगल आहे त्याच्यावर प्रेम करायला तिने आपल्या मुलांना शिकवले. तिची सारी धडपड मुलांच्यावर चांगली संस्कार व्हावेत यासाठीच होती. खरी सौंदर्य सदगुणांचे, स्वच्छतेचे आहे असे ती मानत असे. मरतांना ती म्हणते, तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे आता मला काळजी नाही पण तरीही तिची काळजी संपलेली नव्हती आपल्या लहानग्या पुरुषोत्तमाचे कसे होईल ही काळजी तिला होतीच
आजच्या मातांनी आदर्श माता होण्यासाठी श्यामच्या आईचा आदर्श पुढे ठेवावा असे मला वाटते. कारण मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आई-बापांवर अवलंबून असतो. सूर्य चंद्राच्या किरणांनी जशा कळ्या उमलतात. तशा आईबापांच्या कृत्याने मुलांच्या जीवनकळ्या उमलत असतात. गुरुजींना त्यांच्या आईनेच घडवले आहे. तितकेच त्यांना जगावर, निसर्गावर प्रेम करायला शिकवले. निस्वार्थी सेवेचे व समर्पणाचे धडे तिनेच दिले आहेत. तिनेच गुरुजींना मोठे केले. लेखक, कवी, देशभक्त, समाजसेवक बनवले. आज आपल्या देशाला अशा हजारो आईंची गरज आहे असे मला वाटते व अशी आई तयार होण्यासाठी "श्यामची आई" शिवाय पर्याय नाही याची मला खात्री आहे.
अनंत उपकार
श्यामच्या आईचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, कारण तिच्यामुळे मला माझ्या आईची ओळख पटली. प्रत्येक माता आपल्या लेकरासाठी कायावाचामनाने झिजत असते पण आमच्या सारख्या करंट्यांना (युवा पिढीला) तिच्या प्रेमाचे, त्यागाचे मोलच समजत नाही व परिणामी आम्ही जीवनात अयशस्वी होतो. "श्यामची आई" वाचत असताना हट्टी चंचल श्यामच्या जागी मला मीच दिसत होतो व परिणामी दुःखी होत होतो. गहिवरत होतो व अधिकाधिक मातेकडे ओढला जात होतो. माझ्यासारख्या लाखो मराठी मुलांना आई आणि तिचं हृदय समजावून देण्याचे काम श्यामच्या आईने केले आहे. यातच तिच्या जीवनाची सार्थकता आहे असे मानावे लागेल कारण ती तर अवघ्या विश्वाची माता होती.
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment