name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): एकात्मिक किड नियंत्रण
एकात्मिक किड नियंत्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एकात्मिक किड नियंत्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एकात्मिक कीड नियंत्रणासाठी इकोपेस्ट ट्रॅप (सापळे) Ecopest Traps for Integrated Pest Control

एकात्मिक कीड नियंत्रणासाठी इकोपेस्ट ट्रॅप (सापळे) 
Ecopest Traps for Integrated Pest Control 

शेतकरी श्री. कांतीलाल पाटील यांचे पेटेंडेड संशोधन 

Ecopest trap for integrated pest control


  एकात्मिक कीड व्यवस्थापनाने शेतीमध्ये कीड नियंत्रण करण्याचा उपाय स्वस्त असून यामुळे कीटकनाशके फवारणीचीही बचत होते. या नैसर्गिक उपायामुळे शेतमालाची गुणवत्ता दर्जेदार होत असल्याचे संशोधन जळगाव जिल्हा चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील कांतीलाल भोजराज पाटील यांनी इकोपेस्ट ट्रॅप (सापळा) विकसित केला आहे. हे नाविन्यपूर्ण संशोधन त्यांनी आधी स्वतःच्या शेतीत वापरले. गेल्या सात वर्षापासून ते सापळ्याचे उपयोग करून निरीक्षण करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

Ecopest trap for integrated pest control
कांतीलाल भोजराज पाटील 

दर्जेदार उत्पादनासाठी इको ट्रॅप सापळा

      इकोपेस्ट ट्रॅपविषयी अधिक माहिती देतांना श्री. पाटील म्हणाले की 'हानिकारक कीटकनाशकांचा वापर कमी करून दर्जेदार उत्पादनासाठी पिवळ्या रंगाचा चिकट प्रकाश सापळा उपयुक्त आहे. इको ट्रॅप सापळा हा पिकांवर असणारी पांढरी माशी, तुडतुडे, मावा, लोकरीमाशी, शेंडा पोखरणारी अळी, फळमाशी तसेच इतर हानिकारक कीटक या ट्रॅपला येऊन चिटकतात. या सापळ्यात स्वयंचलीत एलईडी लावण्यात आलेला असून अंधार पडल्यावर तो आपोआप सुरू होतो. कीटक त्याकडे आकर्षित होऊन ट्रॅपला चिकटतात. सूर्योदयानंतर हा एलईडी बंद होतो. हा ट्रॅप (सापळा) दिवस-रात्र कीटक नियंत्रणाचे काम करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

Ecopest trap for integrated pest control

पर्यावरणपूरक सापळ्याची निर्मिती

     श्री. पाटील यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेतले असून शेती करत असतांना शेतकऱ्यांना कीडनाशकाची फवारणी करावी लागते. कीडनाशकांची बाजारात हजारो रुपये लिटरने किंमत आहे. त्याची फवारणी करूनसुद्धा किडींचा पूर्णतः बिमोड होत नाही. हे पाहिल्यानंतर आपण यावर काहीतरी उपाय करावा म्हणून माझं मन अस्वस्थ होतं. यासाठी पर्यावरणपूरक असलेले उपकरण तुलनेने स्वस्त असलेले म्हणजे २०० रुपयात असलेला इको ट्रॅप (सापळा) विकसित केला आहे. हा ट्रॅप बनविण्यासाठी पिवळे कार्ड, द्रव, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि ०.५ एलईडी, दोन पेन्सिल सेल यांचा वापर करून त्यांनी हा ट्रॅप तयार केला आहे. दोन पेन्सिल सेलमुळे  ट्रॅप सुमारे २५ दिवस कार्यरत राहतात. यात सेंसर असल्याने दिवा दिवसा बंद राहतो व अंधार पडल्यानंतर तो प्रकाशित होऊन कार्य सुरू करतो.  हा ट्रॅप स्वयंचलीत असल्याने मजुरांची गरज पडत नाही. सर्व ऋतूत काम करू शकतो.  

Ecopest traps for integrated pest control

इको ट्रॅपला पेटंट

 या इको ट्रॅपला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंटही बहाल करण्यात आलेले आहे. या ट्रॅपच्या निर्मितीसाठी कांतीलाल पाटील यांना जिल्हा नाविन्यपूर्ण परिषदेतंर्गत प्रोत्साहन देण्यात आलेले आहे असे श्री कांतीलाल पाटील यांनी माहिती दिली

 राष्ट्रीय परिषदेत सादरीकरण

  या इको ट्रॅप सापळ्याचे २०१७ मध्ये जळगाव येथे राष्ट्रीय परिषदेत सादरीकरण केले गेले तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्प (महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी) व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद (जळगाव) यांच्या वतीने आयोजित कृषी यांत्रिकीकरण दिवस या निमित्ताने क्षेत्रीय प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. याकरीता ' नवोन्मेश संशोधक शेतकरी' या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे. २०१८ मध्ये अटारी (पुणे) व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे) येथे प्रयोगशील शेतकरी संमेलनात या इको ट्रॅप सापळ्याचे सादरीकरण झाले आहे.

Ecopest trap for integrated pest control

किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी

   या इको ट्रॅप सापळ्याचा वापर द्राक्ष, टोमॅटो, वांगी, कलिंगड, कापूस, मिरची यांसह विविध पिकांमध्ये करता येतो. किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीडनाशकांवर अवलंबून राहण्यापेक्षा हे सापळे उपयुक्त ठरतील. सेंद्रिय शेतीमध्ये किडींच्या नियंत्रणासाठी हे सापळे प्रभावी ठरत आहे. या स्वस्त उपायाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा असे आवाहन श्री. कांतिलाल पाटील यांनी केले आहे

© दीपक केदू अहिरे, नाशिक

(लेखन सेवा पुरस्कार विजेते)

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...