औषधी वनस्पती आवळा : लागवड ते प्रक्रिया
Medicinal plant : Awala
Planting to processing
आवळा हे फळ पुरातन काळापासून प्रसिद्ध असून आवळ्याचा उपयोग आरोग्यवर्धक असून औषधी व गुणकारी म्हणून प्रसिद्ध आहे.
आयुर्वेदात आवळ्याला अमृतफळ म्हणून ओळखले जाते. आवळे आंबट,गोड, तिखट, तुरट, कडू या रसांनी युक्त असतात.
आवळा हे फळ अनेक उद्योगांना चालना देणारे आहे. आवळ्यापासून सुपारी, वडाख, आवळकाठी, मोरावळा, जेलीसरबत, कँडी, लोणचे, चटणी, आम्ल-पित्तनाशक चूर्ण, महासुदर्शन चूर्ण, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण इ. कितीतरी औषधांची निर्मिती करता येईल. औषध निर्मितीमध्ये आवळ्याला महत्त्वाचे स्थान असल्यामुळे अनेक तरुणांना विशेषतः महिला वर्गाला या उद्योगाचा फायदा होईल.
वनस्पती परिचय :
आवळा हे युफॉर्बिरेशी (Euphorbiaceae) कुळातील असून त्याचे लॅटिन नाव एम्ब्लिका ऑफिसिनेसीस (Emblica officinalis) असे आहे. आवळ्याला आमला, आमलकी इमलीका, श्रीफळ, धात्री इ. असे पर्यायी नावे आहेत.
आवळ्याचे झाड मध्यम आकारमानाचे, पानगळ होणारे असून त्याचे मूळ स्थान दक्षिण पूर्व आशिया येथे आहे. भारतामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार राज्यात याची लागवड अधिक आढळते.
आवळ्याची झाडाची पाने साधारणत: चिंचेच्या पानाप्रमाणे बारीक पातळ असतात. फुलांचा रंग पिवळा असून गुच्छात येणारी फळे गोलाकार असून सुरुवातीला हिरवळ नंतर पिवळसर रंगाची होतात. नंतर तांबूस पिवळी होतात. फुलावर विभागलेल्या सहा रेषा असून बी कठीण कवचाचे असते.
औषधी गुणधर्म व उपयोग :
औषधी गुणधर्म व आहारात पौष्टिकता असलेल्या या फळाचा वापर त्रिफळा चुर्णात केला जातो. १०० ग्राम आवळ्यात ४५० ते ७२० मी. ग्रॅम.क जीवनसत्व असते. सतत आवळा सेवनाने तारुण्य अवस्थेत राहता येते. आवळ्याची फळे आम्ल तुरट असतात. त्यामुळे वायूचा नाश होतो. तसेच रक्तपित्त व मधुमेह यांचा नाश होतो.
आवळा फळ शुक्र व धातु वर्धक आहे. केसांसाठी हितकारक असून पित्त व कफनाशक आहे. दृष्टी सतेज करणारा आहे. क्षयरोग, अस्थमा यासारख्या रोगांमध्ये आवळ्याच्या सेवनाने गुण येतो. हृदयरोगावर, बद्धकोष्ठ, रक्तविकार, रक्तस्राव, कावीळ आदी रोगासाठी आवळ्याचा रस गुणकारी ठरला आहे.
आवळ्याच्या नियमित सेवनाने वंधत्व नाहीसे होते. केस गळू नये व पांढरे होऊ नये म्हणून आवळ्याच्या रसाचे सेवन उपयुक्त ठरते. आवळ्यापासून मोरावळा, ज्याम, जेली, सरबत, सुपारी, आवळकंठी, लोणचे, चटणी, आवळा कीस, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण, आम्लपित्त नाशक चूर्ण, महासुदर्शन चूर्ण अशा कितीतरी औषधी गुणयुक्त पदार्थांची निर्मिती करता येते.
आवळा गरामधील घटकद्रव्ये
खालील दिलेल्या माहितीत आवळा गरामधील घटकद्रव्ये दिलेली आहेत. आवळा गरामधील घटकद्रव्य जलांश (८१.२), प्रथिने (०.५) मेद (०.१),खनिजे (०.७), तंतू (३.४), कर्बोदके (१४.१), कॅल्शियम (०.०५), फॉस्फरस (०.०२टक्के), लोह (१.२ मी. ग्रॅम/१०० ग्रॅम), जीवनसत्त्व सी (६०० मी. ग्रॅम/१०० ग्रॅम) आवळ्यापासून मोरावळा किसाचा तसेच अख्खा आवळ्याचा मोरावळा तयार करतात. मोरावळ्याचा उपयोग उत्तम टॉनिक, पित्तशामक उपयोग आहे.
आवळा प्रक्रिया
किसाचा मोरावळा तयार करण्यासाठी आवळा स्वच्छ धुऊन घ्यावा. नंतर स्टीलच्या किसणीवर किसून घ्यावा. किसलेल्या आवळ्याच्या प्रमाणात साखर घेऊन (दुप्पट) किसात मिसळावी.
तयार झालेले मिश्रण एका पातेल्यात घालून त्यावर स्वच्छ फडके बांधून उन्हात ठेवावे. साखरेचा पाक होईपर्यंत ठेवावे. नंतर त्यात वाळा पावडर घालावी. हे प्रमाण एक किलोस २० ग्रॅम वाळा पावडर टाकावी. अशा पद्धतीने किसाचा मोरावळा तयार करता येतो.
आख्या आवळ्याचा मोरावळा बनवण्यासाठी आवळ्याला टोचणीने टोचावे. नंतर त्या आवळ्यांना वाफलून घ्यावे. नंतर दुप्पट साखर घेऊन आवळे वाफळविताना राहिलेले पाणी घेऊन त्याचा पाक करावा. व त्या पाकात आवळे टाकून उकळी आणावी. पाक घट्ट होऊ देऊ नये. अशा पद्धतीने आवळ्याचा मोरावळा तयार करतात.
आवळा चटणी :
आवळ्यापासून आवळा चटणी तयार होते. त्यासाठी स्वच्छ डाग नसलेले १ किलो आवळे घ्यावे, गरम मसाला चार चमचे, लाल तिखट दोन चमचे, एक चमचा वेलदोड्याचे दाणे, दोन चमचे जिरे, एक चमचा शेंगदाण्याची पूड, दोन चमचे बडीशेप, दोन चमचे सुंठ पूड, चवीनुसार साखर मीठ व व्हीनेगार टाकावे. यासाठी सर्वप्रथम १५ मिनिटे आवळे उकळून घ्यावेत. आवळे मऊ झाल्यावर त्यातील बिया काढून घ्याव्यात.
ग्राइंडरमधून गर काढून घ्यावा. जिरे, बडीशेप, सुंठ पूड व सर्व मसाला टाकून मिक्स करून घ्यावा. चवीपुरते मीठ व थोडे व्हीनेगार घालून सर्व मिक्स करून घट्ट झाल्यावर बरणीत भरावे. चटणी सेवनाने पचनास मदत होऊन क जीवनसत्व मिळते.
आवळा लोणचे :
आवळा लोणचे बनवण्यासाठी आवळे पाच किलो, मीठ एक किलो, लाल मिरची पाचशे ते सातशे ग्रॅम, मेथी दीडशे ग्रॅम, मोहरी अडीचशे ग्रॅम, बडीशेप दोनशे ग्रॅम, हिंग आठ ग्रॅ, तेल एक किलो, २५ ग्रॅम सोडियम बेंजोएट एवढे साहित्य लागते. यासाठी पूर्ण पिकलेले बिनाडागीचे आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत. पाण्यामध्ये मीठ टाकून उकळावे. त्यानंतर उकळत्या पाण्यात फोडी मोकळ्या करून घ्याव्यात. बिया काढून टाकाव्यात. बडीशेप बारीक करून घ्यावी. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल करून घ्यावे. तेल गरम झाले की त्यात मेथी, मोहरी, बडीशेप भुकटी टाकावी. आवळ्याच्या फोडीला हळद लावावी. सर्व मिश्रण थोडा वेळ गरम करून घ्यावे. गरम केल्यावर त्यात लाल मिरची पावडर आणि हिंग टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आणि नंतर त्यात सोडियम बेंझोईट मिसळून लोणचे बरणीत मुरण्यासाठी ठेवावे.
आवळा लोणचे खराब होऊ नये म्हणून लोणचे जास्त काळ टिकवण्यासाठी सोडियम बेंझोईट टाकावे. याचे प्रमाण एकदम कमी झाल्यास लोणचे खराब होते. बुरशी येते. लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास लोणचे काळे पडते. लोणचे खराब होऊ नये म्हणून त्यात प्रती किलो एक ग्रॅम या प्रमाणात सोडियम बेंझोइट टाकून ते निर्जंतुक बरणीत ठेवावे. व काढतेवेळी स्वच्छ चमचा वापरावा. ताजे डाग नसलेले आवळे स्वच्छ धुऊन गरम पाण्यात दहा मिनिटे ठेवून बाहेर काढावेत.
जास्त तीव्रता असलेल्या मिठाच्या पाण्यात ठेवू नये. ठेवल्यास सुरकत्या पडतात. आवळ्याचे लोणचे बनवीत असताना फोडी गरम झाल्यास करवटपणा येतो. तसेच मसाल्यामध्ये फोडी जास्त वेळ परतवल्याने लोणच्याला कडवटपणा येतो. लोणचे चविष्ट न होणे, लोणच्याला मिठाचे प्रमाण कमी पडणे, पूर्णपणे मिक्स न होणे, आवळ्याच्या फोडी मऊ पडणे, त्यासाठी मीठ टाकतेवेळी पूर्णपणे मिक्स होण्यासाठी व्यवस्थित हलवून घेणे गरजेचे आहे.
हवामान :
हे झाड कोणत्याही हवामानात येते. समशितोष्ण हवामानाबरोबरच कोरड्या व उष्ण हवामानातही चांगले येते. मोठी झाडे, कडक व उष्ण तापमान (४६ सें.मी.) व अतिशय गोठवणारी थंडी सहन करू शकतात.
कोकणातील उष्ण व दमट हवामानातसुद्धा आवळा पीक चांगले येते. आवळ्याची लागवड हिमालयासारख्या थंड प्रदेशापासून ते राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात घेतले जाते. आवळ्याचे झाड १० अंश ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकते. आवळ्याची लागवड समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीपर्यंत करता येते.
जमीन :
हलकी ते मध्यम जमीन तसेच काळ्या सुपीक तसेच पोयट्याच्या मुरमाड जमिनीत हे पीक चांगले येते. जमिनीचा सामू ७.५ ते ९ असल्यासही आवळा पिकापासून चांगले उत्पन्न येते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आवळ्याची लागवड करू नये. लागवडीसाठी निवडलेली जात, कलम आणि जमिनीचा मगदूर यापासून दोन रांगा आणि दोन झाडातील अंतर दिलेले आहे. खालील दिलेल्या माहितीनुसार जमिनीनुसार दोन रांगा व दोन झाडातील अंतर दिलेले आहे. काळीभारी पोयटाच्या जमिनीत देशी आवळा १० बाय १० मीटर कलम आवळा ८ बाय ८ मीटर तर मध्यम जमिनीत ८ बाय ८ मीटर देशी आवळा तर कलम आवळा ७ बाय ७ मीटर तसेच हलकी क्षारयुक्त चोपण जमिनीत देशी आवळा ७ बाय ७ मीटर तर कलम आवळा ६ बाय ६ मीटर अंतरावर लावावे.
पूर्वमशागत :
लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करावी. भुसभुशीत करावी. जमिनीची आखणी करून २४ फूट अंतरावर शक्यतो कंटुर मार्किंग करून त्यावर १२ फूट अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. मापाचे खड्डे उन्हाळ्यापूर्वी खोदावे. हे खड्डे मे महिन्यात १५ दिवस ऊन्हात तापू द्यावेत. नंतर खत मातीने भरून घ्यावेत.
प्रत्येक खड्ड्यासाठी २५ किलो शेणखत + १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ३०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम फॉलीडॉल भूकटी व ३ घमेले पोयटा माती यांच्या मिश्रणाने खड्डे भरावे. खड्ड्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे भरलेल्या खड्ड्यांमध्ये जून महिन्यात पावसाच्या सुरुवातीस जातीवंत कलमांची लागवड करावी. आवळ्याची लागवड कलम लावून करावी. कलम करण्यासाठी डोळा किंवा मृदूकाष्ट कलम पद्धती वापरतात.
जाती :
कोणत्याही पिकाचे उत्पादन हे त्याच्या जातीवर अवलंबून असते. भरघोस उत्पन्न घेण्यासाठी योग्य जातींची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. आवळ्यामध्ये अनेक प्रकारच्या सुधारित जाती आहेत.
आवळ्याच्या प्रमुख जाती बनारसी, चकैय्या, फ्रान्सिस, कृष्णा, कांचन, एन -९-६,एन. एस. ७, एल ए १०, बळवंत, आनंद -१, आनंद - २, नरेंद्र आवळा -७, कृष्णा ( नरेंद्र -५) या आहेत.
यात नरेंद्र आवळा जातीची झाडे सरळ वाढत असून ३-४ वर्षात भरपूर फळे येतात. फळाच्या गटात रेषा नसतात. या जातीच्या फळांना मोठी मागणी असते.
ठिगळ पद्धतीने गावठी झाडावर डोळा भरून त्याचप्रमाणे मृदकाष्ट कलमे करून या फळझाडाची लागवड करतात. आवळ्याची अभिवृद्धी शाखीय म्हणजे सुधारित कलम पद्धतीने करण्यात येते. स्थानिक परिस्थितीनुसार व उपलब्ध बाबीनुसार भेट कलम, डोळा भरून, शेंडा कलम करून, इन सी टू पद्धतीने कलम करून लागवड करावी. कलम तयार करताना भरपूर उत्पन्न देणारी, उत्कृष्ट फळे देणाऱ्या जातीच्या झाडाची निवड करावी.
लागवड :
साधारणतः पावसाळ्यात निरोगी रोप खड्डयात मध्यभागी लावावे. रोपे संध्याकाळचे वेळी सूर्यास्तापूर्वी १ ते २ तास आकाश ढगाळलेले असताना लावावीत. रोपाभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. रोपांना काठीचा आधार द्यावा. वाऱ्याने रोप कोलमडणार नाही याची काळजी घ्यावी.
आंतरमशागत :
आवळ्याच्या कलमावर जोडाखाली खुंटावर नवीन फूट येते. ती वेळोवेळी काढावी जेणेकरून कलमांची जोरदार वाढ होईल. झाडाच्या फांद्या जमिनीपासून २ ते ५ फूट उंचीवर वाढू द्याव्यात. फक्त कलमाच्या काडीवर व डोळ्यातून आलेली फुट ठेवावी.
सुरुवातीच्या काळात कलमांना वळण देणे आवश्यक असते. यासाठी जमिनीपासून ०.७५ ते १ मी. उंचीपर्यंत एक मुख्य खोड सरळ वाढवावे. व त्याचा शेंडा कापून नंतर त्यावर पुढे चार दिशांना जोरदार फांद्या वाढू द्याव्यात.
आकार देण्यासाठी अतिरिक्त झालेल्या फांद्यांची छाटणी करावी. पावसाळा संपल्यावर बुंध्यापासून दोन फुटापर्यंतची जमीन भुसभुशीत करावी. त्यावर पालापाचोळा, वाळलेले गवताचे आच्छादन करावे. आच्छादनाखाली वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मिथील पॅराथीऑनची भुकटी मातीत मिसळावी.
आवळा कोरडवाहू पीक असले तरी नियमितपणे खत व पाणी देणे गरजेचे आहे. पूर्ण वाढीच्या प्रत्येक झाडास २.५ किलो बागेतील, २.५ किलो लिंबोळी पेंड आणि २० किलो कंपोस्ट खत घालावे. शक्यतो कुजलेले शेणखत अथवा गांडूळखत वापरावे.
पहिल्या वर्षी प्रत्येक झाडास १० किलो शेणखत, २०० ग्रॅम युरिया, ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा वाढवत जाऊन दहाव्या वर्षी व त्यानंतर प्रत्येक झाडास प्रती वर्षी १०० किलो शेणखत,२ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ कि. म्युरेट ऑफ पोटॅश ही खते बांगडी पद्धतीने द्यावीत.
पाणी व्यवस्थापन :
लागवडीनंतर पहिली ३ वर्षे जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. नियमित पाणी पुरवठ्यामुळे कलमांची जोमदार वाढ होईल. मोठ्या झाडांना फुलोऱ्यापासून फळ धारणेच्या काळात पाणी दिल्यास उत्पादनात वाढ होते. आवळा हे कोरडवाहू पीक आहे. परंतु कलमे जागविण्यासाठी पहिली तीन वर्षे आवश्यकतेनुसार २० ते ३० लिटर पाणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. ज्या ठिकाणी सिंचनाची सोय आहे. त्या ठिकाणी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिल्यास वर्षातून दोन हंगामात फळे मिळतात. बिगर हंगामातील फळांना चांगला बाजारभाव मिळतो.
कीड व रोग :
१) साल व खोड पोखरणारी अळी- पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसा प्रादुर्भाव आढळून आल्यास या किडीच्या आळ्या पोखरलेल्या खोड्यातून काढून नष्ट कराव्यात. किंवा त्या छिद्रामध्ये डी.डी. व्ही.पी. हे कीटकनाशक ओतून बंद करावीत. किंवा निंबोळी तेल मिश्रित गेरूची पेस्ट लावावी. २) पानांवर तांबेरा रोग आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी झायबेन हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याप्रमाणे फवारावे. ३) फळांवरील नेक्रोसिस हा बोरॉनच्या कमतरतेमुळे आढळतो. म्हणून झाडावर फळधारणेच्यावेळी ०.६ टक्के बोरॉनची १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारणी दोन वेळा करावी.
फळांची काढणी :
आवळ्याच्या झाडाला ३ ते ४ वर्षांनी फळे मिळण्यास सुरुवात होते. पक्क झालेली फळे हिरवट पिवळी रंगाची किंवा विटकरी रंगाची टणक असतात. अशा फळांची तोडणी करावी.
सुधारित जातीच्या आवळा कलम लागवडीस २ वेळा बहार येतो. पहिला एप्रिल- मे आणि दुसरा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात येतो. फुलोरा आल्यापासून ५ महिन्यात फळे तयार होतात.
चौथ्या वर्षापासून प्रति झाडास ४-५ किलो आवळे येतात. पाचव्या वर्षी १५ ते २० किलो व सहाव्या वर्षी १०० किलोच्या वर, सातव्या वर्षी १५० ते २०० किलोपर्यंत आवळ्याचे उत्पादन मिळते. एका फळाचे वजन १५ ते २८ ग्रॅम भरते. सरासरी उत्पादन विचारात घेता एकरी १११ झाडापासून १५२० किलो एकरी उत्पादन मिळते. व आवळ्याचा प्रति किलो भाव विचारात घेता २५ रुपये प्रति किलो दराने सुमारे ३८ हजार रुपये आर्थिक उत्पन्न आठव्या वर्षापासून मिळू लागते.
#आवळाप्रक्रिया #आवळालागवड #आवळाउत्पादन
#आवळ्याचे औषधी गुणधर्म व उपयोग
#Amla processing #Amla production
# आवळा वैशिष्ट्ये #आवळा
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment