name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): शेतीपूरक ‘कडकनाथ’ व्यवसायातून प्रक्रिया उत्पादने (Agribusiness Kadaknath : success story)

शेतीपूरक ‘कडकनाथ’ व्यवसायातून प्रक्रिया उत्पादने (Agribusiness Kadaknath : success story)

 शेतीपूरक ‘कडकनाथ’ व्यवसायातून प्रक्रिया उत्पादने

(Agribusiness Kadaknath : success story)

आपल्या महाराष्ट्रात विविध शेतीपूरक व्यवसाय केले जातात. त्यात कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायही चांगलाच स्थिरावला असून या व्यवसायात अनेक मंडळीनी पदार्पण केले. पण काळाच्या ओघात काहींचा जम बसला नाही. परंतु आडगाव नाशिक येथील श्री. संदीप सोनवणे यांनी अवघ्या १०० पक्ष्यांपासून सुरु केलेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय आता तर २५००० पक्ष्यापर्यंत पोहचला आहे. टप्याटप्प्याने या व्यवसायात त्यांनी विकास केला असून केवळ अंडी, चिकन, विक्रीवर न थांबता त्यांनी विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित उत्पादने विकसित केली आहेत. ही उत्पादने विक्रीसाठी पारंपारिक स्टोअर्स, ई कॉमर्स प्लेटफॉर्म, वेबसाईट, महिला संचालित सुसज्ज दालने, विविध विक्री प्रदर्शने या माध्यमातून कडकनाथ व्यवसायाला नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या या यशाची दखल साम टी.व्ही. यांनी घेतली असून त्यांची निवड ‘यंग अपकमिंग महाराष्ट्रीयन बिजनेसमन अवार्ड’ या मोलाच्या पुरस्कारासाठी केली आहे. हा पुरस्कार राज्यातील तरुण यशस्वी उद्योजकांना दिला जातो. सदर पुरस्काराचे वितरण दुबई येथे नुकतेच झाले. या पुरस्कारासाठी मी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यावर मुलाखत घ्यायची ठरवली...

    श्री.संदीप सोनवणे यांना कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय का करावासा वाटला या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले कि, मी मुळचा शेतकरी कुटुंबातील असून वडिलांच्या अपघाती निधनामुळे कमी वयातच माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. रोजगाराची संधी शोधण्यासाठी मी १९९१ साली वयाच्या १८व्या वर्षी नाशिकला आलो. परंतु अपेक्षित काम मिळत नव्हते म्हणून उदरनिर्वाहासाठी रिक्शा चालवली. पुढे थोडा स्थिरस्थावर झाल्यानंतर २००४ साली बांधकाम व्यवसाय सुरु केला. त्यात मला अपेक्षित यश मिळत गेले. आता काहीतरी नाविन्यपूर्ण व्यवसाय करावा. त्यातल्या त्यात मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती व शेतीपूरक व्यवसायाची आवड होतीच. पण काय व्यवसाय करावा हे निश्चित सुचत नव्हते या दरम्यान २०१३ मध्ये तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या निवासस्थानी मी कडकनाथ पक्षी पहिला. त्याच्याविषयी जाणून घेतले. त्याच्या अंडी आणि मांस यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याविषयी कुतूहल निर्माण झाले. या पक्ष्याविषयी सखोल जाणून घेतले. अभ्यास केला. इंटरनेटवरून माहिती मिळवली. या पक्ष्याचा मूळ अधिवास असलेल्या मध्यप्रदेशातील झाबुवा येथे भेट देऊन माहिती घेतली. तेथील कडकनाथ फार्मचा अभ्यास करून पुढे हाच व्यवसाय करायचा निश्चित ठरवले असल्याची माहिती श्री.सोनवणे यांनी दिली.

    कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय ठाम झाल्यानंतर २०१५ मध्ये सुमारे २ लाख रुपये गुंतवणूक करत छोटे शेड उभारले. १०० पक्ष्यांपासून हा व्यवसाय सुरु केला आज तर त्यांच्याकडे २५ हजार कडकनाथ पक्षी आहेत. अन्य पोल्ट्री व्यवसायापेक्षा कडकनाथ कोंबडीपालन हा व्यवसाय उत्पादन खर्च, मेहनत व उत्पादन या अंगाने वेगळा असल्याची माहिती त्यांनी दिली. कुशल मनुष्यबळाच्या आधारे नियोजनबद्ध कामकाज चालते. पक्ष्यांच्या शेडसह परिसराची दिवसातून दोनदा स्वच्छता केली जाते. विभागनिहाय कामकाजाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. व्यवसायात गुणवत्ता व नियंत्रण या बाबीकडे लक्ष दिले जाते. बदलत्या काळात अर्ध स्वयंचलित यंत्राच्या साह्याने काटेकोर कामकाज केले जाते. दैनंदिन सर्व कामकाजाच्या अचूक नोंदी ठेवल्या जातात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आरओ शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

    पक्षीनिर्मितीकरिता अत्याधुनिक उबवण कक्षाची उभारणी केली आहे.यात वातावरण नियंत्रण, मोजणी, लसीकरण सुविधा यांचा अंतर्भाव आहे. या टप्प्यावर कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. हैचरीजचे उत्पादनक्षमता प्रतिमाह ३० हजार पक्षी पिले इतके आहे. हैचरीमधून पिले तयार झाल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. १ ते २० दिवस, २० ते ६० दिवस व ६० ते १८० दिवस असे वयोमानानिहाय पक्ष्यांना ठेवले जाते. यामध्ये त्या वयोमानानुसार योग्य ते तापमान, प्रकाशयोजना, लसीकरण व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार विलगीकरण यांची सोय केली आहे.

    कडकनाथ पक्ष्याची पिल्ले आणल्यानंतर पुढे साधारण सहा महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरु झाले. परंतु ब्रोईलर अंडीच्या तुलनेत कडकनाथ अंड्याचा दर अधिक आहे. परिणामी ग्राहकांची मागणी कमी राहत असल्याने सुरुवातीला अंडी विक्रीमध्ये खूप अडचणी आल्या. मात्र आम्ही ग्राहकांना सैम्पल अंडी देऊन याचे महत्व पटवून दिले. विक्रीसाठी मार्केटींगची खास यंत्रणा उभारली. त्यातून प्रामुख्याने मुंबई शहरात ग्राहकांचे जाळे विणले गेले. हीच बाब त्यांच्यासाठी मोठी जमेची ठरली.

    मागणी व वेळेवर पुरवठा होऊ लागल्याने ग्राहकांनी त्यास पसंती दिली असल्याचे श्री.सोनवणे यांनी सांगितले. पुढे नाशिक, पुणे , मुंबई येथे स्वतंत्र विक्री दालने सुरु केली. या विक्री दालनानंतर ई कॉमर्स प्लेटफॉर्मचा त्यांनी विक्रीसाठी अवलंब केला. सोशल मिडियावर जाहिरातीचा वापर करून विक्री हळूहळू वाढत गेली. सध्या बाजारात ग्राहकांना कडकनाथ अंड्याचे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अस्सल कडकनाथ अंडी मिळावी. बनावट विक्री रोखण्याच्या उद्देशाने प्रत्येक अंड्यावर ट्रेडमार्कचा शिक्का मारला जातो. यामुळे ग्राहकांची फसवणूक टळते. व्यवसायात गुणवत्तेसह पारदर्शकता जपणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. कडकनाथ पक्षीपालनाचा हा व्यवसाय कडकनाथ अग्रो वर्ल्ड या नावाने नोंदणीकृत केला आहे. त्यांनी २०१८ मध्ये कडकनाथ या नावानेच ट्रेडमार्क मिळवला आहे. नावाचे अधिकार मिळावीत कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे श्री.सोनवणे यांनी सांगितले.

    कोणत्याही कुक्कुटपालनात खाद्य हा महत्वाचा घटक आहे. गुणवत्तापूर्ण खाद्य पक्ष्यांना उपलब्ध करण्यासाठी श्री. सोनवणे यांनी पक्षी खाद्य निर्मितीसाठी स्वतःचे युनिट उभारले असून त्याची उत्पादनक्षमता प्रती तास ५ क्विंटल इतकी आहे. याद्वारे एका दिवसात (८ तासात) तीन दिवसांचे कुक्कुटखाद्य तयार होते. खाद्यानिर्मिती करताना नैसर्गिक घटक मिसळावे लागतात. यामुळे गुणवत्तापूर्ण अंडी मिळतात. सुरवातीला अंड्यातील उपलब्ध घटक तपासण्यासाठी अंडी प्रयोगशाळेत पाठवली. मात्र तपासणीत काही घटक कमी निघाल्याने गांभीर्याने त्याची कारणे शोधली. तज्ञांच्या सल्ल्यानुसार खाद्यानिर्मितीत सोयाबीन, फिशमिल, मका यासह खनिजे अशी विविध १८ नैसर्गिक घटक मिसळून खाद्य तयार करून दिले. नंतर पुन्हा अंडी प्रयोगशाळेत तपासली असता अपेक्षित घटक उपलब्ध असल्याचे दिसून आले. यातून श्री. सोनवणे यांचा आत्मविश्वास वाढला. आणि गुणवत्तापूर्ण अंड्याचे उत्पादन मिळाले.

    कडकनाथ अंड्याची टिकवणक्षमता अवघी ७ दिवस आहे. यात प्रामुख्याने हिवाळा व पावसाळा वगळता उन्हाळ्यात मागणी कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात शिल्लक राहणाऱ्या प्रती दिन सुमारे २ हजार अंड्याचे करायचे काय हा प्रश्नच होता यावर सलग सहा महिने संशोधन करत अंड्यापासून भुकटी निर्मितीचा प्रयोगही केला भुकटीची साठवणक्षमता योग्य वातावरणात ६ महिन्यापर्यंत आहे. यामुळे उन्हाळ्यातील शिल्लक राहणाऱ्या अंड्याची समस्या व जोखीम कमी झाली. हा प्रयोग सिद्ध झाल्यानंतर आणखी प्रक्रिया उत्पादनांची मालिका नावारूपाला आली असल्याची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली.

    नाविन्यपूर्ण प्रक्रिया उत्पादनाविषयी माहिती देताना श्री. सोनवणे यांनी सांगितले की, निम्म्या अंड्याची थेट विक्री तर निम्म्या अंड्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन उत्पादने बाजारात आणली आहेत. प्रक्रियेतून अंड्यापासून भुकटी तयार केल्यानंतर त्यांनी रेडी टू कुक पद्धतीने मसाला मिश्रित आम्लेट व प्रोटीन पावडर अशी दोन प्रमुख उत्पादने सहा महिन्यापर्यंत टिकतात. यासह कडकनाथ नर कोंबड्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या मिलेनिअम धातूचे संकलन केले जाते. त्यापासून बलवर्धक भुकटी ब्लाक व्हीगर नावाने बाजारात आणली. याच्या शासकीय प्रयोगशाळेतून चाचण्या घेतल्या असून पेटंट मिळवले असल्याची माहिती श्री.सोनवणे यांनी दिली.

    कडकनाथ कोंबडीचे ताजे व फ्रोझन पद्धतीने पिशवीबंद मांस विक्री केली जाते. ज्याची टिकवणक्षमता ९० दिवस आहे. पक्ष्याची अंडी देण्याची क्षमता संपल्यानंतर या कोंबड्याच्या मांसापासून प्रक्रियायुक्त पाळीव प्राण्यासाठी खाद्य (पेटफूड) बाजारात आणले आहे. कडकनाथ शाम्पू, अंड्याची पावडर, कडकनाथ वियाग्रा, कडकनाथ फेसपैक, कडकनाथ हेअर पैक अशी अनेकविध उपयोगी उत्पादने तयार केली आहेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व जंक फूडला पर्याय देण्याच्या उद्देशाने कडकनाथ अंडी व मांसापासून आरोग्यवर्धक पिझ्झा, बर्गर यांसह नव्या दहा पाककृतीवर काम सुरु आहे. ते अधिक आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी सतत संशोधन व विकासकार्य सुरु आहे. या उत्पादनासाठी मैदा व इतर बेस न वापरता तृणधान्य व कडधान्याचा वापर केला जात आहे. गोड व तिखट या दोन्ही प्रकारात हे पदार्थ विकसित केले जात आहेत. ही उत्पादने बाजारात येत असल्याची माहितीही श्री. सोनवणे यांनी दिली.

    बदलत्या बाजारपेठेमध्ये आकर्षक ब्रांडीग त्यांनी केले असून प्रक्रियायुक्त उत्पादने विक्रीसाठी www.kadaknath.com नावाची वेबसाईट तयार केली असून यासह kadaknath77 नावाने सोशल मिडियावर फेसबुक, यु ट्यूब, ट्वीटर, इंस्टाग्राम या माध्यमाद्वारे उत्पादनाचा ते प्रचार आणि प्रसार करतात. यासोबत ग्राहकांना आकर्षक पैकेजिंग, ब्रांडिंग केले जात असल्याची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली. प्रीमियम व इकॉनामी प्रकारात अंडी विक्री केली जाते. सण, उत्सव या धर्तीवर भेट देण्यासाठी कडकनाथ हेल्दी प्रीमियम गिफ्ट बॉक्स संकल्पना सुरु केली. यातून दिवाळी व रमजान सणाच्या खास बाजारपेठेमध्ये शिरकाव केली असल्याची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली. या उत्पादनाला अनेक सेलीब्रेटी व ग्राहकांनी आगाऊ मागणी करून पसंती नोंदवली आहे.

    सुरुवातीला मुंबईत थेट पद्धतीने अंडी विक्रीची व्यवस्था बसवली आहे. त्या अंडी विक्रीसाठी ई कॉमर्स व्यासपीठाचा अवलंब सुरु केला. आज फ्लीपकार्ट, अमेझॉन या व्यासपीठावरून त्यांच्या उत्पादनाला अ वर्ग श्रेणी आहे. या व्यासपीठावरून दररोज सुमारे २ हजार अंडी व ५० ते १०० किलोपर्यंत चिकन विक्री होते. रेडी टू कुक आम्लेट ४०० ते ५०० पैकेट विकले जातात. यासह नेचर बास्केट, फूड हॉंल, ईझी डे क्लब, यांच्या माध्यमातून सुमारे १०० स्टोअर्समध्ये देशभरात अंडी बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे दिल्ली,कलकत्ता, चेन्नई या महानगरासह पुणे, बंगळूर, अहमदाबाद या मोठ्या शहरामध्ये मागणी वाढली. प्रामुख्याने आखाती देशांमधील दुबई, कतार,शारजाह येथे अंडी व चिकन निर्यातीस मोठी मागणी असते. बदलते मार्केटिंग ट्रेड अभ्यासून आपल्या उत्पादनामध्ये नाविन्यपूर्णता आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असतो. 

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकनाथ अंडी व चिकनला मागणी वाढली असल्याचे ते म्हणाले. ही उत्पादने विक्रीसाठी आवश्यक जनजागृती वेबसाईटद्वारे केली होती. श्री. सोनवणे साहेबांचा अफाट जनसंपर्क असून मित्रपरिवाराचा गोतावळाही मोठा आहे. सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेते, प्रशासकीय सेवेतील अधिकारी, उद्योजक आणि व्यापारी ह्यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. नेहमी सदैव कार्यरत असणारे, शून्यातून आपली वेगळी वाट निवडणारे श्री. सोनवणेसाहेबांना मी शुभेच्छा देऊन मी त्यांची रजा घेतली. अधिक माहितीसाठी digikadaknathagroworld@gmail.com या इमेल वर संपर्क करावा,

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com 

www.DigitalKrushiyog.com

#यशोगाथा 

www.kadaknath.com

#प्रक्रिया उत्पादने 

#Kadaknath77


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...