name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): सीताफळ एक बहुपयोगी फळ ! (Custard apple is a versatile fruit)

सीताफळ एक बहुपयोगी फळ ! (Custard apple is a versatile fruit)

सीताफळ 
एक बहुपयोगी फळ !
Custard apple is a versatile fruit
सीताफळ प्रक्रिया उद्योग
Custard apple Processing Industry

Sitaphal ek bahupayogi fal

  खाण्यासाठी गोड, मधुर आणि चवदार फळ सीताफळ कमी पाण्यावर व ओसाड जमिनीवर हे फळझाड तग धरते. औरंगाबादच्या जवळील दौलताबाद परिसरातील सीताफळे ही अतिशय मधुर व अवीट गोडीची असतात. या सिताफळापासून अनेक उपपदार्थ तयार करता येऊ शकतात. सीताफळ लागवड ते त्याची प्रक्रिया याविषयी उपयुक्त माहिती...


Sitaphal ek bahupayogi fal


  सीताफळ या फळाविषयी मला पहिल्यापासून आकर्षण वाटत आले आहे. खाण्यासाआठी गोड व मधुर चव देणारे सीताफळ प्रत्येकाला खुणावत असते. सीताफळाविषयी मी ना.धों. महानोर यांचे पुस्तकही वाचले आहे. त्यांनी स्वतः अगदी बरड जमिनीत अत्यंत कमी पाण्यात ठिबकवर पन्नास एकराहून अधिक सीताफळ बाग फुलवली आहे. अनेक शेतकरी त्यांची बाग बघून भारावून गेले आहेत. आज राज्यात पडीक जमिनी भरपूर प्रमाणात आहेत. माळरानाच्या, डोंगर उताराच्या हलक्या, बरड जमिनीत सीताफळ चांगल्या प्रकारे उत्पादन देत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. सीताफळाला देशात तसेच परदेशांत, आखाती देशांत भरपूर मागणी आहे. मागणीएवढा पुरवठाही होत नाही. 


 आज अनेक पदार्थात सीताफळाचा वापर वाढला आहे. सीताफळ रबडी, कस्टर्ड आईस्क्रीम, मिल्कशेक, पुडिंग अशा पेय खाद्य पदार्थांमध्ये सीताफळाचा वापर वाढला आहे. त्यामुळे सीताफळाला उत्तम भविष्य आहे यात शंका नाही. कृषी विभागाकडून सीताफळ लागवडीला १०० टक्के अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे सीताफळ लागवड चांगल्या पद्धतीने जोम धरत आहे. हे फळ दुर्मीळ होते परंतु आता याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मग बुलढाणा जिल्ह्यातील प्रवीणकुमार गट्टाणी असो किंवा पुणे जिल्ह्यातील दीपक दामले असोत. यासारख्या असंख्य शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवर मात करीत सीताफळ उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले आहे. आज तर सीताफळ संघही स्थापन झाला आहे. या सर्वांच्या संघटित प्रयत्नांमुळे सीताफळ लागवडीला उज्ज्वल भविष्य आहे. तसेच सीताफळ प्रक्रियेलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. 


 मी जेव्हा एखाद्या फळझाडाच्या प्रक्रियेवर लिहितो तेव्हा लागवड हमखास देत असतो. कारण लागवडीला प्रोत्साहन दिले नाही तर तुम्हाला प्रक्रियेकरिता कच्चा माल कसा उपलब्ध होणार, म्हणून प्रथमतः सीताफळ लागवडीविषयी माहिती सांगतो... 


  सीताफळ या फळझाडाच्या यशस्वी लागवडीसाठी निरनिराळ्या भागांकरिता असणारे हवामान व जमिनीची निवड या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या फळबागेचे यशापयश हे जमीन, हवामान व पाणीपुरवठा यावर विशेष अवलंबून आहे. यापैकी हवामानास फारच महत्त्व आहे. कारण हवामानाचा अंदाज घेऊनच त्या त्या हवामानात कोणत्या प्रकारची फळे यशस्वीरीत्या घेता येतात हे ठरवता येते. हवामानाचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात त्यात उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध तसेच तिसरा शीत कटिबंध. यापैकी महाराष्ट्राचा काही भाग उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात मोडतो. पश्चिम महाराष्ट्र समशीतोष्ण कटिबंधात मोडतो. अशा हवामानात अति कमी पावसाच्या प्रदेशात सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घेता येतात. मग हे हवामान राज्यात कुठेही कमी अधिक प्रमाणात असल्यामुळे सीताफळ चांगल्या प्रकारे या हवामानात येते 


  आपल्या राज्यातील हवामान सीताफळ या फळबागेसाठी अनुकूल असल्याचे अनेक शेतकयांच्या लागवडीवरून लक्षात येते. शिवाय जमिनीच्या बाबतीतही हे पीक चोखंदळ नसल्याचे लक्षात येते. सर्वसाधारणपणे या फळझाडाला कमीत कमी १ मीटर खोल खाली मुरमाचा थर असणारी जमीन पाहिजे. जमिनीचा सामू म्हणजे आम्ल विम्ल निर्देशांक ६ ते ८ च्या दरम्यान असावा, जमीन मध्यम प्रतीची पोयट्याची चांगला निचरा होणारी पाहिजे. उथळ खडकाळ तसेच पाण्याचा योग्य निचरा न होणारी, जमिनीखाली पाण्याची पातळी जास्त असणारी जमीनही या फळझाडासाठी योग्य ठरते.


  पूर्वमशागत म्हणून जमिनीची उभी आडवी नांगरट करणे गरजेचे ठरते. कुळवाच्या पाळीने ढेकळे फोडून जमीन सपाट करावी. या फळबागेस ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरवठा करणार असाल तर जमीन सपाट करण्याची गरज आहे. सीताफळ या फळझाडाची लागवड शक्यतो पावसाळ्याच्या सुरूवातीस करतात म्हणून लागवडीपूर्वी बागेची आखणी, खड्डे खोदणे व भरणे अशी कामे करून घ्यावीत. सीताफळाची रोपे अनेक नर्सरीजमध्ये उपलब्ध असतात. सीताफळाचे बाळानगरी, प्रेमगिरी, सासवडी अशा प्रकारच्या जाती आहेत. सीताफळाची अभिवृद्धी बियांपासून तसेच साधे कलम पद्धतीने होते. तयार रोपे खात्रीशीर मिळवावीत. कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या, चांगल्या जातीची निवड खात्रीशीर, मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून करावी. 


    लागवडीसाठी खड्डे हे ४५ बाय ४५ बाय ४५ से. मी. आकाराचे घेऊन त्यात १ ते १.५ घमेली चांगले कुजलेले शेणखत व कंपोस्ट खत, १ किलो सुपर फॉस्फेट, १० टक्के कार्बारील पावडर घालून पोयटा मातीच्या मिश्रणाने ते खड्डे भरून घ्यावेत. रोपे खड्यात लावताना खड्याच्या बरोबर मध्यभागातील एक चौरस फूट माती बाजूला काढून रोप मुळाच्या खोली इतकेच खोल लावावे. मुळ्या दुमडणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाजूने माती सारून ती दाबून घ्यावी. माती सैल राहू देऊ नये. सीताफळाची लागवड आपणाला कोणत्या पद्धतीनुसार करावयाची आहे. त्यानुसार रोपे लावावीत. 


  लागवडीची पद्धत व झाडामधील अंतर निश्चित केल्यावर खड़े खोदणे व भरणे महत्त्वाचे असते. खड्याचा आकार जमिनीचा प्रकार व त्याचा एकूण होणारा झाडाचा विस्तार यावर अवलंबून असतो. रोप लावल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. आधारासाठी ४ ते ५ फूट उंचीची बांबूची काठी रोवून त्याला रोप सैलसर बांधावे, बागेची पावसाळी, वादळी वारे, जनावरे यांपासून संरक्षण करावे.

Sitaphal ek bahupayogi fal

    पहिल्या वर्षी सीताफळ बागेची झपाट्याने वाढ होते. म्हणून झाडांची आळ्यांची खुरपणी करून तणमुक्त ठेवावे, नत्रयुक्त खताची मात्र द्यावी. सीताफळ बागेला यथोचित छाटणी केली जाते. पहिल्या वर्षी छाटणी केली नाही तरी चालते. परंतु दुसऱ्या वर्षापासून नियमितपणे छाटणी करावी. तिसऱ्या वर्षी खालच्या फांद्या काढून प्रत्येक फांदीवर इंग्रजी व्ही आकाराचा शेप ठेवावा. नियमित छाटणी दरवर्षी मार्च ते मे किंवा पानगळ झाल्यापासून मे महिन्यापर्यंत करावी. झाड सहा फुटांच्या वर जाऊ न देता पेन्सिलएवढ्या, बोटाएवढ्या फांद्या दोन फुटापर्यंत काढून टाकाव्यात. छाटणीचे अनेक फायदे असतात. फळे खोडाला, फांद्यांना कमी उंचीवर लागतात. फळांचा आकार वाढतो. जास्त फांद्या व जास्त फळे लागतात. फळे काढणीवेळी विसरत नाहीत. फळे काढणी कमी वेळेत होते व झाडांचे योग्य पोषण होते.


  सीताफळाच्या एका झाडाला १०० ते १२५ फळे लागतात. बाजारातील भाव कमी जास्त पद्धतीने असतो असा अनेक शेतकऱ्यांना अनुभव आहे. सीताफळ विक्री करून आपण पारंपरिक पद्धतीने विक्री व्यवस्थापन करतो परंतु सीताफळापासून प्रक्रिया केल्यास अशी प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री केल्यास चांगला नफा कमवू शकतो. अशा सीताफळाच्या काही उपयुक्त प्रक्रिया पुढीलप्रमाणे : सीताफळाचा गर व त्यापासून बनणारे उपपदार्थ: 

सीताफळाचा गर व त्यापासून बनणारे उपपदार्थ:

 सीताफळाचा गर आपण सीताफळ खाऊन काढू शकतो. पण त्या गरात असणाऱ्या बिया, फळे फोडणे अशा कटकटीपासून मुक्तता पाहिजे असेल तर तयार सीताफळाच्या गराला मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी आपणाकडे डीपफ्रीज मशीन, पैकिंग मशीन असणे गरजेचे आहे. ३ किलोग्रॅम फळांपासून १ किलो गर निघण्याचे प्रमाण असते. हा नैसर्गिक गर बरेच दिवस टिकतो. सीताफळाचा गर वापरून आपण उपपदार्थही करू शकतो. त्याचा वापर करून सीताफळ रबडी, मिल्क शेक, सीताफळ टॉफी, आईस्क्रीम असे अनेक उपपदार्थ तयार करता येतात.

सीताफळ मिल्क शेक : 

 सीताफळ मिल्क शेक हा शरीरासाठी चांगला असतो. रात्री याचे सेवन केल्यास चांगली गाढ झोप लागते. यासाठी ७०० मि.लि. थंड दूध घेऊन त्यात १५० ग्रॅम साखर टाकावी व हे मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करावे. त्यात आवश्यकतेनुसार बर्फ टाकावा. या मिश्रणात २०० ग्रॅम सीताफळाचा गर टाकून बिटर मशीनने एकजीव करावा. यानंतर चांगल्या प्रकारचे सीताफळ मिल्क शेक तयार होतो. अनेक शहरांत हा मिल्क शेक तयार केला जातो. शिवाय शहरातल्या अनेक ज्यूस सेंटरमध्ये सीताफळ मिल्क शेकच्या एका ग्लासाची किंमत ५० ते १०० रुपयांपर्यंत असल्याचे मी स्वतः अनुभवले आहे.

सीताफळाची कुल्फी किंवा आईस्क्रीम : 

  हे बनवण्यासाठी ६०० मिली. दूध घ्यावे. हे दूध ७ टक्के फॅट असलेले घ्यावे, यात २०० ग्रॅम दुधाची पावडर व १५० ग्रॅम साखर टाकावी. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. या मिश्रणात २०० ग्रॅम सीताफळाचा पल्प टाकून बिटर मशीनने एकजीव करावा. हे मिश्रण हलवून घेतल्यानंतर आईस्क्रीम मशीनमध्ये कुल्फी तयार करावी किंवा आईस्क्रीम तयार करावे. सीताफळापासून बनवलेले आईस्क्रीम अथवा कुल्फी अत्यंत स्वादिष्ट व मधुर असते. शिवाय याला बाजारपेठेत नेहमी मागणी असते.

सीताफळाची बासुंदी :

  अत्यंत चविष्ट व मधुर असलेल्या सीताफळ बासुंदीचा वापर लग्नकार्यात तसेच सणावाराला मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी दुधाची ६०० ग्रॅम थंड बासुंदी घेऊन त्यात चवीप्रमाणे १०० ते २०० ग्रॅम साखर टाकावी व हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. त्यात मिश्रणात २०० ग्रॅम सीताफळ पल्प टाकावा. यात आणखी चारोळी, बदाम अथवा काजूचा वापर केल्यास बासुंदी लाजवाब होते. सीताफळाच्या बासुंदीला राजेशाही जेवणात स्थान असल्याचे अनेक प्राचीन दाखल्यांवरून स्पष्ट होते.


सीताफळाची चॉकलेट किंवा टॉफी : 

  सीताफळाची चॉकलेट किंवा टॉफी तयार करण्यासाठी १ किलोग्रॅम सीताफळ गर, साखर ५०० ग्रॅम ग्लुकोज १०० ग्रॅम, दूध पावडर १५० ग्रॅम, वनस्पती तूप १०० ग्रॅम जरूरीप्रमाणे इसेन्स व रंग वापरावा. यात सीताफळाचा गर स्टीम जैकेट भांड्यात १/३ होईपर्यंत आटवावा इतर वरीलप्रमाणे पदार्थ टाकून एकजीव शिजवावेत व त्याची गोळी विरघळणार नाही याची खात्री करावी. नंतर दूध पावडर थोड्या पाण्यात टाकून त्याची पेस्ट तयार करावी व वरील उकळत्या मिश्रणात टाकून चांगली मिसळावी, हे शिजवलेले मिश्रण स्टीलच्या परातीत किंवा ट्रेला तुपाचा हात देऊन पातळ पसरवावे. यावेळी यात सुगंधी फ्लेवरचा वापर जरूरीनुसार करावा. या मिश्रणाचा थिकनेस ३ सें.मी. पर्यंत जाड नसावा. हे मिश्रण ३ तास थंड करावे. त्यानंतर आपण जशी बर्फी करतो तशा स्टीलच्या चाकूने योग्य त्या आकाराच्या वड्या कापाव्यात. चांगल्या मार्केटिंगसाठी बटरपेपरमध्ये गुंडाळून आपल्या बँडनेमच्या प्लॅस्टिक पेपरच्या शीटमध्ये गुंडाळून याची विक्री करावी. 

Sitaphal ek bahupayogi fal

सीताफळाचे कीटकनाशक : 

   सीताफळाचे पाने व बिया या विषारी असल्यामुळे त्यांचा कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे उपयोग करता येतो. सीताफळाच्या पानांमध्ये अॅन्कोरीन व अॅनोनीन यासारखी विषारी अल्कोलाईड द्रव्ये असतात. त्यामुळे या झाडाची पाने शेळ्या, मेंढ्या व गुरे खात नाहीत. पानातील अॅन्कोरीन या कीटकनाशकामुळे या फळझाडावर अगदी कमी प्रमाणात किडी येतात. त्यामुळे सीताफळ बागेला संरक्षणाचा अत्यंत कमी खर्च लागतो. सीताफळाच्या बियांमध्ये रोग व किडविरोधी अॅसिटोजेनी या नावाचे रसायन सापडते. हे रसायन कीटकांना हानिकारक असते असे हैदराबाद येथील एक्रिसाट या संस्थेतील संशोधनावरून समजते. सीताफळाच्या पानांचे व बियांचे अर्क स्पर्शजन्य व पोटातील विषजन्य म्हणून काम करतात. हे अर्क कीटकनाशक, अळीनाशक व कीटकांचे अप्रिय खाद्य असे तिहेरी पद्धतीने काम करते. सीताफळाच्या बियांमध्ये ३० ते ४० टक्के विषारी तेल असते. या कीटकनाशकामुळे कोबीवरील मावा, कडधान्यावरील किडे, भातावरील विटकरी, हिरवे व पांढऱ्या पाठीचे तुडतुडे, पाठीवरील चौकोनी ठिपक्यांचा पतंग, शेवंतीवरील मावा, गवती टोळ, हिरवे ढेकूण, लाल भोपळ्यावरील लाल भुंगेरे, खोडकिडा, केसाळ अळी, कणसातील ढेकूण इत्यादी अनेक प्रकारचे कीड नियंत्रण होते.


    वेस्ट इंडीजमधील एका विद्यापीठाने सीताफळाची पाने व बिया यात कीटकनाशक गुणधर्म असल्याचे सिद्ध केले आहे. नवी दिल्ली येथे औषध संशोधन संस्थेच्या प्रयोगात असे दिसून आले आहे की, सीताफळाच्या बियांच्या अर्कात अल्कलाईडस हे विषारी द्रव तर असतेच पण थोड्या फार प्रमाणात ग्लुकोज, फ्रुक्टोज यासारखी ग्लायकोसाईडस व स्टेरॉईडस रसायने पण असतात. 

     अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झालेल्या प्रयोगातून असे दिसून आले आहे की, सीताफळाच्या पानांचा अर्क वापरल्यामुळे रेनीफॉर्म सूत्रकृमी नियंत्रणात आल्या आहेत. सीताफळाची पाने व बिया तर विषारी आहेतच परंतु त्या झाडाच्या खोडामध्ये हायड्रोसायनिक आम्ल नावाचे विषारी रसायन असते. त्यामुळे या झाडांच्या खोडांना वाळवी अथवा उधई लागत नाही. 


  सीताफळाच्या बियांचे तेल काढल्यावर जी पेंड मिळते ती सीताफळाची पेंडसुद्धा कीटकनाशक असून झाडांना पोषक असते. काही ठिकाणी तलावात सीताफळांच्या बियांची भुकटी टाकतात त्यामुळे तेथील मासे मरतात व मासे धरणे सोपे जात असल्याचे कळते. सीताफळाच्या बियांची भुकटी डोळ्यांत गेल्यावर डोळ्यांची खूप आग होते. यामुळे ह्या बियांची भुकटी करताना खूपच काळजी घ्यावी लागते. भारतातील ग्रामीण भागातील काही स्त्रिया डोक्यातील उवा मारण्यासाठी शिकेकाई भुकटीमध्ये थोड्या प्रमाणात सीताफळाच्या बियांची भुकटी वापरतात. मात्र डोके धुतांना ही भुकटी डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.

सीताफळांचे पानांचे व बियांचे अर्क तयार करणे :  

   सीताफळाच्या पानांचे अगर बियांचे अर्क तयार करण्यासाठी ती पाने, बिया किवा बियांची भुकटी पाण्यात भिजवतात. काही लोक बिया किंवा भुकटी तीन दिवस भिजवतात आणि मग त्याचा पाण्यासहित ठेवून किंवा कुटून, आल्यात पिसून अर्क काढतात. बिया पाण्यात भिजवून कुटण्यापेक्षा अगोदर त्याची भुकटी करून घ्यावी व नंतर भिजविणे सोपे जाते. काही लोक पेट्रोल किंवा केरोसीन रॅकिलमध्ये टाकून अर्क करतात. सेंद्रिय शेती पद्धती व रासायनिक शेती पद्धती या दोन्ही पद्धतीसाठी सीताफळाचा अर्क लाभदायी आहे. अनेक कृषितज्ज्ञ किंवा कन्सल्टेंसी करणाऱ्या काही सीताफळाची पाने व बिया यांचा अर्क कीटकनाशक म्हणून वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देतात. अनेक शेतकरी त्यांच्या सल्ल्यानुसार पानांचा व बियांचा अर्क फवारतात. सीताफळाच्या पानांचा व बियांचा अर्क हा सेंद्रिय शेती करणाऱ्यांना वरदानच आहे. सीताफळाची व अनेक प्रकारची विषारी वनस्पतीचा पानांचा अर्क काढून आता कीटकनाशक म्हणून शेतकरी फवारायला लागले आहेत.

    आता तर शेती क्षेत्रात विशेषतः सेंद्रिय शेती करणाऱ्यांना दशपर्णी अर्क माहीतच आहे. हा दशपर्णी अर्क दहा झाडाच्या पाल्यापासून तयार करतात. त्यासाठी कडुनिंब पाला १० किलो, घाणेरी किंवा टणटणीचा पाला २ किलो, निरगुडी पाला २ किलो, पपई पाला २ किलो, गुळवेल पाला २ किलो, सीताफळ पाला ३ किलो, करंज पाला २ किलो, लाल कन्हेरी पाला २ किलो, रुईचा पाला २ किलो, मोगली एरंड पाला २ किलो अशा दहा वनस्पतींचा अर्क मिळून दशपर्णी अर्क करतात. याचे मिश्रण उत्तम प्रकारे कीड व रोगनाशकाचे काम करते. वर उल्लेखलेल्याप्रमाणे काही झाडांचा पाला न मिळाल्यास त्यांच्याऐवजी कारल्याचा पाला २ किलो, लसूण ठेचा पाव किलो, देशी गाईचे शेण ३ किलो, गोमूत्र ५ लिटर असे सर्व पदार्थ एकत्र करून २०० लिटर पाण्यात टाकावे. हे द्रावण एक महिनाभर आंबवावे. दिवसातून तीन वेळेस काडीने ढवळावे. निमपाला व निंबोळ्या यांच्यात अॅझेडिरेक्टीन हे विषारी द्रव्य असते. त्यात कीटकनाशकाचे गुणधर्म असतात, निम पाला व निंबोल्याचा अर्क तसेच सीताफळाच्या पानांचा किंवा बियांचा अर्क हे एकमेकांना पूरक असे आहेत. कीडनाशक बनवतांना शास्त्रीय आधार घ्यावा. ही माहिती मी तुम्हाला मार्गदर्शक वाटाड्या म्हणून दिली आहे. अधिक खोलात शिरून माहिती घेऊन सीताफळापासून कीडनाशक तयार करता येईल.


Sitaphal ek bahupayogi fal

   अशा पद्धतीने सीताफळ हे गुणकारी असे फळझाड आहे. त्याच्या पानांपासून ते बियांपर्यंत अनेक औषधी गुणतत्त्वे सामावलेली आहेत. सीताफळापासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून मूल्यवर्धनाने किंमत मिळवता येईल.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...