name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम (Agri Business Management Course of Yashwantrao Chavan Maharashtra Open University)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम (Agri Business Management Course of Yashwantrao Chavan Maharashtra Open University)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा
कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम 
Agri Business Management Course of Yashwantrao Chavan Maharashtra Open University


Mukta vidyapithacha krushi vyavasay vyavasthapan abhyaskram

 मुक्त विद्यापीठातून कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सन २००१ पासून सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, कृषी व्यवस्थापन संकल्पना आणि महत्त्व, वित्त व्यवस्थापन, कृषी विपणन, शेतीमालाची विक्री व्यवस्था, शेती उत्पादनाची निर्यात इ.चा समावेश आहे. तसेच मालाचा दर्जा, फळे, भाजीपाला व फुलांची तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्यात, कृषी व्यवसाय विश्लेषण साधने आदी घटकांविषयी सविस्तर माहिती असल्यामुळे हा अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे.


   जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार भारतीय बाजारपेठ जगासाठी नुकतीच खुली करण्यात आली. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असलेल्या भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे अमर्याद वरदान लाभलेल्या भारताने कृषी क्षेत्रात आश्चर्यजनक प्रगती केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मागासलेल्या या देशाने स्वातंत्र्यानंतर आधुनिक शेतीचा अवलंब करीत हरितक्रांती घडवली. यामध्ये शेतक-यांसह कृषी विद्यापीठे, मुक्त विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था, कृषिशास्त्र यांचाही बहुमोल वाटा आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार एक अब्ज लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरविण्याचे प्रचंड आव्हान कृषी क्षेत्रासमोर आहे. तसेच जागतिक स्पर्धेचाही विचार करावा लागणार आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा लाभ उठवून अन्नधान्य, फळे, फुले, भाज्या, वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, तेलबिया आदींच्या निर्यातीला प्रचंड वाव आहे. तसेच उद्योगधंद्यासाठी लागणारा प्रचंड कच्चा माल पुरविण्याचे कामही कृषी क्षेत्राला करावे लागते. त्यामुळे या क्षेत्राकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच अत्याधुनिक, शास्त्रीय, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासकम या व्यवसायातील संबंधितांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.

     
  अविकसीत देशात हजारो वर्ष शेतीव्यवसाय पारंपरिक पद्धतीने केला जात होता; परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर शेतीक्षेत्राचे यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण होत आहे. विविध प्रकारच्या नवनवीन शेतीआदाने नवीन तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. 
 
  उदाहरण द्यायचे झाले तर संकरीत बी-बियाणे, रासायनिक कीटकनाशके, औषधे आपल्या शेतावर वापरल्यास त्यापासून अधिक उत्पादन होईल? त्याच्या विक्रीस जादा खर्च किती येईल? ही नवी आदाने वापरल्यामुळे विशिष्ठ आकाराच्या शेतीपासून निव्वळ नफा किती मिळेल? इत्यादी प्रश्नांची चर्चा करणे, उत्पादन खर्च व त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाचे विश्लेषण करणे आवश्यक वाटू लागले. साहजिकच यातून शेतीचे व्यवस्थापन या विषयाकडे अधिकाधिक लक्ष वेधले जाऊ लागले व त्यातून शेतीचे व्यवस्थापन हे नवे शास्त्र उदयास आले.
     
 या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांकडे शिक्षणाबरोबरच काही अन्य पात्रता असाव्यात. शेतीउद्योग मनुष्यबळावर आधारीत आहे. यातील बहुतेक काम करणाऱ्या व्यक्ती अकुशल, निरक्षर असल्याने त्यांच्याशी जुळवून काम करून घेण्यात कौशल्य लागते. उन्हातान्हात काम करण्याचा कष्टप्रद व्यवसाय असल्याने उत्तम आरोग्य हवे. शेती पूर्णपणे निसर्गांवर आधारीत असल्याने हवामानाचे सखोल ज्ञान गरजेचे आहे. 

  टोळधाड, झाडांवर अचानक उद्भवणारे रोग, किड़ी, अळ्या इत्यादींमुळे लक्षावधी मनुष्यबळाची आणि पैशाची नासाडी होण्याची शक्यता गृहीत धरून अनपेक्षित संकटाला सामोरे जाण्याची तयारी कायम ठेवावी लागते. अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शास्त्रीय दृष्टी आवश्यक ठरते. तयार मालाला चांगला भाव मिळविण्याच्या दृष्टीने बाजारपेठेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. हे ज्ञान डोळसपणे घेता यावे, त्याकडे पाहण्याची दृष्टी मिळावी म्हणून कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम आज महत्त्वाचा ठरला आहे.
 
  शेतीच्या व्यवस्थापनात विशिष्ट शेतावर कोणते पीक घेणे योग्य होईल, त्याचे प्रमाण काय असावे, कोणते आदान किती प्रमाणात वापरावे, विक्रीव्यवस्था, मुख्य पिकाबरोबर इतर जोडधंदे इत्यादी विश्लेषण करून घ्यावे लागतात. हे निर्णय कृतीत आणणे म्हणजे कृषी व्यवस्थापन होय. 

   आधुनिक काळामध्ये शेती ही केवळ एक जीवनपद्धती न राहता तो एक व्यवसाय आहे. जीवनपद्धतीमध्ये केवळ पोटापुरते हा मुख्य उद्देश असतो तर व्यवसायामध्ये उत्पादन कार्यदक्ष करून जास्तीत जास्त नफा मिळविणे हा मुख्य हेतू असतो. उत्पादन कार्यदक्ष आणि फायदेशीर करण्यासाठी शेती उत्पादनामध्ये नवीन तंत्रे आणि निविष्ठांचा वाढता वापर होत आहे. तसेच जागतिक मुक्त व्यापारामुळे निरनिराळ्या देशातील बाजारभाव, मागणी, पुरवठा इत्यादी माहितीसाठी कृषी व्यवस्थापनात माहिती-तंत्रज्ञानाचे सुद्धा महत्त्व आहेच.
       
 शहरी भागात मोठ्या प्रमाणावर झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण त्याचबरोबर खेड्यातून शहराकडे येणारा लोकांचा लोंढा थांबविण्यासाठी ग्रामीण भागातच लोकांना रोजगार पुरविणे, शेतीशिवाय कुटीर व लघुउद्योग यांचा विकास करणे, ग्रामीण भागातच उद्योगांच्या विकासाला चालना देणे, त्यासाठी आवश्यक ते प्रोत्साहन देणे इत्यादी उपाय सुचविण्यात येतात आणि शेतीच्या विकासास योग्य स्थान, प्राधान्य दिले तर शेती उत्पादन वाढून वाढीव उत्पादन कुटिरोद्योगांच्या उत्पादन व विकासासाठी वापरता येईल. 

  एकूणच ग्रामीण भागाचा विकास साध्य करता येईल व त्याचबरोबर शहरी भागातही निर्माण होत असलेल्या गंभीर समस्या कमी करता येतील. त्यासाठी ग्रामीण भागातील प्रमुख असलेला शेतीव्यवसाय व त्याचे व्यवस्थापन चांगले होण्यासाठी हा अभ्यासक्रम चालना देतो. 

 मुक्त विद्यापीठाची कार्यप्रणाली इतर विद्यापीठापेक्षा बंदिस्त नसल्यामुळे या अभ्यासक्रमाला तळागाळातील शिक्षित युवा शेतकरी प्रवेश घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी संयोजक, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी विज्ञान विद्याशाखा, य.च.म. मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.

© दीपक केदू अहिरे
नाशिक

(पूर्वप्रसिध्दी : दै.देशदूत, कृषीदूत पुरवणी,दि.४ सप्टेंबर २००१,पान १२)


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...