डांगी गायीच्या संवर्धनासाठी
डांगी गोपालन संघटन
Dangi Gopalan Sanghatan for the conservation of Dangi cow
नाशिक जिल्हा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथे श्री. योगेश ज्ञानेश्वर महाले यांनी डांगी गोपालन संघटन उभे केले आहे.
डांगी गोवंशावर काम
सुरवातीला त्यांनी आपल्या भागातीलच स्थानिक असलेल्या डांगी गोवंशावर काम करण्याचे ठरविले. लुप्त होत चाललेल्या देशी डांगी गोमातेचे संवर्धन त्यांनी केले असून सोबत काही उत्पादनेही निर्मित केले आहेत. गोमूत्र, शेण, घन जीवामृत, द्रव जीवामृत ते तयार करतात. अगदी माफक दरात ही उत्पादने विकत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्पादनांची निर्मिती
जमिनीस उपयुक्त जिवाणूंचा भंडार म्हणजे डांगी घनजीवामृत, द्रव जीवामृत हे आहेत. देशी डांगी गाईचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून घन जीवामृत आणि द्रव जीवामृत बनवले जाते. कमी दुधाचे प्रमाण त्यामुळे डांगीच्या गोमुत्र आणि शेणामध्ये असंख्य उपयुक्त जिवाणू असतात जे जमिनीला सुपीक बनवतात आणि झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. द्रव जीवामृत आणि घन जीवामृत याचा वापर परसबाग, कुंडीतील रोपे आणि सर्व प्रकारची शेती यासाठी केला जातो. घन जीवामृत वापरण्याचे प्रमाण एका रोपासाठी ८० ते १०० ग्रॅम असून द्रव जीवामृतचे प्रमाण एका रोपासाठी ५० ते ८० मी.ली.असून त्यात आवश्यक तितके पाणी मिसळून सोडावे असे श्री. महाले म्हणाले.
डांगी गोपालनाची सुरुवात
श्री. महाले पुढे म्हणाले की, जर्सी ही गाय नसून गाई सदृश्य विदेशी प्राणी आहे. या विदेशी प्राण्याचे विषारी दूध विकून अनेक जण आज पैसा कमवित आहे. जर्सी दुधाच्या अर्थव्यवस्थेने प्रादेशिक गौवंश बाटविला, घटविला जात आहे म्हणून आम्ही डांगी गोपालन करत असल्याचे ते म्हणाले. आम्ही डांगी गोपालक संघटन वाढोली येथे सुरू केले असून आमच्यासारखे थोडे गौपालक दुधाची अपेक्षा न करता शुद्ध स्वरूपात प्रादेशिक गौवंश सांभाळीत आहेत. गीर, सहेवाल सारख्या भारतीय गौवंशाच्या जास्त दूध देण्याच्या क्षमतेमुळे त्यांना जगण्याचा संघर्ष नाही. पण कमी व दूध न देणाऱ्या भारतीय प्रादेशिक गौवंशाला जगण्याचा अधिकार नाही का? असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रादेशिक गौवंश उपयुक्त
कमी व दूध न देणारा भारतीय प्रादेशिक गौवंशच खरेतर या देशाच्या मातीसाठी व पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण कमी दूध देणाऱ्या गाईंची सर्व ऊर्जा तीच्या शेण, गौमूत्रात एकवटली जाते. कमी दूध देणाऱ्या भारतीय प्रादेशिक गौवंशाच्या एक ग्राम शेणात २०० ते ४०० कोटी अत्यंत उपयुक्त जीवाणू असतात व आमच्या डांगी गौपालक, वाढोली संघटनेच्या शुद्ध स्वरूपात जतन केलेल्या ३०० पेक्षा जास्त डांगी गाई डोंगरावरील वनस्पती खाऊन मोकळ्या सूर्यप्रकाशात फिरतात यामुळे या गाईचे शेण व गौमूत्र म्हणजे या धरतीसाठी अमृतरुपी औषधच असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले.
श्री.योगेश महाले |
गोमूत्रापासून बनविलेले जीवामृत
शेणखतापेक्षा अधिक परिणामकारक डांगी गाईच्या शेण गोमूत्रापासून बनविलेले घनजीवामृत, जीवामृत आपल्या जमिनीत, परसबागेत मातीतील जीवांची संख्या वाढवून ह्यूमसची निर्मिती करण्यास मदत करतात व कुठलेही खत न वापरता विषमुक्त, रसायनमुक्त भरघोस पिक घेता येते हे सिद्ध झालेले आहे. दोन दिवसांच्या दुधाचे पैसे शुद्ध स्वरूपात प्रादेशिक गौवंश जतन करणाऱ्या गोपालकांच्या मातीसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादने विकत घेऊन सहकार्य केल्यास प्रादेशिक गौवंश जगेल व आपली जमीनही जगवेल यासाठी
संकरीत गायीपेक्षा सरस
श्री. महाले यांनी सुरवातीला डांगी जातीचा अभ्यास केला. यावेळी त्यांना असे दिसले की डांगी गायीवर मुळातच शास्त्रोक्त पध्दतीने संशोधन कमी झालेले आहे. मार्केटसुध्दा स्थानिक असल्याने व ही गाय देशी व संकरीत गायीपेक्षा सरस वाटल्याने त्यांनी या गायीची निवड केली. कारण जास्त पावसाच्या आणि डोंगराळ भागातील जास्त आद्रतेच्या वातावरणात तग धरण्याची क्षमता या जातीमध्ये असते. आणि ती अशा परिस्थितीत सुद्धा आजारी पडत नाही. दर १४ ते १५ महिन्याला एक असे अनेक वेत ती देते. बैल डोंगराळ भागात शेतीची कामे, ओढ कामे अतिशय उत्तमरीत्या करतात. म्हणून बैलाला सुद्धा मागणी असते.
डांगी गाईचे व्यवस्थापन
डांगी गाईचे पारंपरिक व्यवस्थापन आणि संगोपन यातील बारकावे श्री.महाले यांनी समजून घेतले. डांगी हा देशी गोवंश शेती आणि ओढ कामासाठी प्रामुख्याने वापरली जाणारी जात असली तरी त्यातील काही गाई ह्या जास्त दूध देण्याच्या क्षमता असणाऱ्या आहे असे श्री.महाले यांना निरीक्षणावेळी दिसून आले. त्याचबरोबर येणाऱ्या काळात बैलाचे शेतीतील महत्त्व कमी होत असले तरी मनुष्याला, जगाला दुधाची आवश्यकता भासणार आहेच.
ओढ कामातील बैलाचे महत्त्व कमी
पारंपरिक पद्धतीने डांगी गाईच्या पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची निवड ही शेती आणि ओढ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलाची शारीरिक ठेवणेनुसार केली जाते. परंतु, गाईचे दूध उत्पादन हे दुय्यम गोष्ट आहे हे लक्षात आले. त्यानुसार जास्त दूध उत्पादनक्षमता असलेल्या गाईच्या शारीरिक ठेवण नुसार असलेले वळू कसा असावा हे निश्चीत केले. कारण आता डांगी गाय जगवायची म्हणजे त्यातून दूध निर्मिती वाढली पाहिजे आणि शेतीतील व ओढ कामातील बैलाचे महत्त्व आधुनिकीकरणानुसार जवळपास संपलेले किंवा कमी झालेले आहे. तसेच जास्त पाऊस पडत असलेल्या डोंगराळ भागात, जास्त आद्रतेच्या भागात, मुबलक प्रमाणात दूध देणारी गाय तयार होऊ शकते हे जाणले.
पैदाशीची शास्त्रशुद्ध आखणी
दूध देणाऱ्या गाई आणि जास्त दूध देणाऱ्या गाईच्या शरीररचनेत बदल आत्मसात करत त्याचे निरीक्षण काटेकोर केल्यानंतर असे अनेक गुण जे बाहेरून दिसतात, त्याचा दूध उत्पादन क्षमतेशी संबंध कसा व का आहे, हे गणित पक्के झाले. आणि त्या गुणवैशिष्ट्यांची यादी केली. यामध्ये प्रामुख्याने नाकपुड्यांची ठेवण, चेहऱ्याची लांबी निंबोली, शिंगाचे प्रकार, शिंगाचा आकार,शिंगाच्या टोकांची दिशा, डोळ्यांची ठेवण, कपाळाची ठेवण, मानेची लांबी, त्वचा रंग, व वंशिड, शरीराचा आकार, शेपटी, कमरेचा चौक, मागील पायांची ठेवण, अंगावरील केस, भवरे, गळवंट, कासेची ठेवण, सडांचे प्रकार, सडांची ठेवण, दुधाची शीर इत्यादी प्रत्येक बाह्मगुणाचे वेगवेगळे उपप्रकार आणि त्याची जास्त दूध देणाऱ्या आणि कमी दूध देणाऱ्या गाईमध्ये आढळण्यानुसार वर्गवारी केली, त्यानुसार गाईची निवड करून वंशवळीनुसार त्यांच्या पैदाशीची शास्त्रशुद्ध आखणी केली आणि सुरुवातीलाच गाई आणि वळू यांच्यापासून पुढे जाण्याचे ठरवले आणि डांगी गोपालन संघटन वाढवले. त्यांना या कामी श्री. दत्तू महाले, अंकुश महाले इ. ची मदत लाभत आहे.
- deepakahire1973@gmail.com
- www.ahiredeepak.blogspot.com
- www.digitalkrushiyog.com
- digitalkrushiyog@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा