मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी माझे विचार
मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी मोठमोठ्या समुदायाला व्यापक प्रमाणात मराठी भाषा वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी अंगीकारावी वाटत नाही. तोपर्यंत ती ज्ञानभाषा होऊ शकत नाही. जगात दहा कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या वीस भाषांमध्ये मराठी बोलली जाते. तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही.
एखाद्या भाषेत करियर करायचं झाल तर इंग्रजी भाषेत होऊ शकत तसं ते मराठी भाषेत होत नाही. म्हणून मराठी ज्ञानभाषा समृद्ध मराठीचा जास्तीत जास्त वापर जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात होणे गरजेचे वाटते.
राज्यातल्या मोठमोठ्या शहरात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या अनेक परप्रांतीयांना मराठी येत नाही. तरीही व्यवसाय करतात. कारण मराठी भाषा न शिकताही त्यांचे चालते. भाषेची अनिवार्यता आडवी येत नाही परंतु तामिळनाडू, बंगाल, कोलकत्ता या शहरात ही परिस्थिती नाही. तिथे तुम्हाला तामिळ भाषा न येता तुम्ही चेन्नईत राहूच शकत नाही. एवढी भाषेची आवश्यकता आपल्याकडे झाली पाहिजे तरच मराठी भाषा समृद्ध होईल.
आज मराठी शाळेमधलं आकर्षण संपलं आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत मराठीच स्थान शोधावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा घसरलाआहे. मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी, मराठी भाषा टिकवण्यासाठी या शाळांचा दर्जा उंचावला पाहिजे असे माझे मत आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तके दर्जेदार झाली पाहिजेत.
पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक चुका, दोष आढळतात. त्यामुळे भाषेची वाट लागते. त्यामुळे मराठी भाषेच्या जाणकारांकडून पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रिया निरपेक्ष व्हावी. राजकीय लोकांचा हस्तक्षेप टाळावा. टी.व्ही. व मोबाईलमुळे वाचन संस्कृतीवर आघात झाला आहे. पूर्वी मराठी वाचनाची गोडी लागायची. दैनिके, साप्ताहिके, मासिके पूर्वी आवडीने वाचली जात. परंतु आज वाचन संस्कृती कमी झालीआहे.
मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी मराठी भाषेचे वाचन होणे गरजेचे आहे. मराठी भाषेत दर्जेदार साहित्यनिर्मिती झाली पाहिजे. मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी एकच एक मराठी भाषा संपूर्ण राज्याला जोडून ठेवू शकलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. दर दहा किलोमीटरवर भाषा बदलते. स्थानिक बोलीभाषेतले अनेक शब्द शोधून ते प्रमाण मराठीतले आहे यासाठी प्रयत्न अभ्यासक, संशोधकांनी करणे गरजेचे वाटते.
आज इंटरनेटवर म्हणजे आंतरजालावर शब्दशोध करायला गेले तर फारसे पर्याय नाहीत. त्यामुळे आंतरजालावर मराठी लेखन मोठ्या प्रमाणात व्हावे. आधुनिक मराठी शब्दकोश तयार केला पाहिजे. तरच आपण मराठी ज्ञानभाषा समृद्ध करू शकू. इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठी शब्द आहेत. तो वापरणे म्हणजे मराठी भाषेचे सौंदर्य टिकवण्यासारखे आहे. मराठी समजणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर केला पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रतिभावंत ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. मायभाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातल्या ओवीतून बंधू निवृत्तीनाथ यांना मातेच्या रुपात पाहून मराठी भाषेची समृद्धी व विपुलता व्यक्त केली आहे. अनेक संतवचनातून व वाणीतून मराठी भाषा समृद्ध झाली आहे. सातशे वर्ष परंपरा लाभलेल्या वारकरी सांप्रदायाने मराठी भाषेचा विकास केला. अनेक संतानी आपपल्या बोलीभाषेप्रमाणे तिला अभंगवाणीतून प्रकट केले. त्याचा अभ्यास प्रत्येक मराठी भाषिकांनी केला पाहिजे. तरच मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होईल. बोली भाषेतील गोडवा, भावुकता, रांगडेपणा, आदरतिथ्य दिसून येते.
कवी गझलकार सुरेश भट यांच्या गझलेत मराठीच्या सामर्थ्याचे दर्शन घडते.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असते कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी समोरची व्यक्ती ओळखीची असो कि अनोळखी, बोलण्याची सुरुवात मराठीतून करावी. अमराठी प्रश्न आला तरी उत्तर मराठीत द्यावे. मराठीत सेवा मागाव्या. नसतील तर त्याबद्दल तक्रार करावी. व्यापार आणि व्यवहारामध्ये मराठी भाषा आणि मराठी माणूस यांनाच प्राधान्य द्यावे. तरुणांनी काय आणि वयस्कर माणसांनी काय, ज्यांना मराठी भाषा ही आपली भाषा वाटते त्यांनी ती स्वतः व्यवहारात आणावी आणि आपसात बोलायला सुरुवात करावी असे मला वाटते.
मराठी बोला! मराठी लिहा! मराठी वाचा! मराठीत व्यवहार करा! ही चतु:सुत्री मराठीच्या संवर्धनासाठी, समृद्धीसाठी वापरणे गरजेचे आहे.
मराठी जागवायची असेल तर तिला ज्ञानभाषा बनवणे. तिच्यापासून पैसा मिळेल याची सोय करणे. मित्र मैत्रिणींचा वाढदिवस असेल तर मराठीतून शुभेच्छा देणे, सोशल मीडियातून मराठीतून संवाद साधावा. मराठी साहित्य वाचावे. मराठी चित्रपटाला, नाटकाला प्राधान्य द्यावे. याचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी भाषांवर बहिष्कार टाकावा. ती भाषा बोलूच नये असा होत नाही. या भाषा नोकरी, व्यापार यासाठी जरूर शिकाव्यात. त्यांचा अभ्यास करावा पण मराठीला प्राधान्य द्यावे. अशा पद्धतीने मराठी भाषा समृद्धीसाठी प्रत्येकाने पेटून उठले पाहिजे.
मराठीचा सार्वत्रिक वापर करून, मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करून संशोधन, साहित्यनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे. मी स्वत: मराठी भाषेतील आशयपूर्ण दीड हजार कविता, ५ शेतीची पुस्तके, ५० मराठी उद्योजकांच्या मुलाखती तसेच लेख, बातम्या, साहित्य आदि लिखाण केले आहे. मराठी राजभाषा व्हावी म्हणून कवितेद्वारे पत्रप्रपंच केला आहे. मराठी भाषा समृद्धीसाठी माझा हा खारीचा वाटा आहे. आणि हाच निरंतर प्रयत्न करत राहणार यात शंका नाही.
दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा